Tuesday, September 3, 2019

मंदीचे फायदे

वर्गात असताना नोटिफिकेशन्सचा त्रास होऊ नये म्हणून मी सर्व मेसेजिंग अॅप्सना म्यूट करून ठेवतो. त्यामुळे मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा जाऊन कुणाचे मेसेज आले आहेत का ते बघणं हा एक नेहमीचा कार्यक्रम असतो.

काल सकाळी क्लासला जायची तयारी करत होतो. पाच मिनिटं होती. म्हटलं जरा इनबॉक्स चेक करुया. तसाही तो थंड असतो पण तितकंच नित्यकर्म केल्याचं समाधान. माझा स्वभावच तसा आहे. नियम म्हणजे नियम. भले इनबॉक्स थंड का असेना, पण आपण ठरलेल्या वेळी बघावं.

आज जर चौदावं शतक असतं तर माझा निष्काम नियमबद्धतेचा हट्ट बघून साक्षात विठुमाऊलीने संतशिरोमणी नामदेवांना माझा आदर्श देऊन नैवेद्य खाण्याचा आपला हट्ट सोडायला सांगितला असता. पण माझ्या आईबाबांच्या लग्नाचा मुहूर्त नेमका विसाव्या शतकातला निघाल्याने नामदेवांना आदर्श मिळाला नाही आणि विठुरायाला नैवेद्य खावा लागला.

हा तर मी काय म्हणत होतो, मी नियमाप्रमाणे इनबॉक्स बघायला गेलो आणि अहो आश्चर्यम्! फेसबुकवरील एका सुंदर खाशी सुबक ठेंगणीचं (सुंखासुठे) नाव वर आलं होतं. या मैत्रिणीला कधी प्रत्यक्षात भेटलेलो नसल्याने आणि फेसबुकवर तिने वरसंशोधनासाठी असतो तसा पूर्णाकृती फोटो टाकलेला नसल्याने तिच्यासाठी ठेंगणी हे विशेषण लागू होतं की नाही ते माहिती नाही. पण ज्याप्रमाणे पितांबर पिवळे असते, नीलांबर निळे असते त्याप्रमाणे सुंदर खाशी सुबक म्हटलं की ठेंगणी म्हणणे क्रमप्राप्त आहे, म्हणून तसंच म्हणून पुढे जातो.

या मैत्रिणीला फोन नंबर कधी आणि कशासाठी दिला होता ते काही आठवेना. पण आज नामदेवाप्रमाणे माझ्यावरही प्रसन्न व्हावं असं विठोबाला वाटलं असावं हे जाणवून मी हवेतल्या हवेत विठोबाला नमस्कार केला. जुन्या मराठी चित्रपटातील संतलोक अभंग गाताना जशी गिरकी मारतात तशी गिरकी मारली आणि कृतकृत्य मनाने फोन हातात घेतला. 'भगवानके घर देर है अंथेर नही है' हे गाणं म्हणत माझी बोटं व्हॉटस अॅपकडे झेपावली.

नोटिफिकेशन म्हणत होतं सुंखासुठे ने मेसेज डिलीट केला आहे. हे रे काय देवा? असा कसा तू निर्दयी झालास? एका कळीचं फूल होण्याआधीच का बरं उखडून टाकलंस? असा कसा तू निष्ठूर झालास? एक स्वप्न पडण्याआधीच तू का बरं भंग पाववलंस?

पाववलंस बरोबर की पावलंस बरोबर की भंगवलंस बरोबर ते मला कळेना, म्हणून मी हताश होऊन मेसेज उघडला. त्यात 'Good morning Anand' हा मेसेज दिसला आणि त्याखालचा मेसेज डिलीट केलेला होता.

गुड मॉर्निंग म्हटलंय की. म्हणजे अजून जीव आहे हे जाणवताच, 'काय झालं असेल? काय म्हणायचं असेल तिला? का बरं डिलीट केला असेल मेसेज? मी आधी का बरं नाही बघितला मेसेज?' असे हजारो प्रश्न डोक्यात गर्दी करु लागले.

मागे एकदा एका मैत्रिणीने फेसबुकवर मेसेज करून फोटो मागितला होता. तिच्यासाठी अनुवादाचं एक किंचित काम केलं होतं. त्या मासिकासाठी तिला फोटो हवा होता. (जिज्ञासूंनी 'मैत्रिण जेव्हा फोटो मागते' नावाची माझी पोस्ट शोधावी). आजच्या मेसेजवाल्या मैत्रिणीला मी कुठल्याही अनुवादासाठी मदत केल्याचं मला आठवत नव्हतं. मग तिला माझा फोटो कशासाठी हवा असेल? असा प्रश्न आपोआप मनात आला. आधीची मैत्रिण दक्षिण गोलार्धातली होती. यावेळची माझ्याच शहराजवळ होती. मग 'फोटो कशाला? हवं तर प्रत्यक्ष भेटूया' असा प्रस्ताव माझ्या डोक्यात तयार होत होता.

कुठला शर्ट घालावा, बाईकने जावं की कारने याबद्दल एक मन विचार करु लागलं. आणि हात पुन्हा पुन्हा केसांवरून, दाढीवरून फिरवत; पोट आत घेत मी नमस्काराचा मेसेज पाठवून चमत्काराची वाट बघू लागलो.

मग झालेला संवाद याप्रमाणे

सुंखासुठे : कसा आहेस?

मी : मस्त आणि थोडा जाडा. (आपण अगदीच गंभीर नाही आहोत, आणि प्रत्यक्ष भेटीत छान गप्पा मारु शकतो याची एक झलक दाखवण्यासाठी मी माफक विनोद केला.)

सुंखासुठे : हा हा हा.. ते चांगलंय. तू जाडाच बरा.

मी (प्रकट) : (जाडाच बरा म्हणजे कौतुक आहे की टोमणा ते न कळल्याने) बोल. काय काम काढलंस? आज कशी काय माझी आठवण आली?

मी (स्वगत) : का गं असं बोलतेस. अगं मी गंमत केली. दीक्षित डायेट केल्यापासून मी तितका जाडा नाही राहिलो. फोटो हवाय का माझा? कशाला उगाच? आपण प्रत्यक्ष भेटूया की.

सुंखासुठे : जरा एक काम होतं.

मी : एक काय दहा कामं सांग. हा हा हा.

सुंखासुठे : अरे मी एका फेसबुक ग्रुपवर आहे.

मी : अरे वा ! फेसबुकचा फार चांगला वापर करतेस तू. (आता तिने काहीही सांगितलं असतं तरी मी अरे वा च म्हटलं असतं)

सुंखासुठे : तर ना , त्या ग्रुपवर एकाने मंदीबद्दल लिहिलं आहे. त्याच म्हणणं आहे की आता आपल्या रुपयाचं डिव्हॅल्यूएशन करावं लागेल. मला कळलं नाही. हे डिव्हॅल्यूएशन काय आहे ते. मग मला आठवलं की गेले काही दिवस तू तुझ्या भिंतीवर मंदीवर फार काही काही लिहितोय. म्हणून म्हटलं तुलाच विचारावं.

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मेसेज माझ्यासाठी नसून मंदीसाठी होता. आणि मग एकाएकी माझ्यात शिक्षकाचा संचार झाला. कुणी शंका विचारली की मी गप्प बसत नाही. मग मी रिसेशन म्हणजे काय? त्याची कारणे? त्यातून बाहेर पडण्याचे उपाय? त्यातील जोखीम? सरकारची जबाबदारी, सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी, चलनाचा विनिमय दर, डेप्रीसिएशन आणि डिव्हॅल्यूएशन मधला फरक अशी सगळी माहिती लिहून पाठवली. माझा स्वभावच तसा आहे. कुणी काही विचारलं की शंका विचारणाऱ्यापेक्षा माझ्या मनाचं समाधान होईपर्यंत मी थांबत नाही.

सगळं लिहून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की समोरची मैत्रिण कधीची ऑफलाईन गेली आहे. म्हणजे मी इतका वेळ एकटाच बोलत होतो तर. भानावर आल्यावर मी घड्याळाकडे पाहिलं. तर क्लासला पंधरा मिनिटं उशीर झालेला होता. कधी नव्हे ते इनबॉक्स मध्ये आलेली मैत्रिण ऑफलाईन गेलेली होती. काय करावे ते न कळल्याने मी जड अंतःकरणाने शेवटचा मेसेज टाईप केला, 'अजून काही माहिती हवी असल्यास नि:शंकपणे शंका विचार.' आणि निःशंकपणे शंका या शब्दावर माझा मीच खुश झालो. माझा स्वभावच तसा आहे. चटकन खुश होणारा.

त्याच खुशीत क्लासला जाण्यासाठी स्कुटरला किक मारून निघालो. फक्त एकंच शंका आहे की सुंखासुठे आता परत इनबॉक्समधे येईल का?

टीप : सदर घटना सत्य आहे की काल्पनिक ते अजून ठरलेले नाही. त्यामुळे सुंखासुठे कोण त्याबद्दल फार चौकशा करू नयेत.

No comments:

Post a Comment