Sunday, October 30, 2016

मैत्रीण जेंव्हा फोटो मागते

घरी बसलो होतो. सर्दीने बेजार झालो होतो. माझं हे असं नेहमी होतं. लहानपणी, परीक्षा असली की ताप यायचा, पोट बिघडायचे. आताशा सुट्टी आली की असं सगळं होतं. अजून चार दिवस फटाक्यांच्या धुराला तोंड द्यायचं आहे या विचाराने मी गांगरलो होतो. हिने नाकाला, कपाळाला भरपूर व्हिक्स लावून दिलं होतं. (यात प्रेम किती आणि आजारी पडल्याचा राग किती ते मला जाणवत होतं). मग शॉपिंगला ती एकटीच माझं क्रेडिट कार्ड घेऊन गेली. तिने केलेल्या शॉपिंगच्या किमतीचे मेसेज तत्परतेने मला पाठवून क्रेडिट कार्ड वाले, "आगीतून फुफाट्यात", "आसमान से गिरे, खजूरमें अटके" वगैरे शब्दप्रयोगांची मला प्रत्यक्ष अनुभूती देत होते. व्हिक्समुळे डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. अश्यावेळी पुस्तक वाचन शक्य नव्हतं. झोपही येत नव्हती. शेवटी फोन उचलला. व्हॉट्स ऍपवर येणारे मेसेज आणि फेसबुकवर येणाऱ्या पोस्ट्स आलटून पालटून पाहत बसलो.
मुलामुलींच्या एकत्र गृपवर काही नेहमीचे पोस्टमन; पणती, माती, येती, वाती, नाती अशी यमके जुळवून अंगावर फेकत होते. घरातील कंदिलाचे फोटो टाकून त्यावर मुलींच्या "कित्ती छान" टाईप कमेंटवर गोबरे गाल फुगवून गुलाबी झाले आहेत असे दाखवणाऱ्या स्मायली टाकत होते. वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व सांगणारी माहिती फॉरवर्ड करत होते. तर हेच लोक फक्त मुलांच्या गृपवर, कंदिलासकट एखादी कमनीय देहाची मदनमंजिरी आव्हानात्मक मुद्रेत उभी असलेले किंवा "उठा उठा दिवाळी आली, शेजारीण रांगोळी काढायची वेळ झाली" किंवा "भाऊबीज मला आवडते कारण तेंव्हा जुनी मैत्रीण माहेरी येते" असे मेसेज सचित्ररूपात पाठवून; मानवी मन किती वेगवेगळ्या पातळींवर एकाच वेळी काम करू शकते त्याची प्रचिती देत होते.
इकडे फेसबुकवर स्वतःची भिंत चालवायला काहींनी ज्ञानदेवांना वेठीशी धरून त्यांना अविवेकाची काजळी काढायला लावले होते. काही जण नेहमीप्रमाणे फेसबुकवरून निवृत्ती जाहीर करत होते. त्यांचे मित्र, वनवासी निघालेल्या प्रभू रामचंद्रांना निरोप द्यायला शरयूतीरी उभ्या असलेल्या अयोध्यावासीयांच्या अविर्भावात त्यांना साश्रू नयनांनी निरोप देत होते. बायका फराळाचे फोटो टाकत होत्या. त्याखालच्या स्त्रियांच्या कमेंटमध्ये मला उगाच, "चकली काळपटली आहे, लाडू माणसांसाठी आहेत की उंदरांसाठी?, वगैरे" असे उद्गार ऐकू येत होते. तर पुरुषांच्या कमेंट वाचून, "अशीच आमची बायको असती, वदले सर्वपती" ही भावना जाणवत होती. दिवाळी अंकात लेखन छापून आलेले काही लेखक आपल्या अंकाची हिरीरीने जाहिरात करत होते आणि संपादकाच्या डिजिटल मीठाला जागत होते. असं सगळं कुणाचं काय काय कुठे कुठे छापून येताना पाहून, आपण एका ठिकाणी लेख देऊन तो त्यांनी छापला तर नाहीच पण त्याची काय विल्हेवाट लावली ते पण सांगितले नाही हे आठवून माझं नाक अजूनच चोंदून गेलं. अश्या सगळ्या नीरस वातावरणात माझ्या फोनने "टिंग" असा आवाज केला. आणि फोनच्या स्क्रीनवर एक फोटो एका गोलात तरंगू लागला.
फेसबुक मेसेंजर हे ऍप मी घेऊन ठेवलंय हे माझ्या मित्रांना माहिती असूनही ते दुर्लक्ष करतात. आणि मग ते दुर्लक्ष करतात म्हणून मग मी पण दुर्लक्ष करतो. मैत्रिणींची गोष्टच निराळी. माझ्यापेक्षा वयाने केवळ एखाद दोन महिने लहान असलेल्या मुलींना मी काका वाटतो, समवयस्क ललनांना मी कुठलेही काम ज्याला हक्काने सांगावे असा भाऊराया वाटतो आणि माझ्या वयापेक्षा मोठ्या स्त्रियांना मी श्यामची आईमधला श्याम वाटतो. त्यामुळे मैत्रिणींशी सगळे संवाद भिंतीवर साधून मी इनबॉक्सची झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली होती. त्याशिवाय, कुणाला मेसेज पाठवताना "जेवलात का?" असले प्रश्न पाठवायचे नाही इतके मला आता कळू लागले आहे, पण कुठले प्रश्न पाठवायचे ते मात्र कळत नाही. त्यामुळे झुक्याने दिलेला मेसेंजर, त्यातील स्टिकर्स, वेगवेगळे स्मायली, सगळे सगळे न वापरता, कोऱ्या करकरीत रूपात तसेच पडून होते. आणि आज मी घरात एकटा असताना फोनच्या स्क्रीनवर गोल तरंगू लागला. आणि त्यात गॉगल डोक्यावर ठेवलेली एक ललना सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहात होती. त्याक्षणी कुठला मॉडेल कोऑर्डिनेटर तिथे असता तर “मनमे लड्डू फूटा”च्या जाहिरातीसाठी त्याने मला आजीवन करारबद्ध करून घेतले असते.
पहिल्यांदा बाबा बनलेल्या अननुभवी बापाने लहान बाळाला हातात धरावे तश्या काळजीने फोनला अलगदपणे हातात धरले. हलक्या हाताने त्याला गादीवर ठेवले. एक दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला. चोंदलेल्या नाकाने तो हाणून पाडला. चष्मा काढून ठेवला, साबणाने तोंड धुतले, पावडर लावली. काजळ सापडेना म्हणून ते लावायचा विचार सोडला. शर्ट बदलला, केसावरून कंगवा फिरवला, चष्म्याच्या काचा पुसून तो पुन्हा नाकावर ठेवला आणि मग गादीवर ठेवलेल्या फोनसमोर पोटावर झोपत, दोन्ही हात कोपरात दुमडून हनुवटीखाली ठेवून फोनकडे मन भरून पाहत शेवटी थरथरत्या हाताने त्या गोलावर टिचकी मारली.
"मला तुमचा फोटो मिळेल काय ?" असा मेसेज वाचून माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मनात पार्श्वसंगीताला "आली माझ्या घरी ही दिवाळी" हे गाणं वाजू लागलं. "भगवान के घर देर है अंधेर नही है।" या वाक्यावर मला एकदम विश्वास ठेवावासा वाटू लागला. नास्तिक होऊन आपण काही चूक तर केली नाही ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. चाळीशीत पुरुषाचे व्यक्तिमत्व खुलते हे ऐकून होतो आणि आता ते खरे असावे असे वाटू लागले. वर्षानुवर्षे बेडूक बनून राहिलेल्या राजकुमाराला मूळ रूपात परत आल्यावर काय वाटू शकेल त्याचा प्रत्यय आला.
हो हो हो... का नाही मिळणार? तुम्ही म्हणाल तर फोटोच काय मी पोस्टर पाठवतो, त्यापेक्षा मी स्वतःच येतो. अशी सगळी उत्तरे मनात आली होती. पण एकदम मनातील सावध सज्जन जागा झाला आणि मी फक्त "???" एव्हढाच रिप्लाय पाठवला.
