Thursday, March 8, 2018

गाणी आणि वर्तमान (भाग १)

--------
-------
ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागला. समाजमाध्यमांवर विविध पक्षांच्या समर्थकांच्या मतांच्या फैरी झडू लागल्या. आवडत्या पक्षाप्रमाणे किंवा पटलेल्या विचारधारेप्रमाणे कुणाला हा निकाल फॅसिस्ट हुकूमशाहीच्या आगमनाची नांदी वाटला तर कुणाला राष्ट्रवादाच्या आगमनाची नांदी वाटला. कुणाला ही लोकशाहीची मृत्युघंटा वाटली तर कुणाला छद्म धर्मनिरपेक्षतेची मृत्युघंटा वाटली. माझ्या मित्रांत विविध पक्षांचे समर्थक आणि विविध विचारधारांशी बांधिलकी असणारे सर्वजण असल्याने प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि मग या विचारांना अनुसरून कुठलं गाणं त्या मित्रांच्या मनोवस्थेसाठी योग्य ठरेल त्याच्या जोड्या माझ्या मनात लागू लागल्या.

भाजप समर्थक मित्रांच्या पोस्टमधील ऊर्जा आणि विजयोन्माद पाहिला. या निवडणुकीत श्री सुनील देवधरांनी काय काम केलं याबद्दल कौतुकमिश्रित वर्णनं वाचली. संघ कार्यकर्ते कशाप्रकारे ईशान्येकडील राज्यांत निरलसपणे कार्य करत आहेत याबद्दलची आदरयुक्त वर्णनं वाचली. आणि मला 'वंदे मातरम' हे गीत आठवलं. रोज शाळा सुटताना म्हणतात त्या संथ लयीतील नाही तर बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात हेमंतकुमारांनी गायलेलं द्रुतलयीतलं वीरश्रीपूर्ण वंदे मातरम. बंकिमचंद्र बंगालमधील होते. आणि ईशान्य भारताच्या सध्याच्या निवडणूक क्षेत्राच्या आसपास त्यांची कादंबरी घडते. म्हणून वाटलं की हे गाणं चपखल बसतंय.



पण थोडा विचार केला आणि जाणवलं की ते वीरश्रीपूर्ण गीत या मित्रांसाठी लागू पडत नाही. कारण वंदे मातरम मध्ये मातेला वंदन आहे. भारत माता आहे. तिच्या भूमीचे वर्णन आहे. तिच्या रिपुदमन करण्याच्या शक्तीचे वर्णन आहे. तिच्या दुर्गारूपाचा गौरव आहे. तिच्यासाठी काय करू त्याचे वर्णन नसून ती कशी आहे त्याचे वर्णन आहे. त्यामुळे ते वीरश्रीपूर्ण असले तरी मातेचे गौरवगीत आहे. आपल्याला काय करायचे आहे त्याचे योजनागीत नाही.

मग दुसरंच गीत आठवलं. हिंदीतील प्रसिद्ध छायावादी कवी किंबहुना ज्यांना छायावादाचाया चार खांबांपैकी एक खांब मानलं जातं, ज्यांनी 'कामायनी' या महाकाव्याची रचना केली त्या जशंकर प्रसाद यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांनी स्कंदगुप्त. चंद्रगुप्त अशी ऐतिहासिक नायकांबद्दलची नाटके लिहिली. कदाचित त्यांच्या 'चंद्रगुप्त' या नाटकातील रचना असू शकेल. जुन्या चाणक्य सिरीयल मधे ही रचना चंद्रगुप्त म्हणतो आणि मग त्याचे मित्र साथ देतात असं चित्रिकरण केलं आहे.

या रचनेत राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. भौगोलिक संदर्भ असलेला देश हा शब्द नाही, तर सांस्कृतिक संदर्भ असलेला राष्ट्र हा शब्द वापरलेला आहे. स्त्रीलिंगी जन्मभूमी किंवा मातृभूमी नाही. तर पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरलेला आहे. सुरवातीला पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरणाऱ्या या गीताच्या शेवटी मात्र स्त्रीलिंगी माँ शब्द येतो. पण ही माँ वंदे मातरम सारखी सुजलाम सुफलाम नाही, बहुबल धारिणीं रिपुदलवारिणीं नाही.

या गाण्यात ती सर्वशक्तिमान दुर्गा नसून तिच्या पुत्रांनी तिला शत्रूंच्या रुधिराने अभिषेक केलेला होता आणि शत्रूंच्या मुंडक्याची माळ घालून तिचा शृंगार केलेला होता. पुत्रांनी दिलेल्या सांस्कृतिक सिंहासनावर बसून ती जगावर राज्य करत होती. कालचक्राच्या गतीने हे सिंहासन मोडकळीस आलेले आहे आणि तिच्या पुत्रांवर जबाबदारी आहे की आपले तन मन धन अर्पून तिला तिचा नष्ट झालेला गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणजे ती वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून; तन मन धन अर्पण करण्यास तयार असलेल्या सर्वशक्तिमान पुत्रांची ती माँ आहे.

