Thursday, January 7, 2016

सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ४)

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
-------------------------------------------
जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.
दिवस १
जिममध्ये आत शिरताच थबकलो. एकदम मागे फिरणार होतो. मला वाटलं मी चुकून बायकांच्या वेळेत आलो की काय? एकाच दृष्टीक्षेपात मला तिथे षोडशवर्षीय कन्यकेपासून ते साठी बुद्धी नाठी ही म्हण अजूनही तितकीच लागू आहे हे सांगणाऱ्या वयोवृद्ध स्त्रिया घाम गाळीत असताना दिसल्या. मी वळत असतानाच एक मजबूत हात माझ्या खांद्यावर पडला आणि त्याने मला जिमच्या दिशेला वळवले. माझ्या लहानपणी स्त्री पुरुषांची जिम एकंच असली तरी त्यांच्या वेळा वेगळ्या असायच्या. आधुनिक जगात स्त्री पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न जिमच्या वेळेपर्यंत येउन पोहोचला असेल याची मला कल्पना नव्हती.
मी भिंतभर आरशासमोर उभा होतो. तिथल्या सकाळी सकाळी शकिराच्या 'Hips don't lie' च्या तालावर घाम गाळण्याच्या वातावरणात मी अगदीच आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरच्या, स्नेहल भाटकरांच्या 'वारियाने कुंडल हाले' वाला दिसतोय असे मला वाटू लागले होते. मी पुढच्या सोपस्काराची वाट पहात शांतपणे पायांकडे पहात (स्वतःच्या) उभा होतो.
सगळ्यात प्रथम मापे घेण्याचा प्रकार होता. ती घेताना त्या सहाय्यकाचा चेहरा पाहून मला जरा गांगरल्यासारखे झाले. विशेषत: मनगट, दंड आणि पोट यांची मापे घेताना त्याच्या चेहऱ्यावर सूक्ष्म अशी हास्याची लकेर आलेली मी चष्मा लावलेला नसतानाही मला दिसल्यासारखी वाटली. पण मी तिकडे दुर्लक्ष केले. माझा स्वभावाच तसा आहे. एकदा ठरले दुर्लक्ष तर मग दुर्लक्ष.
सहायक्काने आधी मला ट्रेड मिलवर चालायला सांगितले. माझ्या लहानपणी पण आई बाबांनी कधी पांगुळगाडा घेतला नव्हता आणि आता एकदम हे म्हणजे जरा कठीण झाले. त्याशिवाय मुलांबरोबर यू ट्यूब वर बघितलेली इतरांची ट्रेड मिल वरची फजिती आठवू लागली. मापे घेताना आलेला गांगरलेपणा हळू हळू (महागुरूंच्या चालीवर) महागांगरलेपणाकडे झेप घेऊ लागला होता. माझ्या चेहऱ्यावरचे ते रस्ता चुकलेल्या अश्राप बालकाचे भाव बघून शेजारच्या ट्रेड मिलवरील महिलेने मला तो आधुनिक पांगुळगाडा चालू कसा करायचा ते धावत धावत सांगितले. मी तिच्या सूचना वापरून ते प्रचंड धूड चालू केले.
समोर काही ३-६-९-१२ असे चढत्या भाजणी मधले नंबर दिसत होते. मी म्हणजे अगदीच काही हा नाही हे त्या कनवाळू महिलेला दाखवण्यासाठी मी ९ चे बटण दाबले आणि पायाखालून सरकणारी भुई इतक्या जोरात पळाली की मला तोल सावरता सावरता त्या कनवाळू महिलेचा हसरा चेहरा फक्त दिसला. मी तिकडे दुर्लक्ष केले. मनात मी स्वतःला आर्नोल्ड, सिल्वेस्टर चा शिष्य समजत होतो पण ही यंत्र माझा अगदी मिस्टर बीन करून सोडतील की काय अशी शंका यायला लागली.
मग दहा मिनिटे सायकलिंग होते. सहाय्यकाचे लक्ष नाही हे पाहून बाजूच्या दुसऱ्या एका ललनेवर छाप पाडण्यासाठी सायकलिंग जोर जोरात केले . तिला सवय असावी. तिने दुर्लक्ष केले. मग मीही केले. या आधुनिक युगात माणूस माणसाला पारखा झाला आहे हेच खरे.
सायकलवरून उतरल्यावर जाणवले की पाय शरीरापेक्षा स्वतःची वेगळी हालचाल करीत आहेत. पण हे लटपटणं इतरांना कळू न देता मी सहाय्यकाकडे गेलो. मला वाटले आजचा दिवस संपला असेल. आम्ही नाही का क्लासमध्ये पहिला दिवस ओळख बिळख करून मुलांना सोडून देत, तसे ही लोकं पण करतील. पण कसचं काय !, 'आता सिट अप्स' असे त्याने बोलताच माझ्या पोटात गोळा आला आणि सिट अप्सच्या नावाखाली मी जे काही केले ते करताना पोटाचा घेर चंद्रावरून देखील सहज नजरेत भरेल इतका वाढल्याचे जाणवले. आजूबाजूची तरुण मुलं , 'आजकाल काय कोणी पण काका बॉडी बनवायला येतात' अश्या नजरेने बघत होती. पण मी दुर्लक्ष केले.
खूप घामटा निघाला. घरी गेल्यावर बायकोने माझ्या आवडीचे sandwich केले होते. खूप भूक लागल्याने नेहमीपेक्षा दोन जास्त खाल्ले. व्यायाम केल्याने भूक वाढते हे सत्य मला त्या दिवशी स्वानुभवाने पटले. शेवटी स्वानुभव हाच खरा गुरु.
दिवस २
आज मी यंत्रांशी सांभाळून राहायचे ठरवले. पण माझ्याकडे लक्ष देणाऱ्या सहाय्यकाने मला उगाच कुठे स्टुलावर चढव पुन्हा खाली उतरव, एक पाय पुढे टाक आणि मग खाली वाक, झोप तुझ्या पाठीवर पण पाय घे पोटावर, असले काही प्रकार करून घ्यायला सुरवात केली. तो hamstrings, quadriceps, calf वगैरे काय काय सांगत होता. मी अडकलेल्या श्वासात जितका शक्य होईल तितका हसरा आणि नम्र चेहरा करून त्याचे ऐकत होतो.
त्या दिवशी त्याने पायाचे व्यायाम असे काही घेतलेत की, भले अख्खे जग माझ्यासाठी पहिले पाउल टाकणाऱ्या आपल्या तान्हुलाच्या पालकांसारखे कौतुकाचे भाव चेहऱ्यावर आणि आनंदाश्रू डोळ्यात आणून दोन्ही हात पसरून माझ्याकडे बघत नसेल, पण मी मात्र पहिल्यांदा आधार सोडून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या तान्हुल्या सारखा दुडकत पाय आपटत चालत होतो. दिवस अखेरीस छोट्या वासरा सारखा दुडक्या चालीने घरी आलो.
मोठ्या मुलाने मागितले म्हणून त्याच्या प्रेमळ आईने त्या रात्री पिझ्झा आणि पास्ताचा बेत बनवला होता. पिझ्झा मला आवडतो. आणि मला आवडणारी गोष्ट मी भरपूर करतो. लाल ग्रेव्हीचा पास्ता धाकट्यासाठी जास्त तिखट झाल्याने त्याच्या वाटणीचापण मला खावा लागला. पांढऱ्या ग्रेव्हीचा पास्ता मोठ्याला फिका वाटल्याने तो संपवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. दोन मुले असणे कधी कधी त्रासदायक असते ते असे.
पाय चेपत अंथरुणावर आडवा झालो तेंव्हा ही म्हणाली, 'पास्त्यात आणि पिझ्झ्यात मैदा असतो. मैदा जाडीसाठी वाईट असे ऋजुता म्हणते.' मी बरं म्हटले आणि कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. सकाळी व्यायाम केला तर रात्री देखील भूक जोरात लागते हे माझे दुसऱ्या दिवशीचे सत्य दर्शन होते. एकंदरीत मी जिमला जायला सुरु केल्यापासून स्वानुभव नावाच्या गुरूने माझ्याकडे जातीने लक्ष द्यायचे ठरवल्याचे जाणवले.
दिवस 3
सकाळी उठलो तर कमरेखालचा भाग हलेचना. दोन्ही पाय जडशीळ झाले होते. मी घाबरलो. मनातल्या मनात मी काल कुठल्या ललनेकडे जास्त टक लावून बघितले नसल्याची खात्री करून घेतली. हो, कलियुगात अहिल्येच्या शापाने गौतमाची शिळा होणे अगदीच अशक्य नाही. मुलांना उठवायची जबाबदारी हिच्यावर झटकून, गरोदर स्त्री च्या चालीने हळूहळू प्रातर्विधी आटोपले.
मुले तयार होती. त्यांची दप्तरे त्यांच्याच खांद्यावर देऊन जिना उतरायला सुरुवात केली आणि कालच्या लहान मुलाच्या दुडक्या चालीने एका एकी उग्र रुप धारण केलं. जिना उतरताच येईना. हळू हळू कठडा पकडून कसा बसा उतरलो. कठडा नसता आणि थोडा मागे झुकून दोन्ही हातांना मुंगळे चावल्यागत हात आणि अजूनही शाबूत असलेले केस झटकत चाललो असतो तर शशी कपूरच वाटलो असतो.
आज जिममधे अप्पर बॉडी एक्सरसाईज घेतले. पाय वाचले. घराखली बाईक लावत असताना बायको वरून म्हणाली तिथेच थांब. ती खाली आली. म्हणाली आज मला अप्पम खावासा वाटतोय. म्हणून मी नाश्ता बनवला नाही आहे. कधी कधी ही इतक्या चांगल्या कल्पना सुचवते की मला पण तिच्यासाठी वट सावित्रीचे व्रत करावेसे वाटते. मग तडक तिला घेऊन नंतर नेहरू मैदानाजवळच्या अण्णा अप्पमवाल्याकडे गेलो.
मी अण्णाचा गेले दहा बारा वर्षाचा गिऱ्हाईक पण गेल्या पाच महिन्यात तिकडे जाणे नव्हते. अण्णाला मुलगा झाल्याचे कळले होते. दुकानात गेलो तो अण्णाने दुकान एकदम चकचकीत नवीन केल्याचे दिसले. मला बघून तो खूष झाला. मी मुलगा झाल्याबद्दल आणि दुकान चकाचक केल्याबद्दल अण्णाचे अभिनंदन केले. अप्पम खाल्ला. नेहमीप्रमाणे एक मेदुवडा पण घेतला. अण्णाने दोन दिले. मी नको नको म्हणालो पण त्याचा आग्रह मोडवेना. वाटलं अण्णा मुलाची पार्टी देत असेल. हे असं गिऱ्हाईकाला स्वतःच्या सुख दु:ख्खात सामावून घ्यायचं शिकलं पाहिजे मराठी उद्योजकांनी असा विचार मनात आला. म्हणून मग दुसरा पण खाल्ला.
नारळाची चटणी छान बनवतो अण्णा. मागून मागून खाल्ली. चहा पण प्यालो. अण्णाने बिल सांगितले आणि मी दिले. नंतर हिशोब केला तेंव्हा कळले की अण्णाने मुलाची पार्टी दिली नाही म्हणून. मग त्याच्यावर एक पार्टी उधार असे बायकोला म्हणालो. ती म्हणाली, नारळात सगळ्यात जास्त कॅलरीज असतात. मला काय बोलायचे ते कळले नाही. म्हणून मी बरं असं म्हणालो.
दुपारी जेवायला एका लग्नात जायचे होते. तिथे बफे पद्धतीचे जेवण होते. खुर्च्या कमी होत्या आणि माझ्या आधी आलेल्या लोकांनी त्या पकडून ठेवल्या होत्या. डोम्बिवलीकरांना सीटा पकडून ठेवणे लोकल प्रवासामुळे छान जमते. त्यामुळे उभ्याने जेवणे आले.
आजच्या अप्पर बॉडी एक्सरसाईझ मध्ये हाताचे अनेक व्यायाम केले होते. त्याचा परिणाम इतका वेळ जाणवला नव्हता. पण जेवताना मात्र माझी त्रेधा तिरपिट उडाली. ताट पकडायला जमेना म्हणून एका टेबलाचा कोपरा पकडला आणि ताट तिथे ठेवले. हात वर उचलवतच नव्हते. त्यामुळे हात टेबलावर ताटाजवळ ठेवून जपानी माणसे नमस्कार करायला वाकतात तसे कमरेत वाकून हाता तोंडाची गाठ घालायचा प्रयत्न केला. पण काही जमले नाही. तेंव्हा तो नाद सोडला आणि भुकेल्या पोटी वधू वरांसोबत फोटो काढून घेतला. त्या फोटोत, लेकीची पाठवणी करणाऱ्या आई बापांपेक्षा मी जास्त दु:ख्खी दिसलो असीन.
रात्री पोरांना माझा कळवळा आला. माझी दोन्ही चिमणी बाळं पाय चेपून द्यायला जवळ आली. मी नको नको म्हणताना त्यांनी सरळ पाय चेपणे चालू केले आणि एकदम जाणवले की आपल्या चिमण्या मोठ्या झाल्या आहेत. त्या आनंदात झोप कधी लागली ते कळलेच नाही. माझा स्वभावंच तसा आहे. थोडे हळू हळू कळणारा पण कळल्यावर आनंदी होणारा.
अपूर्ण … पुढे चालू ठेवता येईल अशी आशा …
----------------

No comments:

Post a Comment