Saturday, February 16, 2019

आणि आर्चिजने कात टाकली

त्याकाळी हिमालय बुटका होता.

त्याकाळीही भारतात वास्तुशास्त्र होते. पण हिमालय बुटका असल्याने चिन्यांनी ते इथे येऊन चोरले. 'आंतरराष्ट्रीय कॉपीराईटचा प्रॉब्लेम नको म्हणून काय करावे?', या विचारात चीनी चोर असताना तिथल्या एका चोराला कळलं की भारताच्या उत्तरेला असणारा हिमालय चीनच्या दक्षिणेला आहे. मग त्यांनी भारतीय वास्तुशास्त्रातील सर्व दिशांचे गुण उलटे करुन त्याचे नाव ठेवले फेंग शुई.

फेंग शुई वापरुन चीन संपन्न झाला. त्या संपन्नतेत तिथल्या लोकांनी फटाक्यांचा शोध लावला. ज्याप्रमाणे भारतीय करदात्यांचा पैसा वापरून उभारलेल्या पुतळ्यांना भारतीय लोकांनी तिकिट काढून भेट देऊन भारतीय अर्थव्यवस्था सुधारली त्याप्रमाणे चीनचे फटाके चीनी लोकांना विकून चीनची अर्थव्यवस्था सुधारली.

पण अॉक्टोबर नोव्हेंबरमधे भारतात हिवाळा म्हणजे चीनमधे उन्हाळा (कारण त्यांचं फेंग शुई आपल्यापेक्षा उलटं). त्यामुळे तेव्हा तिथले काही फटाके व्यापारी उन्हाची काहिली कमी करण्यासाठी हिमालय चढून जायचे. एकदा एक व्यापारी वर चढल्यावर घाबरला आणि घसरुन भारताच्या साईडला पडला.

आणि त्याला कळलं की त्याकाळी भारतात फटाके नव्हते. मग चीनला भारतीय बाजारपेठ खुणावू लागली आणि चीनचे व्यापारी भारतात फटाके विकायला येऊ लागले.

त्याकाळच्या आर्चीज् गॅलरीत हे फटाके विकायला असायचे. लाल रंगाच्या कापडाखाली असलेल्या लाकडी पायऱ्यांच्या फर्निचरवर मांडून ठेवलेले चीनी फटाके मोठे लोभसवाणे आणि आकर्षक दिसायचे. तरुण मुलं मुली फटाके विकत घ्यायला वर्षभराचा पॉकेटमनी वाचवून ठेवायचे आणि मग दिवाळीत बागेत जाऊन जोडीने फटाके फोडायचे. जर फटाका फुटला, रॉकेट उडाले, भुईचक्र फिरले किंवा पाऊस न फुटता बरसला तर ती जोडी पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत टिके, नाहीतर मग बागेतच इतर उपलब्ध पर्याय शोधले जात.

काही मुलामुलींचे पालक वर्षभर पॉकेटमनी देत नसल्याने असे तरुण तरुणी बागेच्या आजूबाजूला फिरुन रोषणाई बघत आणि आपल्याला जे करायला मिळत नाही ते करायची आपली इच्छाच नाही असं स्वतःला आणि बरोबर फिरणाऱ्या मित्र मैत्रीणींना पटवून देत.

त्याकाळच्या काही भारतीय संघटनांना भारतीय संस्कृतीवरील हे चीनी आक्रमण पटत नव्हतं. त्यांना बागेबाहेरच्या लोकांतून पुरेसा पाठिंबा मिळू लागल्यावर त्यांनी संस्कृतीरक्षण मोहीम सुरू केली. बागेत जमलेल्या लोकांच्या फटाक्यांवर पाणी ओतणे, रॉकेट हातात फोडायला लावणे वगैरे उद्योग सुरू केले. त्याकाळच्या प्रसिद्धी माध्यमांना चघळायला विषय मिळाला. फटाके फोडायला न मिळणारे लोक त्याकाळच्या व्हॉटस अॅपवर त्याकाळच्याआधीच्या काळच्या भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि मंडळींना फाशी देऊ लागले.

त्याकाळच्या आसाराम बापूंनी मातापित्यांना बरोबर घेऊन बागेत जाऊन फटाक्याच्या आवाजाच्या वरताण आवाज होईल अशा टाळ्या वाजवा असे सल्ले आपल्या भक्तांना दिले. एकीकडे बंडखोर तरुण फटाके वाजवत आहेत, दुसरीकडे संस्कृतीरक्षक तरुण पाणी घेऊन धावत आहेत आणि तिसरीकडे आईबाबांसहीत इतर तरुण टाळ्या वाजवीत आहेत असं चित्र दिसू लागलं.

पण चायनीज फटाक्यांची रोषणाई इतकी जबरदस्त होती की कित्येकदा पाण्याची बादली बाजूला ठेवून संस्कृतीरक्षकही टाळ्या वाजवू लागत. त्यामुळे फटाके अधिकच लोकप्रिय होत आहेत की काय असा भास होऊ लागला.

मग यावर उपाय म्हणून काही संस्कृतीरक्षकांनी भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या हिमालयातील शिवशंकराला आणि थोड्या खाली असलेल्या काशीला एकत्र आणून चीनपासून दूर दक्षिणेला शिवकाशी नावाचं गाव वसवलं आणि तिथे खास चीनी तंत्रज्ञानाचे पण भारतीय बनावटीचे फटाके बनवायला सुरुवात केली. हे फटाके संस्कृतीसंवर्धन करणारे असल्याने तरुणाबरोबर आता लहान मुलामुलींनाही ते उडवायला मिळू लागले. पण चीनी फटाके विकणाऱ्या आर्चीज् गॅलरीचा बिझनेस कमी झाला.

अशा तऱ्हेने फटाके भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक होत असताना आणि आर्चीज् गॅलरी बॅंकरप्सी कायद्याखाली फॉर्म भरायचं ठरवत असताना युरोपमधे व्हॅलेंटाईन नावाचा एक माणूस संतपदाला पोचला आणि आर्चीज् ने येणाऱ्या काळाची पावले ओळखून कात टाकली. लाल कापडाखाली रचलेल्या पायऱ्यांचं फर्निचर विकून नवीन फर्निचर करायला घेतलं.

No comments:

Post a Comment