Friday, December 27, 2019

टेकडीवरचा माझा झीरो स्टोन

ARAI च्या टेकडीवर भरपूर पायवाटा आहेत आणि एक मोठा हमरस्ताही आहे. जेव्हा टेकडीवर नवीन होतो तेव्हा हमरस्त्याने जात होतो. त्याच हमरस्त्याने परतत होतो. जसजसा टेकडीवर रुळू लागलो तसतश्या त्या पायवाटाही खुणावू लागल्या. मग एक दिवस एका नवीन पायवाटेने जायला निघालो. काहीसं निर्जन आणि म्हणून अस्पर्श असं टेकडीच वेगळं रूप पाहून आनंदलो. माझ्या दिशाज्ञानाबद्दल मला विश्वास होता. त्यामुळे पायवाटेने गेलो तरी शेवटी नेहमीच्या ठिकाणी जाईन अशा आत्मविश्वासाने इयरफोन लावून गाणी ऐकत चाललो होतो. वाटेवर एका ठिकाणी बरोबर मध्येच कुणीतरी दगडांची रास रचलेली होती. कुण्या गाढवाने वाटेच्या मधोमध दगड रचून ठेवले आहेत असं म्हणत पुढे गेलो.


नेहमीचं ठिकाण जवळ येतंय असं वाटेना. फोनवर रेंज मिळत नव्हती. आणि निर्जन भाग असल्याने कुणाला काही विचारण्याची सोयही नव्हती. रस्ता भरकटल्यासारखं वाटलं. पण शिक्षक असल्याने आपण चुकू शकतो यावर चटकन विश्वास बसत नाही. चालत राहिलो. घामाघूम झालो होतो. यातला किती घाम चालण्यामुळे आणि किती घाम रस्ता सापडत नसल्याच्या तणावामुळे होता कुणास ठाऊक?

आणि एका वळणानंतर एकाएकी गजानन महाराजांचं टपरीवजा मंदिर समोर आलं. देवभोळा नसल्याने संतभोळाही नाही. पण इतरांना पवित्र वाटणारी वास्तू अनपेक्षितपणे समोर आली की माझ्याकडून नेहमी ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान आणि लष्करी पद्धतीच्या अभिवादनाचं संमिश्र रूप असलेली हाताची हालचाल आपोआप होते, तशी झाली. मंदिराच्या समोरच्या छोट्याश्या अंगणात एक माझ्यासारखा चालकरी हाशहुश करत घाम पुसत बसला होता. आणि मी माझ्या नकळत एक सुटकेचा निश्वास टाकला. त्याला रस्ता विचारला नाही पण आपण निदान मानवी वावराच्या कक्षेत आहोत हे जाणवून सुखावलो. पुढे जात राहिलो तर तीव्र उतार लागला आणि टेकडी संपली. नेहमीची जागा आलीच नाही. मग धापा टाकीत मागे वळलो. पुन्हा चिलीम ओढणाऱ्या महाराजांचं मंदिर दिसलं आणि मनाशी खूणगाठ बांधली की महाराजांच्या मंदिराच्या उजवीकडे टेकडी संपते. तिथे जायचं नाही.

दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने गेलो. पुन्हा तीच दगडांची रास ओलांडली. आता पुढे गजाजन महाराजांचं देऊळ येईल हे माहिती होतं. देऊळ आलं पण आज उजवीकडे वळलो नाही. डावीकडे अगदी छोटी पायवाट होती. त्या वाटेने गेलो. आजूबाजूला झाडी झुडपं जास्त होती. चालायला छान वाटत होतं. मनात उगाच आपण 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चे किंवा मग 'सर्व्हायवर' सारख्या कार्यक्रमाचे नायक आहोत अशी भावना येत होती. आपण गतानुगतिक नाही. आपण नवीन वाट शोधायला घाबरत नाही. असे विचार डोक्यात येऊन स्वतःबद्दल किंचित कौतुक आणि अभिमानही वाटू लागला. झाडी विरळ होऊ लागली. आणि मग पुन्हा मोठी पायवाट सुरु झाली. पुढे जात राहिलो. आणि मग एका उंच चढावाला पार केलं तर पुन्हा नेहमीचा हमरस्ता समोर आला. काहीही केलं नसताना विजयाचा आनंद मनात भरून आला. उशीर झाला होता. म्हणून परतताना पुन्हा हमरस्त्याने निघालो. मग कित्येक दिवस हाच शिरस्ता झाला. जाताना नवीन पायवाट. दगडांची रास. गजानन महाराजांचं मंदिर. डावीकडची छोटी पायवाट. मग मोठी पायवाट. मग चढण. मग हमरस्ता. मग नेहमीच्या ठिकाणी चालण्याचा शेवट आणि परतण्यासाठी नेहमीचा हमरस्ता.

एका रविवारी असाच परत निघालो होतो. चढणापाशी आलो. समोर हमरस्ता खुणावत होता. पण मनात विचार आला की आज क्लास नाही आहे. तर मग पुन्हा पायवाटेने उलट जाऊया. म्हणून पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करत, हमरस्ता सोडून चढ उतरू लागलो. मोठी वाट संपत आली. कानात कुठलीशी डॉक्युमेंटरी चालू होती. त्याच तंद्रीत चाललो होतो. आणि आजूबाजूला ओळखीच्या खाणाखुणा दिसेनात. तासभर चालून झालेलं होतं. त्यामुळे घशाला कोरड पडलेली होती. शरीरातील अतिरिक्त मेदवृद्धीमुळे भरपूर घाम आलेला होता. तशात डॉक्युमेंटरी संपली. आता लक्ष आजूबाजूला जास्त होतं. सगळी झाडं सारखी. सगळे दगड सारखे. एकक्षण थांबलो. पुन्हा मागे जावं असं वाटलं. पण तिथे दोन मुली माझ्या मागून येताना दिसल्या. (कदाचित माझ्या वयाच्या असाव्यात किंवा मग अजून काही. पण चष्मा घातलेला नसल्याने मला दुरून त्या मुलीच वाटल्या). त्यांचं माझ्याकडे लक्ष जावं इतका मी रुबाबदार नाही हे मला माहिती होतं. पण किमान 'हा धापा टाकणारा मध्यमवयीन पुरुष रस्ता चुकल्यामुळे गोंधळलेला आहे' असं त्यांचं माझ्याबद्दल मत होऊ नये म्हणून मी निसर्ग निरीक्षण करतो आहे असा आव आणला. आणि मग केसांवरून हात फिरवत पुन्हा उताराला लागलो. आता उजव्या हाताला अनोळखी चढण, डाव्या हाताला खोल घळ, मागे अनोळखी मुली आणि त्यांच्या मागे ओळखीचा रस्ता अश्या अवस्थेत मी पोटातल्या कावळ्याचं संगीत ऐकत अरुंद वाटेवरून चालू लागलो.

मुली बऱ्याच मागे पडल्या आहेत आणि त्यांना आपण दिसत नाही आहोत हे कळल्यावर मात्र मी त्या वाटेतून आणि प्रसंगातून मार्ग कसा काढायचा त्याचा विचार करू लागलो. मागे मुली असणार त्यामुळे तिथे जाण्याचे दोर मनाच्या आढ्यताखोर शेलारमामाने कापून टाकले होते. शेवटी मनाचा हिय्या केला आणि हर हर महादेव करत उजवीकडच्या अनोळखी चढणीकडे वळलो. काट्याकुट्यातून आणि घसरणाऱ्या दगडांवरून पायाबरोबर हातही वापरत, धापा टाकत चढण कशीबशी संपवली. अजूनही काही ओळखीचं दिसेना. त्यानंतर ज्याप्रमाणे मी धावलो ते जर कुणी बघितलं असतं तर, पर्णकुटीत सीता नाही हे पाहून सैरभैर झालेला आणि वृक्षवल्लरिंना तिच्या खाणाखुणा विचारणारा राम कसा दिसत असेल त्याची त्यांना लगेच कल्पना आली असती. फक्त शरचाप, जटा आणि वल्कलं तेवढी नव्हती.

दिशाहीन होऊन भटकण्यात अजून पाच मिनिटं गेली. ती पाच मिनिटं मला कित्येक युगांसारखी वाटून आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत समजलेला नसला तरी त्याची अनुभूती मात्र आली. जंगल संपून एक पायवाट दिसली. सगळ्या दिशा आणि सगळ्या वाटा आता सारख्याच दिसू लागल्या होत्या. स्वतःच्या दिशाज्ञानावरचा विश्वास आता संपल्यात जमा झाला होता. आपल्याला बहुतेक चकवा लागला आहे असं वाटू लागलं. मग माझ्या लहानपणी रविवारी दुपारी दूरदर्शनवर प्रादेशिक भाषेतील चित्रपट दाखवत त्यात पाहिलेला सत्यजित रेंचा 'गुपी गाईन बाघा बाईन' हा चित्रपट आणि त्यात जंगलात वाट हरवलेले गोपी आणि बाघा आठवले. त्यांच्यासमोरचा भुतांचा नाच आठवला. मग युट्युबवर तो चित्रपट आहे हे कळल्यावर मुलांना तो बघण्याची सक्ती केली होती ते आठवलं. आणि सध्याच्या ऍनिमेशनपटांच्या खुराकावर वाढलेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर, 'आपल्या बाबांना लहानपणी हे कसं काय आवडलं असावं?' असा प्रश्न उमटलेला पाहून आपण कसे अस्वस्थ झालो होतो ते आठवून हसू आलं. आणि इतक्या गोंधळलेल्या मनस्थितीतही आपल्या डोक्यात रामायणापासून ते आईन्स्टाईन आणि सत्यजित रेंपर्यंत कुठले कुठले विचार येत आहेत हे जाणवून स्वतःबद्दल थोडं कौतुकही वाटलं.


आता मी वाट फुटेल तिथे चालत होतो. मनातल्या शेलारमामाला, मागे दिसलेल्या मुलींना, 'अनोळखी मुलींनाही आपण हुशार दिसलं पाहिजे' या स्वतःच्या बावळट विचाराला शिव्या घालू लागलो होतो. आणि एकाएकी मला समोर ती दगडांची रास दिसली.


सीतेची पैंजणं पाहून रामलक्ष्मणाला जसा आनंद झाला असेल अगदी तसाच आनंद मला झाला. त्या दगडांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. शाहरुखसारखे हात पसरले. स्वतःलाच एक प्रदक्षिणा घातली. आता गजानन महाराजांचं देऊळ कुठे असेल त्याचा पत्ता लागला. टेकडीच्या शेवटच्या टोकाकडे नेणारी नेहमीची ओळखीची चढण कुठे आहे ते कळलं. घरी जायचा रस्ता समजला. सगळ्या टेकडीचा माझ्या मनात तयार असलेला आणि काही काळापूर्वी विस्कटलेला नकाशा पुन्हा पूर्ववत झाला.

रस्त्याच्या मध्यभागी रचलेली ती दगडांची रास जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली होती तेव्हा तिच्याबद्दल मनात आलेले नकारात्मक विचार आता दूर पळाले होते. त्यांची जागा आता विलक्षण आत्मीयतेने आणि प्रेमाने घेतलेली होती. याआधी असाच रस्ता चुकलेल्या कुण्या वाटसरूने पुन्हा रस्ता चुकू नये म्हणून आणि कदाचित इतरांनाही रस्ता कळावा म्हणून ती रास रचली असावी असं वाटून मी त्या अनामिक वाटसरूचे मनातल्या मनात आभार मानले. त्याबद्द्ल कृतज्ञता मनात दाटून आली होती. त्यामुळे त्याला काही देता आलं नाही तरी किमान त्याच्या धडपडीला काहीतरी द्यावं म्हणून मग बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलून त्या दगडांच्या राशीवर ठेवला आणि माझ्या घराच्या रस्त्याला लागलो.

रस्ते माहिती नसताना जंगलातून फिरत शहरे वसवणाऱ्या आदिमानवाबद्दल; समुद्रात असे दगड रचणे शक्य नसताना हजारो मैल दूर अश्या युरोपातून संपूर्ण जग पादाक्रांत करणाऱ्या माणसांबद्दल; वाळवंटात रोज वाऱ्याने टेकड्या आपल्या जागा बदलत असताना, काफिले घेऊन फिरणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल; सगळ्यांबद्दल आदर दाटून आला. काही दिवसांपूर्वी दोन्ही लेकरांना पुण्याचा झीरो स्टोन दाखवायला घेऊन गेलो होतो त्यावेळी भारताच्या टोपोग्राफीचा सर्व्हे करण्याचा महान प्रकल्प तडीस नेणाऱ्या ब्रिटिशांबद्दल आदर वाटला होता. त्यांच्या त्या कल्पनेशी माझ्या अनुभवाचा बारीकसा धागा जुळला आहे असं वाटून अंगी आलेला शीण थोडा कमी झाला.
आणि मग जाणवलं की हे खुणेचे दगड जुन्या पांथस्थांना रस्ता बरोबर असल्याची खात्री देतात, नवीन पांथस्थांना खाणाखुणा देतात आणि परतीच्या वाटसरूंनाही दिग्दर्शन करतात. हे दगड म्हणजे कुणाच्यातरी अनुभवांचे संचित आहेत. कुणाच्या तरी वाटेचा, ती हरवण्याचा, पुन्हा सापडण्याचा आणि इतर कुणी हरवू नये या इच्छेचा वस्तुरूप इतिहास आहेत. मग वाटलं मी जे लिहितो तेही असेच दगड आहेत. मी परतीच्या प्रवासाला निघालो तर मला घराकडे नीट जातो आहे हे सांगणारे. दुसरा कुणी या वाटेने जात असेल तर त्यालाही दिग्दर्शन करणारे. अर्थात त्याला त्यांचं महत्व पटलं तरंच ठीक. नाहीतर दगडांची रास पहिल्यांदा पाहून माझ्या मनात जसे नकारात्मक विचार आले होते तसेच त्याच्याही मनात आले तर त्यालाही किमान एकदा तरी जंगलात वाट चुकण्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि मग कदाचित तोही सैरभैर होईल. मग त्याला दगडांचे प्रयोजन कळेल. आणि मग कदाचित तोही माझ्यासारखाच कृतज्ञ होऊन एखादा दगड त्या राशीवर चढवेल.

1 comment:

  1. Baryach thikani jangalat , dongaraat Shivling aadhalate..tyacha uddesh hi haach asava kaay? Disha samajnyassathi hi (dakshin-uttar rachana) tacha upyog hot asava.
    aapala ugach ek andaaj.

    ReplyDelete