जुन्या चाणक्य सिरियलमध्ये या गीताचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील माझ्या मित्रांना हे गाणे आपलेसे वाटणे स्वाभाविक आहे. आणि संघविरोधकांना संघाची वैशिष्ट्ये धारण करणारे वाटणेही स्वाभाविक आहे. संघाचे विरोधक संघाला जी दूषणे देतात ती सर्व या गीतात ठळकपणे दिसून येतात. शेंडीवाल्यांचा गट. जानवेधाऱ्यांचा गट. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्यांचा गट. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्यांचा गट. भूमी पेक्षा अमूर्त राष्ट्रसंकल्पनेला महत्व देणाऱ्यांचा गट, वगैरे गोष्टी या चित्रीकरणात दिसून येतात.

गाणे सुरु होते तेव्हा रात्रीची वेळ आहे. आश्रमात मशालींचा उजेड आहे. सर्व विद्यार्थी आणि गुरुजन आपापल्या कक्षात विश्राम करत आहेत. एकटा चंद्रगुप्त सचिंत मुद्रेत एका खांबाला टेकून शून्यात नजर लावून बसलेला आहे. आणि तो सहज संथ सुरात स्वगत असल्याप्रमाणे म्हणतो

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन....

आणि आश्रमाला जाग येते. एकामागून एक विद्यार्थी आपापल्या कक्षातून बाहेर येऊ लागतात. आतापर्यंत शांत आणि संथ असलेलं स्वगत आता वीररसपूर्ण गीतात बदलतं. सस्मित आचार्यही आपल्या कक्षातून बाहेर येतात. विद्यार्थी कवायत करत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या भावना एकसुरात मांडतात. हे गाणं बघताना भावनाप्रधान प्रेक्षकांना आपोआप स्फुरण चढतं. आपण काहीतरी करावं ही ऊर्मी दाटून येते.

हम करें राष्ट्र आराधन
तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करें राष्ट्र आराधन ।।धृ।।

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन ।। १।।

अपने हंसते शैशव से
अपने खिलते यौवन से
प्रौढता पूर्ण जीवन से
हम करें राष्ट्र का अर्चन ।।२।।

अपने अतीत को पढकर
अपना ईतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करें राष्ट्र का चिंतन ।।३।।

है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें
जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें
हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से
हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन
मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन
अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन ।।४।।



कम्युनिस्ट पार्टीला त्रिपुरात धूळ चारण्यात आलेल्या यशामुळे अनेक तरुण भाजप समर्थक ज्या प्रकारे व्यक्त होत होते ते पाहून मला वाटले की त्यांच्या डोक्यात वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून हम करे राष्ट्र आराधन मधील माँ आहे.

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग ३)

----
----
मागील भागात मी केलेलं विश्लेषण अनेकांना पटलं तरी मी केलेली सूचना मात्र अनेकांना पटणे कठीण आहे.

एका समाजगटाला हिशोब राखणे आणि तो तपासणे या क्षेत्रात अधिक निर्बंध असावेत याचा अर्थ ते क्षेत्र त्यांच्यासाठी कायमचेच काय पण तात्पुरतेही बंद करावे असा होत नाही. आणि सीएचे काम केवळ हिशोब तपासणी नसून इतर अनेक क्षेत्रात सीए काम करतात ज्यावर निर्बंध आणावेत असं मी सुचवलेलं नाही. कुणालाही सीए होण्यात आडकाठी नसावी पण काहींना हिशोबतपासनीस होण्यासाठी अधिकचे निर्बंध हवेत इतकाच मुद्दा होता.

आजही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत किंवा जमीन व्यवहारात नगद आणि चेकच्या बाबतीत किती जण मारवाडी सीएला प्राधान्य देतील याचा विचार केला की माझा मुद्दा समजायला सोपा जाईल.

यातून नवा चातुर्वर्ण्य तयार होईल अशी भीती कुणी व्यक्त केली आहे. पण माझ्या मते आता कुठलाही उपाय अमलात न आणताही काही व्यवसाय एकेका समाजगटाच्या ताब्यात जात आहेतंच. त्यामुळे मी रोगापेक्षा इलाज भयंकर असे काही सांगितलेले नाही याबद्दल मला खात्री आहे. तरीही हा उपाय स्वप्नाळू आहे हे मला मान्य आहे.

यापेक्षा इतर उपाय कुणाला सुचत असतील आणि ते अधिक व्यावहारिक असतील तर त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात मला काही कमीपणा वाटणार नाही.

जर कुठल्याही समाजगटावर कसलीही बंदी करायची नसेल (कारण ते अनैसर्गिक आहे) तर अजून एक उपाय मी सुचवू शकेन जो स्वार्थभावनेला पूरक आहे.

ज्या मारवाड्यांनी आपल्या व्यवसायात सर्व भागीदार / कर्मचारी स्वसमाजाबाहेरील घेतले असतील त्या व्यवसायाला करात अधिकची सूट द्यावी किंवा भांडवल पुरवठा सवलतीच्या दरात व्हावा.

अर्थात या उपायातही त्रुटी शोधून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहेच.

गैरवापर होण्याचे मुख्य कारण भारतीय समाजाची नियमांबद्दलची उदासीनता असून त्याची धार्मिक आणि सांस्कृतिक अंगाने थोडक्यात कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न मी पोस्टमधे केला आहे. त्याशिवाय नियमबाह्य वर्तनाबद्दल उदासीनतेच्या कारणाची आर्थिक बाजू समजून घेताना मला असे जाणवते की भांडवलाची निर्मिती मार्क्सबाबाने सांगितल्याप्रमाणे कष्टकऱ्यांच्या रक्त आणि घामातून तर होतेच आहे पण भारतात ती भ्रष्टाचारातूनही होते आहे.

ज्या समाजगटाच्या हातात भांडवल एकवटले आहे त्याला ते स्वतःकडे टिकावे आणि वाढावे म्हणून नियमपालन महत्त्वाचे वाटत नाहीत. तर ज्या समाजगटांकडे भांडवलाचा अभाव आहे ते नियमबाह्य वर्तन करुन आपल्यासाठी भांडवलाची निर्मिती करतात. पण अशा प्रकारे भांडवरनिर्मिती झाली तरी ती वैयक्तिक होते. नवभांडवलदाराच्या समाजगटात उद्यमशीलता नसल्याने नियमबाह्य वर्तन करुन भांडवल गोळा करणारा वंचित समाजातील पहिल्या पिढीचा नवभांडवलदार शेवटी जुन्या भांडवलदारांच्या बरोबर रहाण्यात धन्यता मानतो. आणि नियमबाह्य वर्तन, नव्या भांडवलदारांच्या वैयक्तिक फायदा करून देत असले तरी जुन्या भांडवलदारांच्या समाजगटाचा अधिक फायदा करून देते.

म्हणजे हे दुष्टचक्र भेदण्यासाठी आपल्या देशात विविध समाजगट आहेत. त्यांच्याकडे उद्यमशीलता वेगवेगळ्या प्रमाणात आहे. भांडवल फार कमी समाजगटांकडे एकवटले आहे. आणि नियमबाह्य वर्तन हे भारतात वैयक्तिक भांडवरनिर्मितीचे साधन झाले आहे ही वस्तुस्थिती मान्य करुन मगंच उपाययोजना करावी लागेल. नुसते नवीन कायदे करून काही फरक पडणार नाही. आणि कायदापालन करुन घेणाऱ्या संस्थात काम करणारे बहुसंख्य लोक पिढ्यान पिढ्या भांडवलापासून वंचित होते हे देखील ध्यानात घ्यावे लागेल.

मागे पडलेल्या समाजगटांत उद्यमशीलता वाढवणे, त्यांना भांडवलाचा पुरवठा करणे आणि बाजार हाच देव, दिलेला शब्द पाळणे आणि नियम पाळणे हीच त्याची पूजा हे तत्व सर्व भारतीयांत रुजवणे... याला पर्याय नाही.

तोपर्यंत सुचवलेले सर्व उपाय अव्यावहारिक वाटत रहातील.

कुठल्याही समाजाप्रती द्वेषभावना न करता जर आपल्याला कमीत कमी घोटाळे आणि जास्तीत जास्त विकास हवा असेल तर रस्ता लांबलचक आहे आणि थोडा कंटाळवाणादेखील. पण पर्याय नाही.

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग २)

-----
----

सगळ्यात प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो. सध्या गाजत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित व्यक्ती मारवाडी नाहीत. पण अनेकांचा समज आहे की त्या व्यक्ती मारवाडी आहेत.

असा समज होण्याचे कारण गुजराथ आणि राजस्थान ही राज्ये स्वतंत्र भारतात जरी वेगळी असली तरी अनेक भारतीयांच्या दृष्टीने ती एकत्र आहेत. जसे दक्षिणेकडच्या सगळ्या लोकांना अनेक भारतीय मद्रासी समजतात आणि ईशान्येकडच्या राज्यांतील आसामी, मणिपुरी, नागा, मेघालयी आणि अरुणाचली लोक इतर बहुसंख्य भारतीयांना सारखेच वाटतात. तसेच गुजराथी आणि मारवाडी लोक अनेकांना सारखेच वाटतात. त्याशिवाय या दोन्ही प्रदेशातील प्रचलित भाषा एकाच कुळातील आहेत. या दोन्ही प्रदेशात जैन धर्माचा प्रभाव आहे. या दोन्ही प्रदेशातील अनेक लोक नोकरीपेशा किंवा कलोपासना किंवा मुलुखगिरीसाठी फार प्रसिद्ध नसून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहेत. व्यवसायाचे हिशोब ठेवण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत (हिला पर्था किंवा परता असं म्हणतात) या प्रदेशात विकसित करण्यात आली होती. दोन्ही प्रदेशातील लोक आपापल्या व्यावसायिकांचे गट करण्यात आणि त्या गटांत इतरांना सहजासहजी सामील न करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. दोन्ही प्रदेशातील व्यावसायिक एकत्र कुटुंब पद्धतीची व्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यामुळे गुजराथी, कच्छी, राजस्थानी, मारवाडी यात पोटभेद असले आणि प्रत्येक समूहाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असली तरी बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीने गुजराथी हिंदू, गुजराथी जैन, मारवाडी हिंदू, मारवाडी जैन, किंवा कच्छी समाज यांच्यात फार फरक नाही.

मारवाडी समाजाबद्दल विचार करताना माझ्या डोक्यात ज्यू लोकांचा विचार येण्याचे एकमेव कारण होते बँकिंग. ज्यू हा धर्म आहे आणि मारवाडी हा धर्म नाही हे मला माहिती आहे. ज्यू लोक बँकिंगमध्ये येण्याचे प्रमुख कारण इतर संधींचा अभाव हे होते याउलट मारवाडी लोक बँकिंगमध्ये येण्यामागे असे कुठलेही कारण नव्हते.

किंबहुना जगत सेठ सारखी मारवाडी पेढी मुघलांना पैसा पुरवत होती. प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांना जगत सेठ पेढीची मदत मिळाली होती. पुढे ताराचंद घनश्यामदास सारखी मारवाडी पेढी; लोकर आणि अफूचा व्यापार, ठोक व्यापार, अंगडिया सेवा, कर्ज, ठेवी, इन्शुरन्स, हुंडी सारख्या विविध सेवा पुरवून एखाद्या युरोपियन बहुराष्ट्रीय कंपनीसारखी बलाढ्य कंपनी झाली होती. आजच्या बिर्ला, मित्तल आणि सिंघानिया घराण्यांचे पूर्वज याच ताराचंद घनश्यामदासमध्ये तयार झाले होते. आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांची सहानुभूती व सहकार्य काँग्रेसला होते.

१९५६ च्या भाषावार प्रांतरचनेच्या योजनेला भारतभर पसरलेल्या मारवाड्यांचा विरोध होता आणि त्याकाळात त्यांनी अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रे विकत घेऊन त्यावर आपली पकड बसवली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र मारवाडी लोकांनी बँकिंगऐवजी आणि व्यापाराऐवजी उत्पादनक्षेत्रात लक्ष घातले. त्या काळात भारतात उत्पादन क्षेत्रात दोन समाजांनी पैसा ओतला. एक म्हणजे पारशी आणि दुसरा म्हणजे मारवाडी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९९१ च्या उदारीकरणाच्या काळापर्यंत मारवाड्यांनी जवळपास २५% उत्पादनक्षेत्र काबीज केलेले होते. आता डिजिटल क्षेत्रातही ऑनलाईन व्यापारात मारवाडी लोक पुढे आहेत. म्हणजे मूळ व्यापार, मग बँकिंग पेढी, त्यातून राजा महाराजांना कर्ज पुरवठा, मग त्या जोडीने व्यापार,मग बँकिंगच्या उद्योगातून काढता पाय घेऊन उत्पादन आणि मिडीया आणि आता पुन्हा ऑनलाईन व्यापार अश्या विविध क्षेत्रात मारवाडी समाजाने बस्तान बसवले.

इतके असूनही लेबले लावण्याच्या भारतीय समाजाच्या सवयीत; मराठी म्हणजे डोक्यात राख घालून घेणारे, दक्षिण भारतीय म्हणजे नियमांच्या बाबतीत कट्टर, पंजाबी म्हणजे दिलखुलास असे करता करता मारवाडी म्हणजे कंजूष असे लेबल चटकन लागते. याच्यामागचे कारण काय असावे? याचा विचार करताना मला खालील गोष्टी जाणवल्या.

मुळात राजस्थान, नेपाळ आणि कलकत्ता याठिकाणी एकवटलेला हा समाज, ब्रिटिश आमदानीत भारतभर पसरला. मोठया पेढ्यांच्या धर्तीवर अनेक मारवाडी कुटुंबे ब्रिटिश आमदनीत सावकारी धंद्यात शिरली. हिशोब ठेवण्याच्या त्यांच्या पर्था (किंवा परता) पद्धतीमुळे, चक्रवाढ व्याजावर कायदेशीर नियंत्रण नसल्यामुळे आणि कर्जवसुलीसाठी विशिष्ट नियम नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होत गेली. आणि छोट्या खेड्यातील सर्वसामान्य भारतीयांना पैशाला चोख असणारा मारवाडी माणूस दिसला. ज्याच्या उद्योगासाठी पैसा हीच वस्तू आहे त्याने हिशोबाला पक्के राहणे आवश्यक आहे. याला कुणी चिकट म्हणेल किंवा कुणी स्वार्थी पण मला यात काही वावगे दिसत नाही. किंबहुना जो समाज स्वार्थी नसतो तो आपल्या उत्कर्षासाठी इतरांवर अवलंबून असतो. मारवाड्यांच्या बाबतीत एक नक्की झालं की जितक्या चटकन ते युरोपियनांनी आणलेल्या बाजाराच्या व्यवस्थेशी एकरूप होऊ शकले आणि आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीत त्या व्यवस्थेला रुजवू शकले तितक्या वेगाने इतर कुठलाही भारतीय समाज बाजार व्यवस्थेशी एकरूप होऊ शकला नाही. त्यामुळे या समाजातील उद्यमी आणि क्षुद्रबुद्धी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना भारतात मोकळं रान मिळालं. आणि न्यून ते पुरते अधिक ते सरते या न्यायाने मारवाडी समाज चिकूपणाबद्दल, कंजूषपणाबद्दल बदनाम झाला.

असे असूनही त्यांच्याबद्दल संपूर्ण भारतात रोष का निर्माण होत नाही? ह्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळल्यावर मला जाणवले की,

जसा मारवाडी समाज आहे तसेच भारतात इतर अनेक समाज आहेत. मग तो आगरी असो, कोळी असो, शेट्टी असो वा अजून कोणी. आणि या प्रत्येक समाजाला मारवाडी समाजाच्या व्यवसायाच्या मॉडेलचे कौतुक असते, मारवाडी समाजाला नावे ठेवणारे सर्वजण आपल्या समाजात तशी एकी नाही, एकमेकांना सांभाळून घेण्याची तशी कुवत नाही याबद्दल मनोमन हळहळत असतात. म्हणजे तशी संधी निर्माण झाल्यास आज मारवाडी नसलेले सर्वजण व्यवसायाचे मारवाडी मॉडेल वापरण्यास मनोमन तयार असतात. त्यामुळे भारतीयांना मारवाड्यांबद्दल असूया वाटली तरी द्वेष वाटत नाही.

आणि त्याचमुळे मारवाडी भ्रष्ट आहेत, स्वार्थी आहेत, त्यांची निष्ठा पैशाशी आहे हे सर्व आरोप मला बिन बुडाचे वाटतात. जर तसे असेल तर ती बहुसंख्य भारतीयांची प्रवृत्ती आहे. आणि तिचे कारण कुणी मारवाडी असणे किंवा नसणे नसून आपल्या समाजाच्या पापपुण्याच्या धारणेत आहे असे मला वाटते.

अब्राहमिक धर्मात देवाशी केलेला करार आणि अंतिम न्यायाचा दिवस या दोन गोष्टींमुळे माणसाला आपण कुणाला तरी आपल्या वर्तणुकीबाबत उत्तर देण्यास बांधील आहोत असे वाटते. त्यामुळे पाप पुण्याच्या संकल्पना फिकट असल्या तरी

समाजव्यवहारावर सामाजिक कायद्यांचे आणि देवाशी केलेलया कराराचे नियंत्रण रहाते. जो नियमबाह्य वर्तन करेल त्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा स्वाभाविक ठरते.

याउलट प्रमुख भारतीय धर्म; यात हिंदू, जैन, बौद्ध व शीख सगळे आले. या सर्व धर्मात देवाशी करार नाही. अंतिम न्यायाचा दिवस नाही. या दोन्हीच्या ऐवजी आपल्याकडे पुनर्जन्म ही कल्पना आहे. आणि या जन्मातील पापांची शिक्षा किंवा पुण्याचे फळ पुढील जन्मात मिळण्याची सोय आहे. त्यामुळे नियमबाह्य वर्तनाला तात्काळ शिक्षा व्हावी अशी कुणाला इच्छादेखील होत नाही. किंबहुना दानधर्म, भूतदया, देवभक्ती करून आपण केलेल्या पापाचे प्रायश्चित्त याच जन्मी घेणे आणि पुढील जन्मातील शिक्षेचे पारडे हलके करणे आपल्या धार्मिक धारणांना मान्य आहे. म्हणजे पूर्णपणे वेगळ्या धार्मिक धारणांशी बांधील असलेल्या आपल्या समाजावर आपण अब्राहमिक धर्माशी बांधील अशा धारणांवर आधारित कायदे लादण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार, स्वार्थ यांचे भारतीय अर्थ इतर समाजांपेक्षा वेगळे ठरतात. आणि आपल्यापैकी अनेकांना मारवाडी समाजाबद्दल असूया असूनही त्यांच्याबद्दल द्वेष वाटत नाही.

याचाच अर्थ एखादी जादूची काडी फिरली आणि भारतातील मारवाडी समाज एका रात्रीत बदलला तरी त्यांच्या जागी येणारा दुसरा समाज तीच गुणवैशिष्ट्ये धारण करेल. युरोपियनांनी आणलेली बाजारव्यवस्था जर मारवाडी समाजाआधी कोकणस्थ ब्राह्मण, किंवा शहाण्णव कुळी मराठा किंवा दलित किंवा फासेपारधी किंवा नंबुद्री किंवा नागा लोकांना इतर भारतीयांपेक्षा जास्त लवकर आत्मसात करता आली असती तर तेही मारवाड्यांसारखेच वागले असते आणि आपण त्यांच्याबद्दल असूयाग्रस्त झालो असतो. आणि आज जसे आपल्याला अनेक घोटाळ्यात एका समाजाचे लोक दिसून येतात तसे दुसऱ्या समाजाचे लोक दिसून आले असते.

म्हणजे ही स्थिती काळापुढे धावण्याच्या केवळ गुजराथ्यांच्या किंवा मारवाड्यांच्या वृत्तीमुळे येत नसून इतर सर्व समाजांच्या काळामागे राहण्याच्या वृत्तीमुळे तयार होते आहे. यातून बाहेर येण्यासाठीचे पहिले पाऊल तर आपण टाकलेले आहेच. ते म्हणजे गुजराथ्यांना किंवा मारवाड्यांना आपण ज्यू लोकांसारखे वागवत नाही. आता पुढची पावले टाकणे आवश्यक आहे. गुजराथी किंवा मारवाडी लोकांना त्यांचा वेग कमी करायला सांगणे मूर्खपणाचे ठरेल. पण त्याचबरोबर हा वेग खरा आहे तो फुगवटा नाही याची खात्री पटवण्यासाठी सरकारला जास्त काळजी घ्यावी लागेल.

मी सांगितलेल्या उपायांवर अमल करावा इतका मोठा मी नाही हे मला माहिती आहे. पण ऑडिटमध्ये इंटर्नल कंट्रोलचे एक तत्व मी शिकलो आहे आणि ते नेहमी शिकवतो देखील. त्यानुसार, काम करणाऱ्यालाच ते लिहून ठेवायची आणि तपासायची जबाबदारी द्यायची नसते. सध्या शब्दात पेपर लिहिणाऱ्याला तो तपासायच्या कामावर नेमायचे नसते. जर एक समाज म्हणून मारवाडी उद्योगात पुढे असतील तर हिशोब राखणे आणि तो तपासणे या क्षेत्रात त्यांना प्रवेश देताना जास्त निर्बंध असले पाहिजेत. अर्थव्यवस्थेतील उद्योगाचे काम हे ऍक्सिलरेटरचे असते तर हिशोबतपासनीसाचे काम ब्रेकचे असते. एकाच समाजातील व्यक्ती दोन्ही कामे करत असतील तर दोघांपैकी एकाचे काम मागे पडून संपूर्ण अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो. असे अनेक धक्के आपण १९९१च्या आर्थिक उदारीकरणापासून खातो आहोत. कारण उदारीकरण यशस्वी होण्यासाठी करारांचे बंधन पाळणारा समाज अपेक्षित आहे. आणि आपला समाज करारांचे बंधन पाळण्यासाठी प्रसिद्ध नाही.

आर्थिक घोटाळे सर्व देशात होतात. अगदी युरोपीय देशात सुद्धा होतात. पण विकसित देशांच्या तुलनेत भारतात घोटाळे करणे अधिक सोपे आहे आणि घोटाळ्यानंतर शिक्षा चुकवून पळून जाणेदेखील भारतात अधिक सोपे आहे. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आणि बाजारव्यवस्थेच्या आकलनाच्याबाबतीत विविध पातळीवर असलेल्या विविध सामाजिक गटांनी आपला देश बनलेला आहे, त्यापैकी विविध सामाजिक गटांत भांडवलाची उपलब्धता वेगवेगळी आहे हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत घोटाळेबाजांसाठी भारत हा एक स्वर्ग असेल. आपण कधी मारवाड्यांच्या नावे तर कधी गुजराथ्यांच्या नावे तर कधी अजून कुणाच्या नावे खडे फोडत बसू आणि आपल्या धार्मिक धारणांनुसार आपल्याच नशीबाला बोल लावत बसू.

गुजराथी आणि मारवाडी उद्योजक (भाग १)

----
----

ज्यूंबद्दल, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजात अविश्वास आणि तिरस्कार कायम होता. त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे व्याजावर पैसे देण्याचा धर्मबाह्य व्यवसाय ज्यूंच्या हाती एकवटलेला होता.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या या असंतोषाचे जर्मनीतील सत्ताधाऱ्यांनी त्याचे भांडवल केले.

ज्या वेगाने आर्थिक घोटाळ्यांत मारवाडी समाजातील व्यावसायिकांची नावे येत आहेत ते पाहता मारवाडी म्हणजे भारतातील ज्यू होऊ शकले असते.


पण त्यांचे मारवाडरुपी मातृभूमीवर प्रेम असले तरी ज्यूंप्रमाणे त्यासाठी ते झुरत नाहीत.

आधुनिक बॅंकिंगमधे मारवाड्यांना रस नाही. बॅंका चालवण्याऐवजी ते या आधुनिक बॅंकांकडून कर्जे घेतात.

व्यापार उदीम सोडून कला विज्ञान गणित यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रात मारवाडी रस घेत नाहीत.

हिशोब तपासणीच्या क्षेत्रातील केंद्रीय संस्था म्हणजे सी ए इन्स्टिटय़ूट त्यांच्याच ताब्यात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सर्व राजकीय पक्षांना ते आर्थिक मदत करतात. परिणामी कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडाविशी वाटत नाही.

त्यामुळे अजूनतरी हा समाज इतर समाजाच्या असंतोषाचा आणि तिरस्काराचा धनी होत नाही.

भारताच्या प्रगतीत मारवाडी समाजाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे अधोगतीचे खापर फक्त त्यांच्या डोक्यावर फुटू नये असे वाटते.

Thursday, February 15, 2018

नॉट जस्ट अ मसाया

वर्ष कुठलं ते आठवत नाही, पण २६ जानेवारीचा दिवस होता एव्हढं नक्की. त्या दिवशी बाकीच्या सगळ्या बॅचेसना सुट्टी होती आणि फक्त सी ए च्या बॅचचं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असं दिवसभर लेक्चर ठेवलं होतं. त्यामुळे सकाळी जरा उशीरा उठलो होतो. नाश्ता करता करता टीव्ही लावला. आणि चॅनेल सर्फ करताना एका चॅनेलवर ऑपेरा संगीताच्या सेटपमध्ये काहीतरी चालू असलेलं दिसलं. गाणं लागलं होतं. व्हॉट हॅव द रोमन्स एव्हर डन फॉर अस? (रोमन लोकांनी असं आपल्यासाठी एव्हढं काय मोठं करून ठेवलंय?)


आणि मग चारपाच ऑपेरा सिंगर्सने जो काही सवाल जवाब रंगवला होता, ते ऐकता ऐकता हसून हसून ठसका लागला. क्लासला जायला उशीर होत होता म्हणून काहीश्या अनिच्छेनेच घरातून निघालो. पण दिवसभर ते गाणं डोक्यात घुमत होतं आणि वर्गातही मधून मधून हसू येत होतं. मग नंतर इंटरनेटवर शोधाशोध केली. तेव्हा कळलं की त्या कार्यक्रमाचं नाव 'नॉट द मसाया ही इज अ व्हेरी नॉटी बॉय' होतं. मग त्याचे छोटे छोटे तुकडे युट्युबवर पाहत होतो. त्यातल्या लंबरजॅक सॉंग (लाकूडतोड्याचं गाणं) मधील असंबद्ध आचरटपणा ऐकून खूष होत होतो आणि 'ऑल्वेज लुक ऑन द ब्राईट साईड ऑफ लाईफ' मधील साध्या शब्दात मांडलेलं आयुष्याचं तत्वज्ञान ऐकून त्याच्या गीतकाराच्या प्रतिभेवर आश्चर्यचकित होत होतो.

मग एक दिवस शोधता शोधता मोठा खजिना हाती लागला आणि कळलं की 'नॉट द मसाया ही इज या व्हेरी नॉटी बॉय' ही एका चित्रपटावर बेतलेली ऑपेरासदृश संगितिका होती. आणि चित्रपटाचं नाव होतं ‘लाईफ ऑफ ब्रायन’. चित्रपटाची कल्पना होती एरीक आयडल आणि टेरी गिलियन या दोघांची.

माँटी पायथॉन या ब्रिटिश ऍब्सर्ड कॉमेडी ग्रुपने १९७५ मध्ये एक चित्रपट प्रदर्शित केला होता. त्याचं नाव होतं 'माँटी पायथॉन अँड द होली ग्रेल'. किंग आर्थरच्या कहाणीचं विडंबन असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आणि ऍमस्टरडॅममध्ये त्याचं प्रमोशन करत असताना माँटी पायथॉनच्या ग्रुपमधील एरीक आयडल आणि टेरी गिलियन या दोघांना लाईफ ऑफ ब्रायनची कल्पना सुचली होती.

क्रूस वाहून नेत असताना येशूच्या खांद्यावरचा क्रूस मोडतो आणि मग वैतागलेला येशू सुताराला चांगला क्रूस कसा बनवायचा त्याच्या सूचना देतो अशी कल्पना होती. आणि मग त्या अनुषंगाने ख्रिश्चनांच्या नव्या कराराचे विडंबन करावे असे ठरत होते. पण नंतर ग्रुप सदस्यांचे मत पडले की येशू एक चांगला मनुष्य होता आणि त्याची शिकवणदेखील समाजोपयोगी होती. त्याचे विडंबन करणे कुणालाच योग्य वाटेना. मग येशूच्या प्रसिद्ध बारा अनुयायांबरोबर अजून एक तेरावा अनुयायी होता पण तो कुणाला माहिती नव्हता अशी कल्पना करून त्याच्या नजरेतून येशूचा काळ रंगवायचं ठरलं. माँटी पायथॉनने त्या काल्पनिक अनुयायाचं नाव ठेवलं ब्रायन. पण मग शेवटी ही कल्पनादेखील बारगळली. आणि ब्रायन म्हणजे येशूच्या जन्माच्या वेळी बेथलेहम मध्ये अविवाहित मातेच्या पोटी जन्माला आलेला, सगळ्या जगाचं भलं करू इच्छिणारा एक सामान्य गृहस्थ असतो अशी कल्पना करण्यात आली. त्याच्या नजरेतून मग तत्कालीन समाज, त्या काळाच्या अंधश्रद्धा, चापलुसी या सर्वांवर चित्रपटातील प्रसंग रचले गेले.

माँटी पायथॉनचा एक चाहता आणि बीटल्सचा सदस्य जॉर्ज हॅरिसन याने या चित्रपटासाठी तीन मिलियन पौंड्स दिले. त्याची फक्त एकंच इच्छा होती की हा चित्रपट त्याला बघायला मिळावा. जगातील सगळ्यात महाग सिनेमा तिकीट असं याचं वर्णन केलं जातं. तो शेवटपर्यंत बरोबर उभा राहिला तरीही धार्मिक संदर्भ असल्याने ऐनवेळी निर्मात्यांनी काढता पाय घेतला. तरीही चित्रपटाचं शूटिंग झालं. नंतर अनेक खाजगी स्क्रिनिंग झाली. आणि प्रत्येक वेळी संवेदनशील उल्लेख कापण्यात आले. हे सगळं सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट जायच्या आधी. माँटी पायथॉन गर्वाने सांगायचे की या चित्रपटासाठी त्यांनी येशूच्या काळाचा बारकाईने अभ्यास केला होता आणि कुठलाही अपमान होऊ नये याची काळजी घेतली होती. इतके असूनही सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट गेला तेव्हा त्यात अजूनही काही कट्स सुचवले गेले. ते करून चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता.

पण ईश्वरनिंदा करतो म्हणून या चित्रपटावर अनेक देशात बंदी घातली गेली. इंग्लंडमधील काही शहरात तर ही बंदी तीस वर्षापर्यंत लागू होती. ज्या शहरात ही बंदी होती त्या शहराच्या हद्दीत सिनेमा थिएटर नव्हते आणि तिथल्या नगरपालिकेच्या सदस्यांनी तो चित्रपट पाहिला देखील नव्हता. पण या चित्रपटात येशूची निंदा केली आहे या अफवेवर विश्वास ठेवून त्यांनी अशी भूमिका घेतली होती. जणू करणी सेनेची ब्रिटिश आवृत्ती. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी टीव्हीवर जाहीर चर्चेचा कार्यक्रम करण्यात आला. माँटी पायथॉनचे दोन सदस्य आणि चर्चचे दोन सदस्य अशी ती चर्चा होती. माँटी पायथॉनचे म्हणणे होते की आमचा चित्रपट बंडखोर आहे पण तो ईश्वरनिंदा करत नाही. चर्चच्या सदस्यांनी चर्चेला येण्यापूर्वी चित्रपट पाहिला. पण ते चित्रपटाला पंधरा मिनिटे उशीरा गेले होते. त्यामुळे ब्रायन ही वेगळी व्यक्ती आहे हे त्यांना कळले नाही. त्यांच्या दृष्टीने चित्रपटाने येशूची निंदा केली होती. मुलाखतीत विनोदकार तर्कनिष्ठ बोलत होते आणि धर्मपंडित असंबद्ध बोलत होते.



