Sunday, July 16, 2017

बखर बिनपोवाड्याची

परवा द मॅन इन द हाय कॅसल या अॅमेझॉन प्राईम वर उपलब्ध असणाऱ्या सिरियलबद्दल लिहिलं. अनेक मित्रांनी प्रतिसाद दिले. कुणाला जयंत नारळीकरांची 'गंगाधरपंतांचे पानिपत' ही कथा आठवली. कुणाला कॅटॅस्ट्रॉफ थियरी आठवली. कुणी रॉबर्ट हॅरिस आणि लेन डेटन हे अस्तित्वात येऊ ना शकलेल्या इतिहासाबद्दल लेखन करणारे लेखक सुचवले. हे सगळे वाचायचे आहेत याची नोंद मनात करून ठेवत असताना मला माझ्याकडची नंदा खरेंची दोन पुस्तके आठवली.

पहिलं, अंताजीची बखर आणि दुसरं, बखर अंतकाळाची.

अंताजी हा या दोन पुस्तकांचा काल्पनिक लेखक. हा पेशवाईच्या काळात विविध घटनांना साक्षी असतो. पहिल्या बाजीरावाच्या काळात जन्मलेला अंताजी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बखर लिहीत असतो. नागपूरकर भोसल्यांची बंगालवर स्वारी, प्लासी, पानिपत, कुंभेरी, खर्डा अशी अनेक मोठी युद्धे तो पाहतो. इतकेच काय पण नारायणरावाच्या खुनाच्या वेळी तो तिथे हजर असतो. अनेक महत्वाच्या व्यक्तींशी त्याचा संबंध येतो त्यामुळे त्यांचे व्यक्तिविशेष जाणणे त्याला शक्य होते. त्याला रंगवताना खरेंनी लंपटपणा, थोरांबाबत अनादर, स्वतःचा व इतरांचा घाबरटपणा, स्त्रियांविषयी अनुचित आकर्षण, धर्माचरणाबाबत अरुची, अघोरी कृत्यांबद्दल घृणास्पद कुतूहल हे त्याचे स्वभावविशेष ठरवले आहेत. पण स्वतःच्या अनीतीची चाड नसल्याने अंताजीचे लेखन स्वतःस खोटे मोठेपण देण्याच्या दोषापासून मुक्त आहे.

दोन्ही पुस्तकात खरेंनी प्रचलित इतिहासातील अनेक गोष्टींना दूर ठेवले आहे. यात सरसावणारे शेले नाहीत. उसळणाऱ्या तलवारी नाहीत. गर्रकन वळणारे किंवा करारी नजरेने रोखून पहात आपल्या पहाडी आवाजात गर्जणारे शूरवीर नायक नाहीत. राजाचे अश्रू नाहीत. पत्नीसमवेत सारीपाट खेळता न आल्याचे शल्य उरी बाळगणारे हळुवार मनाचे तरीही रणझुंझार योद्धे नाहीत. मंद पावले टाकीत अदबीने झुकून बोलणारे कारभारी नाहीत. पण इतिहास तोच आहे. थोडक्यात अंताजी आपल्याला काचेपलीकडे वर्ख लावून ठेवलेल्या मिठाईच्या मुदपाकखान्यात घेऊन जातो.

म्हणजे या पुस्तकांत अस्तित्वात नसलेल्या इतिहासाबद्दलची कल्पना नसून अस्तित्वात असलेल्या इतिहासाचे उघडे वाघडे रूप आहे. इतिहास लिहिताना तो लोकप्रिय रूपात लिहिण्याचा आणि त्यासाठी अरुंद, कोता आणि बराचसा असंवेदनशील दृष्टिकोन ठेवण्याचा जो प्रघात पडला आहे त्याला न जुमानता, अंताजी आपल्याला त्या काळात घेऊन जातो. रूढार्थाने ही इतिहासाची पुस्तके नाहीत आणि पोवाडेदेखील नाहीत. पण ऐतिहासिक साधने वापरत असताना व्यक्तींच्या उदात्तीकरणाचा मोह टाळला आणि आपली वर्तमानकालीन उद्दिष्टे पूर्ण करून घेण्यासाठी त्याला न रंगवता तिरसट व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो पाहिला तर कसा दिसेल याचे शब्दचित्र आहे.

अंताजीची बखर १९९१ च आहे तर बखर अंतकाळाची त्यानंतर सुमारे १८ वर्षांनी लिहिलेलं आहे. अंताजीचं पात्र कसं सुचलं ते लिहिताना, लेखकासमोर जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेजर या लेखकाने निर्माण केलेला फ्लॅशमन हा काल्पनिक नायक होता. प्रस्तावनेत त्याची ओळख करून देताना खरे लिहितात, 'हा फ्लॅशमन हलकट, घाबरट आणि स्त्रीलंपट दाखवला आहे. पण तो इतिहासातल्या अनेक महत्वाच्या घटना घडत असताना हजार होता अशी कल्पना आहे .

प्रस्तावनेतील फ्लॅशमनचे वर्णन आज पुन्हा वाचताना मला ब्लॅक अॅडर ही माझी आवडती मालिका आठवली. त्यासोबत मॉन्टी पायथॉनचा लाईफ ऑफ ब्रायन चित्रपट आठवला. आणि फ्रेजर साहेबांची पुस्तके वाचायचा कधीचा करून ठेवलेला पण आचरणात न आणलेला संकल्प पुन्हा आठवला. आणि नंदा खरेंची इतर पुस्तके वाचायची बाकी आहेत हे पण आठवले. रात्र थोडी सोंगे फार ही माझी कायमची अवस्था आहे. फक्त इथली सोंगे उत्कृष्ट आहेत आणि माझी ताकद अपुरी.

No comments:

Post a Comment