Thursday, September 29, 2016

पतंजली संस्था, बाबा रामदेव आणि जीन्स

Omkar Dabhadkar आणि श्रीनिकेत देशपांडे, माझा नफ्याला विरोध नाही. भारतीय माणसाने नफा कमावण्याला तर अजिबात नाही. नफा कमावताना नीतिमान माणसांकडून देखील कधी थोडी लांडी लबाडी केली जाते हे मला मान्य आहे. त्यामुळे रामदेव बाबाने नफा कमावण्यास माझा विरोध नाही. किमती स्वस्त आणि उत्तम दर्जा राखला तर, कुणीही, फेसबुकवर किंवा इथे तिथे काहीही लिहो तरी ते यापुढेही अनेक वर्ष नफा मिळवत राहतील हे मला समजते.
माझा असापण अंदाज आहे की, बाबांनी मल्टीनॅशनल कंपन्यांच्या ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यात फार यश मिळविले नसून आतापर्यंत जो ग्राहक, ही उत्पादने वापरत नव्हता, तोही आता ही उत्पादने भरभरून वापरू लागला आहे. त्यामुळे रामदेवांनी बाजारपेठ वाढवली असेच मी सध्यातरी म्हणेन. आणि त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.
माझे केवळ दोन आक्षेप आहेत. पहिला म्हणजे आपल्या व्यवसायाला - नफ्याच्या उद्देशाला, देशसेवेशी जोडण्याला. जर ते 'देशसेवा' शब्द वापरत असतील, तर कशाला देशसेवा म्हणायचे आणि देशसेवा ज्या विविध उत्पादनांमुळे होऊ शकते त्यात प्राधान्यक्रम कशाला द्यायचा याबाबत अनेक देशवासीयांची वेगवेगळी मते असू शकतात. आणि ती बाबा रामदेवांबरोबर जुळली नाहीत तर ते टीका करू शकतात. त्या टीकेला उत्तर "उत्तम दर्जा" हे होऊ शकत नाही. "हो आम्ही नफा कमावतो आणि त्या नफ्यातून देशसेवा करतो" ही भूमिका वेगळी आणि "माझी उत्पादने वापरा म्हणजे आपोआप तुमच्याकडून देशसेवा घडेल" ही भूमिका वेगळी. आपल्या देशात लोक तसेही देशासाठी काही करायला फार तयार होत नाहीत. मग त्यांना केवळ 'आमचे ग्राहक बना आपोआप देशसेवा होईल' अशी ग्वाही देऊन अजून निष्क्रिय करणे योग्य ठरेल काय?, ते येणार काळच ठरवेल.
नफा कमविणारी कंपनी आपले उद्दिष्ट समोर ठेवते. त्याला दाखवून भांडवल गोळा करते. गिऱ्हाईकाला टेबलाच्या पलीकडील बाजूला बसवते. त्याला स्वतःची जबाबदारी घेण्याची सक्ती करते. पण पतंजलीने आधी योगाभ्यास शिकवणारी धर्मादाय संस्था म्हणून लोकप्रिय झाल्यावर, मग आपली उत्पादने आधी आपल्या समर्थकांना विकल्यावर, नंतर आपली उत्पादन करणारी संस्था वेगळी करून तिचा चेहरा मात्र तोच ठेवला आहे. यात कुठलाही कायदा मोडला नसला तरी व्यवहाराचे एक मूलतत्व आहे की कुठल्याही करारात दोन्ही पक्षकारांपैकी कुणाचाही एकमेकांवर undue influence नसावा. हे तत्व इथे काही प्रमाणात मोडले गेले आहे असे मला वाटते. बाबा टेबलाच्या एका बाजूला आणि त्यांचा ग्राहक टेबलाच्या दुसऱ्या बाजूला दोघेही आपापल्या लाभासाठी विचार करत आहेत असे चित्र माझ्या मनात तयार न होता, ग्राहकाच्या बाजूला बाबा अध्यात्मिक आणि उदात्त भावनेने भारलेले संन्यासी ह्या रूपात बसून पुन्हा त्याला आपलीच नफ्याच्या उद्देशाने तयार झालेली उत्पादने विकत घेण्यास उद्युक्त करीत आहेत असेच चित्र मला दिसते.
तुम्हा दोघांना कदाचित माझे मत फार तात्विक वाटेल, पण संन्यासी जिचा चेहरा आहे त्या संस्थेकडून राजकीय जवळीक वापरणे आणि साधनशुचितेकडे दुर्लक्ष करणे, किमान मलातरी खटकते.
