Saturday, December 14, 2019

वेताळ पंचविशी

या बातमीवरून खालील पोस्ट सुचली होती.
------------------------------------------------------------

Image Credit : Internet 

अंधारी रात्र होती आणि वातावरण भेसूर होते. मधूनमधून पाऊस पडत होता. सोसाट्याच्या वार्‍याने अरण्यांतली झाडें हलत होती. विजांचा गडगडाट आणि कोल्हेकुई यांत मधेच भुतांचा हंसण्याचा आवाज येत होता. पण राजा विक्रम डगमगला नाही. निर्धाराने तो प्रेत घेऊन पळालेल्या वेताळाचा पाठलाग करीत होता. वेताळ प्रेत घेऊन झाडावर पुन्हां लपला होता. राजा त्या जुन्या झाडावर परत चढला आणि त्याने ते प्रेत खाली आणले. आपल्या खांद्यावर ते प्रेत घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालायला लागला.

तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन, मला तुझा हेतू काय आहे ते कांही उमजत नाही. हे इतके कष्ट तूं कशासाठी करतो आहेस? मध्यरात्र झाली आहे, गडद अंधार आहे, कांहीही दिसत नाही आणि तुला भिती वाटत नाही कां? वन्य श्वापदांच्या, विषारी जनावरांच्या आणि भुताखेतांच्या या अरण्यांत तू तुझे प्राण धोक्यांत कां घालतो आहेस? तुझ्या मनांत काय आहे ते तरी मला सांग.

अनेकवेळा असं दिसतं की आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे ठरवणं अतिशय कठीण असतं. धर्मबुध्दी नावाच्या राजाच्या राज्यात एक घटना घडली. तिची कथा मी तुला सांगतो. त्या कथेवरुन धर्मबुध्दी असं का वागला ते तू मला सांग.

आटपाट नगर होतं. त्याचा राजा होता धर्मबुध्दी. या धर्मबुध्दीला दोन मुलं होती. एकाचं नाव शुध्दबुध्दी आणि दुसऱ्याचं नाव शीघ्रबुध्दी. दोघेही तेजस्वी आणि बलशाली होते. त्यांच्या बलशाली देहांकडे बघून दबून जाणारा माणूस त्यांच्या विनयशील वागणुकीमुळे चटकन आश्वस्त होत असे. सर्व प्रजाजन आपल्या या राजकुमारांवर अतिशय प्रसन्न होते. इतकं असूनही राजा आता चिंतेत पडू लागला होता. आपल्यानंतर या दोघांपैकी कुणाला राजा करावं या चिंतेने त्याच्या मनात घर केलं होतं.

एकदा त्याच्या कानावर एक अतिशय वाईट बातमी आली. प्रातःसमयी आलेल्या या बातमीने राजा हादरला. कुणीतरी राज्यातील एका स्त्रीवर अतिप्रसंग करुन तिला जाळून टाकलं होतं. या अमानुष अत्याचाराच्या बातमीमुळे संपूर्ण प्रजा चवताळून उठली. अत्याचाऱ्यांना शासन व्हायलाच हवं असा सूर सगळीकडून उठू लागला.

धर्मबुध्दीने दंडपाणी नावाच्या आपल्या अंतर्गत सुरक्षाप्रमुखाला बोलावलं आणि आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांना न्यायासनासमोर आणण्याचं फर्मान सोडलं.

दुसऱ्या दिवशी बातमी आली की दंडपाणीने चारही अत्याचारी नराधमांना पकडलं आहे.'या नराधमांना हालहाल करून मारावं, त्यांचे असे हाल करावेत की पुन्हा कुणाला असा अत्याचार करण्याची इच्छा होऊ नये', अशी मागणी जनतेतून होऊ लागली.

तिसऱ्या दिवशी या चौघांना न्यायासनासमोर घेऊन येण्यासाठी दंडपाणी निघाला. पण रस्त्यात ते चौघे आरोपी त्याला हिसडा देऊन पळून जाऊ लागले. दंडपाणी चिडला. त्याने आपली तलवार काढली आणि तो आरोपींचा पाठलाग करु लागला. नग्न खड्ग घेऊन धावणारा उग्र दंडपाणी बघून आरोपी घाबरले आणि अजून वेगाने पळू लागले. त्यामुळे दंडपाणीचा राग अजून वाढला. आणि आरोपींना पकडण्याऐवजी त्याने त्यांच्यावर सपासप तलवारी चालवल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते मृतदेह मग आपल्या वृषभशकटात टाकून त्याने न्यायासनासमोर आणले.

शकटातील ते मृतदेह, ते आणणारा रक्तलांछित दंडपाणी आणि त्याच्या हातातील ते रक्त प्यायलेलं खड्ग पाहून दरबार भयचकित झाला. नगरजनांनी खचाखच भरलेलं ते सभागृह दंडपाणी काय बोलणार तिकडे कान लावून बसलं होतं. इतक्या मोठ्या जनसमुदायात त्या वेळी अगदी मोरपीस पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता होती.

धर्मबुध्दी, त्याच्या डाव्या बाजूला राणी न्यायसेना आणि उजव्या बाजूला दोन्ही राजकुमार शुध्दबुध्दी आणि शीघ्रबुध्दी बसले होते. मग धर्मबुध्दीने दंडपाणीला साऱ्या दृष्याचा खुलासा करायला सांगितलं.

जेव्हा दंडपाणीने आरोपींनी हिसडा देऊन पळण्यात यश मिळवलं हे सांगितलं तेव्हा सभागृहातील सर्वांच्या डोळ्यात अंगार फुलला. नाकपुड्या क्रोधाने फुलू लागल्या. हाताच्या मुठी वळल्या गेल्या. आणि मग जेव्हा दंडपाणीने पाठलाग व तलवारबाजीची घटना सांगितली तेव्हा सभागृहात एकंच आनंदाचा चीत्कार उठला. सर्व सभाजनांनी दंडपाणीचा जयजयकार केला.

धर्मबुध्दीने मग आपल्या दोन्ही राजकुमारांना पुढे बोलावलं आणि सांगितलं की दंडपाणीने जे केलं आहे त्याबद्दल तुम्हाला योग्य वाटेल तसा त्याचा सत्कार करा. ज्याची पध्दत मला योग्य वाटेल तो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल.

शीघ्रबुध्दी लगेच पुढे आला. त्याने दंडपाणीला आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढून दिली आणि कृतकृत्य झालेल्या दंडपाणीला आपली तलवार भेट दिली. पुन्हा एकदा सभागृहात दंडपाणीचा आणि शीघ्रबुध्दीचा जयघोष झाला. तो आवाज इतका मोठा होता की जणू स्वर्गातील देवतांनाही शीघ्रबुध्दी राजा झाला असं वाटलं.

मग शुध्दबुध्दी पुढे झाला. आता तो दंडपाणीचा सत्कार कसा काय करणार याबद्दल सगळ्यांच्या मनात कुतूहल होतं. त्याने दंडपाणीला जवळ बोलावलं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. त्याला सभागृहाकडे तोंड करायला सांगितलं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि मग तो उच्चारवात म्हणाला 'दंडपाणीचं शौर्य अतुलनीय आहे आणि त्याची न्यायबुध्दी सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे विचार करते.' सभागृह कानात प्राण आणून शुध्दबुध्दीचं भाषण ऐकत होतं. मग शुध्दबुध्दी पुढे म्हणाला 'असं असूनही यापुढे दंडपाणी आपल्या राज्याचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख रहाणार नाही'. दंडपाणी आणि सभागृह या वाक्यामुळे अवाक् झालं असतानाच राजा धर्मबुध्दी उभा राहिला आणि त्याने शुध्दबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं."

ही कथा सांगितल्यानंतर वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, असं वाटतं की राजा धर्मबुध्दी चुकला. त्याने लोकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेणाऱ्या राजकुमाराला आपला वारस म्हणून घोषित केलं. मला तर वाटतं त्याने लोकभावनेत समरस झालेल्या शीघ्रबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं असतं तर प्रजा खूष झाली असती. ते न केल्याने धर्मबुध्दी चुकला. तुला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही जर तू मौन पत्करलंस, तर तुझ्या मस्तकांचे असंख्य तुकडे होतील. आणि तुझ्या पायाशी लोळू लागतील.

राजा विक्रम म्हणाला, ' वेताळा, धर्मबुध्दीने केलं तेच योग्य आहे. राज्य चालवणं म्हणजे केवळ लोकांना आज जे आवडतं आहे ते करणं नसून राज्यशकट मजबूत करणं आहे.

अधिकारी हे व्यवस्थेला बांधलेले असतात. त्यांना त्यांचे अधिकार व्यवस्थेकडून मिळालेले असतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांची कक्षा कुठल्याही कारणांमुळे स्वतःच्या मर्जीने वाढवून घेतली आणि त्याला लोकभावनेमुळे राजाने मान्यता दिली तर ते व्यवस्थेला अंतिमतः मारक ठरते.

जर राज्य म्हणजे एक शरीर मानले तर प्रत्येक अधिकारी हा त्या शरीराचा एकेक अवयव असतो. आणि प्रत्येक अवयवाने आपापले काम सोडून दुसरे काम करणे शरीरासाठी धोकादायक असते. जर माणूस चालताना पडला आणि त्याला जखम झाली, त्यातून रक्त भळाभळा वाहू लागले, त्याच्या रक्तात खपली धरणारे घटक नसल्याने त्या माणसाचा शक्तीक्षय होऊ लागला तरी हृदयाने आपले रक्ताभिसरणाचे काम थांबवून चालत नाही. जर रक्त वाहू नये म्हणून हृदयाचे ठोके थांबले तर त्या माणसाचा तत्क्षणी मृत्यू होईल. त्याऐवजी बाकी सर्व अवयवांनी आपापले काम व्यवस्थित केले तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो.

तसंच राज्याचं आहे. दंडपाणीचं काम न्याय करण्याचं नसून न्यायासनासमोर आरोपींना आणण्याचं आहे. त्याने आरोपींना मारुन टाकणं म्हणजे राज्यव्यवस्थेला दिलेला झटका आहे. याने लोकांना आज छान वाटलं आणि दंडपाणी शुद्ध चारित्र्याचा असला तरी भविष्यात या निर्णयाचा वापर करणारा अधिकारी किती शुद्ध चारित्र्याचा असेल याची खात्री नाही. किंबहुना इतका जयजयकार ऐकल्यावर दंडपाणीला आपल्या निर्णयक्षमतेवर गर्व होणारंच नाही आणि त्याच्या हातून चुका होणारंच नाहीत याचीही खात्री नाही.

व्यवस्था बनवताना आज समोर असलेल्या माणसांच्या चारित्र्याकडे बघून चालत नाही. तर हे अधिकार मिळालेला कुठलाही अधिकारी कशाप्रकारे वागेल त्याकडे लक्ष द्यावे लागते.

आज अमुकतमुकचा जयजयकार करणारे लोक आपल्या या वर्तणुकीचा भविष्यात काय परिणाम होईल ते न कळल्याने तसे वागत आहेत. उद्या अशाच अधिकाऱ्यांचा त्यांना त्रास झाला तर ते रडारड करतील. ते राज्यरुपी शरिरातील जिभेसारखे आहेत. पटकन ओव्या आणि त्याच तालात शिव्या देणारी जीभ. शरीराला त्रास होईल हे कळत असताना जास्तीत जास्त तिखट, मसालेदार किंवा चमचमीत खायला पुढे येणारी जीभ. तिच्या आहारी जाऊन निर्णय घेतले तर शरीर कायम दुःखात राहील.

म्हणून माझ्या मते धर्मबुध्दीने योग्य तेच केलं. "

राजाचं उत्तर ऐकून वेताळ प्रसन्न होत हसला आणि म्हणाला, तुझ्या सूक्ष्म विचारशक्तीबद्दल मी जे ऐकून होतो ते खरंच आहे तर. पण राजा तू असा उदास का दिसतोस? '

राजा विक्रम म्हणाला,' वेताळा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक शक्यता जाणवली. आजच्या आपल्या राजेशाही व्यवस्थेत ठीक आहे पण उद्या जर अशी कुठली समाजव्यवस्था अस्तित्वात आली की ज्यात समाजाचं नेतृत्व कुणी करावं याचा निर्णय लोकांच्या मताने घ्यावयाचा असेल तर त्या व्यवस्थेतील शुध्दबुध्दींचं जीवन किती खडतर असेल याचा विचार करून मी खिन्न होतो आहे. त्या काळात सदानकदा लोकानुनय करणारा राज्यकर्ता आणि अधिकारांचा अधिक्षेप करणारा अधिकारी व्यवस्थेला मारक असतो हे लोकांना कोण समजावेल? या विचारामुळे मी थोडा हतोत्साहित झालोय. '

यावर वेताळ म्हणाला,' खरंय तुझं. पण तू बोललास आणि तुझं मौन सोडलंस. त्यामुळे मी चाललो.' आणि मग वेताळही खिन्नमनाने झाडावर लटकून राहिला. विक्रमाने तलवार उपसली आणि तो पुन्हा वेताळाला आणायला निघाला.

1 comment:

  1. अतिशय सूंदर कथा मांडणी आणि तर्कसंगत विवेचन फुल मार्क्स

    अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete