Tuesday, September 3, 2019

Stiff Upper Lip

मराठी माध्यमातून शिकणाऱ्या आणि मराठी वस्तीत रहाणाऱ्या मुलांच्या आयुष्यात इंग्रजी पुस्तके जशी उशीरा येतात तसंच माझंही झालं. अगदी कॉलेजात गेलो तरी माझा पिंड मराठी लेखकांच्या लेखनावर आणि इंग्रजी लेखकांच्या मराठीतील अनुवादावर पोसला जात होता. त्यामुळे हा बाबा माझ्या आयुष्यात येण्याची शक्यता अजिबात नव्हती.

माझ्यावर ज्यांनी गारुड केलं त्या पुलंनीही याच्यावर एक लेख लिहिला होता. तो लेख इयत्ता आठवीत समोर येऊनही का कुणास ठाऊक पण तो सोडून पुलंच्या त्या पुस्तकाची पारायणं केली होती.

नंतर सीए करायला लागलो. इंग्रजी माध्यमात शिकलेली प्रेयसी आयुष्यात आली. तिने इंग्रजीत वाचलेली पुस्तकं मराठीत अनुवादित स्वरूपात उपलब्ध असल्याने आणि मी ते अनुवाद वाचलेले असल्याने माझी कॉलर ताठ ठेवणं मला सोपं गेलं होतं. पण 'शिखरावर पोहोचणं सोपं, तिथे टिकणं अवघड' या नियमाप्रमाणे प्रेयसीवर छाप पाडणं सोपं पण तिची निवड उत्कृष्ट आहे याची तिला सातत्याने खात्री पटवत रहाणं अवघड असतं. त्यामुळे मी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीतला आळस झटकला आणि इंग्रजी पुस्तकं इंग्रजीत वाचायच्या मागे लागलो.

डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररीत माझं खातं होतं. तिथे इंग्रजी पुस्तकांचा भाग मर्यादित होता. जेम्स हॅडली चेसच्या पुस्तकांची मुखपृष्ठ समंथा फॉक्स आणि इतर ललनांच्या अर्ध अनावृत्त फोटोंचं आवरण घेऊन असल्याने आमच्या चाळीतल्या घरात तीर्थरूपांसमोर वाचणं अशक्य होतं. सिडनी शेल्डन, जेफ्री आर्चर मराठीत वाचून झाले होते. त्यामुळे आमच्या फ्रेंडस लायब्ररीत माझ्या इंग्रजी वाचनासाठी अतिशय तुटपुंजे पर्याय उपलब्ध होते. मग एक दिवस घाईघाईत दोन पूर्ण पोषाखातील पुरुषांचं चित्र मुखपृष्ठावर असलेलं पुस्तक घेऊन घरी आलो. लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव, काही न बघता केवळ घरी स्वीकार होईल असं मुखपृष्ठ आहे म्हणून आणलेल्या त्या पुस्तकाने माझ्या सीएच्या अभ्यासाचं ओझं इतकं सहजगत्या हलकं केलं की ज्याचं नाव ते. शिवाय प्रेयसी आणि तिची बहीण दोघी 'अय्या, कित्ती हुश्शार आहे हा मुलगा' अशा नजरेने बघू लागल्या ते वेगळंच. तीर्थरुपांच्या करड्या नजरेचा एक अनपेक्षित फायदा झाला तो असा.

त्यानंतर हा बाबा माझ्या आयुष्यात आला तो कायमचा. मग एकदा पुन्हा पुलंचं ते पुस्तक समोर आलं. त्यातला तो मी नेहमी काणाडोळा केलेला लेख समोर आला. यावेळी मात्र तो वाचला. जेव्हा पुलंना आपण विनोदी लेखन करतो याचा थोडाफार गर्व होतो तेव्हा ते या माणसाचं कुठलंही पुस्तक हातात घेतात, कुठल्याही पानावरून सुरुवात करतात आणि एखाद्या वाक्यातंच हा बाबा त्यांचं गर्वहरण करतो हे कळल्यावर आपली आवड फार छान आहे यावरचा विश्वास वाढला.

नंतर मुंबईत फिरत असताना टेलिग्राम अॉफिससमोरच्या रस्त्यावरच्या जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्याकडे त्याचा फोटो असलेलं पुस्तक मिळालं म्हणून अत्यंत आनंदाने विकत घेतलं आणि त्याकाळच्या व्हिटी स्टेशनवरच्या पीसीओ बूथवरुन प्रेयसीला फोन करून आनंद शेअर केला होता, ते अजूनही आठवतंय.

त्याचा फोटो त्याच्या ब्रिटिश वंशाला साजेसा होता. स्टिफ अप्पर लिप. बघून कुणाला वाटणार नाही की याला प्रेमाने अख्खं जग प्लम म्हणून ओळखतं आणि याने इंग्रजी भाषिक जगाला आपल्या विनोदाने खळखळून हसवलंय आणि अजूनही हसवतो आहे.


प्लम ऊर्फ पी जी वुडहाऊस म्हणजे इंग्रजी साहित्यातील विनोदाचं झळाळतं पान. अक्षरशः शेकड्याने ग्रंथापत्य प्रसवणारी त्याची लेखणी अजोड आहे. बर्टी वूस्टर आणि जीव्हज्, स्मिथ (ज्याच्या आडनावाच्या सुरवातीला P असतो) मि. मुलीनर, लॉर्ड एम्सवर्थ, उल्क्रिज हे सगळे वुडहाऊसचे मानसपुत्र आपापल्या आयुष्यात जी धमाल उडवत असतात ती वाचणं हा शब्दातीत आनंद आहे.

फ्रेंड्स लायब्ररीत हाताला लागलेलं याचं पहिलं पुस्तक बर्टी वूस्टर आणि जीव्हज् चं असल्याने मला या दोघांवरची पुस्तकं त्याच्या इतर मानसपुत्रांपेक्षा जास्त आवडतात.

हा बर्टी वूस्टर, पहिल्या महायुद्धापूर्वीच्या इंग्लंडात रहात असतो. उमराव घराण्याशी संबंध असल्याने याला उपजीविकेसाठी काही कामधंदा करावा लागत नाही. याच्या अगाथा (कजाग) आणि डालिया (प्रेमळ) अशा दोन काकवा (किंवा मावश्या किंवा आत्या) असतात. (अमृतातेही पैजा जिंकेवाल्या मराठीत काकू, मावशी आणि आत्या या तीन नात्यातला दिसणारा फरक वाघिणीच्या दूधवाल्या इंग्रजीत कळत नाही) तर या काकवा किंवा मावश्या वूस्टरची काळजी घेत असतात. जन्मजात वेंधळेपणा अंगी असलेल्या बर्टीचा मदतनीस (वॅले) म्हणजे जीव्हज्.

दिवसभर लंडनच्या ड्रोन्स क्लबमधे मित्रांबरोबर पत्ते किंवा अन्य खेळ खेळायचे, स्वतः वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडायचं किंवा मित्रांना असं प्रेमात पडलेलं पहायचं, मग त्यांना मदत करायला जायचं, किंवा मग त्यांना प्रेमातून बाहेर पडण्यासाठी मदत करायला जायचं, त्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवायच्या, त्यात गोंधळ घालायचा आणि मग शेवटी जीव्हज् कडून मदत घ्यायची, मधे मधे काकवा (किंवा मावश्या किंवा आत्यांकडून ) शिव्या खायच्या किंवा चिमटे काढणारं कौतुक करुन घ्यायचं,शेवटी पुन्हा बॅचलरंच रहायचं, ही बर्टीची खासियत. जीव्हज् याला सांभाळून घेत असतो.

'श्री. वूस्टर यांचं वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणं वापरता येतील पण हुशार हे विशेषण काही लागू होत नाही' हे जीव्हज् चं आपल्या मालकाबद्दलचं मत. आणि आपण जीव्हज् च्या हातातील बाहुला नाही हे दाखवण्यासाठी वारंवार बर्टीने 'मखमली हातमोजामधील पोलादी पंजा' दाखवण्याचा प्रयत्न करणं हे या दोघांच्या नात्याचं सूत्र. कुठे खलनायक नाही, खून नाही, बलात्कार नाही, अन्याय नाही. अगदी साधी सोपी पण अतुलनीय शब्दात मांडलेली गोष्ट. अतुलनीय अशासाठी की वुडहाऊसचा विनोद प्रसंगनिष्ठ असला तरी शब्दांचे फुलोरे इतके सुंदर की त्यांचा अनुवाद करणं अतिशय कर्मकठीण. त्यामुळे वुडहाऊस वाचावा तो इंग्रजीतच. वुडहाऊस वाचण्याची संधी मिळाली, केवळ या एकमेव कारणासाठी मेकॉलेच्या कट्टर विरोधकांनीही मेकॉलेचे आभार मानायला हरकत नाही.

या बर्टी वूस्टर आणि जीव्हज् वर बीबीसीने सिरीयलंही केली होती. ज्यात सध्या डॉ हाऊस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यू लॉरीने वेंधळ्या वूस्टरचं आणि स्टीफन फ्रायने जीव्हज् चं काम केलं होतं. सिरीयल अतिशय सुरेख असली तरी तिला पुस्तकाची सर नाही हे ही खरं.

दोन तीन महिन्यांपूर्वी सकाळी चालायला जाताना ऐकायला हवी म्हणून डॉक्युमेंटरी शोधत होतो. सहज गंमत म्हणून पी जी वुडहाऊस सर्च केलं आणि बीबीसी सिरीयलच्या व्हिडिओज् खाली एक नवीन व्हिडिओ दिसला आणि जो आनंद झाला की 'माझा आनंद गगनात मावेना' हा वाक्प्रचार अनुभवता आला. तो व्हिडिओ म्हणजे वूस्टर आणि जीव्हज् च्या पुस्तकांचं अभिवाचन होतं. 1992 - 95 मधे ही अॉडियो बुक्स रेकॉर्ड केली गेली होती आणि आता त्या सीडीजचे संच युट्यूबवर कुणीतरी अपलोड करुन ठेवले आहेत.



लगेच जवळच्या मित्रमैत्रिणींना याची लिंक दिली आणि दोन्ही मुलांना म्हटलं आता हे ऐकल्याशिवाय तुमची खैर नाही.

आज दुपारी एका पोस्टवर 'मी जर घोड्याच्या शर्यतीत एखाद्या घोड्यावर पैसे लावले तर तो इतका हळू धावेल की तो दुसर्‍या शर्यतीत पहिला येईल' हे वुडहाऊसच्या वाक्यावर बेतलेलं वाक्य लिहिलं आणि ते इथल्या मैत्रिणीला आवडलं. तेव्हा म्हटलं की आपल्याला मिळालेला खजिना सगळ्यांबरोबर वाटावा. म्हणून ही पोस्ट.

No comments:

Post a Comment