Monday, December 25, 2017

बोलेरो (भाग ४)

--------------
तुंबाडचे खोत मध्ये मंगल आणि अमंगलाचा सातत्याने चाललेल्या सोहळ्याला साक्षी असतो वाडा. मोरयाने बांधलेला; प्रचंड, भव्य वाडा. कादंबरीच्या सुरवातीला आपल्याला भेटतात ते त्याचे भग्नावशेष आणि शेवटी कळतात ती त्याच्या भग्नावस्थेची कारणे. म्हणजे अलिप्त असूनही वाडा शेवटी त्या कथेचा बळी ठरतो. खोतांच्या कथेत वारंवार येत असूनही आणि अलिप्त असूनही त्यात बळी न पडलेली अजून एक साक्षीदार असते जगबुडी नदी. दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला खोत तिची सहकुटुंब पूजा करतात, तिची ओटी भरतात. पण चारशे वर्षांच्या खोत घराण्याच्या इतिहासाला जगबुडी मात्र अलिप्तपणे पहाते. हजारो वर्षांपासून तशीच वहाते. कुठल्याही भावभावनांचे तरंग उमटवू न देता. एकाच तालात, आपल्याच तालात. आणि सगळ्या भावभावनांच्या तरंगात भिजून ओलेचिंब झालेले तुंबाडकर आणि लिंबाडकर तिच्या काठावर आपापले सूर आळवतात. आपल्या स्वभावामुळे निर्माण होणारे आवेग त्या सुरात मिसळतात. आणि जगबुडीच्या लाटांच्या कलकलाटात आपले भेसूर किंवा सुरेल सूर जोडतात.

आधी एक संथ सूर - जगबुडीचा.

तिच्या काठी मोरयाचा वाडा येतो. आणि जगबुडीच्या संथ एकसुरात खोतांच्या घराचे सूर मिसळू लागतात. पाशवी वासनांचे, मग्रुरीचे, रागाचे, द्वेषाचे, लोभाचे, सत्तोन्मादाचे, समजूतदारपणाचे, दबलेल्या दुःखांच्या उमाळ्याचे, हतबलतेचे, आनंदाचे, हताशेचे.

त्यात लिंबाडचे सूर मिसळतात. औदार्याचे, चिरडीला येण्याचे, देशप्रेमाचे, गोंधळल्याचे, ध्येयवादाचे, समजूतदारपणाचे, संशयाचे, दुःखाचे.

त्यात बाहेरील परिस्थितीचे निरनिराळे सूर मिसळत जातात. जातीभेदाचे, आडव्या पंगतीचे, नवीन शिक्षणाचे, मुंबईच्या पैश्याचे, धार्मिक तेढीचे, विधवा विवाहाचे, दारूचे आणि दारूबंदीचे, टिळकांच्या अग्रलेखांचे, गांधींच्या चळवळींचे, सावरकरांच्या गीतांचे आणि कुणी न पाळणाऱ्या त्यांच्या परंपराभेदी विचारांचे, अफवांचे; असे वेगवेगळे सूर मिळून कादंबरी वेग पकडते. आणि या कादंबरीला जर संगीत मानले तर तिचा क्रेसेंडो किंवा उत्कर्षबिंदू म्हणजे गांधीहत्येनंतर वाड्याचे नष्ट होणे.

गेल्या रविवारी कादंबरी वाचून झाली. डोक्यात हे कादंबरीचे संगीतमय रूप भिनलेले होते. ज्या मैत्रिणीने माझा वाढदिवस आहे अश्या चुकीच्या समजुतीने मला ही कादंबरी भेट दिली होती तिचे आभार मानण्यासाठी फोन केला. तिने उचलला नाही. मग तिला मेसेज टाकून घरच्यांबरोबर फिरायला बाहेर गेलो. गाडी सुरु केली तर त्यात माझी आवडती सीडी चालू झाली.

पहिले संगीत होते कार्ल ऑफ्फचे ‘ओ फॉर्च्यूना’. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन. आणि नंतर सुरु झाले फ्रेंच संगीतकार मॉरिस राव्हेलचे ‘बोलेरो’. हे माझे अतिशय आवडते संगीत आहे. मोठ्या लेकालाही आवडते. आवाज मोठा करून तीनचारदा ऐकले. शेवटी बायको आणि आईने वैतागलेल्या वाटल्या तेव्हा बंद केलं. एकाएकी डोक्यात भिनलेल्या कादंबरीच्या संगीतमय रूपाची राव्हेलच्या बोलेरोशी संगती जुळली. घरी आल्यावर राव्हेलच्या बोलेरोबद्दल जे जे मिळेल ते वाचून काढले.

मॉरिस राव्हेल (बोलेरोचा संगीतकार)
Image Source : Internet 
बोलेरो हा एक लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार आहे. क्युबा आणि स्पेनमध्ये लोकप्रिय असणारा हा नृत्यप्रकार म्हणजे जोडीने करायचे नृत्य. यात संगीत आणि नृत्याची लय संथ असते आणि नंतर ती हळूहळू वाढत जाते.

इडा रुबीनस्टेन नावाची एक रशियन नर्तकी राव्हेलची मैत्रीण होती. तिने राव्हेलला तिच्या बॅलेसाठी एका स्पॅनिश संगीतकाराच्या रचनेची सुधारित आवृत्ती करून देण्यास सांगितले. पण त्या रचना दुसऱ्या एका संगीतकाराच्या स्वामित्व हक्काखाली होत्या. त्याने त्या राव्हेलला देण्यासाठी आनंदाने होकार दिला पण राव्हेलने शेवटी स्वतःच एक रचना तयार करायचे ठरवले.

मग एक दिवस त्याने आपल्या मित्राला घरी बोलावले आणि त्याला पियानोवर एक तुकडा वाजवून दाखवला आणि म्हणाला, ‘मी याच तुकड्याला वारंवार वाजवत राहीन आणि प्रत्येक आवर्तनात त्यात एकेक वाद्य वाढवत जाईन. पाच मिनिटात सुचलेल्या त्या तुकड्याचा वाद्यमेळ बनविण्यासाठी राव्हेलला मग सहा महिन्यापेक्षा जात वेळ लागला. त्यातून जे बनलं त्याची सुरवात संथ लयीत आणि शेवट अतिशय वेगात होत असल्याने राव्हेलने त्या संगीताच्या तुकड्याचं नाव ठेवलं बोलेरो.

पंधरा मिनिटे आणि पन्नास सेकंदाच्या या संगीतात जवळपास सतरावेळा तोच तुकडा वाजतो. प्रत्येक वेळी एक नवीन वाद्य जुन्याबरोबर वाजू लागते आणि मग शेवटी अठराव्या आवर्तनात उत्कर्षबिंदूला तो सर्व वाद्यांना घेऊन थांबतो.


कॅरोल लोम्बार्डच्या १९३४च्या बोलेरो नावाच्या चित्रपटात या संगीताला वापरले आहे.


नंतर बो डेरेकच्या ‘१०’ नावाच्या चित्रपटातील एका संवादामुळे आणि बो डेरेकच्या लौकिकाला साजेश्या प्रणयदृष्यात पार्श्वसंगीत म्हणून वापरले गेल्यामुळे संगीताचा हा विलक्षण तुकडा अजून प्रकाशझोतात आला.


राशोमोन चित्रपटात अकिरा कुरोसावाने याच संगीताचे अनुकरण करणारी थीम पार्श्वसंगीत म्हणून वापरली आहे. त्याशिवाय अनेक चित्रपटांत आणि नृत्य नाटकांत या संगीताचा वापर केला गेला आहे.





जेव्हा या संगीताचा पहिला प्रयोग (परफॉर्मन्स) झाला तेव्हा, प्रेक्षक बेभान झाले होते आणि असे म्हणतात की एक स्त्री चित्कारली, ‘ हा वेडेपणा आहे. राव्हेल वेडा आहे’. जेव्हा राव्हेलला हे सांगितले गेले तेव्हा तो म्हणाला.’त्या स्त्रीला हे संगीत कळले आहे’. अजूनही कित्येक वेळा फ्लॅश मॉब करून हे संगीत युरोप अमेरिकेतील मॉल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी वाजवून कलाकार लोकांची वाहवा मिळवतात.



या संगीतावर टीकाही भरपूर झाली. सगळ्यात जहरी टीका म्हणजे हे संगीत नसून पाल्हाळ लावले आहे अश्या स्वरूपाची होती. ‘प्रत्येक संगीताचा एक अंतबिंदू असतो आणि बोलेरोच्या बाबतीत तो सुरवातीलाच आहे पण हे राव्हेलला कळलेले नाही’ अश्या तीव्र स्वरूपात त्यावर टीका झाली. ही टीका वाचली आणि तुंबाडचे खोत ही एक विसविशीत कादंबरी आहे. श्रीनांनी पाल्हाळ लावले आहे, अशी या कादंबरीवर होणारी टीका आठवली. आणि मला जाणवलेले कादंबरीतील संगीत व राव्हेलच्या बोलेरोची नक्की संगती काय ते माझे मला उमगले. राव्हेलची रचना अनेकांना पाल्हाळ वाटते, कादंबरी अनेकांना पाल्हाळ वाटते. राव्हेलला स्वतःला ही रचना त्याची सर्वोत्कृष्ट रचना वाटत नाही. या कादंबरीबद्दल श्रीनांचेही मत काहीसे असेच होते.

बोलेरो नृत्य म्हणजे दोन नर्तकांचा खेळ. कुरघोडी नाही, आक्रमण नाही, एकमेकांना संपवायची इच्छा नाही. उलट एकमेकांशी खेळून आनंद लुटणे हाच हेतू. किंवा कदाचित आनंद लुटण्यापेक्षा खेळणे हीच प्रवृत्ती असल्याने प्रवृत्तीशरण होऊन खेळत राहणे. कादंबरीत मंगल आणि अमंगल हे ते दोन नर्तक. राव्हेलच्या बोलेरोत एकामागून एक वाद्ये सुरु होत जातात आणि जुन्या वाद्याबरोबर तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात. कादंबरीत, मंगल आणि अमंगल सर्व पात्रांतून आपला अविरत खेळ पुन्हा पुन्हा खेळ खेळत रहातात. राव्हेलच्या बोलेरोत ड्रम, एकाच संथ लयीत सुरवातीपासून शेवटपर्यंत वाजत रहातो. कादंबरीत सुरवातीपासून शेवटपर्यंत जगबुडी एकाच संथ लयीत वहात रहाते. राव्हेलच्या बोलेरोत उत्कर्षबिंदूत सर्व वाद्ये एकत्र येऊन जो परिणाम घडवतात तोच परिणाम कादंबरीच्या शेवटी वाड्यावर येणाऱ्या संकटातून आपल्या अंगावर येतो.

कादंबरी मोठी, माझे आकलन तोकडे त्यामुळे त्यावर मी लिहिणार नाही असे आईला निक्षून सांगितले होते पण नंतर गाडीत ऐकलेल्या राव्हेलचे संगीत आणि मनात असलेले श्रीनांनी रंगवलेले शब्दचित्र इतके चपखल बसले की तुंबाडच्या खोतांवर लिहिणार नाही हा संकल्प तुटला. आता तर मला असेच वाटते आहे की कुणी तुंबाडचे खोतवर चित्रपट बनवला तर त्याला पार्श्वसंगीत म्हणून राव्हेलच्या बोलेरोशिवाय काहीही वापरू नये. आणि वाड्याच्या अखेरच्या क्षणी या संगीताचा शेवट येईल असे करावे.

मी ज्या प्रयोगांचा उल्लेख केला आहे त्या राव्हेलच्या बोलेरोच्या प्रयोगांचे आणि मग त्याला चित्रपटात वापरलेल्या तुकड्यांचे तुकड्यांचे किंवा त्यावरून बेतलेल्या पार्श्वसंगीताचे व्हिडीओ वर दिलेले आहेत.

लंडन सिम्फनी ऑर्केस्ट्राचा प्रयोग जरी पंधरा मिनिटे पन्नास सेकंद इतका मोठा असला आणि सुरवातीला थोडा संथ वाटला तरी शेवटपर्यंत ऐका ही विनंती. त्यात साधारण १५व्या मिनिटानंतर जे होते तिथे वाडा नष्ट होतो आहे अशी कल्पना मी केली आहे.

मग कदाचित तुम्हाला पटले नाही तरी किमान शक्यता जाणवेल की तुंबाडचे खोत म्हणजे मंगल व अमंगलाने एकमेकांशी मांडलेला खेळ आहे. कुरघोडी न करता एकमेकांना जोखण्याचा खेळ. दोन प्रवृत्तींचा प्रवृत्तीशरण अविरत अंतहीन खेळ. एकाच वाद्याने संथ लयीत चालू होऊन नंतर वेग आणि वाद्ये वाढवत जाणारा खेळ. ज्याचं नाव बोलेरो.


----

No comments:

Post a Comment