Saturday, February 16, 2019

लिपस्टिक, क्लब महिंद्रा, दिवसकार्य आणि युद्ध

माझ्या हिच्या माहेरच्या अशिक्षित मोलकरणीला तिथे काम करत २५-३० वर्ष झालीत. माझ्या बायकोचं तिला फार कौतुक. आपल्या एकुलत्या एक लेकीला हिच्यासारखंच वाढवायचं तिचं स्वप्न होतं. सगळी कमाई लेकीच्या कपड्यांवर, लिपस्टीकवर, हेअरपिन, बांगड्या आणि इअरिंग्जवर खर्च करायची. आपल्या लेकीचे तसेच लाड करायची जे माझ्या सासूबाई स्वतःच्या लेकीचे करायच्या. तिच्या लेकीनेही प्रेमविवाह केला अगदी माझ्या बायकोसारखाच. फक्त एक गोष्ट राहून गेली, शिक्षणावर खर्च करायचा मात्र ती विसरली. आता मुलगी आणि जावयाला पोसण्यासाठी म्हातारी मोलकरीण राबते आहे आणि मुलगी - जावई टिव्ही हवा, बाईक हवी म्हणून हट्ट करत आहेत. मोलकरणीचं कर्ज काही फिटत नाही.

परिस्थितीने यथातथा असलेल्या आणि जेमतेम ग्रॅज्युएट झालेल्या एका नोकरदार मित्राने परवडत नसताना, इतरांचं बघून आणि घरच्यांच्या भरीस पडून क्लब महिंद्राची मेंबरशिप घेतली. गेल्या तीन वर्षात एकदाच गेला फिरायला तेही लोणावळ्याला कारण प्रवासखर्च परवडत नाही. अजून क्लब महिंद्राचे कर्जाचे हफ्ते फेडतोय.

खाऊन पिऊन सुखी असलेल्या एका ज्येष्ठ नातेवाईकाच्या अतीवृध्द आईचा देहांत झाला. सगळं काही रीतीरिवाजाप्रमाणे व्हावं म्हणून दिवसकार्य कर्ज काढून केलं. मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आता पैसे कमी पडताहेत म्हणून डोक्याला हात लावून बसला आहे.

हे सगळे भारतीय आहेत. दुसऱ्याचं बघून स्वतःला न परवडणाऱ्या गोष्टी करणारी अशीच अनेक लोकं इंग्लंड अमेरिकेतही असतील.

त्यांचे देश हवं तेव्हा हवं तिथे हव्या त्या कारणांवरून युध्द करु शकत असतील. पण त्यांचे देश माझ्या सासुरवाडीइतके किंवा क्लब महिंद्रा परवडणाऱ्या किंवा भपकेबाज दिवसकार्य परवडणाऱ्या घरांइतके संपन्न आहेत. आणि पुराणकाळातील विमानविद्या आणि प्लॅस्टिक सर्जरी करु शकणाऱ्या आपल्या देशाला वर्तमानात मात्र विदेशातून तोफा आणि विमानं आयात करावी लागत आहेत.

आणि फेसबुकवरचे सुशिक्षित भारताने युद्ध करावे असा निर्वाळा देत आहेत. कारण इतर शस्त्रसंपन्न आणि तंत्रसंपन्न देश करु शकतात तर आम्ही का नाही?

आपल्या देशाला जगाचं स्वेटशॉप (मोलकरणींचा देश) म्हणतात ते योग्य ठरवायच्या मागे आपण सगळे लागलो आहोत की काय?, अशी शंका येते मनात.

No comments:

Post a Comment