Monday, January 9, 2017

आनंद आणि क्रौर्य (भाग ७)सर्व प्राणी स्वसंरक्षण, काम, भय आणि भूक या प्रेरणांमुळे हिंसा करतात. शिकारी प्राणी या सर्व कारणांशिवाय केवळ नैसर्गिक अंतःप्रेरणेमुळेदेखील परपीडनात्मक हिंसा करतात. आणि मनुष्य त्याहीपुढे जाऊन केवळ आनंदासाठीदेखील हिंसा करू शकतो. आनंदासाठी जेंव्हा परपीडनात्मक हिंसा केली जाते तेंव्हा त्यात स्थल,काल आणि व्यक्ती निरपेक्ष क्रौर्याचा जन्म होतो असा मुद्दा मी सहाव्या भागात मांडला.

नंतर मला जाणवले की काही जण आनंदाचा शोध हीच नैसर्गिक प्रेरणा मानतील आणि त्यामुळे आनंदासाठी केलेली हिंसा ही देखील नैसर्गिक प्रेरणांमुळे केलेली असल्याने अश्या हिंसेतदेखील क्रौर्य नाही असा मुद्दा पुढे करू शकतील. परंतु या मुद्द्यासाठी, आनंद ही माणसाच्या मनाच्या बाहेर असलेली एखादी अदृश्य वस्तू आहे असे गृहीतक धरावे लागते. माझ्या मते एकरेषीय काळासामोरे स्वसंवेद्य काळाची होणारी जाणीव हेच माणसाच्या अतृप्त असण्याचे कारण आहे. त्यातून तो अनादी - अनंत अश्या एकरेषीय आणि एकदिश काळावर मात करण्यासाठी स्वसंवेद्य काळाच्या गाठी मरून ठेवतो. यातल्या काही गाठी आनंदाच्या असतात तर काही इतर भावनांनी ओथंबलेल्या असतात. त्यातल्या आनंददायक गाठी पुन्हा पुन्हा मारण्यासाठी त्याची धडपड चालू असते. या धडपडीत त्याला सर्वात मोठा आधार मिळतो तो शारीरिक प्रेरणांचा. म्हणून काम आणि भूक या पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या शारीरिक प्रेरणांना शमविण्याच्या प्रयत्नात त्याच्यातील शिकारी जागा होतो. आणि हिंसेतून आनंद मिळाला हे कळताच आनंदासाठी हिंसा सुरु होते. म्हणजे हिंसा ही केवळ नैसर्गिक प्रेरणांमुळे होणारी कृती न राहता स्वसंवेद्य काळाची आनंददायी गाठ मारण्यासाठी केलेली कृती बनते. ही हिंसा नैसर्गिक हिंसेपेक्षा मला वेगळी वाटते म्हणून ते मला क्रौर्याची जननी वाटते.  

आता, माझ्या मते आत्मपीडनात्मक हिंसेमधून क्रौर्याचा जन्म कसा होतो ते आता लिहितो.

माणूस जरी सर्वभक्षी असला तरी त्याला आवश्यक शाकाहारी अन्न मुबलक प्रमाणात एकाच ठिकाणी मिळत नाही. छोटी आणि पुन्हा पुन्हा तुटणारी नखे, अपुरे वाढ झालेले सुळे, भलताच धीमा वेग, कमी शक्तीची घ्राणेंद्रिये, कान, डोळे आणि कमजोर स्नायू असलेली त्याची शरीररचना त्याला पूर्ण शिकारी बनवत नाही. त्याला निसर्गाने दिलेल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांबरोबर अधिकची कृत्रिम उपांगे (शिकारीसाठी शस्त्रे आणि शाकाहारी अन्न मिळवण्यासाठी अवजारे) वापरावी लागतात. मृत प्राण्याचे सडलेले मांस किंवा आजारी प्राण्याचे मांस खाऊन पचवण्यास, त्याची पचनशक्ती कमी पडते. नैसर्गिक अवस्थेत मिळणारे बरेचसे अन्न, आहे तश्या कच्च्या स्वरूपात पचवणे, माणसाला जड जाते. म्हणून शिकार करण्यापासून ते अन्न शिजवण्यापर्यंत अनेक कामांसाठी त्याला टोळी करून राहावे लागते.

मुंग्या किंवा मधमाश्यांसारख्या टोळींने राहणाऱ्या प्राण्यांचं आयुष्य तुलनेने सोपं असतं. कारण टोळीतील त्यांचं स्थान देखील निसर्गानेच ठरवलेलं असतं. शिकारी, कामकरी मुंग्या किंवा मधमाश्यांना प्रजननाची अंगे नसतात. एकंच राणीमाशी असते. प्रजनन करू शकणारे नर दुसरे कुठलेही काम करू शकत नाहीत. आणि त्यांचे काम संपले की त्यांना संपवायला शिकारी मुंग्या / मधमाश्या मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे त्यांची टोळी निसर्गाने बांधून दिलेले नियम पाळत मोठी होत जाते.  प्रचंड मोठी सभासदसंख्या असलेल्या टोळ्या बनवणं त्यांना कठीण जात नाही. टोळीत राहून प्रयोजनविरहित आयुष्य जगणं त्यांना कठीण जात नसावं.

पण माणसाच्या टोळ्या वाघ, सिंह, लांडगे, वानर यांच्यासारख्या असतात.  यातील सदस्यांचे केवळ नर आणि मादी एव्हढेच वर्गीकरण निसर्गाने करून दिलेले असते. बाकी त्यांनी टोळीसाठी कामकरी व्हावे की शिकारी की केवळ प्रजोत्पादन करणारा नर की केवळ राणी असे निर्णय निसर्ग घेऊन ठेवत नाही. या उलट निसर्ग प्रत्येक नराला आणि मादीला सर्व क्षमता कमी अधिक प्रमाणात देऊन ठेवतो. त्यामुळे प्रचंड मोठी सभासदसंख्या असलेल्या टोळ्या हे प्राणी उभारू शकत नाहीत. यांच्या टोळ्यांचा आकार कायम छोटा राहतो. इथपर्यंत माणूस आणि प्राणी सारखे असतात.पण पुढे जाऊन माणूस मात्र, निसर्गतः एकटा जन्मूनही, आणि जबाबदाऱ्यांचे वाटप निसर्गाने करून न देतासुद्धा, प्रचंड मोठ्या आकाराच्या टोळ्या उभारू शकतो.  

छोट्या आणि भांडकुदळ टोळ्यांपासून सुरवात करत माणूस मोठ्या टोळ्या उभारू कसा शकतो हा प्रवास मोठा विस्मयकारक आहे. त्याला सुरवात होते माणसाच्या जन्मापासूनच. माणसाच्या पिल्लाची गोष्टच न्यारी असते. ज्याला आपण पूर्ण वाढ झालेलं अर्भक म्हणतो ते निसर्गात स्वतःच्या हिमतीवर  जगण्याच्या दृष्टीने पूर्ण नसतं. बहुतांश प्राण्यांची पिल्ले जन्मल्यानंतर काही तासात किंवा काही दिवसातच आपले निसर्गदत्त अवयव वापरू शकतात. पण माणसाच्या पिल्लाचे कित्येक अवयव जन्मजात अवस्थेत नसतातच. ते जन्मल्यानंतर नंतर हळू हळू येऊ लागतात (उदा. दात) शरीरातील हाडांची देखील तीच अवस्था असते. नवजात अर्भकाच्या शरीरातील जवळपास ३०५ कूर्चासदृश हाडे नंतर २०६ पक्क्या हाडात बदलतात. इतकेच काय पण माणसाच्या पिल्लाचा मेंदू, अपेक्षित आकाराच्या ३०% आकाराचा असताना त्या पिल्लाचा जन्म होतो. आणि आईच्या कुशीतून बाहेर आल्यानंतर त्याची बाकीची वाढ पूर्ण होत जाते. त्यामुळे त्याला दोन पायावर उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी, पळण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी, पोहण्यासाठी, आपल्या मेंदूचा पूर्ण विकास करून घेण्यासाठी इतर प्राण्यांपेक्षा फार अधिक वेळ लागतो.

शारीरिक वाढीच्या अश्या अत्यंत संथ गतीमुळे माणसाची टोळीत राहण्याची गरज अजून वाढते. जुन्या शिकारी भटक्या टोळ्या तर कित्येकदा भटकण्याचा वेग कमी होऊ नये आणि शिकार सर्वांना पुरावी म्हणून नवजात अर्भकांना मारूनही टाकत असत, आणि वृद्धांना सोडून पुढे जात असत. टोळीत लहान आणि वृद्ध टोळीसदस्य वाढले की फिरण्याचा आणि शिकारीचा वेग कमी होतोच त्याशिवाय शिकारीचे, गोळा केलेल्या अन्नाचे वाटेकरी वाढतात. पण म्हणून त्यांना मारून टाकले तर टोळीचा आकार छोटा छोटा होत जाऊन टोळीचे फायदे मिळणे कमी कमी होत जाते.

म्हणजे ज्या अवस्थेत जन्माला आलो त्या अवस्थेत पंचमहाभूतांना सहन करण्याची ताकद नाही. निसर्गदत्त शरीरावयव वापरून शिकार करण्याइतकी ताकद नाही.  सर्वाहारी असून देखील शरीर पूर्णपणे शाकाहारी नाही आणि मांसाहारी देखील नाही.  आईच्या कुशीतून बाहेर पडताना, पुढे आयुष्यभर जे अवयव वापरायचे ते विकसित झालेले नाहीत. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी जर टोळी बनवावी तर त्यात प्रत्येक टोळी सदस्य शरीररचनेच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात एकसारखा. आणि त्याने टोळीत कुठल्या जबाबदाऱ्या उचलायच्या ते देखील निसर्गाने ठरवून ठेवलेलं नाही. आणि त्यात भरीस भर म्हणून एकरेषीय आणि अपरिवर्तनीय अश्या काळासमोर स्वसंवेद्य काळाची जाणीव. त्यामुळे अतृप्त आनंद आणि अनंत कंटाळा कायमचे मानगुटीला बसलेले. हे सगळं एकत्र बघितलं की माणसाने यातून मार्ग कसा काढला असेल आणि तो निसर्गावर प्रभुत्व मिळवण्यात थोड्याफार प्रमाणात यशस्वी कसा झाला असेल त्याचा विचार करताना मी थक्क होतो.

माझ्या मते इथून पुढे, केवळ परपीडन करणारी हिंसा करू शकणारा माणूस इतर कुठल्याही प्राण्याकडे नसलेल्या दोन गोष्टी वापरतो. एक म्हणजे अमूर्त संकल्पना आणि दुसरी म्हणजे त्या अमूर्त संकल्पनेसाठी आत्मपीडन.

No comments:

Post a Comment