पहिल्या भागावर प्रतिसाद देताना ब्रह्मेंनी प्राण्यांच्या बाबतीत रमणे कंटाळणे या बाबतीत ठाम विधान करता येत नाही असे मत मांडले. हे मला पूर्णपणे मान्य आहे. वानर वंशातील प्राणी, डॉल्फिन सारखे काही मासे यांच्या खेळांचा आणि सिंहाच्या पिलांचा शिकार खेळण्याचा उल्लेख ब्रह्मेंनी केला आहे. आणि पुढे या खेळांचं स्वरूप आदिम जमातीच्या सर्व्हायवल स्किलसारखं असावं ही पुस्ती देखील जोडली आहे. यावर दुमत होण्याचे काही कारण नाही.
किंबहुना त्या मुद्याबाबत माझी संपूर्ण वाक्यरचना, "आनंद आणि कंटाळा ह्या संवेदना प्राण्यांना नसतात, केवळ माणसांनाच असतात" असा ठाम निष्कर्ष सांगणारी नसून तुलनात्मक वेगळेपण सांगणारी असायला हवी होती. पूर्ण पोस्ट वाचल्यावर तशी ती आहे हे देखील कळून येते. पण तिसऱ्या परिच्छेदातील शेवटचे वाक्य सुटे वाचले तर मात्र एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो. तो टाळण्यासाठी आणि तुलनात्मकता अधोरेखित करण्यासाठी मी त्या वाक्यात "माणसांइतक्या तीव्र" हे शब्द नवीन जोडले आहेत. आता ते संपूर्ण वाक्य, "त्यामुळे आहार, निद्रा किंवा मैथुन यासारख्या नैसर्गिक प्रेरणांच्या पूर्तीमुळे होणारे सुख किंवा त्या पूर्ण न होण्यामुळे होणारे दुःख सोडल्यास प्राण्यांना आनंद, कंटाळा या सारख्या जाणीवा, माणसांइतक्या तीव्र नसाव्यात." असे बदलून माझ्या मनातील आणि संपूर्ण पोस्टच्या भावार्थाशी सुसंगत केले आहे.
- प्राण्यांना भावना असतात की नसतात?
- क्रोध, तिटकारा किंवा किळस, भीती, हर्ष, खेद आणि आश्चर्य ह्या सहा मानवी मूलभूत मानवी भावना आणि अपमान किंवा तिरस्कार, मत्सर किंवा हेवा आणि सहानुभूती किंवा अनुकंपा यासारख्या गुंतागुंतीच्या तीन मानवी भावना त्यांना स्पर्श करतात का? करत असल्यास किती खोलवर रुजलेल्या असतात?
- प्राणी शिकू शकतात का? जर शिकत असतील तर कश्याप्रकारे शिकत असतील?
- प्राण्यांनी शिकण्याच्या बाबतीत Edward Thorndike यांनी सांगितलेला Connectionism (The Law of Effect) हा सिद्धांत बरोबर आहे की Wolfgang Kohler यांनी आपल्या दोन मित्रांबरोबर मांडलेला Gestaltism सिद्धांत बरोबर आहे?
- मानवी वस्त्यांजवळ राहणारे प्राणी, पाळण्यायोग्य प्राणी, पाळलेले प्राणी, यांच्या वर्तनावर माणसांच्या संपर्कांचा काय परिणाम होतो? ते मानवी स्वभावाचे काही पैलू आत्मसात करतात का?
या सारखे मुद्दे मी पहिल्या भागात मांडले नव्हते. या बाबतीत मी थोडेफार वाचन केलेले असले तरी या पोस्टशी संबंधित नसल्यामुळे हे विषय मी टाळले होते आणि मूळ विषयाशी त्यांचा संबंध नसल्यामुळे पुढील भागात देखील हे मुद्दे माझ्या पोस्टमध्ये येतील असे मला वाटत नाही.
Jane Goodall बाईंनी चिंपांझी बरोबर राहून त्यांच्या स्वभावाचे केलेले विश्लेषण मला माहिती आहे. त्यात त्यांनी माणसांची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये चिंपांझी मध्ये आढळतात म्हणून माणसाला प्रगत प्राणी मानले तर चिंपांझी त्या प्रगतीच्या सर्वात जास्त जवळ येऊ शकणारे प्राणिसृष्टीतील एकमेव प्राणी आहेत हा त्यांचा निष्कर्ष मला माहिती आहे. त्याचबरोबर त्यांनी निरीक्षणाखाली असलेल्या चिम्पाझींना क्रमांक न देता नावे दिली. त्यांच्यात मिळून मिसळून राहून त्यांच्याशी नाते प्रस्थापित केले, त्यामुळे निष्कर्ष काढण्याची त्यांची पद्धत अशास्त्रीय होती. त्यांनी चिंपांझीना खाणे आयते देऊन त्यांच्यातील आक्रमकता वाढवली, यासारखे त्यांना स्वतःला देखील अंशतः मान्य असलेले आक्षेपदेखील मला माहीती आहेत. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणाचे महत्व कमी होत नसले तरी मानवी संपर्कात आल्यावर जंगली प्राण्यांच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढता येतो.
डिस्कव्हरी आणि ऍनिमल प्लॅनेटवर सिंहाशी मैत्री करणारी माणसे मी पाहिली आहेत. त्यांचे प्राण्यांबरोबरचे कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले भावविश्व् मलादेखील आश्चर्यचकित करते. प्रकाश आमटेंचे "नेगल" मी वाचले आहे. त्यांचे प्राण्यांबरोबरचे भावसंबंध माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या करून गेले आहेत. त्याच वेळी मला हे देखील जाणवते की हे दृष्ट लागतील आणि काळजाला हात घालतील असे भावसंबंध व्यक्तीआधारित आहेत. त्यावरून आपण वाघ सिंहांचा माणसांशी, इतर शाकाहारी प्राण्यांशी किंवा त्यांच्याच प्रजातीतील इतर प्राण्यांशी असलेल्या भावसंबंधांबाबत भाष्य करू शकत नाही. त्यातून प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या मानवी भावनांच्या अस्तित्वाबद्दल आणि त्यांच्या तीव्रतेच्या सारखेपणाबद्दल व्यक्तिनिरपेक्ष भाष्य करणे कठीण आहे अश्या मताचा मी आहे.
सापेक्ष कालप्रवाहाची सापेक्ष जाणीव म्हणजे काय हा मुद्दा स्पष्ट करण्याआधी मानव आणि प्राण्यांतील फरकाबद्दलचे असलेले माझे गृहीतक कुठून आले ते स्पष्ट करण्यासाठी मी अजून एक उदाहरण घेतो. झाडांच्या फांद्यावर उड्या मारणे, समुद्रात वेगाने पोहत हवेत उड्या मारणे, हे अनुक्रमे माकडांना आणि डॉल्फिनला आहार, निद्रा आणि मैथुन यातून मिळणाऱ्या सुखाव्यतिरिक्त आनंद देत असेल; हे जरी मान्य केले, तरी त्यांना त्या आनंदाचा कंटाळा येत नसावा असे वाटायला भरपूर वाव आहे. कारण ज्याप्रमाणे आनंद देणाऱ्या गोष्टींचा देखील नंतर कंटाळा येऊन माणूस नवीन आनंददायक गोष्टींच्या मागे धावतो त्याप्रमाणे इतर प्राण्यांचे वर्तन दिसून येत नाही. त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करून ते तितकेच आनंदी होऊ शकतात असे मला वाटते. आनंदादायक क्रियेच्या / कलेच्या वारंवारतेमुळे मानवाला त्या क्रियेचा / कलेचा येणारा कंटाळा हा एक भाग झाला. त्याशिवाय माणसात संगीताचा कान असलेले आणि नसलेले, नृत्याचा आनंद लुटू शकणारे आणि दोन्ही पायाने डावरे, चित्रकलेत गुंग होणारे आणि रेषांचा गुंता करण्यात प्रवीण रंगांधळे, शिल्पकलेत देहभान विसरणारे आणि शिल्पकलेत दगड असणारे असे विविध प्रकार दिसतात त्याप्रमाणे माकडात, डॉल्फिनमध्ये किंवा इतर कुठल्याही प्राण्यांत असे वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदात रममाण होऊ शकणारे आणि एकाच क्रियेत कंटाळा येणारे प्राणी दिसत नाहीत.
म्हणून मला असे वाटते की अतृप्त आनंद आणि अनंत कंटाळ्याची जाणीव ज्या तीव्रतेने सर्व माणसांना होते त्याच तीव्रतेने ती इतर प्राण्यांना होत नाही. आपोआप निघून चाललेल्या क्षणांची त्यांना माणसाइतकी चिंता नसते. असे का होत असावे? याचा विचार करताना मी, "कालप्रवाह सापेक्ष असणे" याची जाणीव केवळ मानवाला होत असावी हे पहिले गृहीतक मांडले आहे. आणि “ती जाणीव व्यक्तीसापेक्ष असूनही सर्व मानवात आढळते”, हे दुसरे गृहीतक मांडले आहे. याचा विचार करून पहिली पोस्ट वाचल्यास कदाचित वाचकाला आनंद आणि क्रौर्य या माझ्या मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यायला सोपे जाऊ शकते.
No comments:
Post a Comment