नंतरचा अर्धा तास शांततेत गेला. स्क्रीनकडे एकटक पाहून डोळे शिणू लागले. नवीन शर्टाची इस्त्री उतरू लागली. राजकुमार पुन्हा बेडकात परिवर्तीत होऊ लागला. मी गादीवरून उठून इकडे तिकडे येरझाऱ्या मारू लागलो. आणि हा मेसेज चुकून आपल्याकडे आलाय याची खात्री पटत असताना, पुन्हा टिंग असा आवाज झाला. मी चाळिशीतल्या चित्त्याला लाजवेल अश्या चपळाईने गादीवर झेप घेतली. तरंगणाऱ्या गोलावर टिचकी मारली. उत्तर आले होते.
"तुमचा फोटो आणि थोडक्यात माहिती द्या, एका मासिकात द्यायची आहे. मागे तुम्ही मला एक मराठी भाषांतर करायला मदत केली होती. त्यात तुमचा ऋणनिर्देश करायचा आहे."
आणि माझ्या डोक्यात लखकन प्रकाश पडला. एक - दोन आठवड्यापूर्वी ह्या हुशार मुलीच्या भिंतीवर मी प्रतिसाद देताना या तरुणीने मला एका परिच्छेदाचे भाषांतर करून द्याल का ? असे विचारले होते. त्यावर त्याचवेळी मी मराठी भाषांतर करून दिलेही होते. पण नंतर तो सारा प्रसंग विसरून गेलो होतो. आणि आता तिचा हा निगर्वीपणा बघून मी विरघळून गेलो. लगेच दिलं तर प्रशस्त दिसणार नाही, म्हणून मी "आता प्रवासात आहे, रात्री घरी आल्यावर देतो", असा प्रतिसाद दिला आणि अंगठा दाखवला. लागलीच समोरून अंगठा आला.
मग मी स्वतःची माहिती काय द्यायची त्या विचारात पडलो. नोकरी शोधण्याचे दिवस जाऊन आता १६ वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे "Tell me something about yourself" सारखे प्रश्न कसे हाताळायचे ते विसरलो होतो. पण इथे मागे हटून चालणार नव्हते. "उंची अमूक अमूक. वजन तमूक तमूक. गहू वर्ण. मध्यम बांधा" अशी वाक्ये डोक्यात लागली. आणि हे जुन्या काळी दूरदर्शनवर चालणाऱ्या "आपण यांना पाहिलंत का?" या हरवलेल्या व्यक्तींची माहिती देण्याऱ्या कार्यक्रमासारखं आहे असं वाटू लागलं. मग मी ते वर्णन सोडलं.
"लग्नाला अमूक एक वर्षे झाली आहेत... दोन मुलांचा बाप आहे... स्वतःचे घर आहे .. हफ्ते फेडणे चालू आहे... बऱ्यापैकी कमावतो." वगैरे माहिती डोक्यात आली पण ती जर माझ्या सती सावित्रीने वाचली तर आपला सत्यवान, शादी डॉट कॉम वर बिजवराच्या विभागात जाहिरात देतोय असे वाटून तिने स्वतःच यमदूताचे रूप घेऊन सत्यवान सावित्रीची आधुनिक कथा रचली असती. म्हणून मी ही माहिती देण्याचे निग्रहाने टाळले.
मग शिक्षण, व्यवसाय, आवड याबद्दल लिहावेसे वाटले. तर लक्षात आले आपल्या आवडीनिवडी फारच कमी आहेत. खायला, झोपायला, वाचायला आणि चित्रपट बघायला आवडते. आपल्याला क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कुस्ती, ज्युडो कराटे, पोहणे असे मैदानी किंवा बुद्धिबळ, कॅरम यासारखे बैठे खेळ देखील नीट खेळता येत नाहीत. गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग यासारखे खेळ तर नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी वगैरे चॅनेलचे पगारी लोक त्यांचं चॅनेल चालावं म्हणून खेळून दाखवतात असं आपलं मत आहे. या सगळ्या गोष्टी आठवून खजील झाल्यासारखं झालं. एकाएकी मला स्वयंवराला आलेल्या आणि शिवधनुष्य न पेलल्यामुळे ते छातीवर पडलेल्या रावणाच्या मनस्थितीची कल्पना आली.
शेवटी फक्त मुद्दे द्यायचे ठरवले. तीन मुद्दे बरे वाटले. शिक्षण सी ए, व्यवसाय शिक्षक, वाचनाचा छंद आणि लेक्चर देणे ही आवड इतके सांगून बाकी तुला काय वाटेल ते तू लिही असं सांगूया असे ठरवले आणि शांत झालो.
मग फोटो शोधायच्या मागे लागलो. माझ्या मोबाईलमध्ये सगळे फोटो हिचे आणि मुलांचे, माझे फोटोच नाहीत हे तेंव्हा प्रथम कळले. जे होते त्यात मी सर्वात शेवटच्या रांगेतील डावीकडून अठरावा, अश्या स्वरूपाचे होते. मग घरात अल्बम शोधू लागलो. कुठे मी मुलांसोबत होतो, तर कुठे हिच्यासोबत, तर कुठे भावासोबत तर कुठे आई वडलांसोबत. आधार कार्ड, ड्रायविंग लायसेन्स, पॅन कार्ड, घराच्या ऍग्रीमेंटमधला शेवटच्या पानावरचा फोटो आणि पासपोर्ट याशिवाय माझा एकट्याचा फोटो नाही, ही जाणीव धक्कादायक होती. शेवटी एक फोटो सापडला. कृष्णधवल. पोटावर झोपलेला. अंगठा तोंडात घालून चोखणारा आणि फोटो स्टुडिओच्या नवीन वातावरणात बाचकलेला मी सहा महिन्याचा असताना काढलेला फोटो हाच माझा एकट्याचा एकुलता एक फोटो होता. आणि तो पाठवणे म्हणजे रुबाबदार गृहस्थाऐवजी ऐवजी बाळसे धरलेले बाळ अशी ओळख झाली असती. म्हणून शेवटी गृप फोटोतील त्यातल्या त्यात बऱ्या फोटोला कापून कुपून पाठवायचे माझ्या मनाने घेतले. मग पुन्हा एकदा फोटो शोधणे सुरु केले. एक फोटो बरा वाटला त्याला कापून ठेवला. आणि रात्रीची वाट पाहात बसलो.रात्री जेवण झाल्यावर घरची सगळी मंडळी झोपल्यावर, मेसेंजर उघडले. माहितीचा संदेश दिला. फोटो पाठवला. आणि तुम्ही इतक्या चांगल्या आहात की आजकालच्या आपमतलबी जगात देखील श्रेय देत आहात. अशी माणसे विरळा. वगैरे दोन चार वाक्ये लिहून फोन ठेवून झोपायला जाणार इतक्यात पुन्हा टिंग वाजले. पुन्हा गॉगल डोक्यावर ठेवलेली स्त्री गोलात तरंगत होती. मेसेज आला होता.
"मी कधी कुणाचं श्रेय लाटत नाही. ज्याचं त्याला दिलं की नंतर कटकट कमी होते. काम किती का फडतूस असेना मी श्रेय देऊन टाकते. दोन फायदे होतात. नंतर वटवट ऐकावी लागत नाही. आणि काम सुमार दर्जाचं असेल तर त्याचा आळ माझ्यावर येत नाही."
मी बरं म्हणालो. एक हसण्याची स्मायली टाकली आणि फोन बंद केला. तुम्ही फार स्पष्टवक्त्यादेखील आहात असे म्हणावेसे वाटले होते पण मी स्पष्टवक्ता नसल्याने काहीही न म्हणता झोपायला गेलो. माझी सावित्री अर्धवट जागी होती. कुणाचा मेसेज आला होता, वगैरे विचारू लागली. तर मी एका कुशीवर वळत म्हणालो झुक्याचा मेसेज आला होता. म्हणत होता, “मोरे सर, खेळत जा. अजून छंद वाढवा. घराबाहेर पडा. एकट्याचे फोटो काढत जा.” ती झोपेतंच हसली. आणि मग मी पण हसलो.

No comments:

Post a Comment