Wednesday, July 25, 2018

चपखल

भिकबाळी (किंवा बिगबाळी जे काय असेल ते) घातलेले, हातात मोठाली कडी किंवा ब्रेसलेट घातलेले किंवा गळ्यात पदक असलेल्या चेन घातलेले पुरुष जेव्हा मी बघतो तेव्हा मला त्यांचा अतिशय आदर वाटतो. म्हणजे हे लोक हे असं सगळं कसं काय बरं वागवत असतील? या प्रश्नाने मी हैराण होतो. कामासाठी घराबाहेर गेल्यावर थोड्या वेळातच हातातील घड्याळ आणि खिशातील पाकिटाचंही मला ओझं होतं. घाम आल्यावर घड्याळ नकोसं होतं आणि खुर्चीवर बसताना मागील खिशातील पाकीट अनावश्यक ऍक्युप्रेशर करतंय असं वाटल्याने मी अस्वस्थ होतो.

केसांच्या वेगळ्या रचना करणारे किंवा केस रंगवणारे किंवा पोनीटेल बांधणारे किंवा शाळकरी मुलींसारखा हेअरबॅण्ड घालणारे पुरुष जेव्हा मी पहातो किंवा झिरमिळ्यांची ओढणी घेऊन सलवार कुडते घालून सराईतपणे वावरणारे पुरुष पाहतो तेव्हा मला मनातल्या मनात त्यांच्याबद्दल हेवा वाटतो. पुढे जाऊन मी हिंदी सिनेमाच्या हिरोसारखे मधोमध भांग पाडून त्याचा कोंबडा मिरवू नये याची काळजी घेत परमेश्वराने माझे केस साळींदराच्या काट्यांच्या गुणधर्माचे बनवून मला या भूतलावर पाठवले. आणि दाढीच्या बाबतीत आपल्याला दाढी नीट दिसेल का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत दाढी पांढरी होण्याची वेळ झाली. डोकं आणि खांदे या दोघांच्या मध्ये मान नावाचा एक अवयव देताना विधात्याने हात आखडता घेतल्याने आणि आमच्या मालीशवाल्या बाईंचा ‘ईश्वरेच्छा बलियसी’ वर विश्वास असल्याने ओढणी कुठे लटकवावी हा प्रश्न माझ्या बाबतीत माझ्या हयातीत सुटणार नाही. त्याशिवाय त्या झिरमिळ्यांच्या ओढणीत नेहमी काहीतरी अडकते किंवा मग ती ओढणी स्वतःच कशाततरी अडकते आणि माझ्या कूर्ममानेला ओढ देऊन आपले ओढणी हे नाव सार्थ करते.

केवळ ली कूपर किंवा हश पपीजचे बूट वापरणारे, अॅरो किंवा व्हॅन हयूसेनचेच शर्ट्स वापरणारे, फुलशर्टच्या बाह्या जोडण्यासाठी बटन न वापरता महागाचे कफलिंक्स वापरणारे, रेबॅनचा गॉगल वापरणारे किंवा मग टॉमी हिलफिगरचं घड्याळ वापरणारे, फोन कंपनीने नवीन मॉडेल बाजारात उतरवताच ते विकत घेणारे लोक पाहून मी अचंबित होतो. अर्थशास्त्रातील उपयोगितेचे तत्व यांना आणि ध्यानाकर्षी खरेदीचे तत्व मला शिकवू न शकलेल्या शिक्षकांबद्दल मला सहानुभूती वाटावी की राग यावा ते न कळल्याने मी गोंधळात पडून गप्प बसतो.

मादक पेयांची माझी व्याख्या ही द्राक्षासवापर्यंतच संपत असल्याने टकीला, शॉट्स, पेग, क्वार्टर असे शब्द वापरणारे, वेगवेगळ्या ब्रॅंड्सची नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये माहिती असणारे पुरुष जेव्हा मी पाहतो आणि विशेषतः हॉटेलमध्ये वेटर अदबीने बाटली घेऊन आल्यावर त्याला हात लावून कसला तरी विचार करून त्याला होकार किंवा नकार देणारे पुरुष जेव्हा मी पाहतो तेव्हा मला माझ्या अज्ञानाचा महासागर किती अथांग आहे याची जाणीव होते.

कुठल्याही संगीताच्या मैफलीत माना डोलावणाऱ्या, वा वा करणाऱ्या लोकांबद्दल तर मला अतीव आदर आहे. म्हणजे ही जागा वाहवा करण्याची आहे हे यांना कसं कळत असेल त्याचं मला भयंकर कुतूहल आहे. रागांची नावे चटकन ओळखणारे, कुठली गाणी कुठल्या रागावर बांधली आहेत ते चटकन सांगू शकणारे लोक पाहून माझी मती गुंग होते. इथे मला गाण्याचे बोल लक्षात रहायची मारामार आणि यांना राग, त्याची द्रुतलय की मध्यलय वगैरे गोष्टीही इतक्या आरामात समजतात ते पाहून यांच्याबद्दल आणि यांच्या संगीतशिक्षकांबद्दल माझ्या मनात अपार आदर दाटून येतो.

आपण अभिनय करू शकतो, गाणं म्हणू शकतो, चित्र काढू शकतो, कविता करू शकतो, लेखन करू शकतो, मूर्ती घडवू शकतो; आणि पुढे आयुष्यभर आपल्याला हेच करायचं आहे; हे काही लोकांना नक्की केव्हा कळत असेल हादेखील एक न सुटलेला प्रश्न आहे. म्हणजे मला या सर्व कलांपैकी एकही कला येत नाही हे माझ्या शिक्षकांनी कमी मार्क देऊन किंवा विविध गुणदर्शनच्या स्पर्धेत शिरकाव करण्याच्या माझ्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडून जाहीर रित्या सुचवायचा प्रयत्न केला. आणि मी ही गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून या कलांच्या वाट्याला गेलो नाही.

आपण कुणालाही गाढवात काढू शकतो, आपण फेसबुकवरून मोठमोठ्या राजकारण्यांना सल्ले देऊ शकतो, त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना शाब्दिक चिमटे, गुद्दे, कोपरखळ्या, धपाटे इतकेच काय पण लाथाळ्याही करू शकतो अशी खात्री असलेल्या अनेक फेसबुकी विद्वानांबद्दल तर मला अतीव भीतीयुक्त आदर आहे. इथे मी सोसायटीच्या सेक्रेटरीला साधं पत्र लिहिताना डिअर सर लिहू की रिस्पेक्टेड सर लिहू यावर अडखळतो. त्यामुळे फेसबुकवर काही लोक नेत्यांना पप्पू, फेकू, उठा, पेंग्विन अश्या शेलक्या विशेषणांनी संबोधताना बघून मला हे सगळे लोक दाऊदपेक्षा जास्त धैर्यशील वाटतात. नावडत्या पक्षाच्या नेत्याबद्दल आणि त्याच्या अनुययांबद्दल बोलताना यांच्या वाणीला जो त्वेष चढतो तो पाहून आज लोकमान्य असते तर त्यांनी पुनश्च हरिओम वगैरे करण्याऐवजी अग्रलेख लिहिण्याच्या कामी यांची नेमणूक करुन स्वतः पुन्हा गणित किंवा गीतेत डोकं घातलं असतं आणि यांच्या अग्रलेखातील ज्वल्जहाल भाषेला टरकून स्वदेशीयांचं सरकारही इंग्रजांबरोबर भारत सोडून इंग्लंडला परतलं असतं.

यांच्या घरी कधी काही साधा प्रॉब्लेम झाला तर ही मंडळी सरळ फोन उचलून पप्पूला किंवा फेकूला किंवा उठांना आज्ञा करतील आणि त्या आज्ञेतील जरब ओळखून हे नेतेही धावत धावत, तातडीने, विजेच्या वेगाने, निमिषार्धात यांची कामं करून देतील याची मला खात्री आहे. किंबहुना यांच्या घरची कोथिंबीर, घेवडा, गवार वगैरे निवडून झाल्यावर, दिवसातून अर्धाच तास पाणी येणाऱ्या यांच्या बाथरूममधील ड्रम भरून झाल्यावर मग ही नेतेमंडळी देशाच्या कारभारात लक्ष घालत असावीत असा माझा कयास आहे.

फेसबुकवर सक्रिय होण्याअगोदर आपण ३६ आणि ३८ च्या मधील कंबर असल्याने रेडिमेड पॅन्ट जशीच्या तशी वापरू न शकणारे, ९ आणि १० च्या मधील मापाचा पाय असल्याने मोठे बूट घेऊन पुढे कापूस घालून वापरणारे असे जन्मजात कुठेही चपखल न बसणारे आहोत हे समजून चुकले होते.

पण आता फेसबुकवर सक्रिय झाल्यानंतर ‘आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला जे हवंय तेच योग्य का आहे? आणि आपल्याला जे नकोय ते टाकाऊच का आहे?’ याबद्दल आपल्याला काहीच ठाम मते नसल्याने आपण इथेही चपखल न बसणारे आहोत हे नक्की कळले आहे.

No comments:

Post a Comment