Thursday, September 29, 2016

मराठा मोर्चा, फेसबुक-व्हॉट्स ऍप आणि विखारी प्रचार


प्रभावी मूक मोर्चांची सुरवात करून देणाऱ्या मराठा समाजाचे अभिनंदन.


जे एन यु प्रकरणाच्या वेळी सात भागांची एक मालिका लिहिली होती त्यातील चौथ्या आणि पाचव्या भागात हे दोन परिच्छेद, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीत लिहिलेले होते.
------
सबंध देशातील संपूर्ण जनता कायम एकाच दिशेने जात नव्हती. जसे आपण आज आहोत तसेच आपले आजोबा पणजोबा पण असतील. आपण आपले गुण काही आकाशातून घेऊन नाही आलो. ते ही या मातीच्या संस्कारांचे भाग आहेत. त्यामुळे आपले भव्य आणि क्षुद्र गुण आपल्या पूर्वजात देखील होते याची मला खात्री पटलेली आहे. आपल्या पूर्वजांपैकी काहींना ब्रिटीश राज्य मानवले असल्याने, ते जाऊ नये असे वाटत असेल, काही ते जाऊ नये म्हणून सक्रिय प्रयत्न करीत असतील, काही पूर्णपणे तटस्थ असतील, काही स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारावून जाऊन क्रांतीकारी झाले असतील, तर काहींनी गांधीजींचा अहिंसेचा आणि असहकाराचा मार्ग आपलासा करून स्वातंत्र्य चळवळीत आपला खारीचा वाटा उचलला असेल. काहींना प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान करायचे असेल तर काहींना आधुनिक जगाच्या संकल्पनांना वापरून आपल्या या देशाचे हुकलेले प्रबोधनाचे युग प्रत्यक्षात आणायचे असेल.


कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते. कोणी उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाने प्रेरित झाले होते तर कोणी गतकालीन संस्कृतीच्या महापुरुषांतून आणि पुराणपुरूषांतून आपली प्रेरणा घेऊन उभे रहात होते. खंडित राज्यांची परंपरा असलेला देश अखंड होत चालला होता. भारतमाता जन्म घेत होती, आपल्या अनेक लेकरांचे बळी घेऊन. परकीय शासकाशी अहिंसक लढा देणारी तिची लेकरं स्वकीयांशी मात्र हिंसक होऊन लढत होती. ज्याला सगळे स्वातंत्र्य म्हणतात आणि ज्याला मी स्वराज्य म्हणतो, ते आपण अहिंसेने मिळवू शकलो, तरी स्वदेश मिळवताना मात्र आपण प्रचंड हिंसेचा वापर केला. कुणी मारत होते तर कुणी मारले जात होते. प्रत्येकाला आपले वागणे योग्य वाटत होते. वैभवशाली प्राचीन संस्कृती आणि तितकेच उज्ज्वल भविष्य एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. त्या काळच्या घटनाक्रमांकडे बघताना, मला तर कायम भगवद्गीतेतल्या ११ व्या अध्यायातील वर्णन केलेले विश्वरूपदर्शनच आठवते.
------
आज मराठा समाजाने सुरवात करून दिलेले, नंतर अन्य समाजातून पाठिंबा मिळत असलेले, स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, अल्पभूधारक - मोठे शेतकरी, पादचारी आणि स्कॉर्पिओधारक या सर्वांना सामावून घेणारे शांततापूर्ण मोर्चे बघताना मला पुन्हा त्या विश्वरूपाचे दर्शन झाले. आणि अजून एक जाणवले की स्वातंत्र्य लढ्याच्या काळात फेसबुक-व्हॉट्स ऍप नव्हते. त्यामुळे सातत्याने विस्कळीत होणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याला पुन्हा पुन्हा मार्गावर आणणे त्याकाळच्या नेत्यांना थोडे कमी कठीण गेले असावे.


आपण नैतिक अधिष्ठान नसलेल्या नेत्यांच्या काळात जन्माला आलेल्यांची पिढी आहोत. आपण परकीय सरकारशी लढत नसून आपणंच निवडून दिलेल्या सरकारनी निवडणूकपूर्व काळात दिलेल्या वचनांच्या पूर्तीचा आग्रह धरण्यासाठी एकत्र येत आहोत. आपल्यापैकी अनेकांचे स्वतःच्या दैन्यावस्थेबद्दलचे आकलन अपूर्ण आहे. कशाचा अभिमान धरायचा आणि तो कधीपर्यंत धरायचा या बद्दल आपल्या सगळ्यांत मतभिन्नता आहे. देशबांधव असूनही आपल्या सगळ्यांच्या अस्मिता निरनिराळ्या आहेत. आणि कितीही नाकारले तरी आपण क्रौर्यातून मिळणाऱ्या आनंदाला आपल्या जीवनातून हद्दपार करू शकलेले नाही आहोत. आपल्या या मोर्चाला चेहरा म्हणून नेता नाही आहे. आपल्या मागण्या मोर्चागणिक थोड्याफार प्रमाणात बदलताना दिसत आहेत. यामुळे आपण जुन्या मागण्यांमधील अव्यवहार्य भाग सुधारित करून घेत असलो तरी त्यामुळे मोर्चाबद्दल स्वतःचे मत ठरवू न शकलेल्या लोकांना आपण गोंधळात पडत आहोत. यात भर म्हणून आपल्या हातात फेसबुक-व्हॉट्स ऍप आहे.


नजीकच्या भूतकाळात फेसबुक-व्हॉट्स ऍपवरून वणव्यासारखी पसरलेली एक क्रांती २०११ मध्ये इजिप्त मध्ये झाली होती. तिने खुर्चीवरील सरकारला हलवण्यात यश मिळवले. नंतर सैन्याचे अंतरिम सरकार आले. नंतर मुस्लिम ब्रदरहूड नावाच्या कट्टर धार्मिक पक्षाने तिथली सत्ता काबीज केली. शेवटी तिथे सर्व राजकीय पक्षांनी बहिष्कार घातलेल्या निवडणुकीत पूर्वाश्रमीचे लष्करप्रमुख, राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत. लोकांच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाहीत.


म्हणून इथे व्यक्त होताना डोके शांत ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटते. आपल्या एकजुटीचा आणि शिस्तीचा धाक राज्यकर्त्यांना बसला आणि अस्मितेच्या आधारावर राजकारण करणे त्यांना थांबवायला लावून विकासाचे राजकारण करण्यास आपण जर त्यांना भाग पाडू शकलो तर मूक मोर्चाचा बुलंद आवाज सगळीकडे दुमदुमत राहील.

आपल्यापैकी कुणासाठीही मूक मोर्चा काढण्याच्या हक्काला विरोध करणे हा पर्यायच नाही. मूक मोर्चात सहभागी व्हायचे किंवा त्याला बाहेरून पाठिंबा द्यायचा किंवा त्यातील मागण्यांना विरोध करायचा ते ज्याने त्याने ठरवायचे पण मूक मोर्चावर तावातावाने बोलताना तोल ढळू द्यायचा नाही हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment