Wednesday, September 4, 2019

इतिहासाची पुनरावृत्ती

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर फेसबुक असतं तर किती वेगळं चित्र दिसलं असतं.

सतीबंदीवरची भद्र लोकांची अभद्र मतं राजा राममोहन रॉयना जितकी ऐकू आली त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात ऐकू आली असती. आणि सतीसमर्थकांनी रॉयविरूध्द जनमत एकत्र करून त्यांना बिनशर्त माफी मागायला लावली असती.

नेहरू सुभाष संबंधांबद्दल उडणाऱ्या अफवा बघून सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेला 'चलो दिल्ली' ऐवजी 'चलो घर' म्हणून बरखास्त तरी केले असते किंवा मग 'तुम मुझे खून मत दो क्यूंकी उससे मै तुम्हे केवल अंग्रेजोंसे आजादी दे सकता हूं, तुम्हारे अज्ञानसे नही |' असं म्हणत अज्ञातवास स्विकारला असता.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? किंवा पुनश्च हरिओम सारख्या अग्रलेखांवर आम जनतेची मतं. गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक साजरी करण्यावरून केवळ ब्रह्मवृदांतंच नाही तर जनसामान्यांत उठलेला गदारोळ टिळकांना अधिक तीव्रतेने ऐकू आला असता. आणि कदाचित त्यांनी 'कायमचा रामराम' असा एखादा अग्रलेख लिहून केसरीला टाळं ठोकलं असतं.

सावरकरांची जन्मठेप व त्यानंतरच्या सशर्त सुटकेच्या बातम्या, गाय हा उपयुक्त पशू आहे सारख्या त्यांच्या विधानांवर आणि 1857 चे स्वातंत्र्यसमर सारख्या पुस्तकांवर वाचकांची मते त्यांना लगोलग मिळाली असती. आणि सरकारने लादलेल्या शर्तींचा भंग करून पोहत जाऊन त्यांनी अंदमानचे काळेपाणी गाठले असते.

पुणे करार. गोलमेज परिषदा. दांडी यात्रा. असहकार आंदोलन. फाळणी. पाकिस्तानला दिलेले पन्नास लाख. हिंसाचाराचा आगडोंब यासारख्या प्रत्येक घटनेवर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आपण 'पराई पीड जाणत नाही' म्हणून गांधीजींनी स्वतःला 'वैष्णव जन' मानणं सोडलं असतं.

चवदार तळे, पुणे करार, मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, निवडणुकीतील पराभव, धर्मांतर यासारख्या घटनांवर आपल्या विरोधकांच्या अनुयायांची टोकाची मतं आणि स्वतःच्या मूक अनुयायांना गतकालीन मानसिकतेला सोडताना होणारा प्रचंड त्रास पाहून तो महान मूकनायक हतबल झाला असता की अधिक त्वेषाने लढला असता?

जुनागढ आणि हैदराबाद येथील सरकारी समर्थनाने आणि काश्मीरबाबतीत पाकिस्तान समर्थनाने चालणाऱ्या पेड ट्रोल्सच्या पोस्टचा मारा सहन न होऊन पोलादी पुरूष भारतीय एकीकरण व्हायच्या आधीच वितळला असता.

एडविनाची उडवली जाणारी खिल्ली, नियतीशी करारच्या भाषणावरील लोकांची मते, अणुऊर्जा, शिक्षण, आय आय टीची स्थापना, धरण प्रकल्प यावर प्रस्थापितांची आणि विस्थापितांची मते ऐकून पंडीतजी पुन्हा भारत एक खोज लिहायला बसले असते.

कधी कधी वाटतं मार्क झुकरबर्गच्या आईबाबांनी मार्कला जन्म देण्याची घाई न केल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली आहे. नाहीतर आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या समाजबांधवांना रोजच्या रोज फेसबुकवर हाणून आणि नेत्यांना कायम तोंडघशी पाडून आजच्या पिढीला पारतंत्र्यात जन्माला घातलं असतं.

फोडा आणि झोडा हे ब्रिटिशांचं राजकारण नव्हतंच हे मला फेसबुकमुळे कळलंय. फोडा आणि झोडा ही भारतीय प्रवृत्ती आहे.

No comments:

Post a Comment