Saturday, March 30, 2019

माझा तानपुरा

मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या, घरी टेपरेकॉर्डर, टीव्ही असणाऱ्या आणि लायब्ररीसाठी पैसे मागितले तर लगेच मिळणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्यात हा माणूस जशा प्रकारे आला त्याचप्रकारे माझ्याही आयुष्यात आला. त्याने माझं वाचनविश्व समृद्ध करून टाकलं.

त्याने लिहिलेल्या नवे गोकुळमधली “आणि इतर बालगोपाळ” या सदरात मोडणारी भूमिका करून झाल्यावर त्याच्याच वयं मोठं खोटं मध्ये दूधवाल्याची तीन-चार संवाद असलेली भूमिका (मला आपलं उगाच वाटलं होतं की पात्रपरिचय करून देताना “आणि दूधवाल्याच्या प्रमुख भूमिकेत आनंद मोरे” अशा धर्तीवर माझं नाव पुकारतील, पण पात्रपरिचय करून देणाऱ्या शिक्षकांचं नाटकाबद्दलचं आकलन माझ्यापेक्षा अधिक सुस्पष्ट होतं त्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही) केली होती तेव्हा याच्याबद्दल काही माहित असावं इतकं वय नव्हतं आणि वाचनही नव्हतं. नंतर वाचन सुरु केलं तेव्हा कळलं की मराठी बालरंगभूमीची आपण जी काही अत्यल्प सेवा केली आहे ती देखील याच्यामुळेच.

प्राथमिक शाळेत असताना मी केलेली रंगभूमीची सेवा पाहून रंगदेवता तृप्त झाली की नाही ते माहिती नाही पण ‘आपला प्रवेश संपला तरी स्टेजवरून न जाणारा दूधवाला’ हा माझा लौकिक मात्र शाळेच्या सर्व कलाशिक्षकांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पुढे मी नाट्यदेवतेची आराधना करायचं सोडून प्रेक्षकांत बसून मराठी रंगभूमीची निष्काम सेवा करू लागलो.

अभिनयाचं भूत उतरल्यावर जेव्हा पुस्तकांकडे माझी दृष्टी वळली तेव्हा याच्या प्रवासवर्णनांनी, व्यक्तिचित्रणांनी, सहज आणि निर्विष विनोदांनी आणि काल्पनिक आत्मचरित्रानी माझ्या शाळकरी वयात मोठी बहार उडवून दिली. पुस्तकांची गंमत वाढत असताना, प्रत्येक पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिसणारा हा बाबा आठवड्यातून एकदा टीव्हीवर अवतरू लागला. मग अलूरकर म्युझिक हाऊसतर्फे त्याच्या पुस्तकांच्या त्यानेच केलेल्या अभिवाचनाच्या कॅसेट्स निघू लागल्या आणि त्याच्या शब्दांना ध्वनीरूप मिळालं. आता त्याची पुस्तकं मुखोद्गत होणं सहजशक्य होतं आणि त्या जोरावर वर्गातील सुबक ठेंगणींसमोर भाव खाणंही सोपं होतं.

हे चालू असताना आठवीत की नववीत असताना एक धडा आला. ‘हे जग मी सुंदर करून जाईन’. अगदी चवीपुरता नर्मविनोद असलेला धडा म्हणजे एका शाळेतील गॅदरिंगपुढे केलेलं भाषण होतं. धडा मोठा होता पण इतका मोठा असूनही कुठेही कंटाळवाणा वाटत नव्हता. त्यातलं ‘जाताना मी माझ्या अस्तित्वाचे ठळक कुरूप ठसे सोडून न जाता हलक्या सुंदर खुणा सोडून जाईन’ अशा अर्थाचं वाक्य मनात चटकन खोलवर रुजलं. नंतर जेव्हा परीक्षेसाठी या धड्याचा अभ्यास केला तेव्हा कळलं की हे भाषण याच मिश्किल आजोबांनी केलेलं होतं. त्यानंतर मग केवळ टीव्ही किंवा कॅसेटवर मिळणारी त्याची पुस्तकं न वाचता त्याने लिहिलेला शब्द न शब्द वाचायची ओढ लागली.

जाल्मिकीचे लोकरामायण असो किंवा मग खिल्लीमधला ‘आम्ही सूक्ष्मात जातो’ असो किंवा ‘अंतुले साहेब तुम्हारा चुक्याच’ असो किंवा मग मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास असो किंवा मग स्त्रीजातीवर चिडलेल्या आपल्या एका तरुण नातेवाईकाला सांगितलेला आयुष्याचा अर्थ असो किंवा मग मार्मिकच्या समारंभाला उपस्थित न राहता आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रातील ‘टीका कशी वस्तऱ्यासारखी असावी. ज्याची केली त्याची गुळगुळीत व्हावी आणि वर त्यानेच वस्तरा चालवणाऱ्याचं कौतुक करावं’ अशी वाक्य असो किंवा मग रसिकहो, श्रोतेहो, मित्रहो असे भाषणसंग्रह असोत; हा माणूस कमालीच्या सफाईने माझ्या मनाचा ताबा घेत चालला होता.

मुकुंद टांकसाळेंनी त्याच्यावर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे की ‘या माणसाने आमचं सांस्कृतिक विश्व घडवलं. काय चांगलं आहे आहे ते त्याने आम्हाला मोठ्या हौसेने दाखवलं’ हे निदान माझ्या बाबतीत तरी निखळ सत्य आहे. त्याने सांगितलं म्हणून मी बालगंधर्व, कुमार गंधर्व, भीमसेन ऐकू लागलो. त्याने सांगितलं म्हणून मला रवींद्रनाथांची थोरवी कळली, त्याने सांगितलं म्हणून मी वस्त्रहरणमधील शिव्यांची लाखोली मनमुराद हसत ऐकली, रामनगरी, कोसला, आणि कित्येक विद्रोही साहित्य आणि अनेक कवी व कविता माझ्या आयुष्यात केवळ या माणसामुळेच येऊ शकले.

मग एक काळ असा आला की या माणसाचं मला अजीर्ण होतंय की काय असं वाटू लागलं. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ चं याने केलेलं भाषांतर वाचून हाच का तो माझा लाडका शब्दप्रभू? म्हणून प्रश्न पडू लागला. रसिकहो मित्रहो आणि श्रोतेहो या तिन्ही पुस्तकातील भाषणांत साचेबद्धपणा आहे असं वाटू लागलं. वंगचित्रेमधील कम्युनिस्ट विचारधारेबाबतची अस्पष्ट मतं वाचून माझ्या लाडक्या लेखकाच्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाविषयी मनात शंका उत्पन्न झाली. अनेकांनी याच्यावर केलेली टीका थोडीफार पटू लागली. गुण गाईन आवडीचा त्याचा ध्यास खुपू लागला. त्यामुळे याच्या पुस्तकांपासून थोडा दूर राहू लागलो.

फार काळ दूर राहिल्यानंतर कदाचित या दुराव्यातील शुष्कता ओसरली. आणि पुन्हा कधीतरी याची पुस्तकं हातात घेऊ लागलो. यूट्यूबवरील याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रवासात ऐकू लागलो. लहानपणी ज्या ज्या विनोदांवर हसू येत होतं त्याच जागांवर आयुष्याचे चटके खाऊन झाल्यावर पुन्हा तितक्याच जोरात आणि कदाचित अनुभवसिद्ध असल्याने अजून जास्त परिपक्वपणे फुलणारं हसू जाणवून याचं नाणं अस्सल आहे हे मान्य करून टाकलं. आता भक्ती नव्हती पण प्रेम मात्र वाढू लागलं होतं आणि त्या आपण या प्रेमात आहोत याचाही आनंद होत होता. Ratatouille चित्रपटातील क्रिटीक अॅंटोन इगोचं जेव्हा मतपरिवर्तन होतं तेव्हा त्याने म्हटलेल्या लांब स्वगतातील New needs friends या वाक्यात माझ्या लाडक्या लेखकाच्या गुण गाईन आवडीच्या आग्रहाचा अर्थ दिसू लागला.


मग कधी कधी थोडं लिखाण करू लागलो. आणि जाणवलं की हा माणूस माझ्यासाठी बालवाडीच्या शिक्षिकेसारखा आहे. तिनेच पहिली धुळाक्षरं गिरवून घेतली असतात. तिनेच अक्षरओळख करून दिलेली असते. नंतर आपण मोठमोठी पुस्तकं वाचतो, अभ्यास करतो, त्यासाठी नवनवीन शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात. पण मूळ अक्षराभ्यास करवून घेणाऱ्या बालवाडी शिक्षिकेमुळे आपण पुढची इमारत बांधू शकतो.

कुणासाठी भाई, कुणासाठी बहुरूपी, कुणासाठी आजोबा, कुणासाठी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेला हा लेखक माझ्यासाठी मात्र बालवाडीत अक्षरांची तोंडओळख करून देणाऱ्या, शाळेची गोडी लावणाऱ्या शिक्षिकेसारखा आहे अशी माझ्या मनाशी खूणगाठ बांधून ठेवली होती.

आज सकाळी चालायला गेलो होतो. कानात कायद्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी चालू होती. चालणं संपलं. पाणी पीत होतो. फोन खिशात होता. डॉक्युमेंटरी संपली. आणि सकाळच्या रम्य वातावरणात सूर्य उगवत असताना यूट्युबने नवीन काहीतरी चालू केलं. माझ्या या पुरूषोत्तम बालवाडी शिक्षिकेने साठ वर्ष पूर्ण केली होती तेव्हा दूरदर्शनने एक डॉक्युमेंटरी बनवलेली होती. त्याच्याच आवाजात. त्याचा आवाज कानी पडला आणि चालण्याचे श्रम विसरलो. डॉक्युमेंटरी ऐकत घरी आलो. आणि जाणवलं हा मनुष्य केवळ माझी बालवाडी शिक्षिका नसून जर माझं आयुष्य एक गाणं असेल तर त्या गाण्याला मी सुरवात करायच्या आधी मला सूर देणारा आणि नंतर स्वतःचं अस्तित्व जाणवू न देता सातत्याने तो सूर चालू ठेवणारा तानपुरा आहे. हा नसता तर माझ्यातील अपूर्णत्वामुळे अनेकदा कणसूर होणारं माझं गाणं नक्कीच बेसूर झालं असतं.

त्याच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मला माझ्या गाण्यातील तानपुरा कोणता ते जाणवलं म्हणून यूट्युबचे आणि माझ्याच नावाच्या त्या अनोळखी अपलोडरचे धन्यवाद.

Tuesday, March 19, 2019

My Way and Women's Day

परवा क्लासमधून घरी आलो. क्लासमधल्या काही अतिआगाऊ पालकांमुळे आणि फेसबुकवरील एका अतिउत्साही मित्रामुळे जरा डोकं तडतडलं होतं. आपण काहीतरी शांतपणे सांगत असताना समोरच्याने प्रत्येक गोष्टीत अगोचरपणा केल्यावर जशी चिडचिड होते त्या अवस्थेत होतो. बायकोला म्हणालो मला जरा शांत बसू द्या, डोकं शांत झालं की मग बोलतो. माझं काहीतरी बिनसलं असेल तर त्यावेळी शांत रहाणंच चांगलं असतं हे तिला आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे पक्कं माहिती आहे. त्यामुळे ती तिच्या कामात बुडून गेली. मोठा लेक अभ्यास करत होता आणि धाकट्याने टीव्हीवर पिक्चर लावला आणि त्याच्याबरोबर मीपण टीव्ही बघत बसलो. सिंग (Sing) नावाचा इंग्रजी ऍनिमेशनपट होता.चित्रपटात एकही मनुष्य नाही. सगळी पात्र म्हणजे वेगवेगळे प्राणी. आपलं थिएटर लिलावात जाऊ नये म्हणून धडपड करणाऱ्या बस्टर मून नावाच्या कोआलाची आणि त्याला प्रेमळ साथ देणाऱ्या वेंधळ्या वृद्ध स्त्री सरडा सहाय्यकाची गोष्ट.

या कोआलाचं एक थिएटर असतं. आपल्या धूम ३ मधल्या जॅकी श्रॉफसारखं. आणि ते हातातून जाऊ नये म्हणून हा अनेक प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून एक हजार डॉलर्सचं पारितोषिक असलेली एक संगीत स्पर्धा आयोजित करतो. पण त्याची वृद्ध स्त्री सहाय्यक गोंधळ करते आणि तिच्या हातून दोन शून्य जास्त टाईप होतात. एक लाख डॉलर्सचं बक्षीस छापलेली पत्रक गावभर पसरतात. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्या प्रत्येक स्पर्धकाच्या वेगवेगळ्या गमती जमती, प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण तणाव, मोठमोठे अनपेक्षित अपघात आणि शेवटी बस्टरचं थिएटर दिमाखात लोकप्रिय होणं अशी कथा आहे. दोन तासात जवळजवळ साठ गाणी आहेत. त्यामुळे मी काहीशा निरुत्साहाने चित्रपट पहात होतो. डोकं इतकं वैतागलं होतं की रिमोट घेऊन टीव्ही बंद करावा इतकं साधं सुचेना. पण चित्रपट अर्ध्यावर आला आणि माईक नावाचा उर्मट पांढरा उंदीर गायला उभा राहिला. आणि इतका वेळ चित्रपट बघण्याचं सार्थक झालं. दिवसभराचा सगळा ताण निघून गेला. कारण माईक गात होता ते माझं अतिशय लाडकं गाणं आहे. 

फ्रॅंक सिनात्राने अजरामर करून ठेवलेलं हे गाणं १९६९ पासून ते आजतागायत जगभरात गाजतंय. विविध भाषांत याची भाषांतरं झाली. किमान पंधरा जगप्रसिद्ध गायकांना हे गाणं स्वतः गायचा मोह आवरला नाही. कित्येकवेळा चालायला जाताना मी आंद्रे रियूने व्हायोलिनवर सादर केलेलं हे गाणं ऐकून भारावून गेलेलो आहे. असं म्हणतात की या गाण्याने फ्रॅंक सिनात्राच्या करियरमध्ये इतका मोठा रोल बजावला की नंतर त्याला फ्रॅंक सिनात्राचं अँथेम सॉंग म्हणू लागले. नंतर सिनात्राला या गाण्याचा प्रचंड कंटाळाही आला. या गाण्याची अजून एक गंमत म्हणजे अमेरिकेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तेव्हा पहिला बॉल डान्स करण्यासाठी त्यांनी हेच गाणं निवडलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय असं विचारल्यावर सिनात्राच्या मुलीनी गाण्याच्या पहिल्या ओळी उद्घृत केल्या होत्या; And now, the end is near!

फ्रॅंक सिनात्रा करियरमध्ये कंटाळला होता. आर्थिक डबघाईला आलेला होता. आपला तरुण मित्र पॉल अँकाला तो म्हणाला की आता ही शेवटची रेकॉर्ड आणि मग मी संगीत क्षेत्राला रामराम ठोकणार. नंतर पॉल पॅरिसजवळच्या एका खेड्यामध्ये आपल्या घरी गेला होता आणि एका संध्याकाळी रेडियोवर त्याने एक फ्रेंच गाणं ऐकलं. त्या गाण्याची धून त्याला अतिशय आवडली आणि त्याने गाण्याचे हक्क विकत घेण्यासाठी प्रयत्न केले. नगण्य किमतीला लोकप्रिय फ्रेंच गायकाचं ते पडेल गाणं पॉलला विकत मिळालं. आणि त्याने सिनात्राला फोन केला, ‘मी तुझ्यासाठी गाणं शोधलंय’.

रात्री एक वाजता पॉल गाणं लिहायला बसला आणि जर सिनात्रा हे गाणं लिहील तर त्यात कुठले शब्द वापरेल असा विचार करत त्याने सकाळी पाचपर्यंत गाणं पूर्ण केलं. मूळ फ्रेंच गाणं आयुष्यात तोचतोचपणा आल्याने प्रेम सुकून गेलेल्या शुष्क नात्यातील दिखाऊपणाबद्दल होतं पण पॉलने केवळ चाल तीच ठेवून गाण्याचा गाभाच बदलून टाकला. आता ते गाणं होतं एका कृतार्थ म्हाताऱ्याचं. ज्यांच्या आयुष्याची शेवटची संध्याकाळ आहे. मृत्यूची वाट बघताना त्याला गतायुष्य आठवतंय. त्या सिंहावलोकनात ताठ कण्याचा तो वृद्ध म्हातारा म्हणतो आहे की

And now, the end is near
And so I face the final curtain
My friend, I'll say it clear
I'll state my case, of which I'm certain

I've lived a life that's full
I've traveled each and every highway
And more, much more than this
I did it my way

Regrets, I've had a few
But then again, too few to mention
I did what I had to do
And saw it through without exemption

I planned each charted course
Each careful step along the byway
And more, much more than this
I did it my way

Yes, there were times, I'm sure you knew
When I bit off more than I could chew
But through it all, when there was doubt
I ate it up and spit it out
I faced it all and I stood tall
And did it my way

I've loved, I've laughed and cried
I've had my fill, my share of losing
And now, as tears subside
I find it all, all so amusing

To think I did all that
And may I say, not in a shy way
Oh no, no, not me
I did it my way

For what is man, what has he got?
If not himself, then he has naught
To say the things he truly feels
And not the words of one who kneels
The record shows I took the blows
And did it my way

And did it my way
आता माझा अंत जवळ आला आहे. पडदा पडायची वाट बघतो आहे. माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्याची गोष्ट तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो.

मी भरभरून आयुष्य जगलो. वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आणि मनापासून जगलो.

क्वचित कधी पश्चात्ताप झाला. पण असे प्रसंग नगण्य. पण मला हवं तेच केलं आणि सगळ्या परिणामांना न घाबरता सामोरा गेलो.

माझा रस्ता मीच आखला. आणि माझी दिशा मीच ठरवली. आणि मी मनमुराद जगलो.

कधी कधी मी मोठे घास घेतले. पण शक्य तितके पचवले आणि नाही तेव्हा टाकून दिले. पण माझ्या निर्णयांशी खंबीर उभा राहिलो.

प्रेम केलं, हसलो, रडलो, जिंकलो आणि हरलो सुद्धा. आता अश्रू सुकल्यानंतर मागे वळून बघतो तेव्हा सगळं फार विलोभनीय दिसतं आहे.

आता हे सगळं मीच केलंय असं सांगताना मी लाजणार नाही. कारण मी माझ्या मनमुराद जगलो आहे.

कारण हे माझं आयुष्य आहे. आणि ते नाकारण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? मी कधी झुकलो नाही आणि कधी शब्द गिळले नाहीत. मी झेललेल्या घावांच्या खुणा साक्ष आहेत की मी मनमुराद जगलो.

कसला दणदणीत म्हातारा आहे.मनमुराद जगणारा आहे पण बेबंद नाही. बेदरकार आहे पण बेजबाबदार नाही.

हे गाणं ऐकताना मला नेहमी हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सी मधला म्हातारा आठवतो. समुद्रावर एकटा जाणारा. मर्लिन मासा गळाला लागला म्हणून खूष होणारा. माशाला पकडून किनाऱ्यावर आणण्यासाठी उन्हातान्हात भर समुद्रात जाड दोरखंड पकडून बसणारा. हाताला रग लागली तरी दोरखंड न सोडणारा. माशाला किती त्रास होत असेल म्हणून विचार करणारा. त्याच्याशी गप्पा मारणारा. म्हातारपणी मी कसा असावा त्याचा विचार करताना मला कायम हाच म्हातारा आठवतो.

अर्थात भारतीय समाजाच्या चौकटीत अनेक मध्यमवर्गीयांना इतकं छान मनमुराद जगता येणार नाही याची मला कल्पना आहे. जर पुरुषांची ही कथा तर इथल्या स्त्रियांना असं जगता येईल याची शक्यता अगदीच नगण्य.अर्थात आता हे गाणं गायिकांनीही गायला सुरवात केली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना असं जगायला हवं ही इच्छा सगळ्यांच्या मनात तयार होईलंच. कारण कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात येण्याच्या आधी कल्पनेत अवतरते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे बेजाबदार न होता मनमुराद जगण्याची संधी आपल्याकडील सर्व स्त्री पुरुषांना मिळावी हीच आजच्या महिला दिनाची सदिच्छा.

आपल्या अगोचरपणामुळे मला वात आणणाऱ्या पालकांना आणि फेसबुक मित्रालाही धन्यवाद कारण त्यांनी मला वात आणला नसता तर मी परवाच्या मंगळवारी सिंग चित्रपट पाहिला नसता, मग कदाचित मला माझं लाडकं गाणं चटकन आठवलं नसतं आणि माझ्या लाडक्या गाण्याने माझ्या मनात रंगवलेल्या म्हाताऱ्याला विसरून मी उगाच घरच्यांवर डाफरत बसलो असतो.

Fault Linesकाल 'भारतीय तत्वज्ञान' नावाचं पुस्तक वाचत होतो. तत्त्वज्ञानाच्या व्याख्येबद्दल लिहिताना लेखक श्रीनिवास दीक्षितांनी सॉक्रेटिसचं वचन उदघृत केलं.

सॉक्रेटिस म्हणतो की तत्त्वचिंतक सुईण असतो. सुईण मूल निर्माण करत नाही. आईच्या उदरात असलेल्या मुलाला बाहेर येण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तत्त्वचिंतक विश्लेषणाच्या पध्दतीने लोकांच्या मनात असलेल्या सत्याला अविष्कृत करत असतो.

ते वाचताना मला जाणवलं की राजकीय नेते एका पध्दतीने तत्त्वचिंतक असतात. फक्त सत्याऐवजी ते धारणांचा / पूर्वग्रहांचा वापर करतात. जे लोकांच्या मनात आधीपासून असते त्याचा ते अविष्कार करुन दाखवतात.

मग समाजाच्या वेगवेगळ्या गटात गतकालीन आणि वर्तमानकालीन नेत्यांबद्दल, एकेका गटाबद्दल आजकाल व्यक्त होणारा विखार असा का असावा त्याचं कोडं उलगडतं आहे असं वाटलं. आपल्यापैकी अनेकांच्या मनात इतरांबद्दल आधीपासून असलेली अढी, राजकीय नेते अविष्कृत करुन दाखवतात.

प्रत्येक बहुजिनसी समाजात आधीपासून fault lines अस्तित्वात असतात. नेते त्यांच्यावर पडणाऱ्या दाबांना वाढवू शकतात किंवा कमी करु शकतात.

गरीब-श्रीमंत, शहरी-खेडुत, हिंदू - मुस्लिम. सवर्ण - इतर, सुशिक्षित - अशिक्षित, मालक - नोकर, प्रस्थापित - धडपडे, भांडवलवादी - इतर. स्त्री - पुरुष, वृद्ध - तरुण,हे आणि असे अनेक छोटे छोटे गट आपल्या fault lines सकट आपल्या समाजात आधीपासून अस्तित्वात आहेत. आणि आपले नेते, समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे त्यांचे समर्थक ; या fault lines वर पडणारा दाब वाढवत आहेत.

असा विचार मनात आला आणि एक सत्य गवसल्याचा आनंद झाला. माझ्या देशात फोडा आणि झोडाचं सूत्र वापरल्याबद्दल इंग्रजांवरचा राग थोडा कमी झाला. आणि आता कुठल्याही राजकीय पक्षाला ते सूत्र वापरता येऊ नये म्हणून आपल्यावरची वाढलेली जबाबदारी जाणवली.

आमच्या लहानपणी असं होतं

आमच्या लहानपणी असं (नव्हतं) होतं  

अरे तुला सांगतो, त्याकाळी फेसबुक नावाचा प्रकार होता. मुळात डेटिंगसाठी बनवलेली ही साईट नंतर हेटिंगसाठी वापरली जाऊ लागली.

म्हणजे प्रत्येकाचं तिथे एक अकाउंट असायचं. तिथे अकाउंट उघडलं की प्रत्येकाला एक भिंत मिळायची. आधी तिथे लोक काहीबाही लिहायचे. पण नंतर भिंती वापरून लोक एकमेकांना ब्लॉक देऊ लागले.

पण काही काही लोकांची दोन तीन किंवा जास्त अकाउंटही असायची. एका अकाउंटवर आपली खरी माहिती सजवून टाकायचे आणि इतर अकाउंटवर फुलं पानं निसर्ग किंवा मग सिनेमा तारे तारकांचे फोटो वापरले जात.

आता सिनेमा तारे तारका म्हणजे काय ते विचारू नकोस. तो वेगळा विषय आहे. त्याबद्दल बरंच काही बोलता येईल. पण नंतर कधीतरी सांगीन. आता इतकंच सांगतो की आजच्यासारखं सगळ्यांच्या आयुष्यात तेव्हा लोकांना रस नसायचा. उलट फक्त काही लोकांचं आयुष्य उघड्यावर मांडलेलं असूनही त्यात लोकांना फार रस असायचा. या लोकांना तारे तारका म्हणायचे.

तर सिनेमा तारे तारकांचे फोटो लावलेली जास्तीची अकाउंट वापरून लोक आपल्या दबलेल्या भावनांना मुक्त होऊ द्यायचे. बायकांना j1 झालं का? असं विचारणं. पुरुष असूनही स्त्री असल्याचं नाटक करुन आपल्याला शाळेत कधीच सुबोध भावे, भाऊ कदम, कुशल भद्रिके, सागर कारंडे सारखी स्त्री भूमिका करायला न मिळाल्याची भरपाई करणं, आपल्या मूळ अकाउंटवरील पोस्टवर विरोधी मत नोंदवणाऱ्या व्यक्तींशी खोट्या अकाउंटवरुन मैत्री करुन त्याच्या पोस्टवर काड्या करणं, आणि विविध क्लोज्ड ग्रुपमधे ज्वलंत भूमिका मांडणं, असे उद्योग केले जात.

त्याशिवाय त्या फेसबुक नावाच्या डेटिंग साईटवर लग्न झालेले, टिंडर कसं वापरायचं ते न कळणारे आणि इंस्टाग्रामवर प्रत्येक फोटोत आधार कार्डच्या फोटोसारखे दिसणारे लोक आपापल्या पिकल्या पानाचा देठ हिरवा आहे का? ते चाचपून बघायचे. त्यासाठी आपल्या लहानपणीच्या घडलेल्या आणि बहुतांशी न घडलेल्या गोष्टी रंगवून सांगायचे.

बाबा मला कधी कधी वाचून दाखवायचे.

पण मग एकदा काहीतरी वेगळं घडलं. भारत आणि पाकिस्तानमधे तणाव निर्माण झाला. आणि तो जितका तिथे होता त्यापेक्षा जास्त फेसबुकवर दिसू लागला.

काही लोक इतरांना बुळ्या किंवा शेपूटघालू म्हणू लागले. तर उत्तर देताना इतर लोक पहिल्या लोकांना युध्दखोर आणि रक्तपिपासू म्हणू लागले. पण एका गोष्टीवर सगळ्यांचे एकमच झाले की दुसऱ्या गटातले लोक xत्ये आणि देशद्रोही आहेत. त्यामुळे मोठा देशद्रोही कोण? हे ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली. पण मुळात सगळे भारतीय सहिष्णू असल्याने सगळेजण तो बहुमान दुसऱ्याला देण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे संपूर्ण फेसबुकला तेव्हा नाहिश्या होत चाललेल्या जेवणावळीचं स्वरूप आलं. लोक आग्रह करकरुन दुसऱ्याच्या पोस्टखाली कमेंट करुन देशद्रोहीपणा वाढायचे. तो ताटावर आडवा हात केल्यासारखा आग्रह नाकारायचा. मग पोस्टच्या पंगतीवर आलेले इतर लोक वाढा वाढा असा कालवा करायचे. शेवटी पोस्टकर्त्याच्या पदरात देशद्रोहीपणा टाकूनंच लोक शांत व्हायचे.

मग पुन्हा आपापल्या भिंतीवर जाऊन एकमेकांबद्दल मोठमोठाले निबंध लिहायचे. इकडून एक पोस्ट सूं सूं करत निघायची... लगेच तिचे स्क्रीनशॉट दुसर्‍या ग्रुपच्या लोकांना मिळायचे... लगेच इकडून दुसरा मोठा निबंध तयार व्हायचा आणि पोस्ट केला जायचा... दोन्ही निबंध फेसबुकवर एकमेकांना भिडायचे... चकचकाट व्हायचा.. अनेकांचे डोळे दिपायचे... काहीजण ब्लॉक व्हायचे... पण इतर खोटी अकाउंट असल्याने हे पोस्टबिंबासुर विकट हास्य करत पुन्हा जिवंत व्हायचे..

हे पोस्टयुध्द आणि कमेंट खणाखणी बघून माझ्या बाबांना त्यांच्या लहानपणी टिव्ही नावाच्या गोष्टीवर रविवारी सकाळी रामायण नावाच्या मालिकेतील युध्दाचं चित्रीकरण आठवायचं.

बाबांच्या लहानपणी टिव्हीवरची रामायण महाभारतातली युध्द होती. माझ्या लहानपणी फेसबुकवरची पोस्ट, निबंध आणि शेलक्या विशेषणांची युध्द होती. पण आता तुझ्या लहानपणी काहीच विशेष घडत नाहीये. मला तर काळजी वाटते पोरा की तुझ्या म्हातारपणी तू तुझ्या मुलांना कसल्या आठवणी सांगशील?

बैलांच्या शिंगांना पलिते

तिळा तिळा दार उघडची पोस्ट अनेकांना पटली असली तरी पोस्टवरील एकदोन कमेंट्स वाचून जाणवलं की काहीजणांना पोस्ट वेगळी उमजली आहे. काहिंना पासवर्डचा दाखला चपखल नाही असं वाटलं. म्हणून ही पुस्ती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात एक रोमहर्षक प्रसंग आहे. शाहिस्तेखान लाल महालात तळ ठोकून बसलेला असतो. निवडक मावळ्यांसह महाराज रात्री महालात शिरतात. खान कापलाच जाणार असतो पण निसटतो. चार बोटं गमावतो. 'सिवा सिवा, दगा दगा' चा ओरडा होतो. महालात जाग येते. महाराज निसटतात. पण मुघल सैन्य मागे लागतं.

कात्रजच्या घाटात महाराज युक्ती करतात. बैलांच्या कळपाला वापरतात. त्या झुंडीतील सगळ्यांच्या शिंगांना पलिते बांधून तो कळप एकिकडे पळवला जातो. मुघल सैन्याला वाटतं महाराज आणि मावळे धावताहेत. मुघल बैलांच्या मागे धावतात आणि महाराजांचा निसटण्याचा मार्ग निर्वेध होतो.

या गोष्टीत बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते म्हणजे हातात मशाली धरलेले मावळे असा मुघल सैन्याचा समज होईल हा महाराजांचा अंदाज बरोबर ठरतो. घाईगडबडीत मुघल सैन्याचा बुध्द्यांक किती खाली घसरेल याबद्दलचा महाराजांचा अंदाज बरोबर ठरतो. आणि महाराज आपला हेतू सफल करुन विजयी ठरतात.

लहानपणी मला वाटायचं मुघल मूर्ख होते. पण नंतर कळलं की समुदाय जितका मोठा तितकी सरासरी बुध्द्यांक खाली घसरण्याची शक्यता अधिक. त्याचप्रमाणे घाईगडबड जितकी जास्त तितकीच बुध्द्यांकाची सरासरी घसरण्याची शक्यता अधिक. आणि जेव्हा समुदाय निर्नायकी असतो, प्रत्येकाला तो स्वतःच नायक आहे असं वाटतं तेव्हा बुध्द्यांक केवळ घसरत नाही तर तो ऋण होतो. या तिन्ही संकल्पना वापरुन महाराज अगदी साधी युक्ती वापरून स्वतःचा हेतू सफल करून घेतला.

या गोष्टीला मी जेव्हा आजकाल टिव्हीवर आणि समाजमाध्यमांवर तडकाफडकी वाटल्या जाणाऱ्या देशद्रोही आणि देशभक्त सर्टिफिकेट्सच्या संदर्भात बघतो तेव्हा मला जाणवतं की 'भारतमाता की जय किंवा पाकिस्तान मुर्दाबाद किंवा वंदे मातरम् किंवा युद्ध हवं' असं न म्हणणारे किंवा 'शांतता हवी, इथे सरकारचं चुकलं' म्हणणारे देशद्रोही आहेत हा प्रचार म्हणजे आपणच तयार केलेले पलिते आहेत. आपला समुदाय मोठा आहे. दिवस घाईगडबडीचे करण्यात आपल्या हितशत्रूंना रस आहे. आणि समाजमाध्यमांवरच्या लाथाळ्या म्हणजे निर्नायकी लढाई आहे.

आपल्या हितशत्रूंनी शाहिस्तेखानाची आणि कात्रजच्या घाटाची गोष्ट वाचली तर इतरांना देशद्रोही म्हणून सर्टिफिकेट वाटणाऱ्यांची दिशाभूल कशी करावी, स्वतःला देशभक्त समजणाऱ्यांना एका झटक्यात देशद्रोह करण्यात कसं भाग पाडावं आणि या देशात फूट पाडण्याचा स्वतःचा कार्यभाग कसा अलगद साध्य करावा ते त्याना सहज कळेल कारण पलिते आपणंच तयार करून ठेवले आहेत.

तेव्हा समोरच्याचं मत कितीही पटो न पटो. तो आपल्या मनासारखा वागो न वागो. या सरकारचं आणि त्याच्या धोरणांचं समर्थन तो करो न करो तरीही चटकन कुणाला देशद्रोही म्हणणं आपल्याच देशाचं नुकसान करणारं आहे. देशभक्ती इतकी साध्या कसोट्यांवर सिध्द होत नाही आणि विरोधक देशद्रोही नसतात.

तिळा तिळा दार उघड

गुगल, फेसबुक अकाउंट बनवायचं असेल तर आधी युजरनेम ठरवावं लागतं आणि मग पासवर्ड.

पासवर्ड ठरवताना कमीतकमी आठ आकडी असावा, अक्षरं, संख्या आणि स्पेशल कॅरॅक्टर्स वापरणारा असावा, कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स वापरणारा असावा. एकच अक्षर लागोपाठ वापरणारा नसावा, या आणि अशा अटी असतात. बॅंक किंवा सरकारी वेबसाईटवर जर तुम्ही अकाउंट उघडत असाल तर अजून काही अटी पाळायला सांगतात. स्वतःचं नाव, स्वतःच्या नवऱ्याचं. बायकोचं, पालकांचं किंवा मुलामुलींचं नाव, फोन नंबर, जन्मतारीख वगैरे गोष्टी पासवर्ड म्हणून वापरु नयेत.

या अटींमागचं कारण एकंच असतं की तुमचा पासवर्ड तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी माणसाला किंवा एखाद्या सॉफ्टवेअर प्रणालीला ओळखता येऊ नये.

इतकं असूनही तुमचं कनेक्शन सिक्युअर चॅनेल्समधूनंच जावं याची खात्री बॅंका घेतात. क्रेडिट कार्डने पैसे देताना तुम्हाला पिन नंबर टाकावा लागतो किंवा मग तुम्हाला OTP येतो. कारण एकंच तुमचं कार्ड फक्त तुम्हीच वापरावं, इतरांनी कुणी वापरु नये. तुमची फसवणूक करु नये.

बॅंका, सरकारी विभाग. जीमेल. फेसबुक यासारख्या सर्व ठिकाणी आपली ओळख कुणी चोरु नये. आपली फसगत करु नये; म्हणून जागरूक असणारे आपण, देशभक्ती आणि राष्ट्रद्रोह या कल्पनांच्या बाबतीत मात्र अगदी साध्या सोप्या कसोट्या (पासवर्ड) वापरतो.

भारतमाता की जय बोल.... काश्मीरचा आहेस का?....पाकिस्तानवर हल्ला करु नये, पाकिस्तानशी चर्चा करावी, असली मतं आहेत का? खूनका बदला खून असं तुला वाटत नाही का? आमचा नेता चूक असं तुला वाटतं का? तुमचा नेता बरोबर असं तुला वाटतं का?... या किंवा अशाच साध्या कसोट्या वापरुन आपण एकमेकांना देशप्रेमी किंवा देशद्रोही ठरवून मोकळे होतो आहोत.

जो आपल्यासारखा आहे तो देशप्रेमी आणि जो तसा नाही तो देशद्रोही ही आपली सरळसोट व्याख्या आहे. आणि ती वापरण्यासाठी आपण वर सांगितलेल्या तकलादू कसोट्या वापरतो आहोत.

परिणाम अगदी उघड आहे. उद्या कुणी भारतमाता की जय म्हटलं, वंदे मातरम म्हटलं की आपण निःशंक होऊन त्याच्यावर विश्वास ठेवू आणि आपला पासवर्ड कळलेला समोरचा आपली सहज फसगत करुन समाजविघातक कृत्यं करु शकेल.

