गडावरील लोक तटबंदीवर बसून खाली जंगलातील मशाली आणि त्यांच्या सावल्या बघून "पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट वाहे"1 असे म्हणू लागले की मशाली घेऊन खाली नाचणारे वेढेकरी आकाशाकडे बघून "रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा"2 असे म्हणून त्यांना प्रत्युत्तर देत. कधी कधी तर गाण्याच्या भेंड्यांचा हा खेळ देखील रात्रभर चालत राही. मंगळवारी जे लोक गाणी म्हणत त्यांचे आवाज गोड आणि भरदार होते. म्हणून मंगळवारच्या रात्री या भेंड्यांना बाया बापड्या पण ऐकायला येत. सुरात गाणाऱ्या या वेढेकऱ्यांना मग मंगळवेढेकर हे नाव पडले. यांच्या वंशातील एकाने गाणे सोडून पुढे लेखणी हातात धरली. आणि बालमनावर राज्य केले म्हणून त्याचे पाळण्यातले नाव विसरून जाऊन लोक पुढे त्याला राजा मंगळवेढेकर म्हणू लागले.
हे विषयांतर बाजूला ठेवूया. यासाठी (म्हणजे किल्ले बांधणे आणि त्याला वेढे घालण्यासाठी) लोक दिवाळी वगैरेचा मुहूर्त धरत नसत. आला कंटाळा की घाल वेढा. झाली घोरपड मोठी की घाल वेढा. वाटलं कडकलक्ष्मी व्हावंसं की घाल वेढा. असा सगळा प्रकार होता. त्यामुळे मुलांना किल्ले बांधणे यात काही फार नवलाई वाटत नव्हती.
शिवाय शिवाजी महाराज, मावळे प्रत्यक्ष जिवंत असल्याने त्यांच्या मूर्त्या (मूर्तीचे अनेकवचन मूर्त्या केल्याने शाळेत फटका खाल्ला होता.(त्यावेळी जिला भगिनी मानायला माझे बालमन तयार नव्हते अशी एकजण जरा जास्तच जोरात हसली होती. म्हणून मी तिला कधी माझ्या मनीचे गूज सांगितलेच नव्हते.) त्या फटक्याचा प्रतिहल्ला करणे तेंव्हा शक्य नव्हते. म्हणून आजही जेंव्हा कुठे मिळेल तिथे "मूर्त्या" शब्द लिहून त्या फटक्याचा निषेध करतो.) मुंबईच्या बाजारात आलेल्या नव्हत्या.
मटकी, मोहरी, गहू वगैरे धान्ये शेतात मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने त्यांना पुन्हा अंगणात लावल्यास आया (आईचे अनेकवचन. याची पण तशीच कथा आहे.) अंगण सारवतानाचा ओला हात घेऊन तश्याच धपाटा घालीत. त्यामुळे ती रोपे त्याकाळच्या मुलांच्या मनात रुजलीच नाहीत.
शिवाय त्याकाळी सर्व ठिकाणी टाकी किंवा तळी होती. पुष्करणी वगैरे गोष्टी अगदी श्रीमंत लोकांकडेच होत्या. सलाईन वगैरेचा शोध लागायचा बाकी असल्याने आणि कारंजे म्हणजे वाशीम जिल्ह्यातील गावाचे नाव असा शब्दार्थ विकिपीडिया आणि गूगल नकाश्यावर असल्याने त्याकाळच्या मुलांना पाण्याची किमया दाखवण्यात स्वारस्य नव्हते.
माझ्या अंदाजाने जेंव्हा महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्या त्यानंतर हा दिवाळीत किल्ले बांधणीचा प्रकार सुरु झाला असावा. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मुली शाळेत जायला लागायच्या आधी हे सुरु झालं असावं.
म्हणजे बघा, दिवाळीत शाळेला सुट्ट्या देण्याची प्रथा सुरु झाली. मग मुलं घरी राहून दंगामस्ती करत. जुन्या मराठीत यास "कल्ला करणे" असे म्हणत. कल्ला करताना मुले घरभर धावत. स्वयंपाकघरात देखील येत. तिथे मुली कडबोळ्यांना दात काढून त्यांना चकल्या चकल्या असे चिडवणे, शंकरपाळे करंज्या कापणे, लाडूला बेदाणा लावणे असे काम करीत असत. मुलांचा कल्ला ऐकून त्या इइइ असे ओरडत.
मग यांचा कल्ला आणि त्यांचा इइइ एकत्र होऊन किल्ला तयार झाला. एका घरात सुरु झालं तर मग इतरांनी देखील अजून मोठा कल्ला आणि अजून मोठा इइइ करणे सुरु केले. अश्या प्रकारे महाराष्ट्रदेशी दिवाळीत किल्ला करणे सुरु झाले.
1
2
No comments:
Post a Comment