Saturday, February 16, 2019

ध्रुवतारा आणि काश्मीर

वर्गात शिकवताना मुलांना सांगतो की कंपनीकडे दोन ध्येय असली पाहिजेत.

पहिलं असतं लांबचं, अढळ, ध्रुव ताऱ्यासारखं. मग मी गमतीत म्हणतो की ध्रुव तारा फक्त दिशा दाखवतो. आपण कितीही चालत राहिलो तरी ध्रुव ताऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण म्हणून ध्रुव ताऱ्याला नजरेआड होऊ द्यायचा नाही.

दुसरं ध्येय तत्कालीन असतं. अढळ ध्येयाचा दिशेने जाताना त्या काळात ज्या अडचणी असतील त्यांना लक्षात घेऊन कधी मूळ दिशेच्या विरुद्ध जाऊन कधी आडवं तिडवं जाऊन पुन्हा मूळ दिशा पकडायची असते.

अतिरेक्यांचं अंतिम ध्येय काश्मीरवर स्वतःची सत्ता असू शकतं किंवा पाकिस्तानची सत्ता असू शकतं किंवा भारत सरकारला कायमची डोकेदुखी असू शकतं. त्यांची तात्कालिक ध्येयंही भारतीय लष्करावर हल्ले करून दहशत पसरवणे हीच दिसतात.

आपली अंतिम ध्येय काय आणि तात्कालिक ध्येय काय हे आपल्याला कळलं पाहिजे. जर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या पोकळ वल्गनांना बळी पडून आपण काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि तेथील लोक भारतीय नागरिक आहेत, त्यांच्या जीवनात शांती स्थैर्य असणे अंतिमतः आपल्या हिताचे आहे, हे विसरणार असू तर आपण विश्वगुरु. महासत्ता बनण्याच्या लायकीचे नाही. इतकंच काय आपण ज्या कंपन्यांत काम करतो त्यांच्या नफ्याला आणि प्रगतीला आपण अजिबात कारणीभूत नसून केवळ वरिष्ठ व्यवस्थापन चांगलं आहे आणि आपल्याला विचारत नाही म्हणून आपलं बरं चाललंय असं खुशाल समजावं.

इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्त्राएलला युध्द करणं परवडतं कारण शस्त्रास्त्रनिर्मितीचे कारखाने आणि तंत्रज्ञान त्यांचं आहे. आपलं काय आहे? आपल्या भूमीवर लढल्या जाणाऱ्या गनिमी काव्याच्या आणि आत्मघातकी पथकाच्या युद्धाला तोंड द्यायला आपण प्रथम पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वाचाळपणाला आवर घातला पाहिजे आणि आपल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षमतेला इतकं सशक्त बनवलं पाहिजे की पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेलाही भारतात सामील व्हावंसं वाटावं.

No comments:

Post a Comment