मी पतंजली संस्थेच्या व्यवस्थेचा/रचनेचा अभ्यास केला नाही आहे. पतंजली ही कंपनी कायद्याच्या कलम २५ अन्वये तयार केलेली कंपनी आहे का? तसे असेल तर तिचा नफा भागधारकांना वाटता येत नाही. आणि अनेकांच्या विरोधाची धार बोथट होऊ शकते. पण ती आपल्या पदाधिकाऱ्यांना अनिर्बंध पगार देऊ शकते. म्हणजे वेगळ्या मार्गाने नफ्याचे केंद्रीकरण होऊ शकते. आणि रामदेव बाबांच्या संस्थेत असे काही होणार नाही असे मानायला माझे मन तयार नाही. कदाचित बाबांना लाभाचे प्रलोभन नसेल, पण ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना आणि जे त्यांच्या मदतीने राजकीय किंवा व्यावसायिक लाभार्थी ठरले त्यांच्या बाबतीत हे प्रलोभन किती जोरकस असेल हे समजायला जगाचा फार अनुभव असण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय बाबांना समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा दिसून येते. हे मला अजूनच खटकते. अंबानीने जिओ काढला. लोकांनी त्यावरही टीका केली. पण काही काळ जाऊ दे; बाबांच्या उत्पादनावर टीका करणे किंवा त्यात गैरव्यवहार झालेच तर त्यांचा तपास करणे ते उघडकीस आणणे हे सगळे अश्लाघ्य, अनैतिक, धर्मबाह्य आणि बेकायदेशीर देखील मानले जाऊ शकते. बाबांना न्यायालयात खेचणेंच अशक्य होईल आणि जर कुणी माईचा लाल ते करू शकलाच तर बाबांचे समर्थक त्या न्यायाला मानणार नाहीत. बाबा देखील, "या न्यायायलात मी दोषी ठरलो तरी जनतेच्या न्यायालयात मी निर्दोष आहेच अशी टिमकी वाजवून आपले व्यवहार बिनबोभाट पार पाडतील.
ही अतिशयोक्ती वाटली तर आसाराम बापूंचे, लालू प्रसादांचे, सैयद शहाबुद्दीन यांचे आणि सलमान खान यांचे उदाहरण पहा. मग तुम्हाला जाणवेल की मी तिळमात्रही अतिशयोक्ती करत नाही आहे.
इथेच माझा दुसरा आक्षेप सुरु होतो. तो आहे बाबांच्या संस्था उभारण्याच्या पद्धतीला आणि त्याला आपण सर्वजण देत असलेल्या मान्यतेला.
या देशाची घटना आपणच मान्य केली. आपणच घटनेद्वारे अनेक जुन्या कायद्यांना मान्य केले आणि अनेक नवीन कायदे तयार केले. आपला इंडियन काँट्रॅक्ट्स ऍक्ट तर १८७२ चा आहे. तो व्यापाराच्या मिषाने अख्ख्या जगावर राज्य करू शकलेल्या ब्रिटिशांचा आहे. ब्रिटिशांची पार्लमेंटरी लोकशाही आपण उचलली आहे. एव्हढे सगळे आपण त्यांचे घेतले, पण त्यांनी या सगळ्याच्या तळाशी ठेवलेले एक मूळ तत्व मात्र आपण घ्यायला विसरलो आहोत. ब्रिटिश कायदा "व्यक्ती कायम एकाच विचाराने भारलेली असते" हे अमान्य करतो. व्यक्ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या विचारांनी प्रेरित होते. म्हणून व्यक्ती आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर त्याच त्याच घटनांना सामोरी जात असताना वेगवेगळ्या तऱ्हेने वागते. जर व्यक्ती कायम बदलत असेल, परिवर्तनीय असेल, कधी धर्मनिहीत नफा, कधी अधर्माने कमावलेला नफा, कधी स्वार्थ, कधी परमार्थ, कधी तत्त्वनिष्ठा, कधी वैयक्तिक सुख यात जर व्यक्ती हिंदोळे घेत असतील तर मग व्यवहार कसे करायचे? या प्रश्नाला सोडवण्यासाठी त्यांनी मग संस्थांना अपरिवर्तनीय स्वरूप दिले.
व्यक्ती जन्माला येते. तिचा परीघ; स्वतः, पालक, नातेवाईक, शेजारी , मित्र असा वाढत जातो. मग ही व्यक्ती अनोळखी व्यक्तींशी देखील सुयोग्य पध्द्तीने वागू शकते. तिचे वागणे नियंत्रित आणि समाजमान्य राहावे म्हणून कायदे केले जातात. ज्यात शिक्षा असते पण शिक्षेच्या कालावधीत वर्तन चांगले असल्यास सूट देखील दिली जाते. ही व्यवस्था हळू हळू सामाजिकरित्या उत्क्रांत होत जाणाऱ्या नैसर्गिक व्यक्तींसाठी (individuals) साठी सुयोग्य आहे. पण संस्थांचे (artificial person) तसे नसते. त्या अपरिवर्तनीय राहणे आवश्यक असल्यामुळे त्या विशिष्ट उद्दिष्टांसाठीच चालू कराव्या लागतात, आणि ही उद्दिष्टे त्यांना जन्माला घालण्याआधी सांगावी लागतात. त्यात बदल करून चालत नाही. कारण संस्था जन्मतःच सामाजिक असतात. त्या टप्प्याटप्याने सामाजिक होत नाहीत. तसे करणे म्हणजे व्यापाराच्या व्यवस्थेला सुरुंग लावण्यासारखे आहे. आणि बाबा रामदेव यांनी जरी आधी एक धर्मादाय संस्था आणि मग व्यापार करणारी नफ्याची इच्छा धरणारी संस्था अश्या दोन वेगवेगळ्या संस्था स्थापन करून आपण कुठलाही कायदा मोडला नाही हे दाखवले असले तरी दोन्ही संस्थांचे व्यावहारिक नाव आणि दोन्हीमधली कार्यकारी व्यक्ती एकच असल्याने जरी या दोन संस्था असल्या तरी हा बाबा रामदेव या अस्थायी आणि परिवर्तनीय व्यक्तीच्या महत्वाकांक्षेचा विस्तार आहे. आणि त्याला संन्यासी, अध्यात्म यांचा मुलामा दिला गेला आहे. ज्यामुळे पुढे बाबा स्वतः किंवा त्यांचे उत्तराधिकारी स्वतःला कायद्याबाहेर ठेवू शकतील असे चित्र मला दिसते. बाबा तर परिवर्तनीय आहेतच पण त्यांच्या संस्थाही आपल्या नकळत परिवर्तनीय होण्यात वाकबगार आहेत. अश्या व्यक्ती आणि त्यांच्या संस्था केवळ दर्जेदार उत्पादने देतात म्हणून त्यांच्या काम करण्याच्या, पैसे उभारण्याच्या आणि जनतेवर प्रभाव टाकण्याच्या पद्धतीकडे आपण दुर्लक्ष केले तर आपण मेक इन इंडियाच्या तत्वाला हरताळ फासत आहोत. विदेशी गुंतवणूक केवळ करसवलत मिळते आहे म्हणून आली तर ती आपणच तयार केलेल्या आणि मान्य केलेल्या कायदाबाह्य राहू शकण्याच्या या भस्मासुराला आपलेसे करून पुन्हा मागल्या दाराने ईस्ट इंडिया कंपनी आणेल, आणि आपल्याला ते कळणार पण नाही.
आपण ब्रिटिशांचे राज्य नाकारले आहे पण त्यांचे व्यापाराला स्थैर्य देणारे नियम नाकारण्यात तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत आपण अपरिवर्तनीय संस्था उभारण्याचा त्याहून अधिक चांगला मार्ग तयार करू शकत नाही.
आपली ताकद हीच आपली मर्यादा असते, या निष्कर्षावर माझा पूर्ण विश्वास आहे. बाबा रामदेवांची ताकद म्हणजे त्यांची धर्मादाय संस्था. तिथूनच त्यांनी नफा कमविणारी संस्था सुरु केली त्यामुळे नफ्याच्या उद्देशाने चालू झालेल्या संस्थेला त्यांच्या धर्मादाय संस्थेच्या ताकदीचा फायदा झाला आणि आता तीच त्यांची मर्यादा ठरवते आहे.

बिपीन राजन कुलकर्णी आणि Yogesh Damlé तुमच्या दोघांच्या पोस्टमुळे आणि त्यावरील कमेंटमुळे हे सुचले म्हणून तुम्हा दोघांनाही टॅग करतोय. त्रास झाल्यास नोटोफिकेशन बंद करून टाका. ;-)

No comments:

Post a Comment