Sunday, February 21, 2016

भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १) पूर्व पिठिका

------------------------------------------------------------

"विष्णू पुराण" म्हणते की,

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।

Source : Wikipedia
म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे. आणि मग महाभारताच्या युगांतकारी युद्धानंतर तर छोटी छोटी राज्ये किंवा गणराज्ये किंवा स्वत:च्या सीमेत तुष्ट रहाणारे नंदांचे मगध साम्राज्य, हाच या भूमीच्या लोकांचा स्थायीभाव झाला होता.


या स्थायीभावाला प्रवाही केले ते कुठल्या हिंदूने नव्हे तर एक यवन राजा अलक्स्येन्द्र किंवा अलेक्झांडरने. आणि त्यानंतर मोडक्या राज्य, गणराज्यांतून एकसंध राष्ट्र बनवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला  चंद्रगुप्त - चाणक्य  या जोडीने. पण जर अनुक्रमे मौर्य, चेरा - चोला - पंड्या, सातवाहन, शुंग, महामेघवाहन, गुप्त, वाकाटक, कदंब, हूण, चालुक्य, राष्ट्रकूट, पल, चोल, गुर्जर - परिहार, चालुक्य, घोरी, दिल्ली, मुघल, मराठा आणि अगदी शेवटच्या ब्रिटीश साम्राज्यांच्या वेळच्या भारतीय नकाशांवर नजर टाकली तर आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते. आपण ज्याला भारत देश म्हणतो आणि ज्याच्या राष्ट्रवाद हाका आपल्या कानातून घुमू शकतात किंवा ज्या तश्या घुमताहेत म्हणून काही जणांना त्रास होऊ शकतो त्या भारताचा इतिहास खरा सुरु होतो तो १९४७ पासूनच. त्या आधीचा इतिहास हा “आर्यावर्ते, रेवाखंडे, जम्बुद्वीपेच्या” भूमीचा इतिहास आहे. हिंदुस्थान नामक काल्पनिक राष्ट्राचा नाही. भारत नामक देशाचा तर अजिबातच नाही.


भारत किंवा इंडिया नामक देशाचा ( मी इथे राष्ट्र हा शब्द जाणून बुजून टाळला आहे) जन्म ही एक दीर्घकाळ चाललेली आणि अजूनही अपूर्ण असलेली सामाजिक प्रक्रिया आहे. ती माझ्या सामान्य दृष्टीला कशी दिसते,  ते सांगण्यासाठी आधी माझ्या मते देश आणि राष्ट्र या शब्दांचा अर्थ काय? ते सांगतो. देश म्हणजे भूभाग, ज्यात जमीन, जंगले, नद्या, पर्वतमाला, सजीव - निर्जीव असे सगळे काही आले. त्यामुळे देश ही संकल्पना आपोआप एका सलग भूभागाशी संबंधित आहे. तर राष्ट्र म्हणजे समाजमन. थोडक्यात देश म्हणजे हार्डवेअर आणि राष्ट्र म्हणजे सॉफ्टवेअर असे माझे गृहीतक आहे. रोजच्या व्यवहारातले उदाहरण घ्यायचे असल्यास देश म्हणजे आपली इमारत, तिच्या पुढची बाग, तिच्या कंपाउंड पर्यंतचा भाग. आणि राष्ट्र म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेची संकल्पना. मग ती संकल्पना हौसिंग सोसायटीची असू शकते किंवा अपार्टमेंट्सची. संकल्पना व्यक्तींचे हक्क आणि कर्तव्ये ठरवते आणि आपसातले वर्तन देखील.


आता हेच उदाहरण पुढे चालवायचे म्हटले तर, सहकारी गृह निर्माण प्रकल्पामागची सैद्धांतिक कल्पना आहे की, समविचारी लोक एकत्र येउन, आपली संस्था स्थापन करून, पैसे जमा करून, जमीन खरेदी करून, ती विकासकाकडून विकसित करून घेतात. म्हणजे संस्था आधी जन्माला येते आणि इमारत नंतर. सॉफ्टवेअर आधी बनते आणि मग त्या अनुषंगाने हार्डवेअर. अश्या सोसायटी मध्ये लोकांचे वर्तन एकसारखे असण्याची शक्यता जास्त असते. सामंजस्य आणि परस्पर सहकार्य इथे थोड्या जास्त प्रमाणात असू शकते. पण अश्या सोसायट्या आदर्श असल्या तरी फार क्वचितच बनतात. प्रत्यक्ष आयुष्यात, आपण बघतो की एखादा विकासक जमीन खरेदी करून, त्यावर इमारत बांधून, त्यातील घरे वेगवेगळ्या व्यक्तींना विकून, मग त्यांची एक सोसायटी तयार करून देतो आणि बाजूला होतो. म्हणजे इथे हार्डवेअर आधी तयार झाले आणि सॉफ्टवेअर नंतर. इथे सर्व सभासदांची मने चटकन जुळतीलच याची खात्री नाही. इथे को-ऑपरेशन नावालाच असते आणि लहान सहान गोष्टीवरून कुरबुरी चालू असतात. हे उदाहरण लक्षात ठेऊन आपण पुन्हा भारत देशाच्या इतिहासाकडे आणि भारतीय राष्ट्रीयत्वाच्या इतिहासाकडे वळलो तर आपल्याला एक वेगळेच चित्र दिसेल.


इथल्या कुठल्याही राजांना, सम्राटांना किंवा सुलतानांना राष्ट्र संकल्पनेत रस नव्हता. जो तो आपल्याला विष्णूचा अंश किंवा सार्वभौम म्हणवून घेण्यात रममाण होता किंवा मग खलिफाला नजराणा अर्पण करून सल्तनतीवरचा आपला हक्क स्थापित करून घेत होता. रयतेच गावगाडा जुन्या कृषीप्रधान, आणि मानवी श्रमांवर आधारीत अश्या स्वयंपूर्ण पण शोषणकारी जाती व्यवस्थेने सुरळीत चालला होता. राजे बदलल्याने समाजाच्या घटकांच्या परस्परांतील वर्तनात काही मोठे बदल होत नव्हते.


इथे ब्रिटीश आले व्यापार करायच्या मिषाने. मग आपल्या  वखारींना संरक्षण म्हणून त्यांनी आपापली सुरक्षा यंत्रणा उभारण्यास परवानगी मिळवली. त्यासाठी मुलूखगिरी करणे हाच पेशा असलेली एतद्देशीयांचे भलेमोठे मनुष्यबळ त्यांना आयतेच तयार मिळाले. मग हीच सैनिकांची फौज तैनाती फौज म्हणून वापरत त्यांनी इथल्या परस्परांत भांडणाऱ्या राजे महाराजांना परस्परांपासून संरक्षण देण्यास सुरवात केली. आणि मग हळू हळू अगदी आसेतु हिमाचल नसेल पण बऱ्याच मोठ्या भूभागावर एकाच कायद्याचे राज्य आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यश मिळवले. आपल्या साम्राज्याच्या फायद्यासाठी नेटीव्हांच्या या देशात रेल्वेसारख्या पायाभूत सुविधा तर टपाल, पोलिस आणि इंग्रजीचे शिक्षण अश्या अनेक सुधारणा आणल्या. हे साम्राज्य शोषणकारी होते पण त्याच वेळी नेटीव्हांना साहेबाच्या देशात जाऊन तेथील व्यवस्था शिकण्याचे स्वातंत्र्य देणारे देखील होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरवात नेटीव्ह लोकांनी विलायतेत घेतलेल्या कायद्याच्या शिक्षणात आणि त्यांना अनेक इंग्रजांनी केलेल्या मदतीत आहे असे माझे मत आहे.


म्हणजे होती राज्ये. मग आली साहेबाची कंपनी. मग आली तैनाती फौज. शक्य असेल तिथे संस्थाने आणि राज्ये जिंकली किंवा खालसा केली गेली. आणि आधीचे राजे बनले इंग्रजांचे मांडलिक किंवा मित्र. त्यांना चालू झाली तनखे आणि वार्षिक प्रीव्ही पर्सेस. मग झाला १८५७ चा फसलेला उठाव. (ज्याचा मला पटलेला हेतू होता इंग्रजांना हाकलून जुन्या राजांना पुन:प्रस्थापित करणे.) मग संपले कंपनी सरकारचे राज्य. मग भारत बनला ब्रिटीश पार्लमेंटच्या आधिपत्याखालील प्रदेश. मग इंग्रजांनी नेटीव्हांना दिलेल्या शिक्षणामुळे सुरु झाला भारतीय स्वातंत्र्यचा हुंकार. मग इंग्रजांच्या सहाय्याने उभ्या राहिलेल्या भारतीय काँग्रेस या संस्थेच्या नेतृत्वाखाली, सामान्य भारतीय कुळातून जन्मलेल्या लोकांनी चालवलेला स्वातंत्र्यलढा. मग दोन महायुद्धानंतर कर्जबाजारी झालेल्या ब्रिटनने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य.

आता यात गम्मत अशी, की मी तुमच्याकडून काही घेतले तर मी ते तुम्हालाच परत केले पाहिजे. या न्यायाने जर इंग्रजांनी राज्ये आधीच्या राजांकडून घेतली असतील तर परत जाताना त्यानी ती जुन्या राजांनाच परत दिली पाहिजेत. पण तसे झाले नाही. राजांनी स्वातंत्र्य लढा केला नव्हता. तो केला होता जनतेने. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या भूभागाबद्दल ब्रिटीश वाटाघाटी करत होते दुसऱ्याशी. शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला एक  मोठा भूभाग ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त होत एक देश म्हणून प्रस्थापित झाला. महामानव बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली, जगातली सर्वात मोठी अशी लिखित स्वरूपातली राज्यघटना तयार झाली होती. पण तिचे मर्म लोकांना कळायचे बाकी होते. म्हणजे लेखी स्वरूपात घटनारुपी सॉफ्टवेअर तयार होऊन देखील मनात अजून राष्ट्र बनायचे बाकी होते.


------------------------------------------------------------

1 comment:

  1. खूपच सुंदर लेख. राष्ट्र अन देश यामधील फरक इतक्या सोप्या भाषेत पहिल्यांदा च वाचतोय.

    >>अश्या सोसायट्या आदर्श असल्या तरी फार क्वचितच बनतात<< मला वाटत नेतृत्व तेवढ खंबीर अन विश्वसनीय असेल तर नक्कीच बनू शकेल.

    छत्रपती शिवरायांनी केलेली स्वराज्य निर्मिती किंवा श्रीमंत शाहू महाराज यांनी चालवलेलं सरकार आपण याकडे राष्ट्र निर्मिती च्या नजरेतून पाहिलं अन त्या अनुषगांने त्याची चिकित्सा केली तर राष्ट्र निर्मिती नक्कीच होऊ शकेन.

    आता कुठे मी तुमची लेखमाला वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना चुकून काही कमी जास्त बोलल गेल असेल तर क्षमा असावी.

    ReplyDelete