Sunday, February 9, 2020

विविध परंपरा आणि अध्यक्षीय लोकशाही

वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा, आहारविहार पध्दती असूनही सलग भूभागामुळे व एकसदृश संस्कृतीने आणि युरोपियनांच्या कृपेने आधुनिक कायदापध्दतीने एक देश म्हणून एकत्र होणाऱ्या प्रदेशांतून देशनिर्माण होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून आणि परंपरांतील भिन्नत्वामुळे विघटनवादी विचार भविष्यात प्रबळ होऊ नयेत म्हणून, 'ताकदवान केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ता', असं प्रारूप भारतीय घटनेने स्वीकारलं.

स्वातंत्र्य चळवळीत दीर्घकालीन सक्रिय सहभाग आणि भारतीय जनतेच्या मूळ भावनिक व वैचारिक बैठकीशी सांधा जुळलेल्या कॉंग्रेस पक्षाला स्वातंत्र्यचळवळीनंतर या घटनात्मक प्रारुपाचा फायदा झाला. परिणामी प्रबळ केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ताही हाती आलेला कॉंग्रेस, हा एक प्रबळ राजकीय पक्ष होत गेला. त्याचबरोबर देशात सत्ता राबवायची तर केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी एकंच पक्ष हवा हा विचारही दृढ होत गेला.
भिन्न परंपरा आणि भिन्न राजकीय अस्मिता असलेल्या या नवजात देशात घटनाकारांना ज्याचा अंदाज आला होता त्याप्रमाणे हळूहळू प्रादेशिक पक्षही जन्म घेऊ लागले. आणि स्वातंत्र्यचळवळीतील 'आपण एक देश आहोत' ही जाणीव हळूहळू हरपू लागली आणि आपापल्या प्रदेशाची अस्मिता उच्चारवात मांडणाऱ्या राजकीय पक्षांकडे लोक ओढले जाऊ लागले. यातून कॉंग्रेस पक्षाला अन्य राजकीय पक्षांचे टेकू घेणं आणि आपल्या देशाला एकामागून एक कडबोळं सरकार मिळणं असा काळ सुरू झाला. सध्या केंद्रात प्रबळ असलेल्या भाजपलाही प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करत करतंच आपलं राष्ट्रीय स्वरुप प्राप्त करता आलं आहे.
म्हणजे कॉंग्रेसचा प्रवास प्रबळ राष्ट्रीय पक्षाकडून प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणारा राष्ट्रीय पक्ष असा होत असताना भाजपचा प्रवास मात्र प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणाऱ्या पक्षाकडून प्रबळ केंद्रीय पक्ष असा होत गेला. तुम्ही ज्यांच्याशी स्पर्धा करता त्यांच्यासारखेच तुम्ही बनत जाता या नियमाला अनुसरूनंच दोन्ही पक्षांची वाटचाल झाली आहे. प्रादेशिक पक्षांच्या अरेरावीमुळे आणि संकुचित दृष्टिकोनामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या पाठिंब्याने भाजपची वाटचाल अधिक वेगवान होत गेली आणि त्याचबरोबर अजून एक विचारप्रवाह सुरू झाला की आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय प्रारुप आणि द्विपक्षीय राजकीय पध्दत अमलात यावी.
प्रबळ एक धर्म, मोठ्या जनसमूहाची एक भाषा आणि बहुतांश समाजाचा एक देव असलेल्या अमेरिकेचं हे प्रारुप व पध्दत आपल्याला आवडणं यात चुकीचं काहीच नाही. देखणी बायको दुसऱ्याची याप्रमाणे चांगली राजकीय पध्दतही दुसऱ्याचीच असते. विशेषतः संकुचित मानसिकतेचे प्रादेशिक पक्ष आणि आपापल्या गटातटांना फायदा करुन देण्यासाठी सत्ता वापरण्याची त्यांची मानसिकता दिसत राहिली की अमेरिकन घटना आणि अमेरिकन राजकीय पक्षप्रणाली आवडली नाही तर नवलच.
हा विचारप्रवाह भाजप आणि कॉंग्रेस या दोघांच्या पथ्यावर पडणारा असल्याने त्यांचे समर्थक या विचाराला कळतनकळत पुढे रेटत रहाणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.
पण ती पध्दत, प्रणाली व प्रारुप एक भाषा, एक धर्म, एक अस्मिता तयार करून(कुठलेही अत्याचार करुनका होईना) झाल्यानंतर अधिक प्रभावीपणे वापरणं शक्य आहे. आणि जर ते आपल्याला मान्य असेल तर आपल्या या नवजात देशातील कित्येक परंपरा, धर्म, आहारविहार पध्दती यांच्यावर वरवंटा फिरवणंही आपल्याला मान्य करावं लागेल. हे वेगवेगळ्या परंपरांचे पर्वतप्राय उंचवटे आपल्याला समतल करावे लागतील. कुणी कितीही सांगो पण ती प्रक्रिया अन्यायकारीच असणार आहे. जर हा अन्याय करण्याचं पातक आपल्या माथी नको असेल तर मग प्रादेशिक अस्मितांच्या जंजाळात न गुंतवता आणि दमनकारी समतलतेचा आग्रह न धरणाऱ्या प्रबळ केंद्रीय सत्तेच्या वरवंट्याखाली जाऊ न देता, या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग कुठला? या प्रश्नाने मलाही छळलं होतं.
पण दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने निवडणूक लढण्यासाठी ज्या मुद्द्यांची निवड केली आणि प्रचार संपेपर्यंत त्यापासून न ढळता आपली बांधिलकी घट्ट केली ते पहाता या प्रश्नाचं उत्तर सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं मला वाटतं.
प्रादेशिक पक्षांनी आपापल्या अस्मिता जपताना केवळ विकासाकडे आणि नागरी जीवन सुखकर करण्याकडे लक्ष दिलं तर अनेकानेक प्रादेशिक पक्ष असूनही; विविध परंपरा, भाषा, धर्म, आहारविहार पध्दती असूनही ; त्यांच्यावर वरवंटा न फिरवता प्रगती साधणं कठीण असलं तरी अशक्य नाही. आणि त्यात ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्माप्रमाणे एकमेव मार्गाचा आग्रह नसून 'विप्रा बहुधा वदन्ति' चा भारतीय सूर आहे.
त्यामुळे 'आप'ला दिल्ली निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि अन्य राज्यांतील भाजपेतर पक्षांच्या सरकारांना आपचे निवडणूक मॉडेल आपापल्या परंपरांच्या कोंदणात कसे बसवता येईल ते लवकर सुचो या शुभेच्छा. त्याचबरोबर विरोधी विचारांना देशद्रोही न ठरवता व कुठलाही धरबंद न ठेवता कुणालाही जवळ करण्याची सवय सोडून प्रबळ केंद्रीय सत्तेचं काय करायचं याचं उत्तर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनाही सुचो अशा त्यांना शुभेच्छा. आणि सर्वात शेवटी 'केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असावी' याऐवजी 'केंद्रात पूर्ण बहुमत असलेल्या राष्ट्रीय पक्षाची तर राज्यात पूर्ण बहुमत असलेल्या प्रादेशिक पक्षाची सत्ता असावी' हा विचार भारतीय मातीतून मोठा होऊन प्रगतीचा नवा मार्ग जगाला मिळो ही सर्वांना शुभेच्छा.

No comments:

Post a Comment