Wednesday, August 23, 2017

भक्तवत्सल देवीचं जग

कधी कधी वाटतं व्हॉटस अॅप म्हणजे देऊळ आहे. अनेक देवींच्या छोट्या छोट्या देवळांचं एक मोठं देऊळ संकुल.

इथे सगळे भक्त वेगवेगळ्या देवींची अखंड भक्ती करत असतात. भक्तांच्या मनोकामना पुऱ्या होतात की नाही हा विषय संशोधन करण्यास चांगला आहे. पण देवींना पुष्कळ भाव मिळतो. इतका की आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे हे खोटे वाटेल.

साधारणपणे प्रत्येक देवीचा नित्यक्रम असा असतो.

डीपी बदलावा.त्यात शक्य असेल तर डोळ्यात आर्त भाव आणावेत. किंवा एकदम बेफिकीर भाव आणावेत. किंवा स्टेटस मेसेज बदलावा. त्यात विदेशी भाषेतील (विशेषतः स्पॅनिश किंवा फ्रेंच भाषेतील) वाक्ये टाकावीत. यासाठी गुगल ट्रान्सलेट वापरावे. किंवा 'एकटं वाटतंय', 'कधी येशील', टाईप वाक्ये टाकून प्रत्येक भक्ताला ही देवीची आपल्याला घातलेली आर्त साद आहे असे वाटू द्यावे. किंवा स्टेटस बदलावा. त्यात अनेक फोटोंची एक मालिका गुंफावी. त्यातला किमान एक फोटो पतिदेवांबरोबर, एक बाळदेवाबरोबर आणि बाकी सर्व एकटीचे ठेवावेत. आणि मग भक्तांची वाट पहावी.

याउलट प्रत्येक भक्ताचा दिनक्रम असा असतो.

रोज सर्व देवींच्या डिपीचं दर्शन घ्यावं. कधी देवी फूल असते, कधी पानं, कधी बालरूपात, कधी बालपणापासून ते आजपर्यंतच्या अनेक रूपांचा कोलाज, कधी आपल्या सख्यांसोबत असते, कधी बाळदेवासोबत, तर कधी साक्षात पतिदेवांसोबत. मग ज्यांचे स्टेटस मेसेज बदलले आहेत त्यांचे मनन करावे. ते विदेशी भाषेतील असतील तर गुगल ट्रान्सलेट वापरून स्वतःचे ज्ञान वाढवावे. मग ज्यांचे स्टेटस बदलले आहेत त्यांच्या स्टेटसचा स्लाईडशो भक्तिभावाने बघावा. देवीची अशी विविध रूपे पाहून झाली की मग अनन्य भक्तिभावाने हृदय भरून घ्यावे.

मग सत्यनारायणाच्या पुजेत सांगतात त्याप्रमाणे देवीचे मनोरंजन करायचे ही जबाबदारी स्वतःवर घ्यावी. देवीच्या डीपीचं कौतुक करावं. बाळ मोठा झाला आहे अगदी आईवर गेला आहे वगैरे सांगावं. पतिदेवांना जिममध्ये पाठव! तुला शोभत नाहीत वगैरे मनधरणी करावी. मग विनोद किंवा गाणं वगैरे पाठवून देवीचं मनोरंजन करावं.

आणि मग देवळाचं दार बंद करून दिवसभर आपल्या कामाला लागावं. सारखं सारखं नामस्मरण करत रहावं. आणि मध्ये मध्ये व्हॉटस अॅपच देऊळ उघडून देवीपर्यंत आपली प्रार्थना पोहोचली की नाही याची खातरजमा करून घ्यावी. देवी बघत असेल यावर विश्वास ठेवावा.

एक टिक म्हणजे देवी बाळदेव आणि पतिदेवांकडे लक्ष देते आहे. दोन टिक्स म्हणजे देवीला वेळ मिळाला. निळ्या टिक्स म्हणजे आपली सेवा पोचली.

मग अनेकदा देवी उत्तर देत नाही म्हणजे कौल डावा पडला. क्वचित कधीतरी देवी भक्तवत्सल होते आणि उत्तर देते. म्हणजे कौल उजवा पडला.

मग जो मेसेजरूपी प्रसाद मिळाला असेल तो भक्तिभावाने ग्रहण करावा. आणि देवीच्या जयघोषात फोन कपाळाला बांधायचाच काय तो बाकी ठेवावा. किंवा जमल्यास कपाळावर बांधून फिरावे.

जे सुविचार शाळेच्या बोर्डावर लिहिले असताना त्यातील काना मात्रा वेलांटी किंवा एखादा शब्द खोडून त्याचा अर्थ बदलण्यास तो हिरीरीने पुढे सरसावला असता, जे सुविचार आईवडिलांकडून आले असता तो तडक उलट उत्तर देता झाला असता; असे सगळे सुविचार जेव्हा देवीकडून येतात तेव्हा त्याला त्याचा वेगळाच अर्थ समजतो. केवळ विचार चांगला असून भागत नाही तर गुरुपण तितकाच प्रेमळ आणि लोभसवाणा असावा लागतो, हे सत्य त्याला उमगतं.

कित्येक भक्त अशी सेवा दिवसातून अनेकवेळा करतात. इतके सगळे प्रेमळ भक्त आणि भक्तवत्सल देवी असूनही आजकाल माणूस खऱ्या प्रेमाला पारखा झालाय असं सगळे का म्हणतात? ते काही कळत नाही.

No comments:

Post a Comment