Friday, November 23, 2018

भंवरे ने खिलाया फूल

प्रत्यक्ष आयुष्यात आणि इथे फेसबुकवरही माझं मित्रवर्तुळ फार मोठं नाही. पण या मर्यादित मित्रवर्तुळातील खूपजण मला सांगतात की त्यांना माझा फेसबुकवरचा वावर आवडतो. जे असं सांगत नाहीत ते केवळ भिडस्तपणामुळे सांगत नसतील अशी माझी समजूत आहे. यापूर्वी मला ते माझं कौतुक वाटून मी सुखावत असे. आणि खोटं कशाला बोला पण थोडासा गर्वही अनुभवत असे. पण आज सकाळी बायकोशी बोलत होतो. या महिन्यात येऊ घातलेल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी तिला काय भेट द्यायची त्याबद्दल बोलत असताना ती पटकन म्हणाली ‘आनंद, फेसबुकवर लिहू लागल्यापासून तू खूप बदलला आहेस. आधीपेक्षा खूप कमी आक्रस्ताळा आणि शांत झाला आहेस. छान वाटतं तुझ्याशी बोलायला.’ 

भेटवस्तूचा निर्णय झाला. ती तिच्या कामाला लागली. आणि मी माझ्या. पण तिचं माझ्या स्वभावाबद्दलचं निरीक्षण डोक्यातून जाईना. त्याबद्दल विचार करत असताना मला लहानपणी न आवडलेलं एक गाणं आठवलं.

माझ्या जन्माच्या आसपास राजकपूर साहेबांनी समस्त जगाला ‘सत्यं शिवं सुंदरं’ चा साक्षात्कार घडवला असल्याने आणि मी टीपकागदासारखा सगळं काही टिपून घेत असल्याने माझ्या संस्कारक्षम मनाची अतिकाळजी करणाऱ्या माझ्या तीर्थरुपांनी राजकपूरचं आमच्या घरातील राज्य संपवून टाकलं होतं. अर्थात थोडा अजून मोठा झाल्यावर, घरी व्हीसीआर असलेल्या आणि आई बाबा दिवसभर बाहेर असणाऱ्या मित्रांशी दोस्ती करून मी अपुरे संस्कार पूर्ण करून घेतले तो भाग सोडा. पण साधारणपणे १९८२-८३ मध्ये आरके स्टुडिओजचा प्रेमरोग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी रेडिओवर लागत असत. आणि आमचे चाळकरी स्वार्थी नसल्याने ज्यांच्याकडे रेडिओ होते त्या सर्वानी प्रेमरोगची गाणी आमच्याकडून पाठ करून घेण्याची जबाबदारी स्वतःवर असल्याप्रमाणे आपापल्या रेडिओचे आवाज कायम टीपेला पोहोचलेले ठेवून आम्हाला ती गाणी ऐकवली. त्यातली गाणी, गाणी कमी आणि कविता जास्त असल्याने; पाठ होणं कठीण होतं. पण कळत नसूनही एका गाण्याचं धृवपद कायम मनात रेंगाळत राहिलं. ‘भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राज कुंवर’.


कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारताना या गाण्याच्या ध्रुवपदाचा मी लावलेला अर्थ आठवला.

मुलगी जर फूल असेल (मराठीतील फूल, इंग्रजीतील नाही) तर तिच्या जन्मापासून तिचे आई-वडील, भाऊ-बहिणी, काका-मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी जणू तिच्यासाठी त्या भुंग्याचं काम करतात. तिच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतात. तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. आणि मग कुणीतरी या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतं. इतक्या सगळ्यांनी फुलवलेलं व्यक्तिमत्व मग हा प्रियकर आपल्यासोबत घेऊन जातो.

पण याचा अर्थ कायम मुलगी फूल आणि मुलगा राजकुमार असा करता येणार नाही. प्रेयसी भेटायच्या आधी मुलगादेखील एक उमलणारं व्यक्तिमत्व असतं. आणि त्याच्या साथी सोबत्यांबरोबर राहून तो घडतो. मग कुणी मुलगी त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडून त्याला आपला जोडीदार बनवते. त्या व्यक्तिमत्वाचे फायदे ती उपभोगते किंवा मग तोटे सहन करते. म्हणजे जगाला जरी माहेर सोडून सासरी जाणारी मुलगी म्हणजे फूल आणि तिचा नवरा म्हणजे राजकुमार वाटला तरी प्रत्यक्षात ते दोघे एकाचवेळी फूल असतात आणि राजकुमारदेखील.

कॉलेजच्या ग्रुपमध्ये सएकही सुबक ठेंगणी नसल्याने डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट वगैरे माझ्या नशीबात नव्हतं. त्यामुळे माझ्या मित्रांनी म्हटलेल्या ‘बरं’ या एकमेव प्रतिसादाचा अर्थ समजून मी माझा उत्साह आवरता घेतला होता.

पण आज लग्नाच्या वाढदिवसाच्या आसपास असताना, बायकोच्या वाक्यामुळे मला त्याच ध्रुवपदाचा थोडा अजून वेगळा अर्थ लागला.

मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी फूल आणि राजकुमार तर असतातंच. पण ते केवळ काही काळापुरते. एकदा ते एकमेकांच्या आयुष्यात सातत्याने आले की त्यांची फुलाची भूमिका संपत नसली तरी राजकुमाराची भूमिका मात्र संपते. आणि त्यांच्याही नकळत ते एकमेकांसाठी भुंग्याच्या भूमिकेत शिरतात. एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ लागतात. यातून तयार होणारे व्यक्तिमत्व मग अजून नवनवीन मित्र मैत्रिणी तयार करते. आणि मग ते मित्र मैत्रिणी म्हणजे तात्पुरते राजकुमार बनतात. त्यातले जे आयुष्यात दीर्घकाळ राहतात, त्यांचीही राजकुमाराची भूमिका तात्पुरती असते. मग तेही आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आपला वाटा उचलतात.

म्हणजे जर माझ्या प्रेयसीला मी आवडलो तर त्यात माझ्या विवाहपूर्व आयुष्यातील नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा मोठा हात असावा. आणि इथे कुणाला माझा वावर आनंददायी वाटत असेल तर त्यात माझ्या बायकोचाही मोठा हात असावा. आणि आता जर तिला माझ्यातील आक्रस्ताळेपणा कमी झाल्यासारखा वाटत असेल तर त्यात माझ्या फेसबुकवरील मित्रमंडळींचाही मोठा हात असावा.

असलं काहीतरी सुचलं आणि ते मी बायकोला ऐकवलं तर तिनेही ‘बरं’ असा प्रतिसाद देऊन ‘भेटवस्तूची यादी अजून फायनल नाही. काही सुचलं तर उद्या सांगते.’ असा धक्का दिला. या धक्क्याने माझ्या व्यक्तिमत्वाला काय आकार मिळेल कुणास ठाऊक?

1 comment:

  1. छानच! शेअर करतो व्यक्तानंदा!

    ReplyDelete