Saturday, April 11, 2020

भैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)


रामकथा भारतीय उपखंडात पसरलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तिची वेगवेगळी रूपं दिसतात आणि लोककथांतही तिची अनेक उपकथानकं सापडतात. आता जरी मला आठवत नसलं तरी आई सांगते की लहानपणी रोज रात्री बाबांच्या मांडीवर झोपताना गोष्ट सांगायचा हट्ट करायचो आणि त्यात जेव्हा श्रावणबाळाची गोष्ट यायची तेव्हा हमखास रडत रडत झोपी जायचो. मला खात्री आहे की दूरदर्शन आणि मनोरंजनाची अन्य साधने नसलेल्या अनेक शतकांत भारतीय उपखंडातील अनेक पालकांना रामायणाने हात दिला आहे आणि आपापल्या लेकरांचा किंवा नातवंडांचा, गोष्टींचा हट्ट पुरा करण्यात मदत केली आहे. अर्थात यामुळे प्रत्येक घरात रामकथेत भर पडत गेली असावी.

जितकी प्रसिद्ध रामायणे आहेत आणि रामाच्या बाबतीत जितक्या लोककथा आहेत त्या सगळ्या वाचणं मला शक्य नाही. तसेच देशोदेशींच्या पुराणकथांत मला रस असला तरी त्यात माझा व्यासंग नाही. पण जितकं तोडकंमोडकं वाचन मी केलेलं आहे त्यावरून मला जाणवलं आहे की प्रत्येक समूहाच्या पुराणकथांतून त्या समूहाच्या मान्यतांचा आणि संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहात असतो. आणि जसजशा त्या कथा लोकप्रिय होऊ लागतात तसतसे हे अंतःप्रवाह अजून ठळक होऊ लागतात.

नियती ही जागतिक संकल्पना आहे. त्यामुळे जगातील सर्व पुराणकथांत नियती आपलं अस्तित्व दाखवत असते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील घटना या नियतीच्या अदृश्य धाग्याने बांधलेल्या असतात ही कल्पना आपल्याला अनाकलनीय आयुष्यात आधार देत असते. पण नियती ही शक्ती सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील सर्वसामान्य प्रसंगांना उलगडण्यासाठी इतरांपेक्षा अधिक समर्पकपणे केवळ भारतीय परंपरेने वापरली आहे. कारण आपण नियती नामक शक्तीला कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या दोन चाकांवर चालणाऱ्या व्यवस्थेत बसवले आहे. त्यामुळे आपल्याकडे नियतीबरोबर प्राक्तन नावाची अजून एक संकल्पना तयार होते.

संस्कृती म्हणजे जीवनपद्धती मानली तर धर्म म्हणजे संस्कृती निर्माण करण्यारी व्यवस्था आहे असं मला वाटतं. धर्म साधारणपणे दोन प्रश्नांचं उत्तर देतो. 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?'

पाश्चात्य जगात अनेक संस्कृती नांदत होत्या पण त्या सर्वांना मध्यपूर्वेत जन्म घेतलेल्या तीन अब्राहमिक धर्मानी गिळून टाकले आहे. त्यामुळे त्या मृत संस्कृतीतील पुराणकथांतून या दोन प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ती आता निरुपयोगी ठरली आहेत. अब्राहमिक धर्मात 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर 'नियती किंवा परमेश्वराची इच्छा' असं दिलं जातं. तर 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर 'देवाबरोबर केलेला करार'असं दिलं जातं. त्यामुळे तुमच्या नियतीचे शिल्पकार तुम्ही नसता. तुमची नियती अशी का आहे? या प्रश्नालाही उत्तर कायम 'देवाची इच्छा' इतकंच असतं. प्राप्त नियतीला स्वीकारून तुम्ही कराराचं पालन करणं इतकंच तुमच्या हातात असतं. आणि तुम्ही ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे की नाही याचा निर्णय अंतिम निवाड्याच्या दिवशी केला जाणार असतो.

या अंतःप्रवाहामुळे माणसे चांगली किंवा वाईट वागतात. अवतार वगैरेची भानगड नसते. माणूस आणि देव असा सरळसोट मामला असतो. माणसे देवाशी नवा करार करू शकतात. माणसे स्वतःला प्रेषित घोषित करू शकतात. आणि इतर माणसे त्याला खोटं ठरवू शकतात. अनेक तोतये प्रेषित तयार होतात. एखादा प्रेषित समाजमान्य व्हायला त्याची हयात उलटून जावी लागते. प्रेषिताला त्याच्या हयातीत विरोधकांकडून आणि अनुयायांकडूनही त्रास भोगावा लागतो. त्याचं कारणही परमेश्वराची इच्छा इतकंच असतं.

प्रेषिताला जे अनुयायी मिळालेले असतात त्यांच्या सामाजिक स्थानावरून प्रेषिताचा संदेश बहुसंख्यांना मान्य होणार की नाही ते ठरते. लोक जुना प्रेषित सोडून नवा प्रेषित घेऊ शकतात. जुन्या प्रेषिताला मानणारे आणि नव्या प्रेषिताला मानणारे अश्या अनेक सरळ रेषा समाजात तयार होतात. ग्रंथप्रामाण्य वाढते. प्रेषिताचं आयुष्य आदर्श मानल्यामुळे त्याच्यासारखं वागण्याची जबाबदारी इतरांवर येते. पण या सर्वांहून सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे प्रेषिताच्या आयुष्यातील प्रसंगांची जबाबदारी प्रेषितांवर पडते. त्यामुळे ते प्रसंग जर सद्यकाळाशी सुसंगत असतील तर त्यांचा उदोउदो होत राहातो. आणि विसंगत असतील पण प्रचलित इतिहासातून त्यांना वगळणं अशक्य असेल तर त्यांचं दुबळं समर्थन केलं जातं किंवा मग त्याबद्दल मौन बाळगलं जातं. त्यामुळे प्रेषितांच्या मागे कदाचित थोड्या वेगळ्या रेषेत चालणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो. पण प्रेषितापासून कितीही तिरक्या कोनात चालले तरी सगळे प्रेषितांच्या मागे चालणारे असतात. समांतर चालणारे कुणीच नाही.

याउलट भारतात मात्र एकाच वेळी अनेक संस्कृती नांदत होत्या आणि इथेच अनेक धर्मांचा जन्मही झाला. इथे जन्म झालेल्या प्रमुख धर्मांपैकी शीख धर्म सोडल्यास इतर प्रत्येक धर्माने या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरी वेगवेगळ्या प्रकारे केला असला तरी त्या सर्व धर्मात एक सूत्र समान दिसतं की त्यांनी 'एखादी गोष्ट अशी का घडली?' आणि 'कुणी कसं वागावं?' या दोन्ही प्रश्नांना एकत्र गुंफलं आहे. आत्मा न मानणारा बौद्ध धर्म असो किंवा आत्मा मानणारा जैन धर्म असो किंवा मग अनेकेश्वरवाद आणि आपापल्या पूर्वजपरंपरा जपणाऱ्या पुराणप्रिय लोकांचा इतरांनी नाव दिलेला हिंदू धर्म असो. या सर्वात पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांना नियतीबरोबर महत्व आहे.

त्यामुळे 'एखादी गोष्ट अशी का घडली?' याचं उत्तर नियती असलं तरी 'कुणी कसं वागावं?' याचं उत्तर मात्र 'या जन्मीच्या उत्तम कर्माचं फळ पुढील जन्मात मिळणार आहे.त्यामुळे पुढील जन्म हीनयोनीत न होता उत्तमयोनीत मिळावा आणि त्या जीवनात सर्व सुखे मिळावीत म्हणून तुम्हाला धर्म सांगेल त्या पद्धतीने वागणं आवश्यक होतं. या पद्धतीने तुम्ही या जीवनातील तुमच्या सुखदुःखांचे शिल्पकार नसलात तरी पुढील जन्मातील सुखदुःखांचे शिल्पकार असता. त्यामुळे तुमच्या पुनर्जन्मातील सुखदुःखाची जबाबदारी तुमच्या या जन्मातील कृत्यांवर सोपवून आपल्या भूमीत जन्माला आलेले तीनही प्रमुख धर्म मोकळे झालेले आहेत.

अश्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रेषिताचा जन्म होण्याची गरजच संपून जाते. देवाशी करार करण्याचीही आवश्यकता नाही. मग आदर्श जीवन कसे जगावे ते सांगण्यासाठी जैन आणि बौद्ध धर्म सोडल्यास इतर भारतीय लोकांना मान्य असणाऱ्या, पूर्वजपरंपरा मानणाऱ्या लोकांच्या धर्मात पुरुषोत्तम स्वरूपात अवतार घेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष देवावर येते. आणि मग अधर्माचा प्रभाव वाढू लागला की विविध युगात परमेश्वर अवतार घेतो.

परमेश्वराच्या त्या अवताराचे आयुष्य हा अनेकांसाठी आदर्श ठरते पण त्याचे अनुकरण करणे मात्र अपेक्षित नसते. जे प्रत्यक्ष परमेश्वराने अधर्माचा नायनाट करण्यासाठी घेतलेल्या अवतारात केलं ते आता मी करायची गरज नसते. मी आपला माझ्या पुढील जन्मातील सुखांची बेगमी करण्यात स्वतःला गुंगवून ठेवू शकतो. अश्या प्रकारे आदर्श आणि त्याला मानणारे यांची आयुष्ये एकमेकांना समांतर चालत राहतात. लोक देवाची आणि त्याची अवताराची पूजा करतात पण त्याचे अनुकरण करत नाहीत. त्याच्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगत राहतात पण त्या कथाकथनाचा उद्देश मात्र केवळ भक्ती वाढावी, नम्रता अंगी यावी, आणि पूर्वजपरंपरा चालत राहावी इतकाच असतो.

या पूर्वजपरंपराअनुयायी धर्मात इथपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण एकदा का अवतार संकल्पना आली की 'तूच आहेस तुझ्या पुढल्या जन्माचा शिल्पकार' या मान्यतेला सुरुंग लागतो. कारण या अवताराला त्याच्या आयुष्यात जे दुःख भोगावे लागते त्याचं कारण म्हणून त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांची कारणपरंपरा सांगता येत नाही. अवताराला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नसल्याने त्याला कर्मसिद्धांत लागू होत नाही. त्यामुळे मग अवताराला दुःख का भोगावं लागलं? आणि अवताराने चांगलं का वागावं? यांची उत्तरं देणं कठीण होऊन जातं.

'अवताराने चांगलं का वागावं?' यासाठी धर्मसंस्थापना असा उद्देश पुढे ठेवला की काम सोपं होतं. पण अवताराला दुःख का सहन करावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होऊन बसतं. म्हणून मग शाप संकल्पना वापरली जाते. मग श्रावणबाळ येतो. शब्दवेधी बाण येतो आणि शेवटी पुत्रवियोग येतो.

अश्या प्रकारे सर्वसामान्य माणसांचे प्राक्तन त्यांच्या पूर्वजन्मावरुन ठरते याउलट अवतारांचे प्राक्तन त्यांना किंवा त्यांच्या जवळच्यांना मिळालेल्या शापावरून ठरते.

अर्थात भारतीय पुराणकथांत आणि अब्राहमिक धर्मांच्या पुराणकथांत एक समान धागा असतो की, चरित्रनायकाच्या आयुष्यातील कथांचे पूर्ण कार्यकारणभाव दिले आणि त्यांच्या भावभावनांचे चित्रण केले तरी त्यांच्याबरोबरच्या लोकांचे भावविश्व् आणि त्यांची झालेली फरफट याबद्दल सर्व पुराणकथा मौन बाळगतात. त्यामुळे कौसल्या, लक्ष्मण, सीता, तारा, मंदोदरी, कुंभकर्ण, इंद्रजीत या सगळ्यांचे भावविश्व् आपल्यासमोर लोकप्रिय ग्रंथातून येत नाही. त्याचप्रमाणे येशूची आई मेरी किंवा पिता जोसेफ किंवा प्रेषित मुहम्मदांची अल्पवयीन पत्नी आयेषाचे भावविश्व् तितक्याच बारकाईने आपल्या समोर येत नाही. अब्राहमिक धर्मात ग्रंथप्रामाण्य असल्याने त्यात लोककथांना फार स्थान नाही. याउलट आपल्याकडे ग्रंथप्रामाण्य नसल्याने लोककथांनी अनेक प्रक्षेप मूळ कथेत घुसडले आहेत.

अब्राहमिक धर्मात प्रेषितांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दलही परमेश्वराची इच्छा हे स्पष्टीकरण देता येते. प्राक्तनाची झंझट नसल्याने, प्रेषित प्रवृत्तीप्रवण असूनही ते नियतीशरण दाखवता येतात. पण अवतारी पुरुषांच्या आयुष्यातील चमत्कारांचे आवरण बाजूला काढून त्यांच्या आयुष्यातील कार्यकारणभाव उलगडणे अतिशय कर्मकठीण असते. कारण इथला समाज आता नियतीशरण आहे. प्राक्तन आता आपल्या नेणिवांचा भाग झालेले आहे. इथला समाज आपल्या पूर्वजन्मातील कर्मफळांना भोगण्यास तयार आहे. त्या समाजाचा आदर्श आता नियतीशरण दाखवावा की प्रवृत्तीप्रवण दाखवावा? ही मोठी गुंतागुंत आहे. त्याला प्रवृत्तीप्रवण दाखवणे आवश्यक आहे. कारण तो धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेला आहे. पण त्याला नियतीशरण दाखवणे अशक्य आहे. शाप उ:शाप कल्पना वापरून आपण फारतर त्यांनी भोगलेल्या दु:खाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पण त्यांनी जवळच्या व्यक्तींवर आणि संपूर्ण समाजावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणं अशक्य असतं. म्हणून अवतारी पुरुषांचे सगळे वर्तन दैवी ठरवून आपण त्याला योग्यायोग्यतेच्या कसोट्या लावणं टाळतो.

अश्या वेळी जेव्हा भैरप्पा सीतेच्या दृष्टिकोनातून चमत्कार बाजूला करून रामकथा सांगायचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सध्याचे सत्ताधारी असतात तेव्हा पूर्ण पुस्तक वाचताना अजून नवनवीन प्रश्न पडत जातात. किंबहुना, हे प्रश्न भैरप्पांना पडले नाहीत का? आणि त्यांना उत्तरे देणे त्यांना महत्वाचे का वाटले नसावे? हा प्रश्न सतत पडत राहतो.

लक्ष्मण, वसिष्ठ, सीता, गुहराजा, सुमंत या सगळ्यांबरोबर राम ज्या वेळी चर्चा करतो तेव्हा तो सारासार विचार करणारा राजा न वाटता; एककल्ली, हेकेखोर आणि बेजबाबदार राजपुत्र वाटतो. आपल्या निर्णयांचा सीतेवर, लक्ष्मणावर, कौसल्येवर, दशरथावर काय परिणाम होईल त्याचा विचार तर सोडाच पण आपल्या निर्णयाचा प्रजेवर, राज्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करू न शकणारा, प्रजेला भ्रष्टाचार करु शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सोडणारा आणि प्रजेला साठेबाजीच्या व करचुकवेगिरीच्या सवयींकडे ढकलणारा राजा म्हणून समोर येतो. वनवासाहून परत आल्यावर तो अयोध्येच्या राज्यकारभाराची घडी पूर्ववत करू शकत नाही. ते करण्यासाठी भैरप्पा शेवटी लक्ष्मणालाच पुढे आणतात आणि राम एकांतवासात दु:खी आहे असं दाखवतात. त्याचा शेवटही एकाकी करून दाखवतात.

वडिलांचा शब्द खाली पडू नये आणि राज्यलोभी असा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून भैरप्पांचा राम अन्य सर्व आप्तस्वकीयांना, प्रजाजनांना आणि राज्याला ज्या गर्तेत ढकलतो ते बघून रामचरित्र वापरून सध्याच्या पंतप्रधानांच्या कठोर निर्णयांचं समर्थन करण्याचा भैरप्पांचा प्रयत्न असला तर तो किमान माझ्यासारख्या वाचकांपुरता तरी साफ फसला आहे.

रामकथा माझ्या जीवनाचा भाग आहे. लहानपणी अंधारातून जाताना वाटणारी भीती मी रामरक्षा म्हणत पळवून लावलेली आहे. अजूनही कधी देवळात गेलो तर 'ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं' अशी ती राममूर्ती पाहून माझे हात पूर्वसंस्कारामुळे आपोआप जोडले जातात. पण रामाच्या राजकीय आयुष्यातील कुठल्या भागाचा आदर्श सध्याच्या किंवा कुठल्याही काळातील राज्यकर्त्यांनी घ्यावा ? या प्रश्नाचं माझ्यासाठीच उत्तर तरी एकाही भागाचा आदर्श घेऊ नये असंच आहे. आणि भैरप्पांच्या उत्तरकांडाने ते अधोरेखित केलं आहे.

समाप्त

No comments:

Post a Comment