Monday, January 30, 2017

दाढीमिश्यांची गोष्ट (भाग १)

उमलत्या वयातील मुलांसाठी दाढीमिश्या जिव्हाळ्याचा विषय असतो. लहानपणी दुधाच्या मिश्या, मग थोडे मोठे झाल्यावर शाळेत गॅदरिंग मध्ये चिकटवलेल्या खोट्या दाढी मिश्या मुलाला उगीच मोठेपणाचा आभास देतात. मग पुस्तकातील प्रसिद्ध व्यक्तींना दाढी मिश्या काढणे सुरु होते. पुरुषांच्या चित्रावर चढवलेल्या या दाढीमिश्या मग झाशीची राणी किंवा सरोजिनी नायडू यांना पण लावल्या जाऊ शकतात. सगळे बालवीर इतिहासाच्या शिक्षकांवरचा राग असा पुस्तकांतील वीरांच्या चित्रांवर काढतात आणि आपल्या चित्रकलेच्या शिक्षकांचा पगार सार्थकी लावतात.

Image Courtesy ; Internet
मग बाबांचे दाढीचे सामान वापरून त्यातला फोम किंवा ब्रश लावायला गम्मत वाटू लागते. मग चाफेकळी अर्धी वाकवून तिला रेझरप्रमाणे वापरत तो फोम काढायला सुरवात होते. कॉलेजात गेल्यावर मिश्या असणे हे मर्दानगीचे लक्षण मानले जाते. बोलताना ज्याचा हलणारा कंठ दिसतो किंवा ज्याला राठ दाढी आली आहे तो तर कुमार किंवा युवकाऐवजी पुरुष मानला जातो. चॉकलेट हिरो किंवा चॉकलेट बॉय ही शिवी वाटू लागते. थोडे अजून मोठे झाल्यावर नोकरी लागेपर्यंत दाढी न करणे, केस अस्ताव्यस्त ठेवणे, हे बंधनमुक्त व्यक्तीमत्वाचे महत्वाचे दृश्य लक्षण वाटू लागते. जगाचे नियम झुगारायला दाढी वाढवणे हा सोपा प्रतीकात्मक उपाय असतो. त्याशिवाय तो बुद्धिमान, विचारवंत, कलाकार किंवा एकंदरीतच कलंदर लोकांचा ट्रेडमार्क आहे असे वाटू लागते. विचार करताना दाढी खाजवणे, मधे मधे मिशीवर हात फिरवणे या लकबी पण सुरु होतात.

पण मग नोकरीसाठी मुलाखतीला जायला सुरवात झाली की पहिले उतरते ते दाढीचे जंगल. कॉर्पोरेट जगतात रोज दाढी करणे सक्तीचे असते. एखादा टणक असेल तर वीकेण्डला दाढीचे खुंट बाळगतो किंवा अजून दर्दी असेल तर मग फ्रेंच कट किंवा इतर प्रकारे दाढी कोरून स्वतःची वेगळी ओळख तयार करतो. नेहमी दाढी करणाऱ्याने एखाद्या दिवशी दाढी केली नाही की तो कळकट वाटतो. याउलट नेहमी दाढी ठेवणाऱ्याने ती काढून टाकली की त्याला ओळखणे अवघड जाते. नवीनच माणसाशी बोलतोय असे वाटत रहाते. डोळ्यांवर सगळ्यात मोठा आघात होतो, तो मिशी काढून टाकल्यावर. किती का बारीक किंवा विरळ असेना पण असलेली मिशी जर कुणी निग्रहाने काढून टाकली की नाकाखालची जागा फार मोकळी वाटू लागते. उग्र माणूसही मवाळ वाटू लागतो. स्त्री पार्ट निभावणाऱ्या पुरुषाचा मेकअप अर्धा उतरवून झाला असताना त्याच्याकडे बघितल्यावर जसे वाटावे तसे काहीसे, या जुनी मिशी भादरलेल्या व्यक्तींकडे बघताना वाटू लागते.

दाढी मिशी हे पुरुषार्थाचे लक्षण कसे झाले असावे? भारतीय आणि पाश्चिमात्य पुरुषांचे व स्त्रियांचे मत कसे बनत गेले असावे? याबद्दल विचार करत राहिलो की काही गमतीशीर दुवे मिळू लागतात.

1 comment:

  1. भारी लिहिलंय.
    जाम आवडलं

    ReplyDelete