Saturday, November 24, 2018

Circle of Life

शाळेत होतो तेव्हा चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या एक मराठी लेखकाचा मी फॅन झालो होतो. पण एका वर्तमानपत्रात त्या लेखकाचं सदर सुरु झाल्यावर मात्र माझा फॅनज्वर उतरला. त्याला महत्वाचं कारण होतं अनेक लेखांमधून त्या लेखकाच्या वडिलांचा होणारा उल्लेख. ‘उत्तुंग वडिलांचा मी करंटा मुलगा’ असा सूर त्यांनी लावला होता. वडिलांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण साजेसे नाही ही भावना साधारणपणे सर्व मुलांच्या मनात असते. त्याप्रमाणे ती माझ्याही मनात होती. त्यामुळे तो लेख वाचून माझे डोळे भरून आले होते पण जेव्हा तोच सूर पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष लेखातून ऐकू येऊ लागला तेव्हा मात्र माझ्या मनातला हळवा कोपरा निबर झाल्यासारखा झाला. कदाचित लेखक आपल्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत होता आणि माझ्या सुदैवाने त्यावेळी माझे वडील हयात होते, माझ्या कच्च्या मडक्याला आकार देत होते आणि स्वतःपेक्षा पुढे जाण्यासाठी मला प्रोत्साहन देत होते त्यामुळे माझ्या आयुष्यातील त्या लेखकाचं स्थान अल्पजीवी ठरलं. 

पुढे सीएच्या अभ्यासासाठी मुलुंडच्या वझे कॉलेजात एक वर्ष जाणं झालं. एके दिवशी तिथल्या ऑडिटोरियमपुढे भरपूर गर्दी दिसली. माझ्याबरोबरच्या मित्राने चौकशी केली तर कळलं की कॉलेजात चित्रपट दाखवत होते. कॉलेजात चित्रपट दाखवतायत या घटनेचं मला फार कौतुक वाटलं होतं. तिथली गर्दी बघून आम्ही तिथून काढता पाय घेतला. पण त्याक्षणी माझ्या आयुष्यात त्या चित्रपटाने प्रवेश केला आणि अजूनही माझ्या मनाच्या बिलबोर्डवरून तो अजिबात खाली उतरलेला नाही. या चित्रपटाचा त्या लेखकाशी असलेला संबंध म्हणजे या चित्रपटाचा नायकही स्वतःला ‘उत्तुंग वडिलांना न शोभणारा मुलगा’ समजत असतो. पण जीवनाच्या अंतहीन वर्तुळातील त्याचं स्थान घेण्यासाठी त्याचे दिवंगत वडील त्याला दृष्टांत देतात आणि ज्या भूतकाळाला पाठ दाखवून तो पळून गेलेला असतो त्याला सामोरं जाऊन तो आपलं हिरावून घेतलं गेलेलं स्थान पुन्हा मिळवतो. शेक्सपिअरच्या हॅम्लेटवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं असलं तरी चित्रपट शोकांतिका नसून सुखांतिका आहे.

आज सकाळी झोपेतून जागा झाल्यावर ‘कराग्रे वसते मोबाईल’ हा श्लोक म्हणत फोन हातात घेतला तर गूगल न्यूजने सांगितलं की आज या चित्रपटाच्या पुनर्निमितीचं ट्रेलर रिलीज झालं आहे. आणि मग अत्यानंदाने बिछान्यातून उठत दोन्ही मुलांच्या कानाशी यूट्यूबवरील ट्रेलर वाजवून त्यांना जागं केलं. संध्याकाळी जुन्या चित्रपटाची डीव्हीडी काढून पुन्हा एकदा बघितला आणि या चित्रपटाने काय काय दिलं त्या सगळ्या गोष्टी आठवल्या.

प्रेमळ राजा. त्याचा दुस्वास करणारा भाऊ. राजाचा गोडुला निरागस धाडसी राजपुत्र. कारस्थानी काकाच्या भूलथापांना बळी पडून राजपुत्र संकटात सापडणे. त्याला वाचवायला पराक्रमी राजा धावून जाणे. आणि त्यावेळी कपटी भावाने राजाला मरून टाकण्यात यश मिळवणे. ‘वडिलांचा मृत्यू तुझ्यामुळे झाला आहे त्यामुळे तू पळून जा’, असे चिमुकल्या राजपुत्राला पटवून देणे. काकाने मग राज्य हस्तगत करून संपूर्ण व्यवस्थेला स्वार्थासाठी वेठीस धरून सगळ्यांच्या आयुष्याचा समतोल बिघडवणे. आकस्मिकरित्या राजाचा मृत्यू आणि राजपुत्राचं नाहीसं होणं हे दोन आघात सहन न करू शकलेली प्रजा हतबल होणे. पळून गेलेल्या राजपुत्राला बेफिकीर आणि आनंदी मित्र मिळणे. त्यांच्या सोबतीत राजपुत्राने भूतकाळावर पडदा टाकून मस्तमौला होऊन जगणे. आणि मग एक दिवस त्याला गतायुष्यातील काहीजण पुन्हा भेटणे. मोकळ्या माळरानावर रात्रीच्या आकाशात उसळत्या ढगातून त्याच्या वडिलांनी त्याला स्वत्वाची जाणीव करून देणे. आणि मग पुन्हा राज्यात परतून कपटी काकाचं कारस्थान इतरांबरोबर स्वतः जाणून घेत, वडिलांच्या मृत्यूला आपण जबाबदार नव्हतो हे कळल्यावर काकाला शिक्षा करणे आणि मग हर्षोल्हासित प्रजेच्या साक्षीने राजपुत्राने जीवनचक्रातील आपलं स्थान पुन्हा घेणे. इतकी साधी कथा. पण डिस्नीने ती ज्या ताकदीने पडद्यावर मांडली आहे की The Lion King हा केवळ आफ्रिकन सव्हानाचाच नव्हे तर माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनाचा अनभिषिक्त सम्राट झालेला आहे.


लायन किंगने मला दिलेलं Circle of life, मी एका सहकाऱ्याला लग्नाच्या भेटीबरोबर शुभेच्छापत्रात लिहून दिलं होतं. Can you feel the love tonight हे गाणं बायकोबरोबर म्हटलं होतं. (पहिलं वाक्य सहकाऱ्याबद्दल असलं तरी दुसरं स्वतःच्या बायकोबद्दल आहे. वाचकांनी स्वतःचा गोंधळ करून घेऊ नये).

ऑफिसातून घरी आल्यावर कित्येक वेळा मुलांबरोबर I Just want to be king म्हटलं आहे. बिझनेसमध्ये चिंताजनक प्रसंग आले तेव्हा Hakuna Matata म्हणून स्वतःला बळ दिलं आहे. हिटलवरच्या कित्येक डॉक्युमेंटरी बघताना मनात “Be prepared’ म्हटलं आहे. ‘Simba, it is to die for’ हे कपटी स्कारचं वाक्य ऐकून मनातल्या मनात चरकलो आहे. पोटावर ठेवलं तरी आरामात मावतील इतकी छोटी असल्यापासून ते आता माझ्या उंचीला आलेल्या मुलांबरोबर Wildebeest च्या stampedeचा प्रसंग रडत रडत बघितला आहे. छोटा सिंबा stampede मध्ये वाळलेल्या झुडपाच्या फांदीवर स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या फांदीवर त्याच्या नखांचे उमटणारे ओरखडे पाहून चित्रपटाच्या ऍनिमेटर्स आणि दिग्दर्शकाबद्दल कौतुकमिश्रित आदर दाटून आलेला आहे. ‘Help, somebody, anybody’ म्हणणाऱ्या सिंबाला बघून आतडं पिळवटून निघालं आहे. Que pasa आणि mufasa ची गंमत करणाऱ्या ed, edd आणि eddy बद्दल हसू, कीव, तिरस्कार अश्या संमिश्र भावना मनात दाटून आलेल्या आहेत. जेव्हा मुफासा सिंबाला ‘remember who you are’ असं म्हणतो तेव्हा ऊर भरून आला आहे. आणि आपल्या प्राईडलँडकडे परतणाऱ्या सिम्बाबरोबर मी मनातल्या मनात सव्हानाच्या त्या गवतात धावलो आहे. हे सगळं किती वेळा केला आहे त्याची गणती नाही.

या चित्रपटामुळे मला मिस्टर बीनवाला रोवन ऍटकिन्सन पहिल्यांदा भेटला. सर एल्टन जॉन भेटले. Circle of life लिहिणारा टीम राईस भेटला. Stampede च्या दृश्याचं अंगावर येणारं संगीत देणारा हॅन्स झिमर भेटला. आणि या लोकांनी माझ्या आयुष्यात आपल्या कलेने रंग भरणं जे सुरु केलं ते अजूनही थांबलेलं नाही.

आज सकाळी ट्रेलर पाहून, हे सगळं पुन्हा एकदा आठवलं. आता हयात नसलेले वडील आठवले. शेवटच्या दिवसापर्यंत धडधाकट असलेले वडील आठवले. ज्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला होता त्या दिवशी त्या दुःखद घटनेच्या दहा मिनिटं आधी मी मुलांसोबत stampede चा सीन बघत होतो ते आठवलं. आणि त्यानंतर गांगरलेल्या मुलांना समजावून सांगताना रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या ढगात आजोबा आहेत आणि ते आपल्याला ‘रडू नका. remember who you are’ सांगतायत हे सांगत होतो ते आठवलं.

२०१९ला जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा मी सहकुटुंब सहपरिवार थिएटरात जाऊन कधी आनंदाचे तर कधी दु:खाचे अश्रू ढाळत हा चित्रपट बघणार आहे. आणि नेहमी मला स्वतःच्या पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे बाबा माझ्या रूपाने The Lion King बघणार आहेत. ‘वडिलांचा अपेक्षाभंग करणारा करंटा मुलगा’ ही नैसर्गिक भावना आपल्या मुलांच्या मनात येऊ न देण्याचं कसब जर मी पुढे चालवू शकलो तर लायन किंगच्या रफिकीने सिंबाला सांगितलेलं ‘he lives in you’ हे गुपित माझ्या बाबतीत खरं होईल. ते तसं खरं व्हावं आणि माझ्यासाठी वडिलांनी सुरु केलेलं हे circle of life पुढे चालू रहावं म्हणून लायन किंगकडे शुभेच्छा मागेन.

2 comments: