Thursday, February 23, 2017

फळाला झुलत्यात झाडं हो !

मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या शिकवणीचे तास वाढले आहेत. सकाळची शिकवणी आटोपली की रात्री पुन्हा एकदा शिकवणीचा वर्ग भरतो. काल मोठ्याच्या शिकवणीचा वर्ग सुटणार म्हणून रात्री ९ वाजता कार घेऊन गेलो होतो. एकट्याला जायचा कंटाळा आला होता म्हणून धाकट्याला बरोबर घेऊन गेलो. आणि धाकट्याची बडबड सुरु झाली. मग त्याला शांत करण्यासाठी फोनमधली ऑफलाईन घेऊन ठेवलेली यु ट्यूबवरची गाणी ऐकायला दिली. पहिल्याच गाण्यात त्याचा जीव अडकला. बसल्या बसल्या तो गाण्याच्या तालावर उड्या मारत होता आणि मी स्टिअरिंगवर ताल धरला होता. पठ्ठयाने पाच सहा वेळा ऐकलं आणि मग त्याचा दादा आल्यावर घरी जाईपर्यंत त्याला तीनदा ऐकायला लावले. मला तर ते गाणं आवडतंच पण इतके वेळा ऐकलं म्हणून डोक्यात विचारांची साखळी सुरु झाली. तीच इथे शब्दात उतरवतोय.मला हे गाणं आवडण्याचं कारण म्हणजे याचं संगीत, यातली ऊर्जा आणि यात उभा केलेला प्रश्न. “अंडं आधी का कोंबडं हो?” या सनातन प्रश्नानं अनेक तत्ववेत्त्यांना छळलं आहे. आणि कुणीही याचं समाधानकारक उत्तर देऊ शकलेला आहे असं मला वाटत नाही.

उत्क्रांतीवादी म्हणतात, पहिली कोंबडी बिनअंड्याची जन्माला आली. तिने अंडी द्यायला सुरवात केली आणि मग पुढच्या कोंबड्या अंड्यातून जन्मू लागल्या.

आता उत्क्रांतीवादाने हा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवला आहे ती पद्धत अमान्य करणे मला कठीण जाते. त्यामुळे अजून सुयोग्य पद्धत सापडेपर्यंत मी त्याच पद्धतीने अंडं आधी का कोंबडं? हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सारख्या विषयांत देखील मला उत्क्रांतीवादाची पद्धत लागू पडताना दिसते.
अर्थशास्त्रातील भांडवलवाद मला सांगतो, खाजगी मालकीच्या संपत्तीच्या अधिकारातून पहिले भांडवल निर्माण होते. या भांडवलातून उद्योग, उद्योगातून नफा, आणि मग नफ्यातून पुन्हा भांडवल तयार होते. अश्या रीतीने भांडवल - नफा - भांडवल अशी साखळी चालू राहते. या साखळीची पहिली कोंबडी, ‘खाजगी मालमत्तेचा हक्क’ आहे, जी साखळीतून जन्माला आलेली नव्हती.

तर साम्यवाद मला सांगतो, खाजगी मालकीच्या संपत्तीच्या अधिकारातून सर्वात प्रथम संपत्तीचे असमान वाटप होते. या असमानतेतून शोषणाचा जन्म होतो. शोषणातून भांडवलाची निर्मिती होते, त्या भांडवलातून उद्योग सुरु होतो, तो नफा कमावतो, या नफ्याचे असमान रीतीने वाटप होते व भांडवल - शोषण - भांडवल अशी साखळी चालू राहते. या साखळीची पहिली कोंबडी, ‘असमान वाटपाची खाजगी मालकी’ आहे, जी साखळीतून जन्माला आलेली नव्हती.

समाजशास्त्र सांगते,राजा किंवा प्रजेच्या इच्छेतून सार्वभौम सत्तेचा जन्म होतो. ही सार्वभौम सत्ता कायदे निर्माण करते त्यातून ती प्रजेला स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येतील असे वातावरण तयार करते आणि मग हे वातावरण टिकवण्यासाठी सार्वभौम सत्तेला स्वतःला टिकवावे लागते त्यासाठी अजून कायदे तयार होतात व सत्ता - कायदे अशी साखळी चालू राहते. या साखळीची पहिली कोंबडी, ‘समाज धारण करण्याची इच्छा’ आहे, जी या साखळीतून जन्माला आलेली नव्हती.

मी इतके दिवस उत्क्रांतीवाद या जीवशास्त्रीय संकल्पनेची, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रात मला लागलेली संगती पाहून खूष होत होतो. पण उत्क्रांतीवादातून, ‘जड आणि चेतन या दोन गोष्टीत प्रथम कोण आलं?’, किंवा, ‘कशातून कशाची निर्मिती झाली?’ या प्रश्नांची मला पटतील अशी उत्तरे मिळत नाहीत, हे जाणवून थोडा खटटूदेखील होत होतो.
त्यातच दोन दिवसांपूर्वी माझा मित्र उत्पलने, ‘आजचा सुधारक’ मधील काही लेखांची माहिती देताना चैतन्य किंवा आत्मा यासारख्या संकल्पनेशिवाय आपण विश्वाच्या पसाऱ्याचे गणित मांडू शकतो असे मत मांडले होते. त्याने सांगितलेले लेख वाचायचे बाकी असताना हे गाणं ऐकलं. आणि धाकट्या मुलाच्या हट्टामुळे पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो, तेव्हा त्यातल्या,

आदी जल्म बीजाचा झाला, तुका सांगोनिया गेला
सांगोनिया गेला sss तुका सांगोनिया गेला
हो
आदी बीज आलं कुठनं?
कुठनं आलं हो?
अन ते आलं फळामधनं
हॉ
ते आलं फळामधनं अअअअअअअ
अहाहाहा
त्या फळाला झुलत्यात झाडं हो, त्या फळाला झुलत्यात झाडं हो
त्याचं पुरानं हाई लई लांबडं हो
ह्या ओळींकडे लक्ष गेलं आणि अतिशय आनंद झाला.

यातलं, ‘फळाला झुलत्यात झाडं हो’ हे वाक्य फार मस्त आहे. नेहमी झाडाला फळे झुलतात. इथे मात्र अंडं आधी का कोंबडं? हा प्रश्न सोडवताना, गीतकार तुकोबांची साक्ष काढून सांगतो, की आधी बीज आलं. ते बीज कुठनं आलं? तर ते फळातून आलं. आणि त्या फळाला अनेक झाडं लागली. ही सगळी झाडं त्या फळाला झुलत आहेत. त्यांना नवी फळे येत आहेत. त्या नव्या फळांना नवी झाडे असा सगळा उलटा प्रकार आहे.

तुकोबांच्या वाङ्मयाचा मी अभ्यासक नाही. त्यामुळे खरोखरंच तुकोबारायांनी असा कुठला सिद्धांत मांडला आहे की नाही? हे मला खात्रीशीर माहिती नाही. पण हे भारूड ‘वारणेचा वाघ’ या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७० मध्ये आला होता. आणि १९३६ मध्ये आला होता प्रभातचा विख्यात चित्रपट ‘संत तुकाराम’. या चित्रपटातील तुकोबारायांच्या तोंडी ‘आधी बीज एकले’ हा अतिशय गाजलेला अभंग आहे. पूर्ण अभंग असा आहे.


या अभंगात, पहिल्यांदा फक्त बीज होते, मग त्यातून झाड, त्या झाडाला फळे असा कल्पनाविस्तार केलेला दिसतो. जर वारणेचा वाघ मधील भारूड, वर दिलेल्या अभंगाचा वापर करून आपला कल्पनाविस्तार पुढे (खरं म्हणायचं तर मागे) नेत असेल तर, पहिले बीज फळातून येते आणि या फळाला झुलणारी झाडे लागतात; हा उलगडा होतो. पण एकंच गडबड होते, की ‘आधी बीज एकले’ हा अभंग तुकोबारायांचा नसून त्याचे रचनाकार होते शांताराम आठवले. त्यामुळे भारुडात म्हटलेलं ‘तुका सांगोनिया गेला’ मला खटकलं. वाचकांपैकी कोणी जर तुकोबांच्या गाथेचे अभ्यासक असतील तर गाथेत विश्वोत्पत्तीबद्दल तुकोबांनी काही सांगितले आहे काय? आणि असल्यास, शांताराम आठवलेंचा अभंग त्याच्याशी जुळतोय का? यावर त्यांनी कृपया प्रकाश टाकावा.

त्याशिवाय गेल्या वर्षी, ‘सुनता है गुरु ग्यानी’ या निर्गुणी भजनाचं सविस्तर विवेचन करायचा मी प्रयत्न केला होता त्याची आठवण झाली. त्यात निर्गुणातून सगुणाची निर्मिती कशी होते, याबाबत मी ऐतरेयोपनिषदातील दाखला दिला होता. आणि तो दाखलापण हेच सांगतो की निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती होताना सगळं उलटं चालतं. हिरण्यगर्भच्या डोळ्यातून प्रकाशदायी सूर्य, नाकातून प्राणवायू वगैरे तयार होतो, आणि मग प्रकाश आहे म्हणून मातेच्या गर्भातील सगुणाला डोळे, प्राणवायू आहे म्हणून त्याला नाक अशी उत्पत्ती होते. म्हणजे झाडाला डुलणारी फळं हे सगुण विश्वाचं लक्षण तर फळाला डुलणारी झाडं हे निर्गुण विश्वाचं लक्षण की ज्यातून सगुणाची निर्मिती होते. अशी दुसरी संगती लागली.

आणि यात पुन्हा, ‘अंडं आधी की कोंबडी?’ या प्रश्नाची उत्क्रांतीवादाने केलेली उकल जाणवली. पहिली कोंबडी अंड्यातून नाही, त्याच धर्तीवर पहिलं झाड बीजातून नाही, तर ते फळांना डुलणारं झाड आहे. मग या झाडाला फळं, त्या फळांना बिया (बीज) त्यातून पुढली झाडं अशी साखळी चालू होते. पण या साखळीची सुरवात मात्र झाडाला लागलेल्या फळातून न होता, फळाला लागलेल्या झाडातून होते.

अशी उलट सुलट संगती लागल्यावर भारूडातील,

इथं शान्याचं झाल्यात येडं हो
त्याचं पुरानं हाई लई लांबडं हो

या ओळी खऱ्या वाटू लागल्या. आणि भगवान बुद्धाने या बाबतीत घेतलेली भूमिका जास्त जवळची वाटू लागली. भगवान बुद्धाचे सगळे विवेचन, विश्व कसे सुरु झाले याभोवती सुरु न होता, हे विश्व आहे इथून सुरु होते. तो भौतिक आणि सामाजिक प्रश्नांचा विचार करतो आणि अधिभौतिक किंवा काल्पनिक प्रश्नांचा विचार करण्यात वेळ न घालवता विश्वशांतीचा ध्यास घेतो, असं वाचलेलं आठवलं.
आता भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं वाचन लवकरात लवकर सुरु केलं पाहिजे.

Wednesday, February 1, 2017

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग ३)दाढीबरोबर आपण भूगोल, इतिहास, धर्म, व्यवसाय, कला आणि या सर्वातून तयार होणाऱ्या समाजिक परंपरा अश्या विविध क्षेत्रात फिरू शकतो. आणि प्रत्येक वेळी काही मनोरंजक माहिती समोर येते.

दाढीबरोबर भू-गोलावर फिरताना आपण विषुववृत्ताजवळील उष्ण कटिबंधापासून सुरवात करूया. इथे जर दमट हवामान असेल तर पुरुष दाढी राखण्यापेक्षा ती काढून टाकणेच पसंत करतात, पण या प्रदेशातील हवामान जर कोरडे असेल तर मात्र दाढी ठेवणे पसंत करतात. दमट हवामानात घाम आणि त्यानंतर होऊ शकणारे त्वचेचे त्रास सहन करण्यापेक्षा दाढी काढून टाकणेच सोपे जात असावे. याउलट वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने आणि कोरड्या हवामानात घाम येत नसल्याने दाढी राखणे हा पुरुषांच्या आळशीपणाला साजेसा उपाय ठरत असावा.

विषुववृत्ताला सोडून आपण ध्रुवीय प्रदेशांच्या जवळ सरकू लागलो की दाढी वाढू लागते आणि ध्रुवाजवळ पोहोचताना ती पुन्हा गायब होते. समशीतोष्ण कटिबंधात अंघोळ दैनिक नित्यकर्म असेलंच याची खात्री नसते आणि दाढी दैनिकऐवजी साप्ताहिक किंवा मासिक किंवा ऐच्छिक कार्यक्रमात ढकलली जाते. शीत कटिबंधाच्या सीमेवर दाढी न करणेच सोईचे असते. तिथे वाढलेली दाढी, कमी तापमानापासून चेहऱ्याला थोडे सुरक्षा कवच देत असावी. पण ध्रुवीय प्रदेशात मात्र दाढी मोठा त्रास ठरतो. दाढीत अडकलेले पाणी गोठून तो त्रास सहन करण्यापेक्षा दाढी करणे सोयीस्कर ठरते. म्हणजे विषुववृत्तीय असो किंवा ध्रुवीय प्रदेश, जेव्हा हवेत दमटपणा असतो तेव्हा दाढी छाटण्याकडे याउलट हवामान कोरडे असल्यास दाढी राखण्याकडे पुरुषांचा कल दिसून येतो.

भूगोलाला सोडून आता आपण इतिहासात शिरुया. इतिहासात डोकावून पाहताना कित्येकदा धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांची सरमिसळ होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मी एका वेळी एक किंवा दोन मानवसमूहांबद्दल लिहिण्याचे ठरवले आहे. ज्या मी स्वतः इतिहास संशोधक नाही. आणि माझे इतिहासाबद्दलचे वाचन मर्यादित असले तरी कुतूहल अमर्याद आहे. त्यामुळे या कुतूहलाचा साथीने मी जेंव्हा इतिहासाचा पडदा दूर करून मानवाच्या पूर्वजांच्या दाढीकडे बघतो तेव्हा माझ्या मर्यादित ज्ञानाला जे दिसते तितकेच लिहितो आहे.

लिखित इतिहास उपलब्ध असलेल्या ख्रिस्तपूर्वकालीन मानवी संस्कृती जगाच्या वेगवेगळ्या भागात आहेत. आपण सुरवात करूया टायग्रीस आणि युफ्रेटीस नद्यांच्या परिसरापासून. हा प्रदेश म्हणजे त्या काळचा मेसोपोटेमिया, किंवा आजचा तुर्कस्थान, इराक आणि इराण.


enki2.jpg
दाढीधारी एन्की
Image Courtesy : Internet
इथे नांदलेल्या सर्वात प्रसिद्ध संस्कृती म्हणजे सुमेरियन, अक्काडीन आणि बॅबिलोनियन. या तीनही संस्कृतीमधील राजांची आणि देवांची रंगवलेली किंवा कोरलेली भित्तिचित्रे त्यांना दाढी असलेली दाखवतात. पौरुषत्वाचा सुमेरियन देव म्हणजे एन्की. याच्या दोन खांद्यातून दोन नद्या वाहताना दाखवले जाते (याच त्या टायग्रीस आणि युफ्रेटीस नद्या) आणि याला भरघोस दाढी दाखवलेली असते. गिलगामेश या त्यांच्या प्रसिद्ध महाकाव्याचा नायक असलेला ‘गिलगामेश ‘ याच नावाचा नायक राजा देखील दाढीमिशाधारी आहे. पण त्या काळातील सामान्य नागरिक मात्र अनेकदा दाढीमिशाविरहित दाखवलेले दिसतात. म्हणजे अधिकारी पुरुष दाढीमिशावाले आणि सामान्य लोक सफाचट चॉकलेट हिरो असा काहीसा प्रकार मला जाणवतो. दुसऱ्या शब्दात या संस्कृतीत दाढीमिशा हे अधिकाराचे प्रतीक असावे.
Anu-Enlil-Enki-NinHurSag.jpg
वेगवेगळे मेसोपोटेमियन देव
Image Courtesy : Internet
Gilgamesh.jpg
शिंगे असलेला भालाधारी एन्कीडू आणि हातात सिंह असलेला गिलगामेश (एन्कीडूने  गिलगामेशला अंतरिक्षाची सफर घडवून आणली होती)
Image Courtesy : Internet

याच ठिकाणाची अजून एक प्रसिद्ध प्राचीन संस्कृती म्हणजे आजच्या इराणमधली आज लयाला गेलेली पर्शियन संस्कृती. पारशी लोकांचा देव अहूर माझदा आणि त्यांचा दानव आंग्रा मनियु दोघेही दाढीधारी. त्यांचा प्रेषित झरत्रुष्ट किंवा झोरोआस्टर हा देखील दाढीमिशाधारी. त्यांचे राजे सायरस, दरायस, झेरेक्सेस, काम्बियास, दुसरा दरायस, यझदेगार्द; सगळे दाढीमिशाधारी दाखवले आहेत. आणि सामान्य पर्शियन लोकांचे चित्रणदेखील दाढीमिशांसहित केलेले दिसते. म्हणजे कदाचित पर्शियामध्ये दाढीमिशांनी, अधिकाराचे प्रतीक ही आपली जागा सोडून पौरुषत्वाचे प्रतीक ही जागा घेतली असावी.

Naqsh_i_Rustam._Investiture_d'Ardashir_1.jpg
डोक्यावर मुगुट असलेला उजवीकडचा पुरुष म्हणजे अहूर माझदा डावीकडे ससानियन साम्राज्याचा संस्थापक आर्देशीर.
Image Couresy : Internet
प्रेषित झोरोआस्टरची अर्वाचीन चित्रकारांनी काढलेली चित्रे आणि शिल्पकारांनी घडवलेल्या अनेक मूर्ती मिळतात. पण त्यांचे समकालीन लोकांनी काढलेले चित्र किंवा शिल्प मला कुठे मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अनेक चित्रांचा वापर करून क्लाउड बायोग्राफीने बनवलेला एक छोटा व्हिडीओ देतो. देव अहूर माझदा दाढीधारी, नंतरचे पर्शियन राजे दाढीधारी त्यावरून देव आणि राजे यांच्यामधले प्रेषित झोरोआस्टर दाढीधारी होते असे मानायला मी तयार आहे.


हे पर्शियन राजे पुढे बायबलमध्ये देखील भेटायला येतात. म्हणून आपण त्यांना तिथेच सोडून बायबलपूर्व काळातील इतर ठिकाणच्या संस्कृतीमधील दाढीमिश्याचे स्थान बघायला मध्यपूर्व आशियाला सोडून उत्तर आफ्रिकेतील दुसऱ्या एका प्राचीन संस्कृतीकडे पुढल्या भागात जाऊया.

Monday, January 30, 2017

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग २)Image Courtesy : Internet 
खरी दाढी आणता येत नाही ती आपोआप यावी लागते. आणि ती सगळ्या पुरुषांना सारखीच येते असंही नाही. दाढी विरळ किंवा भरघोस असणे हा शारीरिक उंचीप्रमाणे निसर्गनियंत्रित भाग आहे. आणि तो विविध घटकांवर अवलंबून असतो. जन्मदात्यांकडून आलेलया जनुकांचे गुणधर्म, चेहऱ्यावरील केसांच्या रोमछिद्रांची संख्या किंवा केसांच्या ग्रंथी, शरीरातील टेस्टेस्टेरॉनची पातळी, पोषक आहार, पुरेसा व्यायाम आणि पुरेशी झोप या सर्वावर दाढीमिश्यांचे प्रमाण अवलंबून असते. या सर्व गोष्टी पुरेश्या प्रमाणात आहेत याचा एक दृश्य संकेत म्हणजे दाढी मिश्या असा होतो.

याचा उलटा अर्थ असा केला जातो की विरळ दाढीमिश्या असलेल्या व्यक्तीमध्ये टेस्टेस्टेरॉन कमी असावे. परंतू हे पूर्णसत्य नाही. दाढीमिश्यांसाठी विपरीत जनुकीय गुण किंवा विरळ केशिका ग्रंथी यामुळे देखील टेस्टेस्टेरॉनची समाधानकारक पातळी असलेला पुरुष देखील विरळ दाढीधारी होऊ शकतो. थोडक्यात, 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' किंवा 'का रे भुललासी वरलिया रंगा' हे इतर अनेक गोष्टींप्रमाणे दाढीमिश्यांना देखील लागू होतं.

उत्क्रांतीच्या अंगाने जीवशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारे काही शास्त्रज्ञ असं पण मानतात की स्त्रियांना, प्रजननयोग्य काळात दाढीवाले पुरुष जास्त आकर्षक वाटतात. वंशसातत्य हे निसर्गातील प्रत्येक जीवाचे निसर्गदत्त कर्तव्य आहे. आपली जनुकीय रचनाच तशी आहे. अशक्त जोडीदार म्हणजे अशक्त संतती आणि वंशसातत्य खंडित होण्याची शक्यता जास्त, म्हणून मग सशक्त जोडीदार ओळखणे ही मोठी गरज असते. स्त्री व पुरुषांचे वेगवेगळे शारीरिक अवयव या शोधात दृश्य खुण म्हणून कामाला येतात. पुरुषांची दाढी हा सशक्तपणाचा मोठी नैसर्गिक खूण आहे. त्यामुळे दाढीधारी पुरुष, स्त्रियांमध्ये थोडे जास्त लोकप्रिय असतात अशी सगळी या विचारामागील धारणा आहे. 

Image Courtesy : Internet 
फुलांचे रंग आणि गंध जसे फुलपाखरांवर, नर पक्ष्यांचा पिसारा किंवा तुरा किंवा नृत्यकौशल्य जसे पक्षिणींवर, नर हरणांची शिंगे किंवा त्यांचा गंध जसा हरिणींवर, बेडकाची गालफडे जसा बेडक्यांवर, नर चिम्पाझीचा आकार आणि आक्रमकता जशी मादी चिम्पाझींवर; प्रभाव पाडतात त्याप्रमाणे दाढीमिश्या स्त्रियांवर प्रभाव पाडत असाव्यात, असा निष्कर्ष काढायला अनेक दाढीधारी पुरुषांना आवडू शकते. तो कितपत परिपूर्ण आहे याबद्दल संशोधकांत मतभेद आहेत.

उत्क्रांतीच्या अंगाने जीवशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असे पण सांगतात की पूर्ण उमललेले टपोरे (Bee Stung lips) किंवा लालचुटूक ओठ, स्त्रीच्या प्रजननक्षमतेची आणि ती मिलनोत्सुक असण्याची दृश्य खूण असते. बहुसंख्य स्त्रियांना नटण्यामुरडण्याची निसर्गदत्त आवड असते असा समज आणि स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याच्या सरंजामशाही, राजेशाही आणि आता भांडवलशाहीच्या युगात, स्त्रियांची प्रसाधनाची साधने वाढतच गेली. आणि ओष्ठशलाका (lipstick) आता अगदी लहान मुलींच्यादेखील रोजच्या वापराची गोष्ट बनण्याच्या मार्गावर आहेत. आणि पुरुषांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात लिपस्टिक बऱ्यापैकी प्रभावी ठरताना दिसते.

स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांचे कथित मानसशास्त्र जे सांगते त्याला मान्य करून विविध संस्कृतींनी आणि बाजाराने प्रचंड प्रमाणात नवनवीन उत्पादने सातत्याने तयार केलेली दिसतात. आणि फार प्राचीन काळापासून स्त्रियांनी सजण्याचे, नटण्याचे प्रमाण वाढतंच गेलेले दिसते. याउलट, पुरुषांच्या बाबतीत मात्र बाजार आणि सर्वच संस्कृती थोड्या अरसिक होत गेलेल्या दिसतात. सुरवातीच्या काळात सर्रास प्रचलित असलेले अंगावर गोंदणे, कर्णभूषणे, बाहूबंद किंवा मुकुट वापरणे आता सर्वत्र बाद झालेले आहे. सर्वसाधारणपणे पुरुषांत, एखाद दुसरी अंगठी आणि सोन्याची चेन वापरण्याकडे कल असतो. (याला, फ्लेक्सवर चमकणारे काही सन्माननीय अपवाद आहेत, याची मला जाणीव आहे) आजकाल काही तरुण कानातील डूल आणि केसांची पोनीटेल वापरताना दिसतात. पण त्याचा उपयोग स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी होतो याबद्दल संशोधनांती काही बोलता येईल. त्याशिवाय काजळ, गंध, अत्तराचा फाया, हाताला गजरे, अश्या प्रकारे शरीराला सजविणे हे एकतर धार्मिक किंवा अतिरसिक मनोवृत्तीचे लक्षण मानले जाते. 
Image Courtesy : Internet 
म्हणजे रोजच्या जीवनात जितक्या सहजतेने स्त्रिया लिपस्टिक किंवा नेलपॉलिश वापरतात आणि सहेतुक किंवा अहेतुकपणे पुरुषांचे लक्ष्य वेधून घेण्यात यशस्वी ठरतात तितक्या सहजतेने पुरुषाने काही करावे म्हणून बाजार आणि सध्याची संस्कृती त्याला फार प्रोत्साहन देताना दिसत नाही. सध्याची पुरुषांची सगळ्यात लोकप्रिय प्रसाधने म्हणजे शरीरगंध लपवणारे परफ्युम्स, केस काळे ठेवणारी द्रव्ये आणि दाढी गुळगुळीत ठेवण्यासाठीची क्रीम्स व उपकरणे हीच आहेत. म्हणजे सध्या तरी बाजाराने पुरुषांच्या बाबतीतले स्त्रियांचे कथित मानसशास्त्र नाकारलेले दिसते आहे. आणि कल्पक मानवाने दाढी मिश्या वाढवण्याची साधने किंवा औषधे शोधत राहण्यापेक्षा ती कापण्याची साधने शोधण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेले दिसते.

कदाचित ज्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे स्त्री ही उपभोग्य वस्तू मानली गेली आहे त्याप्रमाणे पुरुषाला देखील उपभोग्य वस्तू म्हणून दर्शविणे सद्यकालीन समाजाला कठीण वाटत असावे. त्याशिवाय, स्त्री म्हणजे फूल तर पुरुष म्हणजे फुलपाखरू किंवा भ्रमर या कल्पनेने जोरदार मूळ धरले असल्याने भ्रमराने सजणे तितके महत्वाचे वाटत नसावे. पुरुष स्वभावतः अनेक साथीदार शोधतो आणि स्त्री स्वभावतः कमीत कमी साथीदार शोधते हा समजही या फूल भ्रमर कल्पनेला पोषक ठरतो. त्यामुळे फुलाला भ्रमराबद्दल काही मानसशास्त्र असावे याबद्दल मानवी समाज अजून तितका गंभीर नाही.

म्हणजे दाढीमिश्यांमुळे पुरुष, स्त्रियांना अधिक आकर्षक वाटतात की नाही?, याबद्दल मानवी समाज उदासीन असला तरी इतिहासकाळापासून पुरुषांची दाढी वेगवेगळ्या स्थळकाळात वाढत किंवा घटत गेलेली दिसते.

असे असेल तर मग पुरुष दाढीमिशा का ठेवतात किंवा का काढतात? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मी जेव्हा याबद्दल इतिहासात आणि भूगोलात डोकावतो तेव्हा यामागे अनेक भौगोलीक, सामाजिक आणि राजकीय कारणे काम करत असवीत असे मला वाटू लागते. त्याबद्दल पुढील भागात लिहीन.

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)

उमलत्या वयातील मुलांसाठी दाढीमिश्या जिव्हाळ्याचा विषय असतो. लहानपणी दुधाच्या मिश्या, मग थोडे मोठे झाल्यावर शाळेत गॅदरिंग मध्ये चिकटवलेल्या खोट्या दाढी मिश्या मुलाला उगीच मोठेपणाचा आभास देतात. मग पुस्तकातील प्रसिद्ध व्यक्तींना दाढी मिश्या काढणे सुरु होते. पुरुषांच्या चित्रावर चढवलेल्या या दाढीमिश्या मग झाशीची राणी किंवा सरोजिनी नायडू यांना पण लावल्या जाऊ शकतात. सगळे बालवीर इतिहासाच्या शिक्षकांवरचा राग असा पुस्तकांतील वीरांच्या चित्रांवर काढतात आणि आपल्या चित्रकलेच्या शिक्षकांचा पगार सार्थकी लावतात.

Image Courtesy ; Internet
मग बाबांचे दाढीचे सामान वापरून त्यातला फोम किंवा ब्रश लावायला गम्मत वाटू लागते. मग चाफेकळी अर्धी वाकवून तिला रेझरप्रमाणे वापरत तो फोम काढायला सुरवात होते. कॉलेजात गेल्यावर मिश्या असणे हे मर्दानगीचे लक्षण मानले जाते. बोलताना ज्याचा हलणारा कंठ दिसतो किंवा ज्याला राठ दाढी आली आहे तो तर कुमार किंवा युवकाऐवजी पुरुष मानला जातो. चॉकलेट हिरो किंवा चॉकलेट बॉय ही शिवी वाटू लागते. थोडे अजून मोठे झाल्यावर नोकरी लागेपर्यंत दाढी न करणे, केस अस्ताव्यस्त ठेवणे, हे बंधनमुक्त व्यक्तीमत्वाचे महत्वाचे दृश्य लक्षण वाटू लागते. जगाचे नियम झुगारायला दाढी वाढवणे हा सोपा प्रतीकात्मक उपाय असतो. त्याशिवाय तो बुद्धिमान, विचारवंत, कलाकार किंवा एकंदरीतच कलंदर लोकांचा ट्रेडमार्क आहे असे वाटू लागते. विचार करताना दाढी खाजवणे, मधे मधे मिशीवर हात फिरवणे या लकबी पण सुरु होतात.

पण मग नोकरीसाठी मुलाखतीला जायला सुरवात झाली की पहिले उतरते ते दाढीचे जंगल. कॉर्पोरेट जगतात रोज दाढी करणे सक्तीचे असते. एखादा टणक असेल तर वीकेण्डला दाढीचे खुंट बाळगतो किंवा अजून दर्दी असेल तर मग फ्रेंच कट किंवा इतर प्रकारे दाढी कोरून स्वतःची वेगळी ओळख तयार करतो. नेहमी दाढी करणाऱ्याने एखाद्या दिवशी दाढी केली नाही की तो कळकट वाटतो. याउलट नेहमी दाढी ठेवणाऱ्याने ती काढून टाकली की त्याला ओळखणे अवघड जाते. नवीनच माणसाशी बोलतोय असे वाटत रहाते. डोळ्यांवर सगळ्यात मोठा आघात होतो, तो मिशी काढून टाकल्यावर. किती का बारीक किंवा विरळ असेना पण असलेली मिशी जर कुणी निग्रहाने काढून टाकली की नाकाखालची जागा फार मोकळी वाटू लागते. उग्र माणूसही मवाळ वाटू लागतो. स्त्री पार्ट निभावणाऱ्या पुरुषाचा मेकअप अर्धा उतरवून झाला असताना त्याच्याकडे बघितल्यावर जसे वाटावे तसे काहीसे, या जुनी मिशी भादरलेल्या व्यक्तींकडे बघताना वाटू लागते.

दाढी मिशी हे पुरुषार्थाचे लक्षण कसे झाले असावे? भारतीय आणि पाश्चिमात्य पुरुषांचे व स्त्रियांचे मत कसे बनत गेले असावे? याबद्दल विचार करत राहिलो की काही गमतीशीर दुवे मिळू लागतात.

Wednesday, January 25, 2017

गॉर्डन के आणि Allo Allo

काल संध्याकाळी सहज रावांचा मेसेज आला. “गॉर्डन के यांचं देहावसान झालं.” मला संदर्भ लागेना. मग पुढचा मेसेज आला, “Allo Allo मधले कलाकार”. मग लक्षात आलं की सहज रावांच्या मनात, “बऱ्यापैकी माहिती बाळगून असणारा माणूस” अशी प्रतिमा बनवण्यात मी यशस्वी झालो आहे. पण एका प्रतिमेच्या साच्यात मी अडकण्याचा धोका ओळखून, स्वर्गवासी गॉर्डन साहेबांनी जाता जाता माझ्या माहितीच्या छोट्या परिघाची मला जाणीव करून दिली. त्यात रात्री सोसायटीच्या मीटिंगमुळे उशीर झाला आणि माहितीचा परीघ आपल्या मर्यादेतच राहिला. पण सकाळी थोडा वेळ मिळाल्यावर ‘आलो आलो’ शोधलं. यु ट्यूबवर व्हिडीओ मिळाला. तो पाहताना सारखा हसत राहिलो आणि मनातल्या मनात सहज रावांचे आभार मानले. बोलणाऱ्याला / लिहिणाऱ्याला त्याच्या विषयाची माहिती असायलाच हवी, हा नियम मी कसोशीने पाळतो. पण आज ‘Allo Allo’चा व्हिडिओ बघितल्यावर या नियमातून स्वतःला सूट द्यायचं ठरवलं. त्यामुळे केवळ एकंच व्हिडिओ बघून हा लेख लिहिला आहे.
७५ वर्षाचे गॉर्डन के, ब्रिटनच्या हडर्सफील्डमध्ये १९४१ मध्ये जन्मले. इंग्लडमध्ये (आणि युरोपातील काही इतर देशातसुद्धा) हॉस्पिटल रेडिओ म्हणून एक व्यवस्था आहे. यात हॉस्पिटलमधल्या पेशंटसाठी विशेष रेडिओ स्टेशन्स स्वयंसेवकांच्या सहाय्याने चालवली जातात. यावर संगीताचे विविध कार्यक्रम चालतात. एकट्या इंग्लंडमध्ये २३० च्या आसपास अशी हॉस्पिटल रेडिओ स्टेशन्स आहेत. गॉर्डन साहेब हडर्सफील्डमधल्या एका हॉस्पिटल रेडिओ स्टेशनमध्ये स्वयंसेवक होते. त्यांनी टेक्सटाईल मिल्स, वाईन फॅक्टरी आणि ट्रॅक्टर फॅक्टरीमध्ये कामे केली. यातच सर अॅलन ऐकबॉर्न यांनी दिग्दर्शित केलेल्या रेडिओवरील नाटकात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. आणि मग त्यांच्याच सल्ल्याने गॉर्डन, बोल्टन ऑक्टागॉन थियेटर मध्ये ऑडिशनला गेले. तिथून त्यांची रंगमंच कारकीर्द सुरु झाली. मग १९६८ मध्ये बीबीसी मध्ये ते कलाकार म्हणून काम करू लागले. सुरवातीला फुटकळ रोल्स करत असताना तेथील अतिशय यशस्वी लेखक आणि निर्माते डेव्हिड क्रॉफ्ट यांच्या Are You Being Served? या विनोदी मालिकेत त्यांनी काही स्मरणीय भूमिका केल्या. आणि डेव्हिड क्रॉफ्टवर त्यांची चांगलीच छाप पडली.
Are You Being Served? मालिका संपत आली होती. डेव्हिड क्रॉफ्ट नवीन विषयाच्या शोधात होते. त्यांच्या मित्राने युद्धकाळ दाखवणाऱ्या मालिकांचे विशेषतः Secret Army या मालिकेचे विडंबन करूया असे सुचवले.
Secret Army ही मालिका १९७७७ -१९७९ मध्ये बीबीसीवर दाखवली जात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणाऱ्या या मालिकेत जर्मनीचा प्रतिकार करणारे एक बेल्जीयन युनिट, हॉटेल मालक असलेला तिचा एक सदस्य, त्याची आजारी बायको, रखेल, वेट्रेस, त्याच्या हॉटेलात येणारे जर्मन अधिकारी, आणि त्यांच्या संभाषणातून ब्रिटिश सैन्याला मिळणारे संदेश; असा असा सगळा जामानिमा होता.
क्रॉफ्टना ही कल्पना आवडली. आणि त्यातून जन्म झाला “Allo Allo’’ चा. आणि सुरू झाला गॉर्डन केंच्या आयुष्यातील सुवर्णाध्याय. क्रॉफ्टनी मालिकेची संहिता लिहिली आणि गॉर्डनकडे पाठवताना सांगितले की गॉर्डनने यातील रेने आर्टोईसची भूमिका करावी. गॉर्डनने भूमिका स्वीकारली आणि पुढे १९८२ ते १९९२ अशी दहा वर्षे ते रेनेची भूमिका करत होते. मालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ भागात आणि मालिकेच्या १२०० पेक्षा अधिक रंगमंचीय सादरीकरणात ते रेने बनून प्रेक्षकांना हसवत राहिले. रेने त्यांच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झाला होता की १९८९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नावही Rene & Me: A Sort of Autobiography ठेवले होते. हॉटेलमधले शेफ घालतात तसा ऍप्रन घातलेला रेने ही त्यांची कायमची प्रतिमा बनली. मालिका संपल्यावर एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘खरं सांगायचं म्हणजे, मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेसाठी बनलोच नव्हतो.’
काय होतं Allo Allo मध्ये? रेने आर्टोईस हा जर्मनीने जिंकून घेतलेल्या फ्रान्समधल्या Nouvion गावातला एक मध्यमवयीन हॉटेल मालक. त्याच्या बरोबर असते एक साधारण दिसणारी, बेसूर गाणारी, वेंधळी बायको आणि अंथरुणाला खिळलेली कटकटी बहिरी सासू. ती इतकी कटकटी असते की रेने म्हणतो, ‘देव तिला लवकर उचलत नाही कारण त्याला पण स्वतःची शांती गमवायची नाही’. त्याच्या हॉटेलात दोन सुंदर वेट्रेसेस काम करत असतात. त्या दोघींबरोबर रेनेच्या भानगडी चालू असतात. आणि जेव्हा कधी रेनेची बायको त्याला रंगेहाथ पकडते तेव्हा तो तिला काहीतरी कारण सांगून तिचा संशय दूर करण्यात कायम यशस्वी होतो. त्याच्या हॉटेलात अनेक जर्मन अधिकारी येतात. त्यांच्याशी गोड बोलून कधी स्वतःचे शब्द तर कधी वेट्रेसेसचे सौंदर्य वापरून त्यांची मर्जी राखत असतो. त्याच्या बदल्यात रेशनचे नियम धुडकावून जास्तीचे रेशन मिळवत रहातो.
मग त्याच्याकडे येते एक ब्रिटिश अधिकारी. ती सांगते, की जर्मन अधिकाऱ्यांचा त्याच्यावर चांगला विश्वास आहे यामुळे त्याच्या हॉटेलात कोणी धाड मारणार नाही. म्हणून त्याच्या हॉटेलात दोन ब्रिटिश सैन्याधिकाऱ्यांना लपवायचे आहे. रेने घाबरतो. पण तयार होतो. ब्रिटिश मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी सासूच्या खोलीत रेडिओ ट्रान्समिशन यंत्र बसवतो. रेनेचे उच्चार फ्रेंच हेल असलेले असल्याने, तो हॅलो हॅलो बोलण्याच्या ऐवजी ‘आलो आलो’ बोलतो. म्हणून मालिकेचे नाव ‘आलो आलो’.
तोपर्यंत जर्मनीहून गेस्टापो अधिकारी येतो. हिटलरने त्याला The Falling Madonna चे प्रसिद्ध चित्र शोधून आणायची जबाबदारी दिलेली असते. ते चित्र रेनेकडे नेहमी येणाऱ्या जर्मन अधिकाऱ्याने स्वतःसाठी ठेवलेले असते. त्याला गेस्टापोची भीती वाटते. म्हणून तो ते चित्र लपवायला रेनेच्या हॉटेलात येतो. आता रेने कैचीत सापडतो. एकाचवेळी तो बायको आणि वेट्रेस, सासू आणि बायको, लपवलेले ब्रिटिश अधिकारी आणि लपवलेल्या मौल्यवान कलाकृती, अश्या गोंधळात सापडतो. त्याबरोबर हा गोंधळ वाढवायला मधून मधून गेस्टापो आणि ब्रिटिश गुप्तहेर तिथे येत रहातात.
या मालिकेतली अजून एक धमाल म्हणजे, यात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि इटली या चार देशातले लोक येतात. पण चार भाषा वापरल्या तर मग मालिका समजायला कठीण जाईल म्हणून सगळे संवाद इंग्रजीतून बोलले जातात. फक्त वेगवेगळ्या देशाचे लोक आपापली विशिष्ट हेल काढून बोलतात. त्यामुळेच रेने ‘आलो आलो’ बोलतो. गंमत अशी की फ्रेंच पात्रांनी फ्रेंच हेल असलेल्या इंग्रजीतून बोललेले संवाद आपल्याला कळतात आणि मालिकेतल्या फ्रेंच पात्रांना कळतात पण त्यावेळी समोर असलेल्या इतर देशातील पात्रांना काळात नाहीत. तीच गत जर्मन हेल असलेल्या इंग्रजीची. ते प्रेक्षकांना कळते आणि जर्मन पात्रांना कळते पण इतर पात्रांना काळात नाही. त्यामुळे अजून धमाल येत रहाते.
यु ट्यूबवर मला याचे बरेचसे भाग मिळाले आहेत. त्यामुळे किमान ८५ रात्री तरी रेनेच्या संगतीत हसत हसत जातील.
हे असे दुसऱ्यांदा झाले आहे. याआधी जॉर्ज कार्लिनशी ओळख झाली ती २००८ मध्ये त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर. आणि आता गॉर्डन केशी ओळख झाली सहज रावांमुळे, गॉर्डन साहेबांच्या स्वर्गवासाच्या दिवशीच.
आता बहुतेक गॉर्डन साहेब, परम कृपाळू दयाघन परमेश्वराला प्रेक्षकाच्या भूमिकेत बसवून रेनेच्या गमती करत हसवत असतील. आणि कदाचित हसून तृप्त झालेल्या ईश्वराच्या आनंदामुळे जगात सर्वत्र आनंदी आनंद नांदू लागेल.