Thursday, November 14, 2019

गंगावतरण आणि बालदिन

रोज सकाळी टेकडीवर चालायला जातो. तिथे आता छान पायवाटा पडल्या आहेत. काही अतिशय तीव्र उताराच्या आहेत, काही समतल आहेत. काहीवर असंख्य छोटेमोठे दगड आहेत त्यामुळे जरा दुर्लक्ष झालं की घसरुन कपाळमोक्ष होणं ठरलेलं आहे तर काहींवर दगड खडे वगैरे काही नसून अगदी छान मातीचा रस्ता तयार झाला आहे.

इथे चालायला येणारे जुने लोक सांगतात की या पायवाटा गेल्या चारपाच वर्षात पडल्या आहेत. आधी नुसतं जंगल होतं. माझ्या मनात विचार आला की जंगल असल्याने किमान पायवाटा बनल्या तरी त्या टिकून आहेत. आधीच्या लोकांनी सतत चालून मळून ठेवलेल्या पायवाटा आता माझ्यासारख्या नवमॉर्निंगवॉकरला वापरता येतात आणि त्यातली कुठली सोपी, कुठली कठीण तेही ठरवता येतं. जर इथे वाळवंट असतं तर कदाचित आधीच्या वाटसरूंमुळे तयार होणाऱ्या पायवाटा, रोजच्या वाऱ्यांमुळे नाहीशा झाल्या असत्या. आणि आकाशातील ताऱ्यांच्या मदतीशिवाय मार्गक्रमण करणे अशक्य झाले असतं. त्यांच्यामुळेही फक्त दिशा कळली असती. पण पायाखालच्या वाळूत कुठे साप, कुठे विंचू आणि कुठे लपलेले खड्डे आहेत त्याची कल्पना आली नसती. त्यामुळे मी वाळवंटात रहात नसून वनराईजवळ रहातो याचं मला हायसं वाटलं. पूर्वसुरींचं संचितज्ञान, त्यांनी मळलेल्या पायवाटा वापरायला मिळणं हेदेखील एक भाग्यच की!

पण जर जंगल बदलत असेल तर? ठिकठिकाणी दरडी कोसळून पूर्वसुरींच्या मळलेल्या वाटा कालबाह्य होत असतील तर? वादळ आणि अतिवृष्टीमुळे जुन्या पायवाटांशेजारी असलेले वृक्ष उन्मळून पडले असतील तर? त्यांनी पूर्वसुरींच्या पायवाटा बंद करून टाकल्या असतील तर?





आपण आपल्या वनराईत चालत किंवा बैलगाडीने जात असलो पण इतरांनी त्यांच्या वनराईत सायकली, मोटारगाड्या नेणं सुरू केलं असेल तर? इथल्या पिढीने पूर्वजपरंपरेला चिकटून रहावं आणि पायवाट, बैलवाट सांभाळत बसावं का? इतरांना आपल्या वनराईत येण्यात रस नसेल तरीही आपण आपल्या पिढ्यांचा पुढचा प्रवास आपल्यापेक्षा सुखकर व्हावा म्हणून प्रयत्न करावा की करु नये? आणि जर आपण असा विचार करत नसू तर इतरांनी आपल्या वनराईत ढवळाढवळ केली तर आपल्याला चालेल का? जर इतरांनी केलेली ढवळाढवळ न आवडल्याने आपण त्यांना पिटाळून लावलं तर भविष्यासाठी आपण काय टिकवून ठेवायचं? आपल्या पूर्वजांच्या पायवाटा ज्या इतरांच्या आगमनाला रोखू शकल्या नाहीत? की इतरांकडून शिकलेल्या नव्या तंत्राला वापरून आपण नव्या पायवाटा तयार करायच्या?

जुन्या पायवाटा असताना आता त्या नवीन जगासाठी कामाच्या नाहीत म्हणून नवीन पायवाटा पाडणं सोपं नाही. पण असं काम दुसर्‍या महायुद्धानंतर अफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशातल्या नेत्यांवर आपोआप येऊन पडलं. त्या त्या देशातील नेत्यांनी आपापल्या लोकांच्या मूळ स्वभावाला साजेल असे निर्णय घेत ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. मग तो चीन असो की व्हिएतनाम की इस्त्राएल की कंबोडिया की दक्षिण अफ्रिका.

या सर्व देशात हे निर्णय घेणाऱ्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी सर्व निर्णय अचूक घेतले असं कुणीच म्हणणार नाही. त्यातल्या सगळ्यांनी आपापल्या समाजातील सर्व नागरिकांवर किंवा काही गटांवर अनन्वित अत्याचारही केलेत. त्यांच्या धोरणांमुळे त्या त्या देशातील काही पिढ्यांची आयुष्ये दहशतवाद किंवा बेरोजगारी किंवा सांस्कृतिक क्रांती किंवा अनन्वित क्रौर्य आणि हिंसा यांत भरडून निघाली. असं असूनही त्या त्या देशात ते पूजनीय आहेत. चीनमधील माओ असो किंवा कंबोडियातील नोरोदोम सिंहनुक किंवा इस्राएलमधील डेव्हिड बेन गुरियन. या सगळ्यांनी आपापल्या समाजातील पूर्वसुरींच्या वाटा नाहिशा करत आपापल्या समाजाला येणाऱ्या भविष्यासाठी तयार करण्याकडे लक्ष दिलं. आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचं हे मोठेपण मान्य करत त्यांनी आखून दिलेल्या नवीन पायवाटांचे हमरस्ते करण्याकडे लक्ष दिलं. त्यांच्याकडून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पण त्यांच्या चुकांसाठी त्यांच्यावर सातत्याने कोरडे ओढून त्यांची प्रतिमा मलीन करण्यात आपला व समाजाचा वेळ घालवला नाही. जो पायवाट पाडण्यास सुरुवात करतो त्यानेच हमरस्ता बनवून द्यावा असा आतताई आणि अशक्यप्राय आग्रह धरला नाही. हमरस्ते बनणं हे अनेक पिढ्यांचं संचित आहे, त्यात आपलीही जबाबदारी आहे, सगळी जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्याची नाही हे मान्य करून ते समाज पुढे चालत राहिले. गंगावतरणाची कथा कधी ऐकली नसूनही त्यांनी आपले हे पहिल्या पिढीचे नेते म्हणजे राजा सगर आहेत. गंगावतरणाआधीच ते स्वर्गवासी झाले म्हणून त्यांना दोष द्यायचं टाळून स्वतः अंशुमन किंवा दिलीप किंवा भगीरथ होण्याकडे अधिक लक्ष दिलं.

पण या सगळ्यात एकंच देश असा आहे जिथे मळलेल्या पायवाटा सोडून भविष्यसन्मुख नवीन पायवाटा पाडण्यात पुढाकार घेणारे नेते कमनशिबी ठरले. त्यांच्या अनुयायांनी त्यांना देवत्व देऊन थिजवलं तर विरोधकांनी त्यांना दानव ठरवण्यात कुठलीच कमतरता ठेवली नाही. गंगावतरणाची कथा माहिती असूनही गंगा आणू शकले नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवण्यात समाजातील अनेकांनी धन्यता मानली.

आपल्या समाजाचा आत्मा चीनची भिंत बांधणाऱ्या आत्यंतिक कष्ट सहन करणाऱ्या माणसांचा बनलेला नाही. कंबोडियाच्या आणि व्हिएतनामच्या आत्यंतिक अत्याचारी आणि हिंसक माणसांचा बनलेला नाही. तर तो एकाचवेळी सबै भूमी गोपालकी असा संदेश देणाऱ्या देवाची सुंदर लेणी, मंदीरे बांधणाऱ्या आणि त्याचवेळी मोठाल्या जनसमूहाला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या माणसांचा आहे. एकाचवेळी जिवाशिवाचं अद्वैत आणि प्राण्यांतही देव शोधणाऱ्या आणि त्याचवेळी परजातीतील माणसांना अस्पृश्य मानणाऱ्या माणसांचा आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या दशकानुसार समवयस्क असलेल्या चीन, कंबोडिया, इस्राएल, व्हिएतनाम इथल्या नेत्यांप्रमाणे आपल्या देशात वागून चालणार नाही. हे उमजून निर्णय घेणाऱ्या या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकाचा आज जन्मदिवस.

हमरस्ता बांधण्याची जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्यावर नसते, ही जाणीव या नेत्याने भविष्याचा मार्ग दाखवलेल्या समाजाला लवकर प्राप्त होवो आणि अंशुमन, दिलीप व भगीरथाची परंपरा या समाजात टिकून राहो, हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने या समाजाला शुभेच्छा

2 comments: