Friday, December 14, 2018

आग पोटात घेणारा माणूस

मग जेवण झालं. आठवडाभर घरी असलेले सासू सासरे स्वगृही जायला निघाले. बायकोने भुवई उचलली आणि मी धावत जाऊन कार काढली. पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सासुरवाडीला जाऊन दोन्ही तीर्थस्वरुपांना सोडलं आणि घराकडे वळलो. खरं तर त्यांचं वजन फार वाटत नाही पण का कोण जाणे मला गाडी फार हलकी वाटत होती. माझा रथ असता तर आता तो रस्त्यापासून चार अंगुळे वर चालला असता आणि लोकांनी आपल्याला युधिष्ठिर म्हटलं असतं नंतर FTII चा चेअरमन म्हणून ओळखलं असतं वगैरे विचार डोक्यात आले असताना शेजारी बसलेली ही उदासपणे म्हणाली की आता घर ओकं ओकं वाटेल.

वर्गात एखादा विद्यार्थी सीएच्या अभ्यासामुळे गांगरून गप्प झाला की त्याला / तिला पुन्हा माणसांत कसं आणायचं त्याच्या विविध क्लृप्त्या गाठीशी असलेला मी, हिच्या उदासपणाला मात्र फार घाबरतो. कारण तो घालवण्यासाठी माझ्या खिशाला किती मोठी कात्री लागू शकते याचा अनुभव मी लग्नाची अठरा आणि त्याआधीच्या चार वर्षात घेतला आहे. म्हणून मी ही 'ह्म्म्म्म' हा व्हॉटस अॅपवर शिकलेला उद्गार काढून गाडी चालवत राहिलो. गाडीतल्या एफ एमचं चॅनेल बदलत राहिलो.

एके ठिकाणी गाणं लागलं 'पान खायो सैंया हमारो. मलमलके कुडते पे छीट लाल लाल' आणि मी पण ते गाणं गुणगुणू लागलो. हे जुन्या काळचे नायक फार ग्रेट असावेत. म्हणजे दिवसभर काम करुन घरी आल्यावर हात पाय धुवून पुन्हा मलमलचे कुडते, अत्तराचा फाया वगैरे जामानिमा करुन पानाच्या गादीवर जायचे आणि त्यांच्या कपड्यांवर चक्क पानाचे डाग पडले तरी त्यांची प्रेयसी सर्फ एक्सेल नसलेल्या काळातही प्रेमानं गाणीगिणी म्हणायची. म्हणजे खरोखर तो काळ फार रोमॅन्टिक असावा. इथे मी घरी आलो की थ्री फोर्थ आणि जुना टीशर्ट घालून बसतो आणि अगदीच खांद्यावर टॉवेल टाकला की कुणालाही रामू चाचा आहे असं वाटेल म्हणून तेवढं न करण्याची खबरदारी घेतो तरीही केवळ भृकुटीच्या इशाऱ्याने माझ्या सासऱ्यांची लेक माझा रामू चाचा करते हे जाणवून मी खिन्न होत होतो. स्त्री स्वतंत्र झाली आणि जग बदललं. वगैरे विचार माझ्या मनात येत होते. तेवढ्यात मला एक पानाचं दुकान दिसलं.

छान एसी वगैरे असलेलं पानाचं दुकान नवीनंच उघडलं होतं. मग माझ्या उदासीन अर्धांगाला पुन्हा माणसात आणण्यासाठी आणि नुकत्याच ऐकलेल्या गाण्याच्या प्रभावाने मी पान खाण्याचा बेत जाहीर केला. जरा आढेवेढे, किंचित त्रागा, शेवटी 'बरं चल तुला हवंय तर' वगैरे म्हणत अर्धांग गाडीतून उतरायला तयार झालं.

दुकान नवीन असल्याने कदाचित जास्त लोकांना माहिती नसावं. त्यामुळे गर्दी नव्हती. आम्ही दोघं आणि पानवाला अशी त्रिमूर्ती त्या पान बुटिकमधे होती. वर टिव्ही लावला होता त्यावर वेगवेगळ्या गिऱ्हाईकांची क्षणचित्रे फिरत होती. मधेच काही गिऱ्हाईकांचे जळतं पान खातानाचे व्हिडिओदेखील होते. दुकानाची पहाणी करून झाल्यावर मी काऊंटरकडे वळलो. आजकालचे पानवाले फार मॉडर्न झाले आहेत हा विचार डोक्यात आला असतानाच पानवाल्याने मॉडर्नपणाची परमावधी करत मेनुकार्ड समोर ठेवलं आणि फावल्या वेळात स्वतःच पान खात असल्याप्रमाणे तोंडात गुळणी धरल्यागत गप्प उभा राहिला.

मी जगात कशाला भीत नाही इतका निवड करण्याला भितो. मला सगळ्यात काही ना काही आवडतं मग काय घ्यावं ते न कळल्याने मी जास्तीत जास्त महागाची गोष्ट निवडून खिसा हलका करुन परततो. यामुळे मी हॉटेलात मेनू कार्ड टाळतो. केस कापायला एकाच न्हाव्याकडे वर्षानुवर्ष जाऊन एकाच प्रकारचा हेअरकट करुन घेतो. चपला बूट कपड्यांची खरेदी पहिल्यांदा जे काऊंटरवर येईल त्यावरंच आटपतो. इतकंच काय पण आवडलेल्या पहिल्याच मुलीला मागणी घालून तिच्याशीच लग्न करून मोकळा झालेलो आहे. त्यामुळे मेनू कार्ड नेहमीप्रमाणे बायकोकडे सरकवून मी दुकानातील चकचकीत बाटल्या बघत होतो.

मग हिने गोल्ड वर्ख असलेल्या पानाबद्दल चौकशी सुरू केली. ओझरत्या नजरेने मेनू कार्ड बघून मला कळलं की आज सासू सासरे परतण्याचा उदासपणा मला काही हजारात पडू शकतो. ज्या गाढवाने एफ एम चॅनलवर 'पान खायो सैंया हमारो' हे गाणं लावलं त्या रेडिओ जॉकीला मी मनातल्या मनात भरपूर शिव्या घातल्या. मुसलमान दिसणाऱ्या पानवाल्याच्या घरी आज देवदिवाळीही साजरी होईल, त्याची कच्चीबच्ची मला दुवा देतील वगैरे, अशा तऱ्हेने मी दोन्ही धर्मातील सेतू बनलो आहे वगैरे कल्पना करुन मी स्वतःचं समाधान करुन घेत होतो. पण प्रत्यक्षात मात्र हिने चॉकलेट पान घेतल्याने मी बांधू शकत असलेला सेतू कोसळला.

तिनं काय घ्यावं याचा निर्णय झाला होता आता माझ्यासाठी निवड करायची होती. तेवढ्यात हिचं लक्ष दुकानातील टिव्हीकडे गेलं. तिथे कुठल्यातरी गिऱ्हाईकाला आगीचं पान खाऊ घालण्याचा व्हिडिओ लागला होता. आणि हिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. त्यात मला माझं भविष्य दिसलं. मला एकाएकी अमेरिकाज् फनिएस्ट व्हिडिओज, डोन्ट ट्राय धिस वाले डिस्कव्हरीचे व्हिडिओ आठवू लागले. देवदिवाळी साजरी करता न आल्याने आणि घरी कच्ची बच्ची काय म्हणतील या विचाराने गांगरलेल्या पानवाल्याचा नेम चुकला आणि आगीचं पान आपल्या तोंडात न जाता दाढीला मशालीसारखं पेटवून उठलं तर काय घ्या? या विचाराने माझा थरकाप उडाला. आपली दाढी फार वाढली आहे. खरं तर डिसेंबर लागताच आपण सफाचट करायला हवं होतं अशी हताशेची भावना डोक्यात आली. मी क्षीणपणे नकार द्यायचा प्रयत्न केला पण स्वतःच्या निवडीबाबत चोखंदळ असणारं माझं अर्धांग माझ्याबाबत मात्र ठाम असतं. त्यामुळे मी आगीला तोंड द्यायला तयार झालो.

उंच काउंटरमागे पानवाला काहीतरी करत होता आणि मी भविष्यात काय वाढून ठेवलंय त्या विचाराने दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदा बसलेल्या आणि अभ्यास न झालेल्या मुलासारखा घाबरलेलो होतो. एकाएकी काउंटरमागे जाळ दिसला आणि पानवाल्याने मला तोंड उघडण्याची आज्ञा केली. मी घाबरून डोळे बंद करून तोंड उघडलं. आणि हलाहल प्राशन करणाऱ्या शिवशंकराचं स्मरण केलं. मला उगाचच अग्निकाष्ठ भक्षण करणाऱ्या खंडनमिश्र की मंडनमिश्र नावाच्या विद्वानाची आठवण झाली. गो नी दांडेकर की अजून कुणीतरी लेखकाच्या पुस्तकात वाचलेल्या "होष्यमाणास तयार होणाऱ्या' नायकाची आठवण झाली. आणि मग टाळूला काहीतरी गरम गरम लागतंय ही जाणीव झाली. 'तोंड बंद करा तोंड बंद करा' असे हाकारे ऐकू आले. आणि त्या अवस्थेतही आपला पानवाला भैय्या नसून मराठी आहे याची जाणीव झाली. तोंड बंद केलं, डोळे उघडले आणि परीक्षा संपल्यावर येणाऱ्या सुटकेचा अनुभव घेतला. मग शांतपणे तोंडात कोंबलेले कलकत्ता पान चावत विजयी वीराच्या आवेशात इकडे तिकडे बघू लागलो.

आता सगळं झालं असं वाटत असतानाच ही म्हणाली, 'अय्या, मी व्हिडीओ काढायची विसरले. आता हो काय करायचं?' मी केलेला इतका मोठा पराक्रम कॅमेऱ्यात बंद न झालेल्याचं कळून मी उदास झालो. अखंड मोरे घराण्यात आगीचं पान खाल्लेला मी पहिला पुरुष होतो. असं असूनही माझी गणना 'अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात' मध्ये होणार हे जाणवून मला वेडात दौडलेल्या सात मराठ्यांबद्दल अजूनच कणव दाटून आली. माझ्या चेहऱ्यावर दाटलेली उदासी पाहून हिच्या डोळ्यात पुन्हा एकदा तशीच चमक आली.

'अहो, माझं ऐका. तुम्ही अजून एकदा पान खा. मी आता व्हिडीओ काढते.' हा सल्ला देऊन माझ्या होकार नकाराची वाट न पाहता तिने अजून एका अग्निपानाची ऑर्डर दिलीसुद्धा. पानवाल्याने पडत्या फळाची आज्ञा मानून पुन्हा एक कलकत्ता पान लावायला घेतलं आणि मी तोंडातला तोबरा संपवायच्या मागे लागलो. आता मी दहावीच्या परीक्षेला दुसऱ्यांदा बसणाऱ्या विद्यार्थ्या इतका सराईत झाल्याने काउंटरपालिकडे डोकावून बघू लागलो. पानवाल्याने पानाच्या एका बाजूला टूथपिक टोचून दुसऱ्या बाजूला तीन लवंगा टोचल्या. त्यावर कसलं तरी जेल टाकलं आणि लायटरने त्या लवंगा पेटवल्या. मी तोंड उघडलं आणि पुन्हा, पायतळी अंगार तुडवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा अधिक शौर्य दाखवत मुखामध्ये अंगार घेतला. बायकोकडे विजयी वीराच्या मुद्रेने पाहिले. तिचं व्हिडीओ रेकॉर्डिंग झालं होतं. ते बघत मी खूष झालो. एवढ्यात पानवाला बोलला, 'अरे मॅडम, तुम्ही स्लो मोशनमध्ये व्हिडीओ काढायला हवा होता. मग तुम्हाला अजून व्यवस्थित दिसलं असतं.'

माझ्या कुठल्याही सल्ल्याची व्यवस्थित चिरफाड करून स्वतःला हवं तेच करणाऱ्या हिने लगेच 'अय्या हो की' म्हणत माझ्याकडे पाहत भुवई वर केली आणि मला जाणवलं की हा मराठी पानवाला मला अग्नीपान खाऊ घालत देवदिवाळी ला स्वतःच्या बायकोला सोन्याने मढवण्याच्या बेतात आहे. सोनेरी वर्खवालं पान मी न घेतल्याचं नुकसान तो अश्या प्रकारे भरून काढतो आहे. 'मराठी माणूस व्यापारात मागे का?' हे परिसंवाद आता बंद करण्याची वेळ झालेली आहे. असे सगळे विचार डोक्यात आले. आता मी इतका सराईत झालो होतो की मीच त्याला पान लावण्याच्या सूचना देऊ शकलो असतो. वारंवार तुरुंगात जाणारे गुन्हेगार जसे सराईतपणे हवालदार, वकील, न्यायाधीश वगैरे लोकांसमोर' गीतापे हात रखके सच बोलनेकी कसम' घेतात, त्याच सराईतपणे मी आगीला तोंड द्यायला तिसऱ्यांदा तयार झालो. सगळं साग्रसंगीत पार पाडून शेवटी दुकानाच्या बाहेर पडलो.

गाडीत बसलो. घरच्या ग्रुपवर तो व्हिडीओ पाठवून नातेवाईकांशी गप्पा मारण्यात बायको गुंगली. तिची उदासी पळून गेलेली जाणवली. ऑक्सिजन न मिळाल्याने तोंडात आग लगेच विझली असली तरी एका पानामागे तीन अशा दराने नऊ लवंगा गेल्याने पोटात आग पडली होती. आणि एकाएकी जाणवलं की जर कधी मी आत्मचरित्र लिहायचं ठरलं तर त्याचं शीर्षक 'आग पोटात घेणारा माणूस' असं ठेवता येईल आणि त्याच्या भोजपुरी भाषांतराचं नाव 'आग खायो सैंया हमारो' असं ठेवता येईल.

1 comment: