Saturday, November 7, 2020

हरारी आणि आशुतोष

प्रिय आशुतोष,

मागच्या आठवड्यात तुझ्या पोस्टला लगेच उत्तर देता आलं नाही. आज जरा मोकळा झालो म्हणून उशिरा उत्तर देतोय.

हरारी आशादायक चित्र उभं करत नाहीत हे तर निर्विवाद आहे. किंबहुना २०१८ मध्ये न्यू यॉर्क टाइम्सच्या एका कार्यक्रमात हरारी आणि थॉमस फ्रीडमनची संयुक्त मुलाखत होती. त्यात आशावादी राहण्याचा फ्रीडमन साहेबांचा प्रयत्न ज्या सहजतेने हरारी उडवून लावत होते त्यामुळे मी एकाच वेळी आश्चर्यचकित आणि थोडा निराशही झालो होतो. आपल्याला ज्याचे विचार चिंतनीय वाटतात त्याच्याकडून आपल्याला आशावादी राहण्यासाठी जर पाठबळ मिळालं नाही तर होणारं दुःख ती मुलाखत ऐकल्यावर मी जवळपास एक आठवडाभर सहन करत होतो.

त्याआधी २००८ मध्ये मला जॉर्ज कार्लिन हा स्टँडअप कॉमेडियन सापडला होता यूट्यूबवर. त्याचे सगळे व्हिडीओ बघायचा सपाटा लावला होता. पण शेवटी त्याचे life is worth losing आणि it's bad for you हे दोन प्रोग्रॅम्स बघताना मला नकोसं झालं होतं. कारण तेच. मानवजातीबद्दल आत्यंतिक निराशावाद.

अर्थात कार्लीन आणि हरारी या दोघांच्यात तुलना करत नाही मी. कारण एक विनोदाच्या माध्यमातून समाजातील विसंगतींवर बोट ठेवणारा शब्दांचा खेळिया तर दुसरा विचारांशी खेळणारा आणि इतिहास व जीवशास्त्र या दोन विद्याशाखांचा संगम घडवून आणणारा अभ्यासक. तरीही दोघांच्या विचारांतील अंतिम निराशा मला खटकत होती आणि अजूनही खटकते हे अगदी खरं आहे.

अशाप्रकारे त्या बाबतीत मी तुझ्या बरोबर असूनही तू पोस्टमध्ये मांडलेले मुद्दे आणि शेअर केलेल्या लिंकमधील मुद्दे मला पटलेले नाहीत. का?, ते थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. तुझ्या विचारांपेक्षा वेगळा विचार वाचायला तू तयार असतोस म्हणून मी तुझ्या पोस्टबाबत डेव्हिल्स ऍडव्होकेट होतोय.

डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑन.
१) <<<माणूस कितीही विचारवंत झाला तरी त्याच्या बालपणीच्या श्रद्धा त्याच्या मनात मागे रेंगाळत असतात. तिन्ही अब्राहमीक धर्मांमध्ये जगाचा अंत ही संकल्पना आहे. ..... जगण्याची जोरकस आशा ! साहेब ती देत नाहीत.>>>

बालपणीच्या श्रद्धा आणि हरारींच्या लेखनातील निराशावादी सूर हा मुद्दा मला मान्य आहे. भैरप्पांच्या उत्तरकांड या पुस्तकावरील माझ्या पोस्टमध्ये मीही तो मांडला आहे. पण हरारींनी आपल्या ज्यू धर्मातील धारणांना अनुसरून जगाच्या अंताबद्दल भाकीत वर्तवणे आपल्याला मान्य नसणे हे आपल्या बालपणीच्या संस्कारांचा तर परिणाम नसेल ना? आपल्या हिंदू संस्कृतीत प्रलयानंतर पिंपळाच्या पानावर पायाचा अंगठा चोखत असलेला श्रीकृष्ण हे नवसृजनाचे प्रतीक आहे. आणि कदाचित ते आपल्या मनाच्या तळाशी इतके खोल जाऊन रुजले आहे की आपण त्याला छेद जाणारी कुठलीही कल्पना स्वीकारू शकत नाही. जेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला तेव्हा मी हरारी ज्यू धारणांप्रमाणे लिहीत असतील ही शक्यता मान्य करायचं ठरवलं. मग त्यांच्या विचारांची धार्मिक सत्यासत्यता बाजूला ठेवून वास्तव आयुष्यात जीवशास्त्रीय पुराव्यांशी सांगड घालायचा प्रयत्न केला. त्यासाठी माझ्या मनातील बाळकृष्णाला बाजूला ठेवला. तेव्हा मला पृथ्वीवरील कुठल्याही जीवमात्रांशी भावनिक बंध नसलेला निसर्ग दिसतो. पृथ्वीवर आपल्याला माहित असलेल्या प्राण्यांच्या असंख्य प्रजाती माणसाने पृथ्वीचा अनिर्बंध उपभोग घ्यायला सुरवात करायच्या आधी अशाच नष्ट झालेल्या आहेत. पण त्यांच्याबद्दल निसर्ग हळहळ करीत बसलेला आहे असं कुठे जाणवत नाही. त्यामुळे आपल्या मनातील पिंपळपानावरचा बाळकृष्ण बाजूला ठेवला तर हरारींनी मांडलेला जगाचा अंत ही केवळ धर्मकल्पना न वाटता निरीक्षण आणि अनुमान वाटू लागतं.

२) <<< हरारी त्याच्या अलिप्त पावित्र्यामध्ये गंभीर चेहऱ्याने म्हणतो : "करोनाच्या निमित्ताने उघडकीस आलं आहे की जागतिक नेतृत्व नाही ....... त्या नेतृत्वाची ताकतच मुळात केवढी असेल! किती सहज शक्य असेल त्या सत्तेला सगळ्यांनाच गुंडाळणं .>>>

माझ्या मते हरारी इथे नेतृत्व म्हणजे व्यक्तींबद्दल बोलत नसून नेतृत्व या गुणविशेषाबद्दल आणि तो निर्माण करताना आणाव्या लागणाऱ्या व्यवस्थांबद्दल, मूल्यांबद्दल बोलत आहेत. सध्याची राष्ट्र राज्य संकल्पना आणि त्यानुसार तयार झालेली मूल्यव्यवस्था जागतिक अरिष्टांसाठी अपुरी आहे असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला जाणवला. जर नवी मूल्यव्यवस्था आणि त्याप्रमाणे संस्थात्मक व्यवस्था निर्माण केली तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशाही नेतृत्व तयार होणार नाही. अर्थात हे होणे नजीकच्या काळात शक्य नाही त्यामुळे हरारींचा सूर निराश होणे अगदी स्वाभाविक आहे. सध्याच्या मूल्यव्यवस्था आणि शासनव्यवस्था तशाच ठेवून जर आपण जागतिक नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करणार असू तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हुकूमशहा तयार होणे अटळ आहे. पण सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून मत मांडणारे हरारी या बाबतीत वरवरचा विचार करून सार्वजनिक व्यासपीठावर मत मांडतील असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील जागतिक नेतृत्व हे नव्या मूल्यव्यवस्था आणि संस्थांही उभ्या कराव्या लागतील या गृहितकावर आधारित आहेत असं मला वाटलं. किंबहुना इथे मला ज्यू हरारी चक्क हिंदूंची वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना जागतिक नेतृत्व उभं करण्यासाठी महत्वाची आहे असं मांडताहेत असं वाटलं.

३)<<<सध्या हरारी नेत्यानाहू सरकारवर सारखा टीका करतो. नेत्यानाहूच्या तरुण मुलाने त्याला ट्विटरवरती झोडलंही. अनेक विचारवंत बघता बघता अलगद ट्रॅपमध्ये अडकून किंवा स्वखुशीने अशा आडपडद्याच्या राजकारणात उतरतात. .... का तो विचारवंतांच्या स्वधर्माला जागतो आहे ?>>>

हरारी आपल्या मतासाठी जर समाजमाध्यमांवर सक्रिय असेल तर त्यामुळे त्याच्या मतांचं महत्व कमी न होता उलट ते अजून वाढतं. हरारी पैसे घेऊन इतरांच्या उद्दिष्टाला साजेशी लोकभावना तयार करण्याचे कारस्थान करत असेल हा आरोप मला मान्य करायला कठीण वाटतो. पण एका क्षणासाठी तो खरा आहे असं मानलं तरीही केवळ त्याने सुपारी घेऊन असे लेख लिहिले असं मान्य केलं तरीही त्याच्या लेखात त्याने मांडलेल्या मुद्द्यांत तथ्य आहे की नाही हे शोधणे आणि ते नसल्यास तसे हरारींच्या निर्विकारपणे मांडणे हे हरारी विरोधकांचे कर्तव्य आहे. त्याने सुपारी घेऊन असं लिखाण केलं असेल असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

तू जो लेख शेअर केला आहेस, तो मी वाचला. पण त्यातही मला आशावादी राहण्याची आपली मानसिक गरज पूर्ण करण्याची धडपड जास्त जाणवली. आपण आशावादी राहणं ही आपली गरज आहे, निसर्गाची नाही हे मी आता मान्य केलं आहे. किंबहुना आपण आशावादी आहोत ही देखील निसर्गाची आपोआप तयार झालेली एक गुंतागुंत आहे हेही मला मान्य आहे. कदाचित निसर्गाने दिलेल्या या आशावादाच्या बळावरच आपण किंवा आपल्या भावी पिढ्यांतील कुणी वंशज प्रलयानंतरच्या पाण्यावर तरंगणाऱ्या पिंपळपानावरच्या श्रीकृष्णाला पाहू शकणार आहेत ही शक्यताही मला मान्य आहे. पण म्हणून पृथ्वीपासून दूर दहाहजार किलोमीटरवर असलेल्या यानातून पृथ्वीकडे निर्विकारपणे बघत इथल्या सजीवांचा इतिहास आणि भविष्य सांगण्याची हरारींनी विकसित केलेली विचारपद्धती नाकारून काहीच फायदा नाही. किंबहुना त्यामुळेच आपण येणारे संभाव्य धोके लवकर ओळखून त्यावर उपाय शोधून जगाचा अंत टाळू शकतो. असं मला वाटतं.

डेव्हिल्स ऍडव्होकेट मोड ऑफ.

माझ्या पोस्टच्या सुरवातीला मी हरारींच्या एका मुलाखतीचा उल्लेख केला आहे. ती खाली देतो. 

थोडी निराशाजनक आहे. पण फ्रीडमन साहेबांनी ज्या पद्धतीने आशावादाचा किल्ला लढवला आहे ते मला फार आवडलं आहे. आणि शेवटी त्यावरची हरारींची प्रतिक्रयाही मला आवडली आहे. मुलाखत थोडी मोठी आहे (साधारण सव्वा तास). त्यामुळे तुला मोकळा वेळ असेल तेव्हा बघ.

1 comment:

  1. First time I am going through your blog . Basically, I am not a blogger and I do not read them either. But now hope that I should read them and one day I may write some too.
    I went through this video. Found two or three good points and sentences to pick up and quote but whole discussion is rather extension of Alvin Toffler's Future Shock.

    ReplyDelete