Tuesday, March 19, 2019

बैलांच्या शिंगांना पलिते

तिळा तिळा दार उघडची पोस्ट अनेकांना पटली असली तरी पोस्टवरील एकदोन कमेंट्स वाचून जाणवलं की काहीजणांना पोस्ट वेगळी उमजली आहे. काहिंना पासवर्डचा दाखला चपखल नाही असं वाटलं. म्हणून ही पुस्ती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात एक रोमहर्षक प्रसंग आहे. शाहिस्तेखान लाल महालात तळ ठोकून बसलेला असतो. निवडक मावळ्यांसह महाराज रात्री महालात शिरतात. खान कापलाच जाणार असतो पण निसटतो. चार बोटं गमावतो. 'सिवा सिवा, दगा दगा' चा ओरडा होतो. महालात जाग येते. महाराज निसटतात. पण मुघल सैन्य मागे लागतं.

कात्रजच्या घाटात महाराज युक्ती करतात. बैलांच्या कळपाला वापरतात. त्या झुंडीतील सगळ्यांच्या शिंगांना पलिते बांधून तो कळप एकिकडे पळवला जातो. मुघल सैन्याला वाटतं महाराज आणि मावळे धावताहेत. मुघल बैलांच्या मागे धावतात आणि महाराजांचा निसटण्याचा मार्ग निर्वेध होतो.

या गोष्टीत बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते म्हणजे हातात मशाली धरलेले मावळे असा मुघल सैन्याचा समज होईल हा महाराजांचा अंदाज बरोबर ठरतो. घाईगडबडीत मुघल सैन्याचा बुध्द्यांक किती खाली घसरेल याबद्दलचा महाराजांचा अंदाज बरोबर ठरतो. आणि महाराज आपला हेतू सफल करुन विजयी ठरतात.

लहानपणी मला वाटायचं मुघल मूर्ख होते. पण नंतर कळलं की समुदाय जितका मोठा तितकी सरासरी बुध्द्यांक खाली घसरण्याची शक्यता अधिक. त्याचप्रमाणे घाईगडबड जितकी जास्त तितकीच बुध्द्यांकाची सरासरी घसरण्याची शक्यता अधिक. आणि जेव्हा समुदाय निर्नायकी असतो, प्रत्येकाला तो स्वतःच नायक आहे असं वाटतं तेव्हा बुध्द्यांक केवळ घसरत नाही तर तो ऋण होतो. या तिन्ही संकल्पना वापरुन महाराज अगदी साधी युक्ती वापरून स्वतःचा हेतू सफल करून घेतला.

या गोष्टीला मी जेव्हा आजकाल टिव्हीवर आणि समाजमाध्यमांवर तडकाफडकी वाटल्या जाणाऱ्या देशद्रोही आणि देशभक्त सर्टिफिकेट्सच्या संदर्भात बघतो तेव्हा मला जाणवतं की 'भारतमाता की जय किंवा पाकिस्तान मुर्दाबाद किंवा वंदे मातरम् किंवा युद्ध हवं' असं न म्हणणारे किंवा 'शांतता हवी, इथे सरकारचं चुकलं' म्हणणारे देशद्रोही आहेत हा प्रचार म्हणजे आपणच तयार केलेले पलिते आहेत. आपला समुदाय मोठा आहे. दिवस घाईगडबडीचे करण्यात आपल्या हितशत्रूंना रस आहे. आणि समाजमाध्यमांवरच्या लाथाळ्या म्हणजे निर्नायकी लढाई आहे.

आपल्या हितशत्रूंनी शाहिस्तेखानाची आणि कात्रजच्या घाटाची गोष्ट वाचली तर इतरांना देशद्रोही म्हणून सर्टिफिकेट वाटणाऱ्यांची दिशाभूल कशी करावी, स्वतःला देशभक्त समजणाऱ्यांना एका झटक्यात देशद्रोह करण्यात कसं भाग पाडावं आणि या देशात फूट पाडण्याचा स्वतःचा कार्यभाग कसा अलगद साध्य करावा ते त्याना सहज कळेल कारण पलिते आपणंच तयार करून ठेवले आहेत.

तेव्हा समोरच्याचं मत कितीही पटो न पटो. तो आपल्या मनासारखा वागो न वागो. या सरकारचं आणि त्याच्या धोरणांचं समर्थन तो करो न करो तरीही चटकन कुणाला देशद्रोही म्हणणं आपल्याच देशाचं नुकसान करणारं आहे. देशभक्ती इतकी साध्या कसोट्यांवर सिध्द होत नाही आणि विरोधक देशद्रोही नसतात.

No comments:

Post a Comment