Tuesday, September 3, 2019

मॅग्ना कार्टा

बाईक आणि सायकल चालवताना वळणावर सिग्नलला भलत्या ठिकाणी उभं राहून मी अनेक कार, बस आणि ट्रकवाल्यांना त्रास दिला आहे हे मला कार चालवायला शिकल्यावर समजलं. रस्त्यावरच्या कमीत कमी फटीतून पुढे घुसणारे बाईकवाले झुरळांसारखे आहेत असं मी बायकोला गमतीने म्हणतो. त्यावर बायको म्हणते की हे तुला बाईक चालवताना बरं आठवत नाही, तेव्हा कसा तू ही पुढे पुढे जाण्यासाठी धडपडत असतोस. आणि मग मी खदाखदा हसतो.

आज सकाळी क्लासला बाईकने येत होतो. उशीर झाला होता. मोठ्या सिग्नलला पुढे भरपूर बसेस ट्रक्स आणि कार्सची गर्दी होती. सिग्नल बदलला असता तरी मी तिथे पोचेपर्यंत पुन्हा लाल झाला असता. क्लासला उशीर होत होता. म्हणून कार्स ट्रक आणि बसेसमधल्या मोकळ्या सुटलेल्या रस्त्याच्या सांदीकोपऱ्यातून बाईक काढत एकदम पुढे जाऊन उभा राहिलो. उजव्या टर्नच्या बाजूला उभा होतो.

सिग्नल पडला. मी चटकन पुढे निघालो. पण त्यामुळे माझ्या डाव्या बाजूला असलेल्या कारचा चालक नवशिका असावा. त्याला उजवीकडे वळायला त्रास झाला. ती कार बंद पडली. मग पुन्हा स्टार्ट करण्यात वेळ, तोपर्यंत मागच्या गाड्यांनी हॉर्न वाजवणे वगैरे साग्रसंगीत झालं. मी पुढे निघून गेलो. मागचा गोंधळ ऐकू येत होता. त्या कारवाल्याने कदाचित मला शिव्या घातल्या असतील किंवा नसतील पण मला त्या मनात ऐकू आल्या.

आज मी कार चालवत असतो तर मी झुरळवृत्तीबाबतचं माझं मत अजून घट्ट केलं असतं. पण आज मी बाईक चालवत होतो त्यामुळे मी स्वतःच्या वागण्याचं दुबळं समर्थन करत होतो.

आणि मला एकाएकी आपल्या राजकीय परिस्थितीचं एक सूत्र सापडलं. कुठलाही पक्ष विरोधात गेला की वेगळा वागतो आणि सत्तेत असला की वेगळा वागतो. परिणामी आपला समाज आहे तिथेच गोलगोल फिरत रहातो कारण झुरळं संपत नाहीत. कारवाले बाईकवर बसले की सांदीकोपऱ्यातून पुढे सरकतात आणि बाईकवाले कारमधे बसले की आडव्या तिडव्या गाड्या लावून रस्ता अडवतात. आणि हेच कारवाले पुन्हा बाईकवर आले की पुन्हा झुरळ होतात. जहॉं शुरु वहॉं खतम् वाली ही दास्तान मला मग फारशी अजीब वाटेनाशी झाली. लोकंच असे तर त्यांचे पक्षही तसेच. अजीब काय त्यात?

मग मला एकाएकी ब्रिटनच्या मॅग्ना कार्टाची आठवण झाली. त्यातही राजा आणि पंचवीस सरदार स्वतःच्या सोईने कधी कारवाल्यांसारखे तर कधी बाईकवाल्यांसारखे वागत होते. पण शेवटी त्यातील कलमांना 1297 मधे इंग्लिश कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यातही कौतुकास्पद गोष्ट ही की त्यानंतर कुणी सोयीस्कर वागण्यासाठी आपद्धर्माचं तत्व वापरलं नाही. सरंजामी व्यवस्था मागे पडली आणि नामधारी राजघराण्याखाली लोकशाही आली पण मॅग्ना कार्टाची तत्वे पाळण्यापासून ब्रिटन फार ढळला नाही. कदाचित हेच त्यांच्या विश्वविजयाचं मूळ कारण असावं. ज्या वर्तनाने समाजाची प्रगती होत नाही उलट एकाची मनमानी होते त्याविरुद्ध कायदा बनवणे. तो बनताना संघर्ष झाला तर अटीतटीचा करणे. पण संघर्षांत एक बाजू जिंकली तर हरलेल्या बाजूनेही नंतर तो कायदा पाळणे. परिणामी गोल गोल फिरत रहाणाऱ्या इतर समाजांच्या तुलनेत ब्रिटन महासत्ता न बनता तरंच नवल होतं.

माझा हे निरीक्षण आणि त्यावरचा निष्कर्ष कुणाला पटो की न पटो, मी मात्र आता बाईकवर असताना झुरळासारखं न वागण्याकडे आणि कारमध्ये असताना कार आडवीतिडवी उभी न करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देईन.

No comments:

Post a Comment