यातून पुढे कुणाचाच कुणावरही विश्वास राहणार नाही आणि जो देश आपल्याला प्रगत करायचा आहे, जे राष्ट्र आपल्याला बलशाली करायचं आहे ते कल्पनेतंच विरून जाईल.

देशभक्ती फार मौल्यवान गोष्ट आहे. आपल्या बॅंक खात्यातील रकमेपेक्षा कित्येक पटीने जास्त मौल्यवान. तिच्यासाठी इतके सोपे पासवर्ड आपण वापरणार असू तर नजिकच्या भविष्यातील अनागोंदीला आपणंच जबाबदार असू.

आपल्यासारखा दिसत नाही, बोलत नाही तो देशद्रोही आणि आपल्यासारख्या दिसतो, बोलतो तो देशप्रेमी ही अतिशय घातक आणि बालिश संकल्पना आहे. टिव्हीवर, समाजमाध्यमांवर इतरांना सटासट देशद्रोही किंवा देशप्रेमी असण्याची सर्टिफिकेट वाटणारेच खरे देशद्रोही आहेत.

मोठा भाऊ आणि पुरंदर

१) माझे वडील गावातून येऊन मुंबईजवळ स्थायिक झाले. चाकरमानी असल्याने त्यांचा शिवसेनेकडे ओढा होता. आपल्या खळ्ळ खट्याक करणाऱ्या मित्रांचं गुणगान पण शाळेतून एकजरी तक्रार घरी आली तर मला चालणार नाही अशा त्यांच्या धोरणामुळे शिवसेनेच्या कार्यपद्धतीबद्दलचं माझं आकर्षण, त्यांच्या नकळत त्यांनीच कमी केलं. आर्थिक उदारीकरणानंतर मी पदवीधर झालो. तोपर्यंत शिवसेनेने मराठी मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरली होती. त्यामुळे माझ्यासाठी शिवसेनेची ओढ वाटण्याचं कारण उरलेलं नव्हतं.

२) २०१४ मधे शिवसेनेने 'मोठा भाऊ' हा शब्द फार वापरला. नंतर धुसफूस करत आणि राजीनाम्याचं शस्त्र वापरत आपले नेते टिकवून ठेवले. स्वबळाच्या घोषणा करत शेवटी काल युतीची घोषणा केली.

Source : Internet 
३) युती करणारे दोघे असून सोशल मीडियावर खिल्ली मात्र शिवसेनेचीच उडवली गेली. आणि अनेक कट्टर शिवसैनिक हताश होऊन स्वपक्षावर आणि नेत्यांवर टीका करताना दिसले.

४) मोदी लाट, केंद्रात आणि राज्यात भाजपचा वरचष्मा, सर्वपक्षांतून नेत्यांची भाजपने चालू ठेवलेली आयात, नोटबंदी आणि जीएसटी नंतर महानगरपालिकांच्या अर्थव्यवस्थेवर घडलेला प्रतिकूल परिणाम, शब्दात लीलया खेळून समाजमाध्यमांवर शिवसेनेची खिल्ली उडवणारे, पण पक्षश्रेष्ठींच्या प्रत्येक कोलांटउडीलाला शिरोधार्य मानणारे भाजपा समर्थक आणि भावनिक होऊन स्वतःच्या शब्दात अडकणारे आणि पक्षश्रेष्ठींवर आपला शब्द चालतो का नाही यात गोंधळून जाणारे शिवसैनिक... अशा सगळ्या गडबडीत शिवसेना नेत्यांनी खरंतर युती करून स्वपक्षाला थोडंफार अधिक आयुष्य बहाल केलं आहे.

५) आता खरी कसोटी शिवसैनिकांची आहे. जर राज्यापुरती समसमान जागावाटणी झाली आहे आणि युती जिंकली तर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर शिवसेनेला भविष्य आहे. पण जर युती जिंकत असताना भाजपने जास्त जागा जिंकल्या तर शिवसेनेची विघटन प्रक्रिया सुरू होईल.

६) त्यामुळे आता शिवसैनिकांचं आपल्या संघटनेवर प्रेम असेल तर त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून आणण्यासाठी कंबर कसायला पर्याय नाही. ही वेळ जर त्यांनी अपेक्षाभंगाचं दुःख करण्यात आणि आपल्याच नेत्यांवर टीका करण्यात घालवली तर शिवसेना संपवण्यात खरा हातभार भाजपऐवजी सैनिकांकडून लागेल.

७) बाळासाहेबांसमोरचे प्रश्न वेगळे होते. त्यांची उत्तरं वेगळी होती. आताच्या शिवसेनेचे प्रश्न वेगळे आहेत. तेव्हा जुनी उत्तरं चालणार नाहीत.

८) कानामागून येऊन तिखट झालेल्या धाकट्या भावासमोर आपला मान ठेवणं सोपं नसतं. अशा वेळी गप्प बसून आपलं काम कसं करावं ते समजत नसेल तर शिवसैनिकांनी अनिल अंबानीच्या मोठ्या भावाकडे बघावं. धीरुभाईंच्या मृत्यूनंतर जास्त आवाज अनिल अंबानींचा झाला होता पण आज मुकेश अंबानीच मोठा भाऊ आहे हे सिद्ध झालं आहे.

९) शिखरांवर चढण्यापेक्षा चढलेल्या शिखरांवर टिकणं कठीण असतं.

१०) जमल्यास शिवसेना नेत्यांनी मातोश्रीचं नामकरण 'पुरंदर' करावं. ;-)