Tuesday, February 2, 2016

राहुलच्या गुरुत्वाकर्षणाचे अध्यात्म

हे रसग्रहण नाही आणि ही समीक्षा देखील नाही. या दोन्ही गोष्टी कशा कराव्यात  ते मी शिकलेलो नाही. पण Rahul Bansode न्ची गुरुत्वाकर्षणाचे अध्यात्म ही दीर्घकथा वाचताना माझ्या मनात आलेल्या विचारांना मी दिलेले शब्दरूप आहे.
कथा खूप सुंदर आहे. अनेक रूपकांचा वापर करून राहुलने विविध विषयांना यात सुसंगतरित्या गुंफले आहे. वाचकांना विचार करायला लावेल असे अनेक मूलगामी विचार त्यात वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून चमकून जातात. त्यातून लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची आणि त्यातून मिळालेल्या निरीक्षणांतून व्यापक अनुमान काढण्याचा कल्पनाशक्तीची जाणीव होते. खगोल, वास्तु, काम आणि पुरातत्व इतके वेगवेगळे पदर असलेली कथा लिहिल्याबद्दल राहुलचे मनापासून अभिनंदन. माझ्यापुरतं बोलायचं तर जी कथा वाचकाला स्वतःच्या अंतरंगात आणि समाजाच्या प्रथा-परंपरात  दोन्हीकडे स्वतःचा शोध घेण्यास भाग पाडते ती कथा यशस्वी, आणि या निकषावर राहुलची कथा पूर्णपणे यशस्वी होते.
मी राहुलच्या फेसबुक पोस्ट्स अनियमितपणे वाचत असतो त्यामुळे त्यात वाचलेले काही विचार पुन्हा कथेत भेटीला आलेले पाहून इतके दिवस राहुलचे मन फेसबुकवर वाचतो होतो याची सुखद जाणीव झाली. पण याचा अर्थ ही कथा म्हणजे राहुलच्या फेसबुक पोस्ट्सचे केवळ एकत्रीकरण नाही. तिची मजा, संपूर्ण वाचूनच अनुभवता येईल. काही ठिकाणी कथा मला थोडी विस्कळीत वाटली पण विषयाचा आवाका मोठा असल्याने कदाचित अजून एक हात फिरवल्यावर हा विस्कळीतपणा गेला असता अशी चुटपूट लागली.
आता यापुढे मी जे काही लिहितो आहे ते केवळ राहुलच्या कथेमुळे मला झालेल्या जाणीवांचे शब्दरूप आहे. राहुलला या कथेतून हेच मांडायचे होते असे मी म्हणत नाही आणि कथेच्या इतर वाचकांनी माझ्या लेखनाला पूर्णपणे दूर सारून राहुलची कथा वाचली तर तिची गूढ गोडी कणभरही कमी होणार नाही. किंबहुना कथेचे शीर्षक, गुरुत्वाकर्षणाचे अध्यात्म, इतके समर्पक आहे की त्यातूनच राहुल आपल्या सगळ्यांना स्वतःचे अर्थ काढण्याचा अधिकार देतात. त्या अधिकारातून मी पुढले लिखाण करतो आहे.
स्थळाची आणि पात्रांची नावे
राहुलची स्थळ आणि पात्रांच्या नावांची निवड वेगळी आहे. कथा घडते ती नावाच्या पाटीवर पूर्णपणे पुसलेला "न" आणि अर्धवट राहिलेल्या "वा" अश्या नवापूर गावात. नाव नवापूर पण गाव विस्मृतीच्या गर्तेत. आणि पात्रांची नावे पण अशीच लक्षवेधी आहेत. जो पुरातत्वाचा विस्तृत पट गुंफतो तो आलोक म्हणजे small किंवा छोटा. जो नशेत घडा घडा बोलतो आणि एरवी नम्र असतो- आलोपच्या कामात पूर्ण मदत करतो तो प्रयंक म्हणजे आनंदी प्रयत्न. कृतंतीचा अर्थ मला नाही कळला. पाताळातली एक नदी म्हणजे उन्मुक्त शाल्मली. आणि समाजाच्या रीतीविरुद्ध कामसुख मागणारा तिचा प्रियकर अरीत.
खगोल
विज्ञान कथा सोडल्यास याआधी खगोल शास्त्राचा  कथेत वापर झालेला मी पाहिला नव्हता. आणि मानवी संबंधांवर - उत्क्रांतीवर भाष्य करणाऱ्या कथेत असा वापर बहुदा हा प्रथमच. त्याबद्दल राहुलचे अभिनंदन.
पण त्यात थोडी तपशिलात चूक झालेली दिसली. धनु राशीत मृग नक्षत्र येत नाही तर तिच्यात येतात पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा ही दोन नक्षत्रे. मृग नक्षत्र येते थोडे वृषभ आणि थोडे मिथुन राशीमध्ये. पण ही गडबड भारतीय खगोलशास्त्राच्या इतरांपेक्षा असलेल्या वेगळेपणामुळे होऊ शकते. पाश्चात्य खगोलशास्त्रात वापरतात तो शब्द आहे constellation. तिकडे नक्षत्र नाहीत. फक्त बारा zodiac signs. पण भारतात मात्र बारा राशीमध्ये असतात सत्तावीस नक्षत्रे. त्यामुळे प्रत्येक राशीत येतात दोन-सव्वादोन नक्षत्रे. पण कथेत येणारा धनु राशीचा एक अस्थानी उल्लेख सोडल्यास पूर्ण कथा इंग्रजीत ज्याला Constellation of Orion किंवा मराठीत ज्याला मृगशीर्ष नक्षत्र म्हणतात त्याबद्दल आहे हे कळते. मला वाटतं राहुलने मृगशीर्ष हे भारतीय नाव न वापरता Orion हे नाव वापरलं असतं तर कथेतल्या धनुर्धाऱ्याच्या उल्लेखाशी सुसंगत झालं असतं.
मृगशीर्ष नक्षत्र म्हणजे कल्पना करायची की एका काचेच्या टेबलावर हरीण उभे आहे आणि आपण त्या हरणाकडे टेबलाखाली उताणे झोपून बघतोय. मग आपल्याला दिसतात ते चार पाय, त्रिकोणी डोकं, व्याधाने मारलेला आणि पोटात शिरलेला बाण आणि त्या बाणापासून खाली सरळ रेघ मारली तर दक्षिण आकाशातला सर्वात ठळक तारा व्याध (इंग्रजीमधल्या Orion Constellation मधला Sirius).
भारतीय रूपकानुसार मृग बनलाय वेगवेगळ्या ताऱ्यांनी आणि व्याधाचा आहे एकच तारा. याउलट पाश्चात्य रूपकानुसार मृग कुठे नाहीच. आपला मृग म्हणजे त्यांचा Orion हा स्वतःच धनुर्धर आणि आपला व्याध म्हणजे तिकडल्या धनुर्धराचा कुत्रा. सोयीसाठी मी डावीकडे मृगशीर्ष आणि उजवीकडे Orion ची रेखाकृती खाली देतो आहे. ती बघून कल्पना थोडी अधिक स्पष्ट होईल आणि हे देखील कळेल की या धनुर्धाऱ्याचा धनु राशीतील धनुर्धाऱ्याशी काहीही संबंध नाही.
डावीकडे मृगशीर्ष आणि उजवीकडे Orion



भूगोलावर खगोल
राहुलच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे (पृथ्वीच्या) भूगोलावर (आकाशीच्या) खगोलाची पूर्वजांनी केलेली वास्तुरचना. ही कल्पना मराठी कथेत संपूर्णतः नवीन असली तरी जगाच्या पाठीवर प्रत्यक्षात मात्र मानवी इतिहासात अनेक ठिकाणी आढळून येते. इंग्लंडमधले स्टोनहेंज हा त्याचाच एक नमुना आहे. तर मेक्सिकोच्या टेउटीव्हाकान (Teotihuacan) येथील पिरामिड्सची रचना आणि इजिप्तच्या गीझा येथील पिरामिड्सची रचना,  मी वर दाखवलेल्या Orion च्या कमरपट्ट्यातील तीन ताऱ्यांना, आपल्या पूर्वजांनी पृथ्वीवर वसवण्याचे उदाहरण आहे.
ग्रीकांचा Orion हा इजिप्शियनांचा Osiris नावाचा देव. त्याच्या सेट नावाच्या भावाने राज्यलालसेने त्याला मारून टाकले. मग त्याच्या इसीस नावाच्या बायकोने त्याच्या शरीराचे तुकडे जोडले. पण लिंग काही सापडेना. मग तिने सोन्याचे लिंग बनवले आणि वडिलांनी दिलेल्या दिव्य शक्तीच्या सहाय्याने सोन्याच्या लिंगासकट त्याला जिवंत करून त्याच्याकडून होरस नावाचा सर्वशक्तिमान पुत्र प्राप्त करून घेतला. ओसिरीसच्या मूर्तीचे पाय ममीच्या पायांसारखे कापडात गुंडाळलेले दाखवतात.
अश्या या ओसिरीसचे कामच मृत्युनंतरचे जीवन सांभाळणे. म्हणून इजिप्शियन राजांनी त्याच्या कृपाप्रसादासाठी पिरामिड्स बांधले. त्यात स्वतःचे मृत शरीर ममीरूपात ठेवले. आपल्या पिरामिड्स मधील हवेचे झरोके ओसिरीस च्या दिशेने ठेवले. आणि पिरामिड्सची रचना केली ती ओसिरीसच्या कमरपट्ट्यातील तीन ताऱ्यांप्रमाणे.
राहुलच्या कल्पनाशक्तीचा सुंदर अविष्कार म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी केलेल्या पिरामिड्सच्या रचनेला भारतीय करून राहुल तिथे उभी करतात देवळे. या देवळात मूर्ती नाहीत तर गाभाऱ्यात आहे निर्मितीच्या नैसर्गिक क्रियेत गुंगलेली प्रणयी युग्मशिल्प. पिरामिड्स ऐकवतात पूर्ण जीवन संपवून निघून गेलेल्या माणसाची मृत्यूवर विजय मिळवण्यासाठीची प्रार्थना तर राहुलची देवळे सांगतात नवीन जीव जन्माला आणण्यासाठी प्रेमी जीवांनी केलेय रतीक्रीडेची कहाणी. दोन्हीत भूगोलावर खगोल अवतरलाय पण दोन्हीत आहे जीवनाची दोन अंतिम टोके. ह्या कल्पनेसाठी राहुलना मनापासून सलाम.
कामप्रेरणा आणि तिचा अविष्कार
राहुल या कथेत जिला आपण नैसर्गिक म्हणतो त्या कामक्रीडेबद्दल तर बोलतातच पण जिला अनैसर्गिक समजले जाते त्या समलिंगी संबंधांबद्दल देखील वेगळे विचार मांडतात. त्यातील, संस्कृती जेंव्हा तिच्या परमोच्च शिखरावर असते तेंव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला हानी न पोहोचवता स्वतःच्या शारीरिक आनंदाची केलेली पूर्तता आणि रतिक्रीडा यांचा संबंध चिंतनीय आहे. त्याशिवाय, कामक्रीडा शिल्पात कोरून ठेवणारी देवळे म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या साठी करून ठेवलेले त्यांच्या संस्कृतीचे रेकोर्डिंग अशी एकटीदुकटी विधाने देखील नवीन विचारांची दिशा मोकळी करतात.
कामप्रेरणा आणि गुरुत्वाकर्षण
गुरुत्वाकर्षण हे वस्तूवर कार्य करणारे एक बल आहे की तो वस्तूचा एक गुणविशेष आहे याबद्दल भौतिकशास्त्रज्ञात अजून एकमत नाही. त्याचे मोजक्या शब्दातील वर्णन आईनस्टाईनच्या जनरल थिअरि ऑफ रीलेटीव्हीटीप्रमाणे करायचे तर वस्तुमानाच्या केवळ अस्तित्वाने तयार झालेला गुणधर्म असे करावे लागते. तसेच कामप्रेरणा हे देखील स्त्री पुरुषांवर काम करणारे एक बाह्य आकर्षणबल आहे की तो स्त्री पुरुषांच्या केवळ अस्तित्वाने किंवा त्यांच्या मनात येणाऱ्या कामविषयक विचारांच्या अस्तित्वाने तयार झालेला गुणधर्म आहे याकडे राहुल आपले लक्ष वेधतात असे मला वाटते.
शाल्मलीकडे अरीत ज्या सुखाची मागणी करतो आणि जी तिला अयोग्य वाटते, तिचा उच्चार अरीतने केल्यामुळे त्या मागणीचे अस्तित्व शाल्मलीच्या मनात तयार होते आणि मग देवळातल्या, टप्प्या टप्प्याने उत्तान होत जाणाऱ्या शिल्पांकडे बघताना ते काल्पनिक अस्तित्व मूर्तरूप धारण करून शाल्मलीसमोर उभे राहते. दोन दिवसाच्या सौजन्यपूर्ण मैत्रीमुळे आणि त्यात उन्मनी अवस्थेला पोहोचवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शाल्मली त्या अस्तित्वाला जिवंत करते. अरीतची अयोग्य वाटणारी मागणी शेवटी आपले अस्तित्व शाल्मलीच्या मनातून, देवळातल्या शिल्पातून आणि उन्मनी अवस्थेतून जिवंत होते. हे सगळे अध्यात्म राहुलने शब्दाच्या सहाय्याने कसे उलगडले आहे ते वाचूनच समजेल.
इतका सगळा अनुभव राहुलने मला दिला म्हणून त्याचे आभार प्रकट करून त्याला त्रास देण्याऐवजी, त्याच्या लेखनामुळे माझ्या मनात आलेले विचार त्याला वाचायला लावण्याचा त्रास थोडा सुसह्य वाटेल असे गृहीत धरून मी चालू केलेला लेखनप्रपंच संपवतो. राहुलना त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment