Monday, January 9, 2017

आनंद आणि क्रौर्य (भाग ५)



माझ्या मते क्रौर्याला ओळखणे थोडे किचकट आणि कठीण काम आहे. ज्याला आपण चटकन क्रूर म्हणू, ते थोडा विचार केल्यावर क्रूर नाही असे आपले आपल्यालाच वाटू शकते. क्रौर्याला आपण मृत्यू, हत्या, शिकारी किंवा सूडाच्या अनुषंगाने येणाऱ्या हिंसेशी संबंधित केल्याने क्रौर्याचे संपूर्ण स्वरूप ओळखण्यात अनेक अडचणी येतात.

त्यातली पहिली अडचण म्हणजे माणसाला इतर सजीव आपल्यापेक्षा क्रूर वाटतात. हरणांना, सश्यांना आणि इतर शाकाहारी प्राण्यांना काय वाटतं ते माहिती नाही पण रक्ताने माखलेले तोंड घेऊन शिकारीचे लचके तोडत क्षुधाशांती करणारी सिंह किंवा तरसांची झुंड माणसांना मात्र क्रूर वाटते.

दुसरी अडचण म्हणजे एका माणसाला किंवा एका समूहाला जे वर्तन क्रूर वाटेल तेच वर्तन इतरांना क्रूर वाटेलच असे नाही. शाकाहारी माणसांना मांसाहारी लोक क्रूर वाटतात. मांसाहारी लोकांना कच्चे मास खाणारे आदिवासी लोक क्रूर वाटतील. कुणाला मृत व्यक्तींचे शरीर जाळून टाकणे क्रूर वाटेल, तर कुणाला ते पुरून सडवणे क्रूर वाटेल, तर कुणाला ते दख्मा (टॉवर ऑफ सायलेन्स) मध्ये गिधाडांनी खाण्यासाठी सोडणे क्रूर वाटेल.

तिसरी अडचण म्हणजे क्रूरतेची व्याख्या कालपरत्वे बदलत जाते. जे जुन्या काळी समाजमान्य होते ते वर्तमानकाळात क्रूर वाटू शकते. राजगादीसाठी पित्याचा किंवा भावांचा खून करणे आज क्रूर वाटत असले तरी एकेकाळी ते समाजमान्य होते कारण पिता देखील असेच काही करून गादीवर आलेला असे. केवळ सैनिकांनाच नव्हे तर युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील नागरिकांना कंठस्नान घालणे हे देखील एकेकाळी समाजमान्यच होते.

चौथी अडचण म्हणजे क्रूरतेची पातळी ही पाहणाऱ्याच्या कोमलतेच्या पातळीवर देखील अवलंबून असते. लहानपणी जी गोष्ट क्रूर वाटते ती मोठेपणीही क्रूर वाटेलंच असं नाही. सैनिकी प्रशिक्षण घेण्यास आलेल्या उमेदवाराच्या मनातील क्रौर्याच्या परिसीमेची पातळी प्रत्यक्ष धुमश्चक्री अनुभवलेल्या सैनिकांच्या पातळीपेक्षा बरीच खाली असते.

पाचवी अडचण म्हणजे क्रूरतेची पातळी ही पाहणाऱ्याच्या अनुभव आणि परीपक्वतेवर अवलंबून असते.  गांडुळांवर मीठ टाकणे किंवा मुंग्यांना चिरडणे किंवा पक्ष्यांना गलोलीने दगड मारून जखमी करणे किंवा चतुराच्या शेपटीला धागे बांधणे किंवा फुलपाखरांचे पंख चिमटीत घट्ट धरणे लहानपणी क्रूर भासत नाही पण तेच मोठेपणी क्रूर वाटू शकते.

सहावी अडचण म्हणजे एकाच कृतीची साधने बदलली  की त्यातलया क्रौर्याची आपल्या मनातली पातळी बदलते. लाथाबुक्क्यांनी तुडवून रक्तबंबाळ करून मारणे आणि तलवारीने किंवा चाकूने मरून टाकण्यात, लाथाबुक्क्यांनी तुडवणे चाकू तलवारीपेक्षा जास्त क्रूर वाटते.  पण हीच तुलना बंदूक आणि तलवारीत केल्यास तलवारीने मारणे क्रूर वाटते. तर पुढे जाऊन बंदूक आणि विमानातून टाकलेल्या बॉम्ब मध्ये बंदुकीने केलेली हत्या अधिक रानटी आणि क्रूर वाटते.  

सातवी अडचण म्हणजे एकाच कृतीची भौगोलिक किंवा शारीरिक जागा बदलली की तिच्यातील क्रौर्याचे प्रमाण आपल्याला कमी जास्त भासते. म्हणजे सीमेवर युद्धक्षेत्रात केलेल्या सैनिकांच्या हत्येपेक्षा, युद्धक्षेत्रापासून दूर, सीमेच्या आत नागरिकांची हत्या अधिक क्रूर वाटते. किंवा पोटात सुरी खुपसून केलेलया खुनापेक्षा गळा चिरून, डोळे फोडून केलेला खून अधिक क्रूर वाटतो.

आणि आठवी अडचण म्हणजे हत्येतील व्यक्ती बदलली की त्यातील क्रौर्य बदलते. सैनिकांपेक्षा नागरिकांची हत्या क्रूर वाटते. पुरुषांपेक्षा स्त्रियांची हत्या क्रूर वाटते आणि प्रौढांपेक्षा लहानग्यांची हत्या क्रूर वाटते.

या सर्वांवरून क्रौर्याच्या बाबतीत एक निष्कर्ष असा निघू शकतो की ते स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असावं. आणि क्रौर्य ही निसर्गदत्त स्वाभाविक गोष्ट नसून तो मानवी मनाचा खेळ असावा.

हा निष्कर्ष जरी बरोबर असला तरी तो मला पूर्णपणे बरोबर वाटत नाही.

No comments:

Post a Comment