Thursday, October 19, 2017

नो रिग्रेट्स

काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.

मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं २०१० मध्ये. म्हणजे हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ५१ वर्षांनी. क्रिस्तोफर नोलानच्या इन्सेप्शन चित्रपटात हे गाणं वारंवार येतं. इतकंच काय पण संपूर्ण चित्रपटात हेच गाणं पार्श्वसंगीत म्हणून संथ लयीत वाजत रहातं. बॅटमॅन आणि जोकरमुळे नोलानचा फॅन बनलेल्या मला इन्सेप्शनमध्ये मात्र फसगत झाल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर बांधलेला हा चित्रपट जरी मला आवडला असला तरी यात प्रेक्षक कसा विचार करतील त्याची गणितं मांडून पटकथेची मांडणी केल्यासारखी मला वाटली होती. हे काही वाईट नाही. पण मग हा जादूचा किंवा नजरबंदीचा प्रयोग ठरतो, चित्रपट नाही; असं माझं मत पडलं होतं त्यामुळे थोडा उदास होऊन घरी परतलो होतो. नोलानने आपल्याला गोष्ट न सांगता आपल्याला गोष्टीचा भाग बनवलं आणि त्या गोष्टीतून प्रेक्षकाला बाहेर पडता येणार नाही अशी योजना केली हे माझं मत झाल्याने मी नंतर नोलानच्या चित्रपटापासून थोडा दूर राहिलो. इतका की नंतर त्याचा इंटरस्टेलार हा चित्रपट, चित्रपटगृहात न पहाता मी तो टीव्हीवर येऊन पुन्हा पुन्हा दाखवला जाऊ लागला तेव्हाच पाहिला. इतके सगळे झाले तरी ते गाणे मात्र माझ्या डोक्यात इन्सेप्शनने घट्ट बसवून टाकले होते. त्याची संथ लय. तो एक वेगळा स्त्री आवाज. त्यातली आर्तता. सगळं भारून टाकणारं होतं. किंबहुना इन्सेप्शनच्या परिणामकारकतेत त्या गाण्याचा मोठा वाट आहे असं माझं पक्क मत आहे.मग २०१२ मध्ये मादागास्कर या चित्रपटाचा तिसरा भाग आला. मुलांबरोबर पाहायला गेलो होतो. त्या चित्रपटात “कॅप्टन शेंटेल शॅनॉन ड्यू बॉइस” ही खलनायिका असते. न्यूयॉर्क मधून युरोपात आलेल्या अलेक्स या सिंहाला आणि त्याच्या प्राणी मित्रांना पकडण्यासाठी ती जीवाचं रान करते. त्यात तिचे साथीदार जायबंदी होतात. हॉस्पिटलात ते सारे प्लॅस्टर लावून आपापली हाडं जुळवून घ्यायला पलंगावर झोपलेले असतात. ड्यू बॉइस तिथे येते. त्यांना सांगते, 'चला उठा, आपल्याला सगळ्या प्राण्यांना पकडायचं आहे.' नखशिखांत प्लॅस्टर मध्ये बांधले गेलेले सहकारी हलतसुद्धा नाहीत. ती पिस्तूल काढते. आणि छताला लागलेला एकेक दिवा फोडत जाते. पार्श्वसंगीत चालू होतं. शेवटच्या दिव्याच्या प्रकाशात जणू स्पॉटलाईट टाकला आहे अश्या अविर्भावात उभी राहून गाणं म्हणू लागते. सगळे सहकारी हलू लागतात. त्यांची प्लॅस्टर तडकू लागतात. ते उभे राहतात. आणि गाण्याच्या शेवटापर्यंत सगळे ठणठणीत होऊन तिच्या सेवेत रुजू होतात.


मला गाण्याचे बोल कळले नाहीत, कारण ते फ्रेंच भाषेत आहेत. पण हे कुठेतरी ऐकलंय इतकं आठवत होतं. मग एकदा टीव्हीवर मादागास्कर ३ पुन्हा बघताना मध्ये गुड नाईटची ‘नऊ मिनिटात सलमान बना’ अशी जाहिरात लागली. त्यात ते संगीत पुन्हा ऐकू आलं. आणि लिंक लागली. मग नेटवर शोधाशोध केली. तर कळलं की हे गाणं फार प्रसिद्ध आहे. ते जवळपास पाच सहा चित्रपटात वापरलं आहे. आणि दोन तीन जाहिरातीतसुद्धा. आता प्रश्न हा होता की ते गाणं ऐकू आल्याबरोबर ड्यू बॉइसचे सगळे साथीदार लगेच ठीकठाक कसे होतात? मग शोधाशोध चालूच राहिली. आणि त्यातून जे मिळालं फार विस्मयकारक आणि आनंददायक होतं. मी इंटरनेटच्या काळात जन्माला आलो म्हणजे मी भाग्यवान आहे याचा पुनःप्रत्यय करून देणारं होतं.

सन १९१५. फ्रान्समध्ये एक 'गाणारी चिमणी' जन्माला आली. वडील रस्त्यावर डोंबाऱ्यासारखे खेळ करून पैसे कमावणारे, आई बारमध्ये गाणारी तर आजी वेश्यागृह चालविणारी होती. लहानपणी आजीकडे वाढूनही कुपोषित राहिलेल्या या मुलीची मूर्ती छोटी होती. आणि स्वभाव इतका भित्रा होता की तिच्या हालचालीत तिची अस्थिरता जाणवायची. पण ती इतके सुंदर गाणे म्हणायची की तिचं नाव पडलं भित्री, छोटेखानी, गाणारी मुलगी म्हणजे 'गाणारी चिमणी'. तिचं नाव होतं एडिथ पिफ. (मी तिला वाचून ओळखतो, आणि माझं फ्रेंच; झुलू, मंडारिन, किंवा रशियन इतकंच चांगलं असल्याने तिच्या नावाचा उच्चार मी माझ्या मनाने करत आहे. चुकला असल्यास तिथे दुर्लक्ष करा.)

एडिथच आयुष्य खडतर होतं. पण त्यात रोलर कोस्टर सारखे चढउतार होते. भरपूर हाल अपेष्टा आणि उदंड यश; वैयक्तिक आयुष्यात अपयशी प्रेमप्रकरणं आणि अपयशी विवाह पण सामाजिक आयुष्यात प्रचंड लोकप्रियता तिच्या वाट्याला आले. सगळ्यांना धुंद करणारा आवाज असलेली एडिथ स्वतः मात्र ,मादक द्रव्यांच्या आहारी गेली होती. हे गाणं तिच्या आयुष्यात यायच्या आधीच एडिथ प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेली होती.

१९५६ मध्ये मायकेल व्होकेरने, लोकप्रिय फ्रेंच गायिका रोसेल ड्यू बॉइससाठी एक गाणं लिहिलं. पण नंतर ते गाणं एडिथने म्हणावं असं वाटल्याने त्याने गाण्याचे बोल बदलले. त्यानंतर १९५९ मध्ये गीतकार मायकेल, संगीतकार चार्ल्स ड्यू मॉँट बरोबर एडिथच्या घरी गेला. एडिथचा मूड वाईट होता. तुसडेपणाने ती म्हणाली, 'एकदा काय ते म्हणून दाखवा माझा वेळ फुकट घालवू नका.' घाबरत घाबरत तिच्या घरच्या पियानोवर ते गाणं चार्ल्सने म्हटलं. गाणं संपलं. एडिथ शांत होती. तिने चार्ल्सला गाणं पुन्हा म्हणायला सांगितलं. पुन्हा ऐकत असताना ती अतिशय आनंदी होत गेली. आणि तिने ते गाणं म्हणायचं कबूल केलं. आणि मग या जगप्रसिद्ध गाण्याचा एडिथच्या गळ्यातून जन्म झाला. मूळ फ्रेंच गाणं आहे Non, je ne regrette rien. त्यानंतर हे गाणं जवळपास चौदा गायकांनी गायलं आहे आणि किमान बारा भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. माझ्या फ्रेंच ज्ञानाची कुवत मी वर सांगितलेली आहे. त्यामुळे मी ह्या गाण्याच्या शब्दांसाठी त्याच्या इंग्रजी अनुवादाकडे वळलो. तो इंग्रजी अनुवाद असा आहे.

No! No regrets
No! I will have no regrets
All the things
That went wrong
For at last I have learned to be strong

No! No regrets
No! I will have no regrets
For the grief doesn't last
It is gone
I've forgotten the past

And the memories I had
I no longer desire
Both the good and the bad
I have flang in a fire
And I feel in my heart
That the seed has been sown
It is something quite new
It's like nothing I've known

No! No regrets
No! I will have no regrets
All the things that went wrong
For at last I have learned to be strong

No! No regrets
No! I will have no regrets
For the seed that is new
It's the love that is growing for youकष्ट अवहेलना आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशस्वी झालेल्या एडिथला या गाण्यात आपलं आयुष्य दिसलं नसतं तर नवलंच. हे गाणं म्हणजे भित्र्या स्वभावाच्या लहानखुऱ्या मुलीनं आयुष्यभर केलेल्या झगड्यानंतर त्यावर केलेलं भाष्य होतं. आयुष्याच्या संध्याकाळी तिला कुणी त्या खडतर प्रवासाबद्दल तिचं मत विचारलं असतं तर जणू त्याचं उत्तरंच ह्या गाण्यात होतं. इथपर्यंत कळल्यावर माझे डोळे पाणावले होते.

पण मादागास्करमध्ये हे गाणं ऐकल्यावर जखमी पोलिसांच्या अंगात वीरश्री का संचारते?, ते काही कळत नव्हतं. मिळेल तसा शोध घेत होतो.

एकदा अल्जीरियाच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल वाचत होतो तेव्हा अचानक एक लिंक मिळाली. अल्जीरिया किंवा अल्जीयर्स ही उत्तर अफ्रिकेतील फ्रान्सची वसाहत. खरं तर वसाहत नाहीच त्यांनी अल्जीरियाला फ्रान्सची भूमी घोषित केलेलं होतं. या अल्जीरियामध्ये दोन प्रकारचे नागरिक रहात होते. मूळचे इस्लामिक अरब आणि नंतर तिथे आलेले कॅथलिक आणि ज्यू फ्रेंच लोक. अर्थात इस्लामी अरबांना समाजात खालच्या दर्जाचे स्थान मिळाले होते. इतका खालचा दर्जा की अरब नागरिकाच्या मताची किंमत फ्रेंच नागरिकाच्या १/७ होती. तिथे स्वातंत्र्यलढा धुमसत होता. तो रक्तरंजित होता. खून, बलात्कार, मारझोड, सामूहिक हत्याकांड, लुटालूट दोन्ही बाजूकडून चालू होते. फ्रेंच सरकार प्रचंड दमनकारी होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अल्जीरियाचा लढा तीव्र होत गेला. १९५४ पासून तीव्रता वाढत गेली. अल्जीरियामधील फ्रेंच लोकांना अल्जीरिया सोडायचे नव्हते. पण फ्रान्समधील कम्युनिस्ट लोकांच्या मदतीने अल्जीरियन स्वातंत्र्यसैनिक आपला लढा जागतिक व्यासपीठावर नेऊ शकले.

शेवटी फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक या प्रश्नावर कोसळले. आणि चार्ल्स द गॉलला पुन्हा पाचारण करण्यात आले. त्याच्या अधिकारात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आणि हे सगळे होण्यात अल्जीरियातील फ्रेंच लोकांचा मोठा हात होता. त्यांची अपेक्षा होती की चार्ल्स द गॉल अल्जीरियातील बंडाळी मोडून काढतील आणि जुनी व्यवस्था अधिक मजबूत करतील. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव इतका होता की संपूर्ण स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर अल्जीरियात सार्वमत घेण्यास चार्ल्स द गॉलने संमती दिली. सार्वमत घेतले गेले. अल्जीरिया आणि फ्रान्समधील ७५% लोकांनी अल्जीरियाला स्वातंत्र्य द्यावे असे मत दिले. अल्जीरियातील फ्रेंच नागरिकांना मात्र यामुळे आपली फसवणूक झाली आहे असे वाटले. त्यांनी फ्रांस सरकारविरोधात आणि या सार्वमताच्या विरोधात बंड पुकारले. बंडाला सगळ्यात पहिला पाठिंबा दिला होता तो फ्रेंच लीजन या लष्करी तुकडीने. एडिथने आपलं No Regrets हे गाणं या फ्रेंच लीजन तुकडीला अर्पण केलं होतं.

फ्रेंच लीजन म्हणजे फ्रेंच नागरिक नसलेल्या पण फ्रान्ससाठी लढू इच्छिणाऱ्या लोकांची फ्रान्सने परदेशात उभारलेली सेना. हिची सुरुवातच मुळी अल्जीरियात झाली. या सेनेत सहभागी असलेल्या परदेशी नागरिकाने फ्रान्सच्या बाजूने लढताना जर युद्धात रक्त सांडले तर त्याला लगोलग फ्रान्सचे नागरिकत्व मिळते. ही जगातील एकमेव सैन्य तुकडी असावी की जी आपल्या देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ न घेता आपल्या तुकडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेते.

तर अश्या या फ्रेंच लीजनच्या अल्जीरियातील तुकडीने सार्वमताचा विरोधातील बंडाला आपले समर्थन दिले. पण बंड तकलादू ठरले. चार दिवसात त्याचा निःपात करण्यात आला. बंडाचे सूत्रधार पकडले गेले. त्यांना शिक्षा झाल्या आणि सैन्य तुकडीतील शिपायांना अल्जीरियातील आपल्या बराकी सोडून दुसऱ्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले गेले. जवळपास १५० वर्षांचा इतिहास असलेली आपली शक्तिस्थाने सोडून सैनिक बराकीबाहेर निघाले तेच मुळी एडिथचं No Regrets हे गाणं म्हणत.

१५० वर्षाचा बऱ्यावाईट अनुभवांचा ऋणानुबंध सोडून चालले होते ते सैनिक. नवीन मोहिमेवर. जुनं सगळं सोडून. ज्याला त्यांनी अल्जीरियातील स्वातंत्र्यलढा मोडून काढण्यासाठी सर्वाधिकारी राष्ट्रपती होण्यास मदत केली होती त्यानेच अल्जीरियाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते आणि फ्रेंच लीजनच्या शक्तीला उखडून टाकले होते. काव्यगत न्याय म्हणावा की काय अशी परिस्थिती. आणि म्हणून ते जणू No Regrets म्हणत स्वतःचं सांत्वन करत होते. त्यानंतर ते गाणं फ्रेंच लीजनचं स्फूर्तीगीत बनलं आहे.

जुनी जखमी मोहीम सोडून पुन्हा नवीन मोहिमेवर रुजू होण्याची आज्ञा देताना हे स्फूर्तीगीत जेव्हा मादागास्करची खलनायिका म्हणते तेव्हा तिच्या साथीदारांच्या मनात स्फूर्ती दाटून येणे स्वाभाविक असते. हे जाणवल्याने माझा शोध संपत आला. मादागास्करच्या दिग्दर्शकाच्या कल्पकतेचे आणि विनोदबुद्धीचे कौतुक वाटले. पण एडिथच्या गाण्याच्या प्रवासाने दिपून गेलो असतानाच अजून एक गोष्ट जाणवली. की या गाण्याचा प्रवास अजून थांबलेला नाही.

एकंच मूल, छोटी कुटुंब, पंचविशी आणि तिशीपर्यंत चालणारी शिक्षणं, तोपर्यंत होऊन जाणारी एखाद दोन प्रेम प्रकरणं, त्यानंतर त्याच जोडीदाराशी किंवा दुसऱ्या कुणाशी होणारे प्रेमविवाह किंवा जमवून आणलेले विवाह, मग नोकरी आणि घर यांचा सुवर्णमध्य साधण्याची धडपड, त्यात समाजमाध्यमामुळे जवळ आलेलं जग, त्यातून दिसणारे मित्र मैत्रिणींचे आनंदी चेहरे, त्यातून आपण सोडून जग आनंदात असल्याचा होणारा आभास आणि शेवटी त्यातून स्वतःसाठी येणारी अस्वस्थता, जवळ आलेल्या जगामुळे नवीन मित्र मैत्रिणी मिळण्याच्या वाढलेल्या संधी, त्यातून वाढू लागलेले विवाहबाह्य संबंध, आई वडिलांशी उडणारे खटके, मुलांच्या शिक्षणाविषयी वाढणारी अपराधी भावना, आपण आता आयुष्याच्या केंद्रभागी नाही हे कळल्यावर होणारी मनाची घालमेल, त्या घालमेलीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःशी चाललेली झटापट, त्यात काही जणांचे उध्वस्त मनोविश्व, काही जणांना जीवनाचा जाणवलेला फोलपणा, काहीजणांना पुन्हा सापडलेला नवा सूर… या सगळ्याचे व्यवस्थित सार म्हणजे मायकेलने लिहिलेले, चार्ल्सने संगीतबद्ध केलेले आणि एडिथने अजरामर करून ठेवलेले हे गीत. ज्यांना नवीन सूर सापडतो त्यांना तर हे गीत आवडेल याची मला खात्री आहे. आणि ज्यांना तो सापडत नाही त्यांच्याही जुन्या जखमा या गीतातील शेवटचं कडवं ऐकताना चटकन बऱ्या होवोत, बांधून ठेवणारे प्लॅस्टर गाळून पडो आणि नवीन सूर सापडण्यासाठी, सापडलेला सूर आळवण्यासाठी शेवटचं कडवं प्रेरणा देणारे ठरो हीच सदिच्छा.

No! No regrets
No! I will have no regrets
For the seed that is new
It's the love that is growing for you

No comments:

Post a Comment