Tuesday, September 3, 2019

भाजप ३०० पार

भाजपच्या ऐतिहासिक विजयाच्या निकालानंतर फेसबुकवरील मित्रांच्या प्रतिक्रिया वाचतो आहे.

अनेक भाजपविरोधक मित्र या निकालाने दुःखी आहेत. त्यांच्यापैकी काहींना या निकालात भारतीय जनतेचा ढासळलेला बुध्द्यांक दिसला. तर काहींना भारतीय जनतेला विकासापेक्षा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा महत्त्वाचा वाटला म्हणून विषाद वाटलेला पाहिला. काहींना हा हिटलरसदृश सामूहिक संमोहनाचा प्रकार वाटला. काहीजण भाजपचे अभिनंदन करुन शांत बसले तर काहींनी नाझी सलाम न करणाऱ्या अॉगस्ट लॅण्डमेसरचा फोटो शेअर केला. काही मित्रांनी भारतीय जनतेबद्दल काहीही भाष्य न करता आपण भाजपविरोधी का आहोत त्याची कारणमीमांसा मांडली.

सगळ्या प्रतिक्रिया विचारांना प्रवृत्त करणाऱ्या होत्या पण यातल्या तीन प्रतिक्रियांनी माझ्या डोक्यात विचारांची अनेक चक्र फिरवली. आज त्यातल्या एका प्रतिक्रियेने माझ्या मनात उमटवलेले तरंग लिहितो. बाकीच्यांबद्दल जसा वेळ मिळेल तसं लिहीन.

एका मित्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डोंबिवलीतील स्वयंसेवक श्री. बाळासाहेब खरे यांच्या निरलस वृत्तीबद्दल आणि भाजपच्या या विजयात संघाच्या अशा अनेक निस्वार्थी स्वयंसेवकांचा वाटा आहे अशा अर्थाची पोस्ट लिहिली. त्या पोस्टचा शेवट होता की आज जर बाळासाहेब भेटले तर ते मोदी विजयामुळे फार हुरळून न जाता सायंशाखा लावण्याचं आपलं काम करायला निघतील.

पोस्ट अतिशय हृद्य आहे. आणि मी थोडा हळवा असल्याने वाचताना माझ्या घशात आवंढा दाटून आला.

पण मग मला जाणवलं की, माझे सासरे देखील असेच आहेत. रोज सकाळी उठून कुणी पहात असो किंवा नसो, त्यांची देवपूजा अगदी साग्रसंगीत तास दीड तास चालते. त्या देवाने त्यांच्या कित्येक इच्छा पूर्ण केलेल्या नाहीत, त्यांना कधी दर्शन दिलेलं नाही, तरीही त्यांची पूजा नियमबरहुकून चालते.

मग मला आठवले पुलंच्या असामी असामी मधील धोंडो भिकाजी जोशींचे कोकणातील कीर्तनकार काका. ज्यांच्या किर्तनाला कित्येकदा फक्त गाभाऱ्यात कोदंडधारी राम आणि बाहेर स्वतः काका इतकेच लोक असायचे. तरीही किर्तनात खंड पडला नाही.

मग मला आठवले माझ्या कुलस्वामिनीचे मंदिर. जिथे रोज ठरलेल्या वेळी देवीची साग्रसंगीत पूजा होते. पडदा लावून देवीला नैवेद्य दाखवला जातो. बाहेर किती भाविक आहेत याने काही फरक पडत नाही. आणि सबंध भारतात अशी अनेक देवळं असतील की जिथे बाहेर भाविक असो किंवा नसो, पुजारी नित्यनेमाने दिवाबत्ती आणि आरती करत असतील.

मग मला जाणवलं की आपल्या नियमांप्रमाणे काम करत राहणे ही भारतीयांची वृत्ती असावी. अगदी प्रत्येक कामात जरी वापरता नाही आला तरी 'कर्मण्ये वाधिकारस्ते'चा सिद्धांत भारतीय किमान देवाच्या बाबतीत तरी पाळताना दिसतात. संघाने त्याचा वापर करून, देवाऐवजी भारतमाता आणली. परिणामी अनेक व्यक्तींना आपल्यातील निरलस आणि निस्वार्थी पैलू जगापुढे मांडता आला.

फक्त यात एक गडबड होते. ज्याप्रमाणे देवाने दर्शन द्यावे, नैवेद्य खावा म्हणून कुणीच नामदेवासारखा हट्ट धरत नाही, त्याप्रमाणे बाळासाहेब खरेंसारखे अनेक आदरणीय कार्यकर्ते आपल्या कामाच्या परिणामाची फार काळजी न करता आपल्या नित्यनेमाला पूर्ण करत राहतात.

इथपर्यंत पोहोचल्यावर माझं मनात अजून एक विचार आला. जर आपल्या कार्याचा संस्था टिकण्यासाठी काय फरक पडतो आणि अशा टिकलेल्या संस्थेच्या शीर्षस्थानी कोण आलं आहे याबद्दल उदासीन राहून आपल्या नित्यनेमाला लागणे हा भारतीयांचा आत्मा आहे तर मग कदाचित इतकी सारी परकीय आक्रमणे होऊनही आपली संस्कृती टिकून कशी राहिली? हे कोडं सुटतं.

आता मुद्दा असा आहे की जर हा आपल्या संस्कृतीचा आत्मा असेल तर तो बदलता येणं कठीण आहे. किंबहुना अशक्य आहे. मग या आत्म्याला लोकशाहीच्या नवीन आकृतीबंधात बसवायचं कसं? कारण लोकशाहीत जीवन प्रवाही असून दर पाच वर्षांनी आपल्याला राज्यकर्ता निवडायचा असतो. त्यामुळे निरलस कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थ विसरले तरी त्यांनी सामाजिक स्वार्थ विसरून चालणार नाही. आपला राज्यकर्ता कोण आहे आणि तो आपण टिकवलेल्या संस्थेचा, संस्कृतीचा वापर करून या देशावर, या राष्ट्रावर कोणत्या धोरणांची अंमलबजावणी करतो आहे याबद्दल या कार्यकर्त्यांनी उदासीन असून चालणार नाही. देव नैवेद्य खाणार नाही. कदाचित एखादा निस्वार्थी राज्यकर्ताही सत्तेचा मलिदा खाणार नाही. पण देव आणि राज्यकर्ता यांतला मोठा फरक म्हणजे देवाला निवडून यायचं नसतं. त्यामुळे त्यालानिवडणुकीचा खर्च नसतो. पक्ष चालवायचा नसतो, आर्थिक लागेबांध्यांची गरज नसते. मानवी राज्यकर्त्याला मात्र या सगळ्या गोष्टी लागू असल्याने देवासारखं नैवेद्य निरपेक्ष राहणं कायम जमेल याची खात्री नाही.

त्यामुळे भारतीय समाजाच्या आत्म्यावर आधारित जे मॉडेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वापरून भाजपला विक्रमी विजय मिळवून दिला त्या मॉडेलमधील असंख्य आदरणीय स्वयंसेवकांना आपले कार्यक्षेत्र राजकारण नाही ही माहित असल्यामुळे त्यांनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही तरी, राजकारणातील खाचाखोचा वापरून राज्यकर्ते झालेल्या आपल्या सहकाऱ्यांबद्दल त्यांना उदासीन राहून चालणार नाही. अन्यथा भारतीय संस्कृतीचा अक्षय आत्मा, संस्कृती टिकवण्यात यशस्वी होईल पण तो कायम अत्याचारी राज्यकर्त्याला हरवण्यासाठी अवताराची वाट पहात राहील.

आज राज्यकर्ता अत्याचारी नाही, म्हणून अत्याचारी राज्यकर्ता कधीच येणार नाही अशी समजूत अतिशय भाबडेपणाची ठरेल. त्यामुळे अत्याचारी राज्यकर्ता कधीच येऊ नये यासाठी भारतीय समाजाला आपल्या निस्वार्थी वृत्तीत थोडा बदल करावा लागेल. वैयक्तिक निस्वार्थ सर्वोच्च ठेवून सामाजिक बाबतीत आपल्याला थोडं स्वार्थी व्हावं लागेल.

संसदीय लोकशाही ही नवीन संकल्पना आहे. तिला राबवताना भारतीय समाजाच्या मूळ आत्म्याला धक्का न लावता आपण योग्य ते संस्कार नवीन पिढीवर करू शकू तर मागील पिढीतील बाळासाहेबांसारख्या अनेक निरलस आणि निस्वार्थी व्यक्तींच्या कार्याचं चीज होईल.

No comments:

Post a Comment