पण शेवटी चित्रपट प्रदर्शित झाला. कित्येक ठिकाणी जाहिरात करताना ‘इतका विनोदी चित्रपट की त्याला नॉर्वेत बॅन करावे लागले’ अशी जाहिरात केली गेली. आणि या सगळ्या जाहिरातीचा, वादविवादाचा चित्रपटाला प्रचंड फायदा झाला. मूळच्या दमदार कथानकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

हा भाग थोडा पद्मावत सारखा वाटला तरी एक मोठा फरक आहे. की पद्मावतमध्ये निर्माता दिग्दर्शकांचं लक्ष कपडेपट आणि नेपथ्याकडे जास्त होतं तर लाईफ ऑफ ब्रायनमध्ये निर्माता दिग्दर्शकांचं लक्ष कथेकडे. पद्मावतमध्ये दिग्दर्शकाने प्रचलित कथेवर स्वतःचा कल्पनाविस्तार केला. तर लाईफ ऑफ ब्रायनमध्ये प्रचलित कथेत बदल न करता तत्कालीन समाजातील सामान्य लोकांच्या नजरेतून घटना कश्या दिसल्या असतील त्याचे चित्रीकरण केले गेले. चित्रपटात येशू जेव्हा येतो तेव्हा तो असामान्य आहे हे स्पष्ट जाणवते. त्याच्यामागे प्रकाशाचे वलय असते. त्याचे चित्रीकरण करताना कुठलेही विडंबन किंवा कल्पनाविलास केलेले नाहीत आणि कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रचलित धारणांना कुठलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली होती. इतके असले तरीही शेवटी ब्रायनला क्रूसावर चढवले जाते तेव्हा बाजूच्या क्रूसावर चढवलेले गुन्हेगार आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारं गाणं म्हणतात असं दृष्य आहे. त्यामुळे त्या प्रसंगात शिक्षेचे विडंबन झाले असा आक्षेप घेतला गेला होताच.



या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जवळपास चाळीस वर्षांनी एरीक आयडलने त्यावर ऑपेरा स्टाईलने एक संगितिका बनवली. आणि एका २६ जानेवारीला ती मी टीव्हीवर थोडीशी पाहिली होती. त्यानंतर मी माँटी पायथॉनचा चाहता झालो तो कायमचाच. ‘नॉट जस्ट अ मसाया’ ची संपूर्ण संगितिका मला ऑनलाईन मिळाली नव्हती. एकदा ऍमेझॉनवर शोधली पण तिचं आंतरराष्ट्रीय शिपिंग असल्याने किंमतीपेक्षा शिपिंग चार्जेस जास्त होते. म्हणून मग कुणी मित्र किंवा नातेवाईक परदेशातून येतील तेव्हा सांगू असं म्हणून तो विषय बंद केला होता.

गेल्या महिन्यात माझ्या ब्लॉगला ABP माझाचं पारितोषिक मिळालं आणि अनेक मित्रमैत्रिणींकडून कौतुकाचा वर्षाव झाला. त्यापैकी एका मैत्रिणीने काय भेटवस्तू देऊ ते सांग? म्हणून आग्रह धरला. माझे पारितोषिक जरी मला महत्वाचे असले तरी कौतुकापेक्षा अजून काही कुणी द्यावे अशी माझी अपेक्षा नव्हती. पण आग्रह थांबावा म्हणून शेवटी मी ‘नॉट जस्ट अ मसाया’चं नाव सांगितलं आणि ती गोष्ट विसरून गेलो. आज क्लासवरून घरी आलो तर एक कुरियर घरी माझी वाट पाहात होतं. पाठवणाऱ्याचा पत्ता ओळखीचा वाटेना. वरंगळवरून कोण मला काय पाठवेल ते कळेना. आपण बॉम्ब स्क्वॉडसारखे कपडे घालून मग पाकीट उघडावं असाही विचार मनात आला. शेवटी पाकीट उघडलं तर साक्षात माँटी पायथॉनच्या ‘लाईफ ऑफ ब्रायन’वरून प्रेरित एरीक आयडलच्या
नॉट जस्ट अ मसायाची डीव्हीडी माझ्यासमोर होती.

त्या दिवशीच्या लेक्चरमुळे पूर्ण पाहू न शकलेला कार्यक्रम आता पूर्ण पाहिला आणि मग ABP माझाचे आभार मानले. यंदाच्या ब्लॉग माझा स्पर्धेत भाग घेणाऱ्या इतर स्पर्धकांनी मला जिंकू दिले म्हणून त्यांचेही मनातल्या मनात आभार मानले. आणि सरतेशेवटी आग्रही मैत्रिणीचेही आभार मानले. आणि एका वेगळ्या आनंदात बुडून गेलो.