Saturday, October 29, 2016

ऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार

मला वाटतं हा राग पाकिस्तानी कलाकारांपेक्षा करण जोहर वर जास्त आहे. हाच चित्रपट जर एखाद्या सुमार गर्दी खेचू शकणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकाने काढला असता, तर कुणाला इतका त्रास झाला नसता. करण जोहर आपल्या कुठल्याच समीकरणात बसत नाही. तो तद्दन भंपक सिनेमे काढतो तरीही ते चालतात. त्याच्याकडे बाजाराला खेळवण्याची क्षमता आहे. हे त्याच्या इंडस्ट्री मधील अनेकांना देखील खुपत असणारंच. प्रत्येक इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या राजकीय निष्ठा असणारे लोक असतात. जोहरची निष्ठा पैशाशी जास्त आहे. त्याला बिझनेस समजतो. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन तो मार्केट शेअर वाढवू पाहतो. काही जणांना हे मॉडेल पटत नसावे. काहीजणांना त्यांच्या आता रिलीज होऊ घातलेल्या चित्रपटाला होऊ शकणारी जोहरच्या चित्रपटाची स्पर्धा मोडून काढायची असावी. काहींना जवळ आलेल्या निवडणूका जिंकायच्या असाव्यात. या सर्वांना उरी अटॅक आणि नंतरच्या सर्जिकल स्ट्राईक्सने उत्कलन बिंदूपर्यंत आणलंय.

माझ्या मते बहिष्कार ही वैयक्तिक बाब आहे. माझ्या वडिलांनी संजय दत्तचे कुठलेही सिनेमे बघितले नाहीत. (मी मुन्नाभाई बघितला) त्याचे सिनेमे टीव्हीवर आले आणि आम्ही पाहत बसलो की तोंड फिरवून बसत किंवा बाहेर फिरायला जात. आज जोहरला विरोध करणाऱ्या किती जणांनी दत्तचे सिनेमे न बघता मोडून काढले. त्याचा तर मुंबई बॉम्बस्फोटाला प्रत्यक्ष हातभार होता. मला असे म्हणायचे नाही आहे की दत्तला बहिष्कार नाही केलात म्हणजे तुम्ही इतरांना बहिष्कार करण्याचा हक्क गमावलात. माझे म्हणणे हे आहे, बहिष्कार करावा न करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरून कुणाला देशप्रेमी किंवा देशद्रोही ठरवू नये.



वरील व्हिडिओत जोहरने मांडलेला  २००-३०० तंत्रज्ञांचा मुद्दा निखालस खोटा आहे. पण अनेक चित्रपटगृहात काम करणाऱ्या लोकांचा मुद्दा (ज्याबद्दल जोहर काही बोलला नाही) मात्र मला महत्वाचा वाटतो.

आणि हो पाकिस्तानी कलाकारांना इथे काम - पैसा - प्रसिद्धी मिळणे यातून पाकिस्तानची चित्रपट सृष्टी आपोआप मरते आणि भारतीय सांस्कृतिक वर्चस्व बाजाराच्या माध्यमातून प्रस्थापित होतं याकडे कुणाचं लक्ष कसं जात नाही त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. अर्थात भारताकडे करवा चौथ आणि तत्सम चालीरीती सोडल्यास उद्योजकांची विशेष संस्कृती नाही हे मला माहिती आहे. जर आपण आपल्या उत्पादनांना जागतिक दर्जाचे बनवू शकलो आणि त्यांचा वापर आपल्या देशातल्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी करू शकलो, तर ते आपल्या चित्रपटातून दिसू लागेल आणि मग चित्रपटातून ऊर्जा घेणाऱ्या शेजारी राष्ट्रांतून आपल्या उत्पादनांची मागणी वाढेल, ह्या शक्यतेकडे काणाडोळा करू नये.

तूर्तास आपण डॉल्से अँड गब्बाना, गुची, पेप्सी, कोक, मर्सिडीझ आणि ऑडीची जाहिरात करण्यापलीकडे फार काही करू शकत नाही हे मला माहित आहे. पण सच्चा देशभक्त असल्याने, तसे का होईना, पाकिस्तानी चित्रपट उद्योग बंद पडतोय या कल्पनेने मी खुष होतो. अर्थात आपण त्यांना कोपऱ्यात कोंडले तर त्यांच्या मरू घातलेल्या चित्रपट उद्योगाला आपण खतपाणी घालतोय हे कुणाला कळेल का यात मला शंकाच आहे.

No comments:

Post a Comment