Monday, January 9, 2017

आनंद आणि क्रौर्य (भाग ३)



माणसाला काळाची जाणीव दोन प्रकारे होते.

पहिल्या प्रकारात ही जाणीव गतीवर अवलंबून असते. सूर्य - चंद्र उगवतात - मावळतात, घड्याळाच्या तबकडीवर तास - मिनिट आणि सेकंदाचे काटे फिरतात, वाळूच्या घड्याळातील वाळू खाली पडते, घटिकापात्र पाण्यात बुडतं, लंबक एक झोका पूर्ण करतो,  क्वार्ट्झच्या स्फटिकात आंदोलन पूर्ण होते किंवा कैसियमच्या - अमोनियाच्या अणूंमध्ये थरथर पूर्ण होते आणि आपल्याला काळ पुढे सरकला याची जाणीव होते. पण थोडा अजून विचार केला तर असे जाणवेल की हे कालांतर नसून एका अचल वस्तूच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या चल वस्तूचे आपण विशिष्ट एककात मोजलेले स्थलांतर आहे.

दुसऱ्या प्रकारात काळाची जाणीव, वस्तूंमधील बदलावर अवलंबून असते. ऋतू बदलतात, रुजलेल्या बीमधून रोपटे बाहेर येते, रोपाचे झाड होते, कळ्यांची फुले होतात, मोहोर येतो, कच्ची फळे धरतात आणि ती पिकतात, झाडे उन्मळून पडतात, त्यांची माती होते, दूध - अन्न नासते, दगडाची वाळू होते, पाण्याची वाफ होते, पाऊस पडू लागतो - थांबतो - जमीन ओली होते - सुकते , बाळ पोटात येते, त्याचा जन्म होतो, दुधाचे दात येतात - पडतात - नवीन दात येतात - पडतात, नखे - केस वाढतात, टक्कल पडते, माणसे - प्राणी - पक्षी मरतात, त्यांची कलेवरे सडून माती होतात आणि आपल्याला काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. पण इथेसुद्धा थोडा अजून विचार केला तर असे जाणवेल की हे देखील कालांतर नसून एका वस्तूंत इतर वस्तूंच्या प्रभावाने घडून येणारे अपरिवर्तनीय रूपांतर आहे. आणि हे रूपांतर आपण स्थलांतर मोजण्याच्या एककातच मोजू शकलेलो आहोत.  

हे स्थलांतर आणि रूपांतर माणसाप्रमाणे प्राण्यांना देखील जाणवत असणारंच. पोटातील आतड्यात अन्नाचे भ्रमण पूर्ण झाल्यावर (अचल आतड्यात चल अन्नाचे स्थलांतर झाल्यावर), त्या अन्नाचे विघटन होऊन ऊर्जा आणि मलात रूपांतर झाल्यावर, त्यांनाही भुकेची परिणामी काळाची जाणीव होत असणार. प्राणी हा जाणवलेला काळ मोजतात की नाही ते माहीत नाही पण मानव मात्र  स्थलांतर आणि रूपांतर मोजण्यासाठी एकंच एकक ठरवू शकला आहे. त्यामुळे आपण काळाला अनुभवताना मोजू देखील शकतो.   

स्थलांतरात हे जाणवत नाही पण रूपांतर अपरिवर्तनीय आहे हे आपल्याला स्पष्ट कळते. म्हणून कालप्रवाह एकाच दिशेने होतो असा निष्कर्ष आपण काढतो. या निष्कर्षावर आधारित आपण काळाचे भूत, वर्तमान आणि भविष्य असे तीन भाग करतो. त्यातील भूतकाळ आपल्या स्मृतीत राहतो. भविष्य अनंत शक्यतांच्या स्वरूपात आपल्याला झोपेत किंवा जागेपणी दिसत रहाते. आणि वर्तमानात आपण या अनंत शक्यतांपैकी एका शक्यतेला स्मृतीत परिवर्तीत होताना पहातो. ह्या परिवर्तनात आपला आणि आपल्या इच्छाशक्तीचा भाग किती महत्वाचा असतो तो पूर्ण वेगळा विषय आहे. पण अपरिवर्तनीय रूपांतराला स्थलांतरशी निगडीत एककात मोजू शकल्याने,  काळाबद्दल कुठलीही सैद्धांतिक कल्पना समजलेली नसताना देखील, आपण कालांतर ही संज्ञा वापरू शकतो.

काळ सापेक्ष आहे असे मी म्हणतो ते यामुळेच. कालांतराला स्थलांतराच्या एककात मोजल्याने, स्थलांतराची गती बदलली की आपोआप काळ वेगळा होतो. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा वेग बदलला की आपली कालमापनाची सध्याची सूर्य-पृथ्वीवर अवलंबून असलेली कोष्टके कुचकामी ठरतील. लाखो वर्षांपूर्वीचा पृथ्वीवरचा दिवस छोटा होता आणि लाखो वर्षांनी पृथ्वीवरचा दिवस आजच्यापेक्षा मोठा असेल. काळाची संकल्पना आपण कालमापनातून शिकतो म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व असलेला पदार्थरूपी व्यक्तीनिरपेक्ष काळ ही न्यूटनने समर्थन केलेली संकल्पना किंवा पदार्थरूपी अस्तित्व नसलेला आणि केवळ जाणीवरूपी अस्तित्व असलेला व्यक्तिसापेक्ष काळ ही लायबेनिट्झ आणि कांट यांनी मांडलेली संकल्पना आपल्यापैकी अनेकांना समजायला कठीण जाते. खरं सांगायचं तर मीसुद्धा समजणारे आणि न समजणाऱ्यांच्या सीमारेषेवर आहे. पण मला जाणीवरूपी व्यक्ती सापेक्ष काळ ही संकल्पना काही अगम्य कारणांमुळे आपलीशी वाटते. कदाचित विश्वाचे अस्तित्व, न्यूटनने सांगितलेल्या निरपेक्ष यांत्रिक नियमांपेक्षा नंतर आईन्स्टाईनने सांगितल्याप्रमाणे सापेक्षतेच्या नियमातून अधिक अचूकतेने स्पष्ट करणे शक्य आहे असे वाचल्यामुळे, मला काळाच्या सापेक्ष असण्याबद्दल जास्त आपुलकी वाटत असेल.

आता या सापेक्ष काळाची सापेक्ष जाणीव म्हणजे काय ते बघूया.

आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी रूपांतरामुळे जाणवणारा काळ;  भूत, वर्तमान आणि भविष्य अश्या तीन भागात विभागला. मग त्याला मोजण्यासाठी स्थलांतराचे परिमाण वापरले. मोजणे आले की एकके आणि त्यांची सूक्ष्मपासून महत्तम पर्यंतची कोष्टके आली. सध्याच्या शास्त्रीय परिभाषेत काळाचे सूक्ष्मतम एकक प्लॅन्क टाईम युनिट आहे. आपण आपल्या विषयासाठी त्याला बिंदू मानूया. मग माझ्या मनात असा प्रश्न येतो की, कोणताही प्राणी एका वेळी काळाच्या त्या सूक्ष्मतम एकाच बिंदूला अनुभवू शकतो का? आपण काळाला मोजण्यासाठी जरी त्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म एकक तयार करू शकलो आणि ते मोजूही शकलो तरी त्या सूक्ष्मातीसूक्ष्म  काळबिंदूला आपण संपूर्णपणे, एकटा, इतर बिंदूपासून तोडून, अलग थलग अनुभवू शकतो काय? आणि साहजिकच याला माझे उत्तर "नाही" असेच आहे. काळ मोजणे निराळे आणि काळ अनुभवणे निराळे.  

आपण अनुभवत असलेल्या काळबिंदूवर त्याच्या आधीच्या काळबिंदूची आणि त्याच्यापुढच्या काळबिंदूची गडद सावली असते. किंबहुना आपण निःसंशय एका काळबिंदूला कधीच अनुभवू शकत नाही. आपला कालानुभव कायम काळाच्या भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीनही बिंदूच्या गुच्छाच्या किंवा पुंजक्यांच्या  स्वरूपात असतो. आपण ज्याला वर्तमानबिंदू अनुभवणे म्हणतो तो खरं तर भूत, वर्तमान आणि भविष्य अश्या तीन बिंदूच्या पुंजक्याला अनुभवणे असते. अश्या प्रकारे काळाला पुंजरुपात अनुभवणे मानवासहित सर्व प्राण्यांना शक्य असते. आणि आपण सर्वजण बिंदुरूप काळाचा अनुभव न घेता त्रिपरिमाणात्मक काळाचा अनुभव घेत असतो.

पण मानवाच्या बाबतीत काळाला अनुभवणे हे कायम एकाच रेषेवर नसते. माणूस अनुभवत असलेल्या काळाच्या पुंजक्यातील भूत आणि भविष्यकाळाचे क्षण हे कायम लगतच्या भूत आणि भविष्यकाळातीलच असतील अशी खात्री नसते. माणसाच्या कालानुभवातील काळबिंदूंचे पुंजके हे सध्याच्या काळबिंदूच्या अनेक वर्षे मागे असलेल्या स्मृतीतील काळबिंदूला आणि अनेक शक्यतांपैकी एक शक्यता असलेल्या भविष्यातील एखाद्या काळबिंदूला एकत्र करून बनू शकतात.

एक उदाहरण म्हणून मी एका रेल्वे प्रवासाची कल्पना करतो. समजा एक सुंदर तरुणी पहिल्या वर्गाच्या डब्यात दोन अनोळखी तरुणांच्या मध्ये बसली आहे. ती स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत चॅटिंग करते आहे. दोन्ही तरुणांना चॅटिंग दिसते आहे. पण खिडकीजवळ बसलेला तरुण थकलेला आहे. त्याला गार वाऱ्याने पेंग येते आहे. म्हणजे त्याचा काळबिंदूंच्या अनुभवाचा पुंजका कदाचित, तरुणीला डब्यात चढताना पाहणे, ती शेजारी बसली याची सुखद जाणीव, तिने लावलेल्या अत्तराचा गंध, तिचे चॅटिंग पाहता येते याचे अप्रूप आणि थकव्याने येणारी गाढ झोप असा बनला आहे. पण त्याच वेळी दुसऱ्या तरुणाला मात्र तिच्या अत्तराच्या गंधात त्याचे कॉलेजचे दिवस, त्याला आवडणारी पण जिच्याशी लग्न होऊ शकले नाही ती मुलगी आठवते आहे. आणि जर तिच्याशी लग्न झाले असते तर काय होऊ शकले असते या विचारात गढला आहे. म्हणजे त्याच्या काळबिंदूंचा पुंजका हा ट्रेन प्रवासाच्या कित्येक वर्षे आधी घडून गेलेल्या कॉलेजमधील आवडत्या मुलीला आणि तिच्याबरोबर कधीच न होऊ शकलेल्या संसाराच्या शक्यतेला एकत्र करून त्याला वेगळा अनुभव देऊ शकला. म्हणजे जरी दोन व्यक्ती एकाच वर्तमानात असतील तरी त्यांच्या काळबिंदूंच्या पुंजक्यांचा परीघ एकंच असेल याची खात्री नसते.

इतकंच काय पण इथपर्यंत जे कुणी नेट लावून वाचू शकले असतील त्या सगळ्यांच्या मनात या क्षणी कुठल्या गतस्मृती आणि भविष्यतील कल्पना एकत्र येऊन त्यांच्या काळबिंदूच्या अनुभवाचा परीघ कुठपर्यंत विस्तारला किंवा संकुचित झाला असेल तेदेखील कुणी सांगू शकत नाही. यालाच मी सापेक्ष काळाची सापेक्ष जाणीव म्हणतो. ही अशी लगतच्या बिंदूना सोडून जुन्या स्मृतीतील आणि काल्पनिक भविष्यातील बिंदूना जोडणारी काळाची जाणीव प्राण्यांना होत नसावी असे माझे मत आहे.

यावर कुणी प्राणी सूड घेतात किंवा कुत्रे - घोडे स्वामीनिष्ठ असतात. म्हणजे ते देखील सध्याच्या काळबिंदूला गतस्मृतीतील मागच्या कुठल्यातरी काळबिंदूशी जोडू शकतात असे मत मांडू शकेल. विचाराच्या सोयीसाठी प्राण्यांनी सूड घेणे आणि तसा व्यक्तिकेंद्रित सूड घेतल्यावर शांत होणे किंवा त्यांचे स्वामीनिष्ठ असणे  आपण खरे मानूया. पण, ज्याप्रमाणे मानवाच्या काळबिंदूचा परीघ क्रोध, किळस, भीती, हर्ष, खेद,आश्चर्य, अपमान, मत्सर आणि सहानुभूती यापैकी कुठल्याही भावनेच्या कारणाने विस्तारीत आणि संकुचित होतो त्या प्रमाणे प्राण्यांच्या काळबिंदूचा परीघ बदलत असावा असे मानण्यास सध्या तरी कोणताही प्रयोग निष्कर्षासहित तयार नाही.

त्यामुळे recent past आणि near future च्या काळबिंदूना विसरून गतस्मृतीतील आणि कल्पनेतील बिंदूना सध्याच्या क्षणाशी जोडण्याची क्षमता मला तरी केवळ माणसांमध्येच दिसते. त्यामुळे तो ज्या भौतिक परिस्थितीत आहे तिला विसरून आनंद घेण्याची किंवा कंटाळ्याने घेरला जाण्याची शक्यता माणसाच्या बाबतीत जितकी तीव्र आहे तितकी इतर कुठल्याही प्राण्यांच्या बाबतीत नाही असे मला वाटते. यातूनच मग, माणसाच्या कलासाधनेचा, समाजरचनेचा, तंत्रज्ञानचा उगम होतो. आणि सुरु होते माणसाची अतृप्त आनंदाला शमविण्याची आणि अनंत कंटाळ्याला नाहीसे करण्याची धडपड.  

पोस्ट खूप मोठी झाली आहे. त्यामुळे फार लोक वाचतील याची खात्री नाही. पण तरीही कुणी पूर्ण वाचलीच तर पोस्ट वाचून जाड झालेले डोके थोडे हलके करण्यासाठी हा व्हिडीओ पहा.


No comments:

Post a Comment