Monday, January 23, 2017

मी आणि नाविक चिरतरुणी

मला काही कळण्याच्या आधीच मी नात्यात पडलो. म्हणजे माझे रक्ताचे नातेवाईक आणि हे नाते जिच्याशी होणार होते ती, असे सगळे जण माझ्या आगमनाची वाट पहात आधीच तयार होते. मग मी एखाद्या  पुढाऱ्याप्रमाणे अगदी उशीरा या जगात दाखल झालो. आता मला तो समारंभ तितकासा आठवत नाही. पण बहुधा माझ्या आगमनानंतर सगळ्या नातेवाईकांनी माझे डोळे भरून दर्शन घेतले असावे. आणि ज्याच्यामुळे आपण आई, बाबा काका, मामा, मावशी, आजी, आजोबा झालो तो जीव कसा जीव तोडून रडतो आहे याबद्दल माझे कौतुक केले असावे. त्या सोहळ्याबद्दल बाकी काही आठवले नाही तरी त्यात माझा धाकटा भाऊ आणि ती, हे दोघेही नव्हते हे मला नक्की आठवते आहे.  

माझ्या आईवडिलांचे मी पहिले अपत्य. लहानपणी मी फार मस्तीखोर असावा. म्हणजे तसे काही ठोस पुरावे नाहीत.  पण सरकारी धोरणांवर कायम टीका करणाऱ्या माझ्या तीर्थरूपांनी, माझ्यानंतर केवळ एकाच भावंडाला जन्म देऊन झाल्यावर लगेच 'हम दो हमारे दो' चा नारा दिला. माझ्या जन्मानंतर साधारण चोवीस वर्षांनी आम्ही घर बदलल्यावर आमचे शेजारी लगोलग आमच्या मागे नवीन घरी शेजार थाटायला आले नाहीत.  मी क्रिकेट वगैरे खेळून खिडक्यांची तावदाने फोडू नयेत म्हणून सगळ्यांनी लाकडाच्या खिडक्या माझ्या जन्माआधीपासूनच बसवून घेतल्या होत्या. आमच्या घरासमोरच्या मोठ्या मैदानात गोट्या खेळण्यासाठी मी ठिकठिकाणी करून ठेवलेल्या गल्लींना (खोलगट खड्डयांना) कंटाळून शेवटी मालकाने तिथे दुसरी चाळ बांधली. इतकंच काय पण शाळेत देखील दरवर्षी शिक्षक दिनाला सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना गुलाबाचे फूल देऊनसुद्धा  शाळेने किंवा शिक्षकांनी मला कधीच प्रेमाने एकाच इयत्तेत बसवले नाही, दहावी झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला तर न मागता लगेच देऊन टाकला. या सर्वांवरून मी इतकाच निष्कर्ष काढू शकतो की लहानपणी मी फार मस्तीखोर असावा. माझ्या या मस्तीखोरपणात सगळ्यात मोठा वाटा तिचाच होता. तिनेच माझ्यातल्या कल्पनाशक्तीला पंख लावले.  ती मला आनंदी कावळ्याची गोष्ट जगून दाखवत होती. आणि तसेच जगण्यासाठी अजूनही उद्युक्त करते आहे.

मी तिच्या अंगाखांद्यावरच वाढलो. आणि आज जरी आम्हा दोघांत दुरावा दिसत असला तरी मनाने मी अजून तिचाच आहे. तिला मी काही दिले नसले तरी तिने मात्र मला भरभरून दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने मला जगाकडे बघायचं कसं ते माझ्याही नकळत शिकवलं. सुखाचा शोध घेताना समाधानी कसं रहायचं ते शिकवलं. मी शिष्योत्तम नसलो तरी तिच्याबरोबर घालवलेल्या आयुष्याचा ठसा काही प्रमाणात माझ्यावर पडला आहे.

ती फार उंच नव्हती. दिसायला सुबक सुंदर पण नव्हती. खरं सांगायचं तर ओबडधोबडच होती. पण प्रेमळ होती.
बैठी, लांबलचक पसरलेली, मंगलोरी कौले असलेली बारा अधिक दहा घरांची आमची चाळ आजही मनात घट्ट रुतून बसली आहे.

आजचं आमचं डोंबिवली म्हणजे जुन्या छोट्या छोट्या गावांचं आणि पाड्यांचं एकत्रीकरण करून झालेलं शहर. पूर्वी इथे मोठ्या प्रमाणावर शेती चालायची. अश्याच शेतात मग तिथल्या गाववाल्यांनी चाळी उभ्या केल्या आणि गिरणगावात किंवा गिरगावात जागा घेणं न परवडणारे अनेक चाकरमानी इथे राहायला आले. एक दिवस खाचरातून, चिखलातून रस्ता काढत माझे तीर्थरूप देखील इथे आले आणि इथलेच झाले. इथे आल्यावर त्यांचं लग्न झालं. आयुष्याला स्थैर्य आलं. ते माझा जन्म होईपर्यंतच टिकलं. इथेच त्यांनी आयुष्याबाबत स्वतःची स्वप्नं बघितली, त्यासाठी मन लावून झटले आणि त्यातली बरीचशी स्वप्नं पूर्ण होत असताना ते चाळीतल्या आपल्या छोट्या घरात समाधानी राहिले. मला वाटतं माझं चाळीवरचं प्रेम माझ्या वडिलांकडूनच आलं असावं.

आमची चाळ खरी बारा खोल्यांची. पण मग चाळ मालकिणीच्या नातेवाईकाने त्याच्या मालकीच्या जागेच्या हिस्स्यावर बांधण्याच्या चाळीचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने एक भिंत कमी बांधण्यासाठी आपली दहा खोल्यांची चाळ आमच्या चाळीच्या वरच्या अंगाला चिकटून बांधली. त्यामुळे आकाशातून ती एक बावीस डब्यांची लांबलचक मालगाडी  दिसत असावी.

चाळीच्या शेवटच्या टोकाला सोनचाफ्याचं झाड होतं. त्यावर चढून त्याला गदागदा हलवून आम्ही मुलं सोनचाफ्याचा सडा खाली पाडायचो. मग त्या फुलांच्या प्रत्येक पाकळीला मध्ये हलकेच दुमडून नखाने एक छोटं गोल छिद्र पाडून, त्या पाकळीला उलटं वळवून  देठात गुंफून त्याची अंगठी तयार करायचो. कश्यामुळे कोण जाणे पण आम्ही त्या अंगठ्यांना वनवासी सीतेच्या अंगठ्या म्हणायचो. अगदीच लहान असताना खराट्याच्या काड्यांचे धनुष्य खांद्यावर, त्याच खराट्याच्या काड्यांचे बाण बनियनच्या भात्यात आणि सीतामाईच्या ह्या अंगठ्या दोन बोटांच्या बेचक्यात मिरवणं हा आम्हा मुलांचा छंद होता.  शाळेत शिकवलेला घडीचा जपानी पंखा सोडल्यास या अंगठ्या ही मला जमलेली एकमेव हस्तकला होती. चाळीत समवयस्क मुली कमी होत्या त्यामुळे आम्ही बनियन चड्डी धारी चिमुकले राम लक्ष्मण, सीताहरण होऊन गेल्यानंतर सीतेला शोधायला निघाल्यासारखे दिसत असू.

त्याच चाफ्याच्या झाडावर फांद्या वठल्यामुळे दोन ठिकाणी इंग्रजी व्ही आकाराच्या बेचक्या तयार झाल्या होत्या. त्या नैसर्गिक बेचक्यात प्रत्येकी एकंच जण बसू शकत होता. रावण व्हायला कुणीच तयार नसल्यामुळे, राम लक्ष्मणांची एक जोडी लवकर जाऊन त्या बेचक्यांची जागा पकडून बसून खाली उभ्या असलेल्या बाकीच्या राम लक्ष्मणांवर शरवर्षाव करीत असे. अश्या तऱ्हेने या अभूतपूर्व युद्धाद्वारे, आम्ही राम लक्ष्मणांना 'आपुला संवाद आपणाशी' च्या धर्तीवर 'आपुलेची युद्ध आपणाशी' करण्यात भाग पाडून वाल्मिकींच्या रामायणात तुकोबा आणि मायावी गृहयुद्ध घुसडत होतो. युद्धात जो उंचावर असतो त्याची सरशी होऊ शकते हा युद्ध शास्त्राचा पहिला नियम, वेढा नीट आवळून जर उंचावरच्या शत्रूची शस्त्रास्त्रांची रसद तोडली तर आपण उंचावरच्या शत्रूला देखील हरवू शकतो हा दुसरा नियम आणि युद्ध संपल्यावर खराट्याच्या काड्या गोळा करून ठेवायच्या नाहीतर परब काकू ओरडतात हा तिसरा नियम आम्ही सगळी मुलं लहानपणीच शिकलो.

चाफ्याच्या झाडाच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं आणि चाळीच्या मागे गावठी आंब्याचं. दोन्ही झाडांची खोडे सरळसोट उंच वाढली होती. त्यामुळे त्यावर चढणे अशक्य होते. मग खाली पडलेल्या चिंचा आणि बाळकैऱ्या वेचणं हा पोराटोरांचा आवडता उद्योग होता. चिंचा कैऱ्या पाडण्यासाठी रबरी बेचक्या वापरायचा प्रयोग आम्ही एका दुपारी केला पण त्यामुळे इच्छित फळ मिळण्याऐवजी आधी तीन चार जणांची कौले फुटली मग आम्हा बेचकीधारकांची कानशिले लाल करण्याचा आनंद, प्रथम पीडित कुटुंबांनी आणि मग ज्याच्या त्याच्या आईवडिलांनी यथेच्छ लुटल्यामुळे बेचक्या पुन्हा चाळीत दिसल्या नाहीत.

चाळ बैठी होती. आटोपशीर होती. तिला गिरगावातील चाळींचा किंवा साहित्यात प्रसिद्ध झालेल्या चाळींचा नखरा नव्हता. घरं छोटी छोटी होती. इतकी छोटी होती की आमच्या अशिक्षित मालकीणबाईने टॉल्स्टॉयची "How much land does a man require?" ही कथा वाचली असावी अशी शंका मनात यावी.  प्रत्येक घराच्या मधोमध एक अर्ध्या उंचीची भिंत. तिच्या अलीकडच्या बाजूला दारातून आत शिरताच हॉल कम डायनिंग कम बेडरूम आणि पलीकडच्या बाजूला किचन कम बाथरूम. अशी साधी सोपी सरळ रचना होती. सगळा मिळून दीडशे स्क्वेअर फुटाचा पसारा की ज्या योगे अपरिग्रह हे मूल्य सगळ्या बिऱ्हाडकरूमध्ये आपोआपच रुजले. मालकीणबाईंनी चाळ बांधताना केलेल्या तडजोडीमुळे दोन घरात एक भिंत सामायिक, अशी रचना होती. त्यामुळे एका बिऱ्हाडात केलेली खुसफूस दुसऱ्या बिऱ्हाडात इतकी सहज ऐकू जायची की 'भिंतीना कान असतात' ही म्हण मुळात "भिंतीना तोंडे असतात" अशीच असावी हा माझा संशय अजूनही फिटलेला नाही.

जे आवाजाचं तेच वासाचं. संध्याकाळी एका घरात भाजीला दिलेली फोडणी, दोन्ही दिशांना, शेजारच्या किमान तीन घरात आमोद सुनांस करीत होती. जोशी अन पेंडश्यांना देखील आज परबांकडे पापलेट आहेत की बोंबील हे नुसत्या वासाने सांगता येत होते. भोईर आणि साळुंख्यांच्या घरचे लसूण देवस्थळींच्या गोडांबट वरणाला घमघमवत होते. माणसांचेच काय पण चाळीत सऱ्यावरून फिरणारे उंदीर देखील खोबऱ्याचा वास नक्की कुठल्या बिऱ्हाडातून आला ते न कळल्याने बऱ्याचदा बावीस घरे ओलांडत सऱ्यावरून उलट सुलट चकरा मारत रहात. उंदरांच्या या धावपळीमुळे, इतिहासाच्या पुस्तकातलं, शिवाजी महाराज सुरत लुटायला जाण्याचं वर्णन, "पहाडातले उंदीर धावत होते सुरती बर्फीच्या दिशेने" असं वाचल्यावर मला बराच काळ,  सुरतेच्या मोहीमेला मावळे कौलारू घरांच्या सऱ्यावरून गेले असावेत असं वाटत होतं.

प्रत्येक घरापुढे अंगण होतं. दिवाळीच्या दहा पंधरा दिवस आधी लाल मातीवाला यायचा. मग ती माती विकत घेऊन, अंगणात त्याचा एक ढिगारा करून ठेवायचा. कारखान्यात कामाला जाणाऱ्या पुरुषांना शुक्रवारी तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना रविवारी सुट्टी मिळायची. मग जसा वेळ मिळेल तसे सगळे पुरुष लोक आपापल्या अंगणातील ढिगारा वापरून अंगण सारखे करायचे. त्यावर पाणी मारून, धुणी धुवायचा सोटा वापरून ते चांगलं चोपून काढायचे. मग पुन्हा त्यावर शेण टाकून ते छान सारवून घ्यायचे. नऊ साडेनऊला झोपी जाणारी आमची चाळ त्यावेळी मात्र उशीरापर्यंत जागी असायची. कुणाचंही अंगण चोपायचं असलं तरी आम्ही सगळे बच्चेकंपनी त्याच्या मदतीला जायचो. दिवाळीत या अंगणावर सगळ्या बायका छान रांगोळ्या काढायच्या. नेहमी आईला रांगोळी काढण्यात मदत करता करता एकदा मी स्वतः एकट्याने रांगोळी काढायचं ठरवलं. अर्धी रांगोळी काढून झाल्यावर माझ्या  लक्षात आलं की अठरा ठिपके अठरा ओळीच्या माझ्या महत्वाकांक्षी रांगोळीत मी केवळ सतरा ओळीच काढल्या होत्या. आता कुठल्याही क्षणी माझ्या डोळ्यात तरंगणाऱ्या गंगा यमुनांच्या लोटात माझी रांगोळी वाहून जाणार अशी परिस्थिती तयार होत असताना, शेजारच्या दोन तीन तायांनी येऊन माझी जुनी रांगोळी भरभर आवरून पुन्हा मला अठरा ठिपके अठरा ओळी घालून दिल्या होत्या ते चांगलं आठवतंय.

आमच्या या छोट्या घरांच्या छोट्या अंगणांपुढे एक मोठे मोकळे मैदान होते. मैदानाच्या शेवटच्या टोकाला पापडीची झाडं होती. हिवाळ्यात त्याच्या पापडी सुकून चाळभर उडायच्या आणि आम्ही मुलं त्या गोळा करून त्याच्यावरचे पातळ आवरण काढून त्या खात बसायचो. चारोळीसारख्या लागणाऱ्या या पापडी खाणे हा आम्हा मुलांचा आवडता उद्योग होता. मैदानाच्या पलीकडे बांबूचं बन होतं. त्यातले बांबूचे कोवळे कोंभ काढून त्याला उलगडून त्या पानाचा किंचित खरखरीत तलमपणा, हलका पोपटी पांढरा रंग आणि ओलसर सुवास अनुभवणे हा अजून एक खेळ होता. पापडीच्या झाडाखाली जमिनीतून वर आलेले मोठे मोठे दगड होते. झाडाच्या सावलीत या दगडांवर बसून मी अनेकदा, चिंता करतो विश्वाची च्या आविर्भावात आजूबाजूच्या धुळीत काठीने रेघोट्या मारत बसायचो. पण मग मित्र मंडळी आली की ही चिंता कुठल्या कुठे पळून जायची.  

शाळेतून आल्यावर आम्ही सगळी मुलं मुली या मैदानात पडीक असायचो. फार लहान मुले पकडापकडी, शिवाजी म्हणतो, दगड की माती असले खेळ खेळायची. तर थोडी मोठी मुले विषामृत, लगोरी, डब्बा ऐसपैस, लपंडाव, चोर-पोलीस, गोट्या, आबाधुबी आणि नंतर क्रिकेट सुद्धा तिथेच खेळायची.

क्रिकेट लोकप्रिय होण्याच्या आधी आमचा आवडता खेळ होता गोट्या. रिंगण, गल्ली वगैरे खेळून दुसऱ्या कडच्या गोट्या जिंकून घ्यायच्या आणि आपल्याकडील संग्रह वाढवून जगातील गोटी सम्राट बनायचे असे आम्हा साऱ्या चाळकरी मुलांचे स्वप्न होते. त्याकाळी ऑलिम्पिक मध्ये गोट्यांचा खेळ असता आम्ही चाळकरी मुलांनी सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकच काय पण उत्तेजनार्थची प्रशस्तीपत्रकं देखील जिंकून भारतमातेला खूष करून टाकलं असतं. हळू हळू गोट्यांचं वेड निवळलं आणि त्याची जागा क्रिकेटने घेतली. सगळ्यांकडे क्रिकेटची सगळीच साधने नसल्याने, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे आम्हाला मान्य करावे लागले. कुणी बॉल आणायचं, कुणी बॅट असा सगळा मामला होता. स्टंप, बेल्स, ग्लोव्ह्ज आणि पॅड ही थेरं आम्ही केली नाहीत. फलंदाजाच्या मागे ठेवलेले तीन दगड हेच स्टंप होते. आणि त्यांची उंची फलंदाजागणिक बदलायची. ज्याची बॅट आहे तो फलंदाज असला की हे स्टंप बुटके होऊन त्याला कधी आउट होऊ द्यायचे नाहीत आणि साधनविहीन फलंदाज आला की मात्र त्यांची उंची वाढायची आणि त्या बिचाऱ्याचा डाव झटपट आटपायचा. त्या काळात तेंडुलकर नसल्याने आम्हा मुलांच्या क्रिकेटने चाळीच्या मैदानाबाहेर धाव घेतली नाही. असं असलं तरी, चाळीतल्या या क्रिकेटमध्येच, आंतरराष्ट्रीय राजकारणात सदैव वापरात असलेला, 'ज्याची बॅट तो दोनदा किंवा तीनदा आउट झाला की मगच एकदा आउट' हा महत्वाचा नियम आम्ही सगळेजण शिकलो.

याच मैदानात कठपुतळीवाला खेळ करायला येऊन जायचा. गादीतला कापूस पिंजण्यासाठी आपली धनुकली घेऊन 'टोंय टोंय' असा आवाज करत पिंजारी यायचा. गांधी टोपी आणि खाकी हाफ पॅन्ट घातलेला कल्हईवाला यायचा.  पाटीला टाकी लावून देणाऱ्या बायका पाठुंगळीला लहान बाळ बांधून यायच्या. सगळ्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे आमचे मैदान. पहाटे वासुदेव, दुपारी कडकलक्ष्मी आणि संध्याकाळी साईबाबांचे नाव घेत, धूप फिरवत आणि मोरपीसाचा झाडू डोक्यावर मारत फकीर यायचे. अमावस्येला 'अवस वाढा वो माय' म्हणत तर ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिरान' म्हणत बायका यायच्या. चाळीने कुणाला विन्मुख पाठवले नाही. या  सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे शब्द भिन्न असले तरी त्यांचा अर्थ एकंच होता.

एप्रिल महिन्यात परीक्षा आटपल्या की चाळीत वाळवणं सुरु व्हायची. लिज्जत लोकप्रिय होण्याच्या पूर्वीचा काळ असल्याने घरोघरी पापडाचं पीठ तयार केलं जायचं. कुणाकडे मीठ जास्त पडायचं तर कुणाकडे मिरी. त्याशिवाय सांडगे, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या, ताकातल्या मिरच्या, कुरडया आणि खारोड्या असा अधिकचा जिन्नस देखील बनायचा. घरात उभ्या करून ठेवलेल्या फोल्डिंगच्या खाटा मग बाहेर मैदानात यायच्या. आधी एक चादर मग त्यावर एक प्लॅस्टिकचा कागद अंथरला जायचा. त्यावर हे वाळवण मांडले जायचे. मग धूळ बसू नये म्हणून त्यावरून पुन्हा प्लॅस्टिकचा कागद पसरायचा. आणि मग ही मांडामांड उडू नये म्हणून चार कोपर्‍यावर दगड ठेवले जायचे. या कामी शेजारणी एकमेकींना मदत करायच्या. मध्ये मध्ये आम्हा पोराटोरांची लाट्या किंवा कच्चं पीठ खायला लुडबुड चालू असायची. आम्हाला दूर सारून उन्हं वर यायच्या आत कामं उरकण्याकडे त्यांचं सारं लक्ष असायचं. एकदा त्यांची कामं पूर्ण होऊन वाळवण सूर्यनारायणाच्या स्वाधीन केली की बायका आपापल्या घरी परतायच्या आणि मग गाईंनी वाळवण खाऊ नये, ओढून खाली टाकू नये म्हणून आम्ही काठ्या घेऊन त्याची राखण करत पापडीच्या झाडाखाली दगडावर बसायचो. "तळे राखी तो पाणी चाखी", ही म्हण आम्ही एकमेकांना इथेच प्रात्यक्षिकांसहित शिकवली.

एप्रिलच्या अखेरीस परीक्षेचा निकाल लागला की चाळ ओस पडायची. आमच्यासारखी गावी काहीच नसलेलया एक दोन कुटुंबांवर राज्याची जबाबदारी टाकून सगळी बच्चे कंपनी भरतासारखी आजोळी जायची. आणि मग उरलेल्यांचा वनवास सुरु व्हायचा. आजोळी गेलेले सगळे भरत आणि शत्रुघ्न  परतायचे जूनच्या पहिल्या आठवड्यात. तोपर्यंत चाळ सुस्त पडून राहायची. माझी वाचनाची आवड कदाचित या सक्तीच्या एकांतवासामुळे वाढली असावी.

जूनमध्ये शाळा सुरु व्हायचे वेध लागलेले असायचे. नवी पुस्तकं, रेनकोट किंवा लांब दांड्याच्या छत्र्या, गमबूट वगैरे नवीन खरेदी तरी व्हायची किंवा मागील वर्षीच्या वस्तूंना तेलपाणी केलं जायचं.  त्याचवेळी पुरुष माणसं  एका मोठ्या सोहळ्याच्या मागे लागलेली असायची. निळ्या, पोपटी, नारिंगी अश्या विविध रंगांची प्लॅस्टिकची मोठी कापडं आणली जायची. आणि पहिला पाऊस सुरु व्हायच्या आत पुरुष मंडळी शिड्या लावून कौलांवर चढून प्लॅस्टिकची ही आच्छादने कौलांवर अंथरत. हे मोठं जिकिरीचं काम असायचं. पाय घसरू द्यायचा नाही. कौलं फुटू द्यायची नाहीत. सुटलेल्या वाऱ्यात ते प्लॅस्टिक उडू द्यायचं नाही आणि मग ते प्लॅस्टिक दोन रांगा सोडून तिसऱ्या रांगेतील कौलांच्या खाली दाबून अख्ख्या घराला, वरुणराजाला भेटण्यासाठी तयार करायचं. इतकं करूनही कुठेतरी कौल नीट बसायचं नाही. मग पाऊस सुरु झाला की घरात ठिबक सिंचन सुरु व्हायचं. ते थांबवण्यासाठी मोठी काठी घेऊन हलक्या हाताने कौलाला खालून उचकून नीट करायला लागायचं. असं सगळं करून किमान एखादा आठवडा पाऊस झाला की मग चाळ न गळता पावसात मनसोक्त भिजू लागायची. शाळेतून येताना, वाहत्या पाण्यात गमबूट छप छप वाजवत, छत्रीतून बघताना, पागोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू देणारी आमची चाळ मोठी लोभसवाणी दिसायची.  बऱ्याच घरासमोर पागोळ्याखाली एक दोन बादल्या भरायला लावलेल्या असायच्या. मग तेच पाणी हात पाय धुवायला किंवा कधी कधी कपडे भांडी करण्यासाठीही वापरलं जायचं.  त्या काळचं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा ना.

चाळीत गणेशोत्सव वगैरे साजरा होत नसे. पण चाळीतील मुलांची नाटकं, नाच वगैरे बसवून घेण्यात माझी आई पुढे असायची. मला नाच शिकवण्यापेक्षा पांगळ्यांना नाच शिकवणं सोपं आहे आणि मी नाटकात छान भूमिका करतो हे माझ्या आईला तिथे कळलं. माझ्या नृत्यकौशल्याबद्दलच्या मातोश्रींच्या मताला माझ्या लग्नानंतर हिने दुजोरा दिला.  पण केवळ भूमिकाच नाही तर मी एकंदरीत चांगलीच नाटकं करतो असं तिचं मत आहे.

ही बसवलेली नाटकं आणि समूहनृत्य मग आम्ही गणपतीच्या दिवसात डोंबिवलीतील ठिकठिकाणच्या गणपती उत्सवात करत असू. कधी कुठल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर बांधलेल्या स्टेजवर तर कधी मंदिरात. कुठल्याही कार्यक्रमात प्रेक्षकांकडून कधीच नाराजीचा सूर उमटला नाही. त्यावरून डोंबिवलीच्या लोकांच्या रसिकतेच्या कक्षा रुंदावण्यात आणि कलेबाबतच्या धारणा सर्वसमावेशक करण्यात मी आणि माझ्या चाळकरी मित्र मैत्रिणींनी  मोठा हातभार लावला आहे, हे मान्य करून  मराठी रंगभूमी आमची सदैव ऋणी राहील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

चाळीतली बरीचशी माणसं चाकरमानी होती. पण काही जणांनी आपापले व्यवसाय देखील चालू करून बघितले. एक शेजारी दर उन्हाळ्यात कोकणातून परतताना ट्रक भरून आंबे आणि फणस आणायचे. एका चाळकऱ्याने टेलरिंगचा कोर्स पुरा करून लोकांचे कपडे शिवून देण्याची तयारी दाखवली. एक पुरोहित होते. एकाने चिट फंड चालू करून बघितला. पण बहुतेक सगळ्यांनी मराठी माणूस धंदा करताना काय काय चुका करतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायची जबाबदारी आपल्यावर आहे असे वर्तन केले. शेवटी कुणाकडे फारसा पैसा जमला नाही तरी धंदा करताना काय काय करू नये हे सांगण्याचा अनुभवजन्य अधिकार तयार झाला. हे सगळे चाकरमानी सकाळी साडेसातच्या आत घर सोडायचे. दीड दोन तास प्रवास करत मुंबई गाठायचे आणि मग कामे पूर्ण करून परतीचा प्रवास करत संध्याकाळी सात साडेसातला घरी परतायचे. चाळीत पुरुष माणसांची अशी भरती ओहोटी चालू असायची. सातच्या आत घरात हे तत्व कर्त्या पुरुषांकडूनच पाळले गेल्याने बाकीचे सगळे आपोआप घड्याळाच्या काट्यावर चालायचे.

माणसं फार धार्मिक नव्हती पण मूर्तिभंजक देखील नव्हती. कुणाकडे गजानन महाराजांची पोथी वाचली जायची तर कुणाकडे नवनाथ भक्तीसार. कुणाकडे खंडोबाची तळी भरली जायची तर कुणाकडे आठवले शास्त्री बुवांचा स्वाध्याय चालायचा. जो तो आपापल्या कुळाचाराला धरून होता आणि दुसऱ्याच्या कुळाचाराबद्दल कुणाला काही आक्षेप नव्हते. खाण्यापिण्याबाबतचे एकमेकांचे स्वातंत्र्य सगळ्यांना मान्य होते. लोक एकमेकांना धरून होते. कुणी कुणाकडून उधार उसनवार घेत नव्हते त्यामुळे फसवाफसवीचा प्रश्न नव्हता. भांडणे देखील क्वचितच व्हायची पण त्यामागे समोरच्याविषयी राग असण्याऐवजी परिस्थितीवरचा राग जास्त होता. कुणी कुणाची आय माय काढत नव्हता. काही पुरुषांच्या बोलण्यात शिव्या सहजस्वभावाचा भाग म्हणून येत होत्या पण त्या आपल्या मुलांनी देखील शिकाव्यात असा त्यांचा काही अट्टाहास नव्हता. कुणी कुणाचा दुस्वास किंवा हेवा करत नव्हते. पण एकाकडे आलेली वस्तू वर्ष दोन वर्षात बाकीच्या सगळ्यांकडे आलेली असायची. त्यामुळे रेडिओ, टी व्ही, मिक्सर, फ्रिज, टेपरेकॉर्डर, मुलांसाठी सायकली अश्या वस्तू एखाद्या लाटेसारख्या सगळ्या घरात येत गेल्या. आणि चाळीतलं समाधान कधी उतरणीला लागलं नाही.

बाकी सगळ्या बाबतीत वयं पंचाधिक शतं असणारे आम्ही बावीस बिऱ्हाडकरू, फक्त पोटे साफ करण्याच्या बाबतीत एकमेकांना पाठ लावून विरुद्ध दिशेने पाहात असू. आमच्या बारा खोल्यांचे संडास बाराव्या खोलीच्या डाव्या बाजूला तर पहिल्या दहा खोल्यांचे संडास पहिल्या खोलीच्या उजव्या बाजूला अशी विभागणी होती. इकडच्या लोकांनी तिकडे जाऊ नये असा अनाक्रमणाचा अलिखित करार आम्ही मुले कधी कधी निसर्गापुढे हतबल झाल्यामुळे मोडत असू. पण ज्याने त्याने पाणी घरून आणायचे असल्याने त्यावरून कधी भांडणे झाली नाहीत. बारा बिऱ्हाडात प्रत्येकी किमान चार डोकी या हिशोबाने दोन संडास आमच्या चाळीसाठी फार कमी होते त्यामुळे मेटाकुटीला येणे, घायकुतीला येणे, दम धरणे, धीर धरणे, प्राण कंठाशी येणे, जीव नकोसा होणे, बांध फुटणे या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ माझ्या लेखी अनेक वर्षे "रांगेत उभे रहाणे" हाच होता. तिथे उभे असलेले रांगेतले सगळेजण, आतल्या समाधिस्थ उमेदवाराला इष्टदेवतेने लवकर मोकळं करून समाधीतून बाहेर काढावं म्हणून बाहेर प्रार्थना करीत उभे राहायचे. त्याची समाधी भंग करायला कोणी मेनका उर्वशी येणार नाही या जाणीवेने कधी हे रांगेतील समाधीच्छूक उमेदवार "ठोठावा म्हणजे उघडेल" या प्रभूवचनाचा हवाला देत आतल्या व्यक्तीला बाहेरील परिस्थितीची जाणीव करून देत. सगळे उपाय थकले की मग डोळे मिटून, शांतपणे बाहेरील रांगेतच, बाराव्या घराच्या भिंतीला टेकून कधी उजवा पाय तर कधी डावा पाय मुडपून उभे रहात आणि आपली तप:साधना चालू ठेवीत. ते पाहून मुळाक्षरांच्या तक्त्यावरचा, एका पायावर उभा असलेला बगळा देखील अश्याच कुठल्या रांगेत उभा असावा असा शोध बालवाडीत जाणाऱ्या धाकट्या माझ्या भावाने लावला होता.

जेंव्हा चाळ बांधली तेंव्हा सुरवातीला या दोन्ही संडासाची दारं चांगली असावीत पण नंतर त्याच्या कड्या निखळून पडायच्या किंवा पावसाळ्यात दारं फुगायची. त्यामुळे चाळकऱ्यांकडून  नोकरीसाठी आवश्यक अश्या  "knock before you enter" या नियमाचे सक्तीने पालन आणि धंद्यासाठी आवश्यक असा "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" साठी लाथ मारण्याचा सराव या दारांनी येता जाता करून घेतला. त्यात कधी कधी कुणी खोडकर मुले आपला कार्यभाग आटोपून जाताना बाहेर कुणी नसले की दार पुन्हा घट्ट लावून, नंतर येणाऱ्या अनेकांना नशीबाच्या हवाली करून जात. आणि इतके करून जर दार उघडून बाहेर येणारा उमेदवार विडी पिणाऱ्या दोन चाळकऱ्यांपैकी असला तर बाहेर असणारे अनेक जण आपला नंबर स्वतःहून पुढच्या उमेदवाराला द्यायचे. आणि अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा आपण धीरोदात्तपणे इतरांचा विचार आधी करु शकतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे.

चाळीने सगळे बदल पाहिले.पण चाळ गांगरली नाही. उलट ती सगळ्या बदलांना समर्थपणे सामोरी गेली.  समोरच्या मोकळ्या मैदानात नवीन चाळी उभ्या राहिल्या. अंगणे आक्रसली. मातीवाला येणे बंद झाले. उरलेली छोटी अंगणे चाळीने कोब्याची करून घेतली. त्यावर गेरू लावून आपली रांगोळीची हौस भागवली. ग्रामोफोन गेले आणि टेपरेकॉर्डर आले. लाकडी मांडणी आणि त्यावरची पितळी भांडी गेली आणि अॅल्युमिनियमच्या आटोपशीर मांडणीत स्टीलची भांडी आली. स्वयंपाकाच्या ओट्याखालचा पाटावरवंटा आणि खलबत्ता जाऊन ओट्यावर मिक्सर आला. नेहमीचा कल्हईवाला जेव्हा एका मोसमात आंबे आणि इतर वेळी सोलापुरी चादरी विकायला आला तेव्हा चाळीने त्याचे देखील स्वागत केले.

चाळीने भरपूर रेडिओ ऐकला आणि टीव्ही आल्यावर त्याला देखील आपलेसे केले. सकाळी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरचे भक्तिसंगीत ऐकणारी चाळ त्याच उत्साहाने टीव्हीवरील 'दस कदम' पहात फिट राहण्याचा प्रयत्न करू लागली. मैदानातील नवीन चाळीत गुजराथी कुटुंबे आली. त्यांनी त्यांचे फरसाण आणि चादरींचे उद्योग सुरु केले. उत्तर प्रदेशचे भैय्ये आले. त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरु केला. पण त्यांच्या पैसे कमावण्यावर कुणाला असूया वाटलेली दिसली नाही. सामुदायिकरीत्या काहीही साजरी न करणारी चाळ, मुलांनी चालू केली म्हणून होळीसाठी वर्गणी द्यायला आणि बोंब मारायला लगेच पुढे आली. गुजराथ्यांच्या गरब्यात नाचायला जाणाऱ्या घराच्या लेकींना चाळीने कधी नाही म्हटलं नाही. आणि रंगपंचमीत ज्याला रंग खेळायचे नाहीत त्याला कधी चाळीने रंगवलं नाही. दिवाळीत टिकल्या फोडणारी मुले नंतर लक्ष्मी बार आणि सुतळी बॉम्ब फोडू लागली. नंतर त्यांनी तेही बंद केले, पण चाळ हळहळली नाही. नवीन लहानग्यांच्या हातात तिने त्याच कौतुकाने केपांची पिस्तुले दिली.  तरुणपणी मायकेल जॅक्सन च्या ब्लॅक ऑर व्हाईटची गाणी मोठमोठ्याने लावणाऱ्या मुलांवर देखील चाळ तितकीच खूष होती जितकी ती त्याच मुलांनी लहानपणी स्वाध्यायाच्या वेळी गीताईचा बारावा आणि अठरावा अध्याय म्हणून दाखवल्यावर होत होती. चाळ माठातले गार पाणी पिताना खूष होत होती आणि मग त्याच उत्साहाने फ्रिजमधले थंड पाणी देखील पिऊ लागली. चाळीने मुलांची समूहनृत्ये, नाटके ज्या कौतुकाने पहिली त्याच कौतुकाने तिने व्हीसीआर वर आणलेला पिक्चरदेखील बघितला. चाळीने जुन्याबरोबर नव्याचेही कौतुक तितक्याच उत्साहाने केले.

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऎका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनि

ही केशवसुतांनी मागितलेली तुतारी आमची चाळ कायमच फुंकत होती.  

रिक्षा न करता रोज स्टेशनपर्यंत  चालत जाणारे बाप मुलांसाठी सायकली आणून देताना चाळीने पाहिले. आणि मुलगा अभ्यास करत नाही म्हणून कानफाट फोडणारे बापही पाहिले. चाळीने बालमानसशास्त्राचा प्रसार झालेला नसतानाही मुले व्यवस्थित मोठी होताना पाहिली. घरातला कचरा परसदारी टाकणारी बिऱ्हाडे पाहिली आणि डुकरानी गटार उकरून घाण करू नये म्हणून पूर्ण बारा घरांची गटार रविवारी साफ करणारा चाळकरीही पाहिला. संडासाच्या कड्या निखळतात आणि मालकीण काही करत नाही म्हणून धुसफुसणारे लोकही चाळीने बघितले आणि स्वतःच्या खर्चाने कड्या लावून घेणारे चाळकरीही बघितले. चाळीने गावी जाऊन उन्हाळा साजरा करणारी मुले बघितली आणि उन्हाळी शिबिरात जाणारी देखील. "आज कुठे तुमचा नाटकाचा दौरा?" असं म्हणून लहान कलाकारांना चिडवणारे चाळकरी देखील पहिले आणि त्याच मुलांना दूरदर्शवरील किलबिल कार्यक्रमात चमकवणारे चाळकरी देखील पहिले. सायंशाखेत जाणारी मुले पहिली आणि ज्युडो, कराटे, स्विमिंगला जाणारी देखील. ऋषिस्मरण वाचून भारावून गेलेली मुले खगोल मंडळात जाऊन विश्वाचा पसारा पाहून तशीच भारावलेली चाळीने पाहिली.

आता जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा मला वाटते आमची चाळ नाविक होती. स्त्री नाविक. त्यासाठी स्वतःच्या नावेतदेखील ती कालानुरूप बदल घडवून आणत होती.  तिने आम्हा सगळ्यांचा जीवनप्रवास पाहिला. सगळ्यांना प्रवाहाबरोबर पुढे जाण्यास मदत केली. ज्यांना पैलतीरावर जायचे होते त्यांना पैलतीरावर आणि ज्यांना ऐलतीरावर केवळ पुढे जायचे होते त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यात चाळ कायम गुंग होती. तुम्ही हेच स्थळ का निवडलेत प्रवासासाठी असा प्रश्न तिने कधी कुणाला विचारला नाही. जे चाळ सोडून गेले त्यांनाही तिने तोंड भरून आशीर्वाद दिले आणि जे चाळीतच राहिले त्यांना देखील तिने समाधानात ठेवले. सोडून गेलेल्यांच्या जागी आलेल्या नवीन भाडेकरूंना देखील तिने लगेच आपलेसे केले. त्यांच्या सुख स्वप्नांत ती लगेच सामील झाली.

मागल्या दिवाळीत चाळीत परत गेलो होतो. भराव घातल्याने आमची बुटकी चाळ थोडी अजून बुटकी झाल्यासारखी दिसत होती.  एक दोन घरे बंद असल्यामुळे त्यांच्या भिंतीवरचे प्लॅस्टर उडालेले दिसत होते. त्यांच्या दारापुढे अंधार होता. पण अजूनही चाळीत स्वच्छता होती. बाकीच्या राहत्या घराच्या कौलांना आकाशकंदील टांगलेले होते. छोटी मुलं भुईचक्र, अनार, फुलबाज्या लावत होती आणि त्यांचे दादा ताई मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढत होते. कौलांवरचे पाच सात आणि तेरा काड्यांचे अँटेना केबलने कधीच मोडीत काढले होते पण आता केबलला मागे टाकणारे डिश अँटेना कौलांवर दिसत होते. माझ्या मोबाईलवर मला एक दोन नवीन वाय फाय नेटवर्क दिसत होते. माझ्या जुन्या घराच्या शेजारचे बिऱ्हाडकरू बदलले होते. त्यांच्या दारात एक मोठी ताई संस्कारभारतीची रांगोळी काढायला सुरवात करत होती. आणि तिच्या शेजारी एक छोटासा मुलगा पाण्याने भरलेले डोळे घेऊन उभा होता. ती ताई त्याला सांगत होती, "ठिपक्यांचा कागद फाटला तर काय झालं, मी शिकवते तुला बिनठिपक्यांची रांगोळी." ते वाक्य ऐकताना मला माझ्या आणि चाळीच्या अदृश्य नात्याचं शब्दरूप ऐकतोय असं वाटलं.

ठिपक्यांची असो व संस्कारभारतीची, रांगोळी काढणे महत्वाचे. जागा  किंवा साधनांची कमतरता असेल तरी आपले अंगण, आपले जीवन सुशोभित करत रहायचे. ‘जुनं ते सोनं’ असलं तरी सरसकट जुन्याला कवटाळून बसायचे नाही. नव्याला अनुभव नसतो आणि स्थैर्य नसते पण म्हणून ते आपोआप टाकाऊ नसते. त्याला फुकाचा विरोध केला तर त्यातील हिणकस गोष्टीच मोठ्या होऊन नव्यातील सौंदर्याला खाऊन टाकतात. म्हणून त्याला अनुभवी मित्राचा हात द्यायचा. जीवनाचा झरा जुन्याकडून नव्याकडे देताना तो तसाच खळाळता रहावा म्हणून आपली सगळी ऊर्जा वापरायची. जुने किंवा नवे टिकणे महत्वाचे नाही, पण समाधान टिकणे महत्वाचे.

मला खात्री आहे उद्या शहरीकरणाच्या प्रचंड वेगात आमची ही चाळ कधी पुनर्विकासासाठी पाडली  तरी तिच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतीमध्ये देखील तिचा समाधानी अक्षय आत्मा वास करत राहील आणि तिथल्या बिऱ्हाडकरूंशी आपले प्रेमळ स्त्री नाविकाचे नाते टिकवून ठेवेल.

No comments:

Post a Comment