Monday, January 23, 2017

संघ, कम्युनिस्ट आणि संस्थांचे भविष्य

माझे मित्र उत्पल वनिता बाबुराव यांनी असलेपण नसलेपण या शीर्षकाखाली संघ आणि मार्क्सवाद याबद्दल त्यांचे विचार २०१५ मध्ये मांडले होते. आणि मग ते फेसबुकवर शेअर पण केले होते. विषय संघ असल्यामुळे फेसबुकच्या शिरस्त्याप्रमाणे त्यावर शेरेबाजी झाली. आणि मग त्याच्यावर प्रतिसाद देताना हे लिखाण झालं

Utpal Vanita Baburao मला तुमचा लेख आवडला. त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रिया आणि त्यावर तुम्ही संयत भाषेत दिलेली ठाम उत्तरे देखील आवडली. मणेरीकरांनी मांडलेला वैचारिक गोंधळ आणि एकदिशेचा मुद्दा आणि त्यावरचे तुमचे बहुदिशेने संपन्न होण्याचे उत्तर पण वाचले. आणि एकदम मी मागे मांडलेल्या भारतीय समाजाच्या आणि भारतीय इतिहासाच्या बद्दलच्या माझ्याच विचारांची आठवण झाली. तुमच्या सोयीसाठी ते आधी इतरत्र मांडलेले विचार प्रथम लिहितो आणि मग त्याची या लेखाशी माझ्या मनात असलेली संगती मांडतो.

"आपल्या भारत देशाचे प्रश्न फारच वेगळे आहेत …. इंग्रजांच्या गुलामीतून मोकळे झालेले इतर देश इंग्रजी आक्रमणापूर्वी सामाजिक, वैचारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत होते या उलट जाती पातीमध्ये आणि जुन्या अंधश्रद्धामध्ये अडकलेला भारतीय समाज वैज्ञानिकदृष्ट्या अप्रगत असला तरी सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या खूपच प्रगत होता ….

त्यामुळे जरी इंग्रजी अमलाखालील इतर देशांच्या इतिहासाचे सरळ सरळ दोन भाग पडतात,

१) इंग्रजी राज्याच्या आधीचे अंधार युग ,

२) आणि इंग्रजी राज्याच्या नंतरचे नवीन युग

ज्यांना समाज हि संकल्पना माहिती नव्हती ते एक भाषा, एक धर्म, एक देव आणि व्यापाराची एक संस्कृती असलेली देशाची संकल्पना इंग्रजांकडून उचलतात आणि तिथपासूनच त्यांच्या देशाचा इतिहास सुरु होतो ….

तरी भारताचे मात्र तसे नाही…. इंग्रजी अंमल चालू होण्यापूर्वी आपण जन्म मृत्यूच्या आणि कर्म सिद्धांताच्या वर्तुळाकार चक्रात फिरणारा एक संस्कृतिपूर्ण समाज निर्माण केला होता … या समाजात पाश्चात्यांप्रमाणे देशाची एकरेषीय संकल्पना नसली तरी वेगवेगळी सार्वभौम राज्ये असलेली अनेकदा लयाला जाऊनदेखील मनात कायम तेवत असलेली राष्ट्राची संकल्पना होती….

या केवळ संकल्पनारूपी राष्ट्रात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या चालीरीती, भाषा, खाद्य संस्कृती, कुटुंब व्यवस्था गुण्यागोविंदाने नांदत होत्या. चर्चिल ने सांगितलेल्या एका भाषेने आणि एका देवाने जोडला गेलेला आणि एका राजाशी निष्ठा ठेवणारा असा आपला देश कधीच नव्हता …. काही भागात स्त्री सत्ताक पद्धती होती तर काही भागात पुरुष सत्ताक. काही भागात अनेक पत्नी असणे तर काही भागात अनेक पती असणे समाज मान्य होते. काही भागात योनी पूजा तर काही भागात लिंग पूजा प्रचलित होती. काही भागात कनिष्ठ वर्णीयांच्या स्त्रिया वरिष्ठ वर्णीयांच्या कायम सेवेसाठी होत्या तर काही भागात रोटी बेटी व्यवहार आणि शरीरसंबंध पूर्णपणे नियंत्रित होते. काही ठिकाणी खजुराहोचे उन्मुक्त प्रदर्शन आणि कामाख्येची पूजा होती तर काही ठिकाणी ब्रह्मचारी हनुमंत पूजनीय होता… इंग्रजांशी लढून स्वतंत्र केलेला हा देश कधी देश नव्हताच मुळी.

त्यात पुन्हा भर पडते ती आपल्या वर्तुळाकार इतिहासाची. पाश्चात्य संस्कृती एक रेषीय आहे. पुढील पिढी केवळ त्यांच्या मागील एका पिढीचे अनुकरण किंवा उल्लंघन करते पण कोणी मागच्या च्या मागच्या पिढीचे अनुकरण करत नाही. येशू आवडला ना मग आदम, मूसा वगैरे विसरून जायचे. मुहम्मद आवडला ना मग येशूला पण विसरून जायचे. अब्राहम, इसाक, इस्माइलचे नाव घ्या पण नियम पाळायचे शेवटच्या प्रेषिताचे. त्यामुळे समाजात एकाच बिंदूतून निघून वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या नवीन रेषा तयार होत असतील पण सर्व रेषा अंतहीन आणि सरळच रहातात वर्तुळाकार होत नाहीत. या उलट भारतीय समाजाच्या वर्तुळाकार पद्धतीत प्रत्येक नवीन पिढी वर्तुळाच्या केंद्रबिंदूत जन्म घेते आणि हळू हळू परीघामध्ये रूपांतरित होते. त्यामुळे प्रत्येक नवीन पिढीला आपल्या इतिहासाचा आरंभबिंदू स्वतःच्या मागे न मिळता स्वतःच्या समॊर विस्तारणाऱ्या परिघात बघत येतो … त्यामुळे एकमेकांशी असंबद्ध असा सगळाच भूतकाळ आपल्या इतिहासाचा भाग होतो. कोणी एकपत्नी रामाचा आदर्श ठेवतो तर कुणी अनेकपत्नी कृष्णाचा. कुणी खजुराहोला आपलेसे करते तर कुणी ब्रह्मचारी हनुमंताला. कुणी सती प्रथा मानतो तर कुणी विधवा विवाह. कुणी जातीप्रथा मानतो तर कुणी वसुधैव कुटुंबकम. कुणी जरठकुमारी विवाह मानतो तर कुणी त्याला चिमुकल्यांचे लैंगिक शोषण.

मग ह्या प्राचीन वैविध्यपूर्ण राष्ट्राचे रूपांतर एका विकसित देशात करायचे तरी कसे ?"

मूळ पोस्ट संपूर्ण स्वरूपात इथे आहे. या पोस्टचा इथे न दिलेला शेवट वैचारिक नसून कल्पनारम्य असला तरी पोस्ट मधील वर दिलेल्या निरीक्षणावर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही.

आता वरील पोस्टची, तुमच्या विचारांशी आणि मणेरीकरांशी झालेल्या संवादाशी मला लागलेली संगती सांगतो.

तुमच्या पोस्ट मध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आणि संघनिष्ठ लोकांच्या आचार विचारांवर मत मांडले आहेत. मी लहानपणी अनियमितपणे खेळायला शाखेत जायचो त्यानंतर माझा आणि संघाचा संबंध पुस्तकातून, प्रचारकी साहित्यातून आणि बातम्यांमधूनच आला आहे. पण संघाबद्दल मला हे जाणवले आहे की बहुदिशांनी धावणाऱ्या आणि तरीही स्वतःचे सनातत्व मिरवणाऱ्या हिंदू समाजात; दिशा ठरवून, कार्यक्रम आखून, दीर्घकालीन वाटचालीसाठी तयार असणारी, त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पदर असणारी संघ हि एकमेव संघटना आहे. त्यांची दिशा योग्य की अयोग्य? त्यांचे साध्य आणि साधन विवेकी कि अविवेकी? हा भाग पूर्ण वेगळा, पण आपल्या वर्तुळाकार समाजात इतर एकरेषीय समाज आणि धर्मांपासून प्रेरणा घेऊन अस्तित्वात आलेली हि पहिलीच संघटना आहे.

बहुदिश आणि त्यामुळे वर्तुळाकार फिरत असलेला समाज आपल्या प्रगतीचे किंवा पतनाचे कुठलेही कारण सांगू शकत नाही. तो कधीही नामशेष होत नाही आणि कालबाह्य देखील होत नाही. तो नदीप्रमाणे प्रवाही न राहता साचलेल्या डबक्याप्रमाणे स्थितीशील राहतो. त्याच्या चुका होत नाहीत असे नाही पण त्या मान्यच केल्या जात नाहीत आणि म्हणून त्या सुधारण्याचा प्रयत्न देखील करता बऱ्याचदा विफल ठरतो. अश्या समाजातील संस्था डबक्याचे शिळेपण वाढवतात.

गरज आहे ती अश्या समाजात एकरेषीय संस्था तयार होण्याची जी डबक्याचे तोंड फोडेल आणि पाणी वाहते करेल. संघ हे करू शकेल का? याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण संघ निर्मितीचे हेतू डबक्याला प्रवाही करण्याऐवजी त्याला नियंत्रित करण्याचे आहेत असे संघ विरोधकांना वाटते.

पण कुठलीही संस्था तिच्या व्यक्त केलेल्या उद्देशांशी पूर्णपणे प्रामाणिक कधीच राहू शकत नाही हे सत्य जर आपण विधायक दृष्टीने वापरायचे ठरवले तर संघ देखील त्याला आवडणाऱ्या आणि भारतात सध्या जे पुरोगामी म्हणून ओळखले जातात त्यांना न आवडणाऱ्या व्यक्त उद्देशांशी प्रामाणिक राहू शकेल याची काय शाश्वती ?

रॉबर्ट ओवेनच्या न्यू लानार्क च्या कामगार कल्याणाच्या प्रयोगाची इतिश्री त्याच्या कामगारांनीच केली होती आणि मार्क्स ची वाक्ये संदर्भ सोडून त्याचे भक्त आणि विरोधक कश्या प्रकारे वापरतात याचे उदाहरण तुम्ही स्वत: या लेखात दिलेच आहे. गांधीजींच्या विचारांची हत्या त्यांचे गोळ्या न झाडणारे अनुयायी अधिक जोषात अजूनही करत आहेत आणि जीनांचे सेक्युलर पाकिस्तानचे स्वप्न त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या अनुयायांनी धुळीस मिळवले. मग संन्यास शिकवण्यासाठी संस्था स्थापन करून शेकडो देशातून विलासी राहणीसाठी आणि समाजविघातक कृत्ये करतात म्हणून तडीपार केलेल्या ओशो रजनीशांनी सांगितलेले “संस्था संस्थापकाचा हेतू नष्ट करते” या पुन्हा पुन्हा प्रत्ययास येणाऱ्या सत्याला संघ अपवाद ठरेल याची सर्व संघ विरोधकांना इतकी खात्री कशी?

तुम्ही स्ट्रॅटेजिक विचार म्हणालात म्हणून माझे मत सांगतो. मला तर वाटते की संघाला सरसकट विरोध करण्याऐवजी लोकशाही मार्गाने राजकीय ताकद मिळवलेल्या या संस्थेचे पालकत्व आणि मालकी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. संघाला जे हवे त्याला विरोध करण्याऐवजी त्याला तेच का हवे? असा प्रश्न विचारले पाहिजे. जे आपल्या प्रगतीसाठी हवे आहे असे संघासकट आपल्या सगळ्यांना मान्य असेल त्याच्या सिद्धतेसाठी कुठला मार्ग निवडणार हे देखील संघाला विचारून इतर पर्यायी मार्ग सुचवले पाहिजेत. ह्यामुळे आपण प्रगती करू शकू आणि संघाची उद्दिष्टे किंवा मार्ग जर बहुसंख्यांना पटत नसतील तर संस्था संस्थापकाचा हेतू नष्ट करते हे वैश्विक सत्य पुन्हा संघाच्या बाबतीत खरे होताना पाहू शकू.

मी वाचलेल्या सर्व सामाजिक क्रांतींमध्ये मला एक समान गोष्ट जाणवली की पुरोगामी विचारवंत, प्रस्थापित सत्तेला खाली खेचण्यासाठी अत्यंत मोलाचे वैचारिक बळ देतात. आधुनिक भारतात प्रस्थापित कोण ? हा एक गुंतागुंतीचा प्रश्न असल्याने भारतातील पुरोगामी विचारवंतांचे काम अधिकच कठीण आहे.

पण भारतीय इतिहासाला समजून त्यामुळे तयार होणाऱ्या भारतीय मनाला समजून ज्याप्रमाणे गांधीजींनी समग्र भारताला स्वातंत्र्य संग्रामात अलगद आणले, रक्तरंजित आणि हिंसक क्रांती टाळून जागतिक राजकारणाच्या विविध घडामोडी स्वकीयांच्या फायद्यासाठी वापरून आपल्याला भंगलेल्या देशाचे का होईना पण राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यास मोलाचा हातभार लावला, त्याप्रमाणे आपल्या पिढीची जबाबदारी आहे ती या मातीतले नवे सामाजिक आणि राजकीय आकृतिबंध तयार करण्याची. विदेशी मातीत रुजलेले विचारवृक्ष आपल्याकडे आपोआप रुजतीलच अशी भोळी आशा आपल्या प्रगतीच्या वाटा अरुंद करून टाकेल.

पानसरे सरांची श्री. उत्तम कांबळेंनी घेतलेली एक दीर्घ मुलाखत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली होती. आत्ता हे लिहिताना त्याची आठवण झाली आणि पुस्तक काढून बघितले. पृष्ठ क्र ५३ वर सरानी मार्क्स बद्दल असं स्पष्ट म्हटलंय की “धर्माचं जेवढं कौतुक मार्क्स ने केल तेवढं कौतुक धर्मवाद्यांनीही केलं की नाही शंका आहे.” आणि मग सर तुम्ही इंग्रजीमध्ये उद्घृत केलेला परिच्छेद देतात. त्याआधी पृष्ठ क्र ५२ वर ते म्हणतात, “गणपती नवसाला पावतो, त्याला नारळ दिला की तो पावतो. ही टाकाऊ गोष्ट आहे. पण उत्स्व्वाच्या निमित्तानं नाचायला, मिरवायला मिळालं पाहिजे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. या सहज प्रवृत्तीचं पोषण झालं पाहिजे. जे टाकाऊ ते काढून टाकलं पाहिजे असं मला वाटतं. पर्यायी उत्सव तयार करणंही आवश्यक आवश्यक आहे. आपल्याला दंग करायला मिळाला पाहिजे, नाचायला मिळालं पाहिजे हे वेगळ्या पर्यायामधून दिलं नाही तर लोक परंपरागत सव उत्सवाकडे वळतात. पर्याय देण्यात आपण कमी पडतो. महात्मा फुल्यांनी असे पर्याय देण्याचा प्रयत्न केला. पण या पर्यायांकडे कम्युनिस्टांच दुर्लक्ष झालं.”

म्हणून भारतीय पुरोगामी मग ते डावे असतील किंवा उजवे, त्यांना पुढील मार्गक्रमणासाठी पर्याय निवडताना महात्मा फुल्यांनी सुरु केलेला, गांधीजीनी यशस्वीरीत्या वापरलेला आणि दुर्गापूजेत सहभागी होऊन बंगाली कम्युनिस्टांनी प्रशस्त केलेला मार्ग स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला आपल्या पोथ्या तयार कराव्या लागतील भविष्यात ज्या जागतिक विचारधारेशी जुळू शकतील पण ज्या या मातीत शतकानुशतके रुजलेल्या परंपरांचा स्वतःसाठी मुळं म्हणून वापरून घेतील. त्या मन लावून आचरणात आणाव्या लागतील.

पुढील पिढ्यांसाठी जेंव्हा त्या कालबाह्य ठरतील जेंव्हा त्यांना या कालसापेक्ष पोथ्यांचा त्रास होईल तेंव्हा ते आपण निर्माण केलेल्या पोथ्या मोडीत काढतील, कदाचित आपला तिरस्कार करतील, आपल्याला नावे ठेवतील, आपल्या पोथ्यांतील वाक्ये संदर्भ सोडून वाचून त्यांचा उपहास करतील, हे सर्व मान्य करूनच आपण आपले डबके फोडू शकू.

synthesis होण्यासाठी लागणारा antithesis हा synthesis च्या मजबूतीवरच आपले वैशिष्ट्य दाखवू शकतो म्हणून गरज आहे ती सनदशीर मार्गाने आपला लढा तीव्र करीत राहण्याची.

माझ्या विचारात कुठे विसंगती आढळल्यास तो माझ्या वैचारिक अपरिपक्वतेचा दोष समजून तो सुधारण्यास आपण आणि आपले माझ्यासारखेच इतर मित्र मला सहाय्य करतील अशी खात्री आहे.

No comments:

Post a Comment