Monday, December 25, 2017

बोलेरो (भाग २)

-----
श्री ना पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’ या महाकादंबरीने माझ्या मनावर गारूड केले.

उत्कृष्ट चित्रकार गरज नसल्यास संपूर्ण कॅनव्हास रंगवत बसत नाही. याउलट जिथे आवश्यक असेल तिथे कोऱ्या कॅनव्हासलाच चित्राचा भाग बनवतो. शिरुभाऊंनी या कादंबरीत हेच तंत्र अवलंबले असावे असे मला प्रस्तावना वाचून वाटले आणि मग संपूर्ण कादंबरी वाचताना शिरुभाऊंनी समाजात झालेले बदल कसे दाखवले आहेत, तिथेही माझे लक्ष जात राहिले.

कादंबरी सुरु होते पेशवाईच्या अस्ताच्या वेळी आणि संपते गांधीहत्येनंतर. या विस्तीर्ण कालखंडात भारतीय समाजात झालेले बदल लेखकाने मोठ्या सफाईने मांडले आहेत. कादंबरीतले पहिल्या पिढीतले खोत दादा आणि बंडू, अघोरी तंत्रमार्गाची उपासना करतात खरं तर मला हा भाग हास्यास्पद वाटायला हवा होता आणि या वर्णनाला मी लेखकाचं स्वातंत्र्य म्हणून मान्य करत पुढे गेलो असतो. पण माझ्या सुदैवाने मी नंदा खरेंचं, ‘बखर अंतकाळाची’ वाचलं होतं आणि त्या अनुषंगाने इतर वाचनही झालं होतं त्यामुळे पेशवाईच्या अखेरच्या काळात भारतीय समाजात तंत्रमार्गाची, शाक्तांची, अघोर पंथीयांची किती चलती होती ते मला माहिती होते. त्यामुळे दादा आणि बंडू खोतांच्या तंत्रउपासनेमागे तत्कालीन समजुतींचा लेखकाने वापर करून घेतल्याचे मला जाणवले. आणि पुढे जाऊन चिमापा, भिकापा व ताई आपल्या आजोबांच्या या अघोर साधनेला ‘ब्रिटिश सत्ता उलथवण्यासाठीचा प्रयत्न’ असा हेतू जोडून देऊन आपल्या घराण्याची प्रतिष्ठा राखतात. पुनर्लेखन करून सोयीचा इतिहास उभा करून आपल्या अस्मिता टोकदार करण्याची आणि समाजात आपले वजन वाढवण्याची भारतीय प्रवृत्ती अधोरेखित करतात. श्रीनांच्या लेखणीतून उतरलेले हे प्रसंग वाचताना, ‘वर्तमानात जगत भविष्य घडवत असताना भारतीय समाज त्याच वेळी घटित इतिहासालाही घडवत असतो’ हे माझं मत बरोबर असल्याची खात्री पटली.

दादा खोतांचा जन्म १७८० चा तर बंडू खोतांचा जन्म १७८२ चा. म्हणजे जेव्हा मुंबईची सात बेटं एकत्र करण्याचा प्रकल्प सुरु झाला त्याच वर्षाचा. म्हणजे खोतांच्या या काळात मुंबई अजून नावारूपाला आलेली नसते. त्यामुळे कादंबरीच्या या भागात मुंबईचा उल्लेख येत नाही. तो येतो अगदी नंतर म्हणजे खोतांच्या तिसऱ्या पिढीच्या वेळी, नरसू बजापाच्या वेळी. तोपर्यंत सगळं कथानक तुंबाड आणि लिंबाडच्या जवळपासच्या परिसरात फिरत रहातं. तालुक्याचा उल्लेखही कादंबरीत नंतर येतो. दादा खोत आणि बंडू खोत गावात अनिर्बंध सत्ता उपभोगत असतात.गावात कुणाला आणायचं, कुणाला कुठली जमीन द्यायची, कुणाच्या बायकोला आपल्या छपरी पलंगावर न्यायचं सगळा त्यांच्या मर्जीचा मामला. कुणी विचारणारं नाही. ‘हम करेसो कायदा’ हाच नियम. ना कोणी पोलीस पाटील ना कोणी न्यायाधीश. जेव्हा खोत बंधू अघोरी उपासनेतील अमानुष प्रकार करतात तेव्हा कादंबरीत कंपनी सरकारच्या कायद्याचा प्रवेश होतो आणि तुंबाडात टोपीकराबरोबर फौजदार येतो. त्याला त्या अमानुष प्रकाराचा छडा लावण्यात जितका रस आहे त्यापेक्षा आता खोतांच्या हम करेसो कायद्यासमोर कंपनीच्या कायद्याची ताकद दाखवायची आहे. आणि कंपनीचा कायदा सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचं आहे. त्यामुळे त्याचा आवेश लेखकाने वाजवीपेक्षा जास्त ठेवला आहे. नंतर कोर्टकचेरी न करता फौजदार पैसे खाऊन प्रकरण दाबतो, तेव्हा आजही टिकून असलेली सरकारी कमर्चाऱ्यांची वृत्ती अधोरेखित होते.

या काळात पोलीस नाहीत. मुंबई नाही. वर्तमानपत्र नाही. शिक्षण नाही. प्रेमविवाह नाहीत. पण विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध सर्रास आहेत. ब्राह्मणांत केशवपन सक्तीचे आहे. जन्माधारित अधिकार आणि त्याने आलेली मग्रुरी किंवा लाचारी यानेच समाजाचा गाडा चालतो आहे. ब्राह्मणेतर समाजात मराठ्यांचे स्थान महत्वाचे आहे पण ब्राह्मण स्वतःला उच्च समजतात आणि इतरही त्यांना तसे समजतात हे दिसून येते. काही ब्राह्मण केवळ पूजापाठ सांगतात आणि गरीब आहेत तर काही ब्राह्मण जमीनीचे मालक आहेत, सधन आहेत आणि आपली जमीन कुळांना कसायला देत आहेत. स्वतः व्यापार उदीमात लक्ष घालत आहेत. सोवळे ओवळे पाळत असले तरी स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या वैविध्याला जातीपातीचे बंधन नाही. सधन ब्राह्मण अनधिकृतरित्या अनाचार करत असले तरी गरीब ब्राह्मण कुलाचार, सोवळे ओवळे आणि नियमांच्या बाबतीत काटेकोर आहेत. गरीब ब्राह्मणावर हात टाकायला कुठल्याच जातीला फार भीती वाटत नाही. आणि आपल्याच जातभाईकडून अधिकृतरित्या जातीबाह्य वर्तन झाल्यास त्याला बहिष्कृत करण्याचे ब्राह्मणांचे वर्तन मराठ्यांसकट सर्व जातींना हास्यास्पद वाटते आहे. थोडक्यात सांगायचे तर व्यवहारात ‘बळी तो कान पिळी’ हा नियम असूनही ब्राह्मणातील गरीब श्रीमंत सारेजण किमान अधिकृतरीत्यातरी आपल्या पूर्वजांच्या धर्माचे नियम पाळण्यात धन्यता मानत होता.

शिक्षणासाठी गणेशशास्त्री पुण्यास जातात आणि नंतर सरळ काशीला. मुंबईला नाही. काशीहून धन्वंतरी होऊन येतात. पण नंतरच्या पिढ्यात मात्र डॉक्टर, वकील होणे प्रतिष्ठेचे मानले जाते आणि शिक्षणासाठी पुण्याऐवजी मुंबई महत्वाची ठरू लागते. सुरवातीला तुंबडबाहेर न जाणारी माणसे मग आगबोटीने मुंबईला फेऱ्या मारू लागतात. मुंबई जेव्हा कादंबरीत येते तेव्हाही ती कुणालाही विरघळवून टाकणारा मोठा जनसागर म्हणून येते. तिथे मोठमोठ्या इमारती आहेत, हॉस्पिटल आहेत, कॉलेजेस आहेत, लॉज आहेत, पेढ्या आहेत बग्ग्या आहेत, ट्राम आहे, चाकरमानी आहेत आणि नायकिणी आहेत. मुंबईचा प्रवेश झाल्यावर पुणे आणि काशी मागे पडते.

तुंबाडात शाळा सुरु होते ते प्रकरण वाचताना मला भैरप्पांची तंतू कादंबरी आठवली. शाळेत ब्राह्मण समाजातून येणारी जास्त मुलांची संख्या. मराठ्यांची त्यामुळे होणारी चडफड. त्यावरून होणारे राजकारण हा भाग तंतूपेक्षा वेगळा असला तरी काही माणसांचा आटापिटा. इतर सगळ्यांचा आडमुठेपणा. पैशाचं अपुरं पाठबळ. ध्येयवेडे शिक्षक. पालकांची आणि मुलांची शिक्षणाबाबतची उदासीनता, हे सगळे भाग सारखेच. आणि ब्राह्मण मराठे वाद वाचताना नेमाडेंचे चांगदेव चतुष्ट्य आठवतेच.

राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख येतो तोही कथानकाला पुढे घेऊन जातो. आपल्या हाताने सुल्तानकीची वस्त्रे खलिफाला पाठवून त्याचा आशीर्वाद मिळवून आपापल्या रयतेवर हुकूम गाजवण्याचा शिरस्ता ज्याप्रमाणे मुघल साम्राज्याच्या काळी रुळला होता तोच कित्ता मोरया गिरवतो आणि हर्णेच्या किल्ल्यावर आलेल्या शिवरायांकडून स्वतःचा सत्कार करून घेतो. नंतर चिमापा स्वतःच्या पैशाने समारंभ करून स्वतःचा सत्कार करवून घेतो ते वाचताना तर सध्याच्या कित्येक पुरस्कारांची आठवण व्हावी.

तुंबाडात फार थोड्या लोकांकडे केसरी येऊ लागतो. त्यातले बहुतेक लोक तो वाचत नाहीत. पण उमलत्या वयातील विश्राम ते ताईआत्याबरोबर वाचून भारावून जातो आणि देशकार्यासाठी घर सोडतो. काँग्रेसचा सदस्य वगैरे न होता त्याला क्रांतिकारक व्हायचे असते. लढ्याचे स्वरूप काय? कुणाशी, कुणासाठी आणि कसं लढायचं ते माहीत नसताना घरातील वातावरणापासून तुटलेला कोवळा पोरगा जेव्हा सरकारविरोधासाठी घर सोडतो तेव्हा तत्कालीन क्रांतीकारांची मानसिक अवस्था वाचकाला थोडी वेगळ्या अंगानेही दिसू लागते.

टिळक कोकणचे आणि त्यातही ब्राह्मण असल्याने त्यांचे नेतृत्व ब्राह्मण समाजात सहजी स्वीकारले जाते. पण ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारंच’, अशी गर्जना करणाऱ्या टिळकांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी कुणी घर सोडून बाहेर पडत नाही. ती किमया होते काँग्रेसमुळे आणि त्यातही गांधींमुळे. लोकांना गांधी कळत नाहीत. त्यांचे नेतृत्व अनेकांना गोंधळात पाडते. चळवळ सुरु करून मध्येच मागे घेणे, उपोषण, आमरण उपोषण, युद्धात सरकारला सहकार्य पण नंतर असहकाराची चळवळ, खादी, चरखा, सूत, परदेशी कापडाची होळी यातल्या कित्येक गोष्टीमागील राजकीय आणि आर्थिक तत्वे सामान्यांच्या गावीही नसतात. परदेशी कापडाची होळीत टाकलेले कपडे हे चळवळीतला सहभाग नसून काका पुतण्याचे भांडण म्हणून आलेले असतात. आणि नंतर कित्येक लोक मँचेस्टरचे कापड वापरणे चालू ठेवतात ते वाचताना स्वातंत्र्यलढ्यातील सामान्यांच्या सहभागाची वेगळी बाजू समोर येते.

काँग्रेसचा प्रचार करणारे बापू, नरसू आणि नरुशेट आपापल्या स्वभावाप्रमाणे चळवळीतील सोयीचा भाग उचलतात. बापू गावाचे गांधी होतात. ब्रह्मचर्य ते मैला साफ करणे ते विजातीय विवाह कर्मकांडांशिवाय लावून देणे वगैरे कामे करू लागतात. लोकांत अप्रिय होतात. पण गांधीवाद सोडत नाहीत. त्यामागे त्यांचे एक वैयक्तिक दु:खही असते, ज्याचा उल्लेख ते शेवटी नरसूकडे करतात आणि पुन्हा सार्वजनिक भूमिकेमागील वैयक्तिक कारणांकडे लेखक आपलं लक्ष वेधून घेतो. नरुशेट दारूबंदी होईपर्यंत काँग्रेसबरोबर राहतात पण नंतर मात्र त्यांना काँग्रेस नकोशी होते. नरसूला गांधी पटत नाही. त्याला गांधींचे नेतृत्व म्हणजे देशाचे दुर्दैव वाटते पण त्या माणसाच्या एका हाकेसरशी सारा देश हलतो याचे त्याला फार कौतुक असते. पुणे कराराच्या वेळी गांधींनी आंबेडकरांची केलेली अडवणूक त्याला पटत नाही पण स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? हेच त्याला कळत नाही. आणि नंतर एकाएकी अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम सुरु होणे, दलितांना हरिजन संबोधणे हे त्याला हास्यास्पद वाटते. त्याला गांधी आणि सावरकर दोघेही काळाच्या पुढे असलेले नेते वाटतात. सावरकरांची मते समाजाला पचणार नाहीत असे त्याला वाटते. गावात सुरु होणारे सावरकर मंडळाचे प्रतिज्ञापत्र छापायलाही तिथला ब्राह्मण मालक नकार देतो कारण त्यात हिंदू हीच माझी जात, विज्ञान हाच देव, गाय हा एक उपयुक्त पशू वगैरे मते नोंदवलेली असतात. आणि या मंडळाचे सभासददेखील ती प्रतिज्ञा न वाचताच केवळ तरुण नातेवाईकाचे मन राखावे म्हणून सभासदत्व घेतात आणि मंडळाच्या एकाही सभेला हजार राहात नाहीत.

गांधींचे साधे रहाणे लोकांत चेष्टेचा विषय असते टिळकभक्त लोकांना गांधींचा उदोउदो आवडत नाही. म्हणून ते सावरकरवादी होतात. पण सावरकर अंगीकारत नाहीत. सगळे राजकीय वाद केवळ वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी वापरले जातात. हिंदू मुस्लिम दंग्यामागेही वैयक्तिक हेवेदावे हेच मोठे कारण असते. प्रत्येक सामाजिक चळवळीच्या उदात्त मुखवट्यामागचा वैयक्तिक हेवेदाव्यांचा ओबडधोबड चेहरा दाखवून लेखक त्याची चकाकी खरी किती आणि खोटी किती याचा निर्णय वाचकांवर सोडतो.

शेवटी फाळणीला गांधींना जबाबदार मानणाऱ्या काँग्रेसी नरसूला, टिळकभक्त असलेले देहाडराय जेव्हा सांगतात की फाळणीला गांधींचा विरोध होता आणि तिची बीजे टिळकांनी केलेल्या लखनौ करारात होती. हे कळल्यावर नरसूला जो धक्का बसतो त्यावरून स्वातंत्र्यलढ्यातील कित्येक घटनांबद्दल बहुसंख्य भारतीय समाज किती अज्ञानी होता त्याकडे लेखक आपले लक्ष वेधून घेतो.

जातीबाह्य विवाह, काळाबाजार, मुलींनी नोकरी करणे, प्रेमविवाह, केशवपन थांबणे, चित्रपट, त्यातील नायिकांप्रमाणे केसांच्या रचना, हिंदू अविभक्त कुटुंब, त्यातील सामायिक मालमत्तेबाबत होणारे वाद आणि त्यावर गडगंज होणारे वकील, देश सोडून बाहेर स्थायिक होणारे हुशार भारतीय, नीरा आणि माडीची जागा घेऊन संसार उध्वस्त करणारी दारू; हे सारे आपल्याला मधून मधून भेटत राहतात आणि तत्कालीन समाजाचे बदलते चित्र आपल्या मनात उभे राहू लागते. श्रीनांनी कथेतील व्यक्तींबरोबर तत्कालीन समाजालाही कथेचा नायक बनवल्याचे जाणवते. हे थोडे सध्याच्या हॉलिवूड पटांसारखे आहे. लाईफ इज ब्युटीफुल मध्ये नाझी छळछावणीच्या पार्श्वभूमीवर बापलेकाची कथा किंवा टायटॅनिक मध्ये त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एका जोडप्याची प्रेमकथा, ही उदाहरणे त्याच धाटणीची आहेत फक्त यात श्रीनांनी फार मोठ्या काळाची पार्श्वभूमी आणि अनेक पात्रांच्या जीवन कथा एकात एक गुंफल्या आहेत.
----

No comments:

Post a Comment