Tuesday, September 3, 2019

कुत्रा आणि आयुष्याचं प्रयोजन

सकाळी क्लासला पोचलो. कारमधून उतरलो. बॅग काढत होतो. पायाजवळ कुणीतरी आहे असं वाटलं. बघितलं तर गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा. मी बॅग घेतली. निघालो. कुत्रा माझ्याबरोबर निघाला.

थोडा पुढे गेलो आणि आठवलं की बहुतेक काचा वर करायच्या राहिल्यात. मागे वळलो. कुत्राही वळला. कारपर्यंत गेलो. खरंच मागच्या काचा वर करायच्या राहिल्या होत्या. गाडी चालू करताना खाली केलेल्या काचा नंतर एसी चालू करताना वर करायला विसरलो म्हणजे आपण absent minded professor बनत चाललो आहोत हे जाणवून एकाच वेळी हसूही आलं आणि दुःखही झालं. कुत्र्यानेही एक डोळा बारीक आणि एक डोळा मोठा करुन माझ्या भावनांना साथ दिली.

काचा वर करुन पुन्हा क्लासकडे वळलो. तर कुत्राही माझ्यासोबत निघाला. बारीक डोळा तसाच होता. मग मला जाणवलं की मगाशी तो माझ्या हर्ष खेदाच्या भावनांशी तद्रूप झाला नसून त्याचा एक डोळा बारीकंच असावा. किंवा मग त्याचा मालक रोज सकाळी आस्था चॅनेल बघून कपालभाती / सिंह आसन वगैरे करत असताना कुत्र्याने 'मी तर कायम जीभ बाहेर काढून असतो. त्यामुळे सिंह आसन माझ्यासाठी नसून, बहुतेक डोळा बारीक करण्याचं आसन माझ्यासाठी आहे' असा विचार केला असावा.

कुत्रा बरोबर का चालत असावा त्याचा विचार करताना मला Dark Knight मधला जोकर आठवला. I am like a mad dog chasing cars, I wouldn’t know what to do if I caught one, you know, I just do…things.
 


मग वाटलं, 'बरंय आपल्याला काय करायचं आहे ते माहिती आहे. नाहीतर आपणही मॅड डॉग झालो असतो.'

नंतर वाटलं पुढे काय करायचं ते कुत्र्याला माहिती नाही असं आपण ठरवतो. कदाचित कुत्र्याला कारचा पाठलाग शक्य तोवर करायचा असेल. त्याचं प्रयोजन अल्पकालीन आणि आपलं दीर्घकालीन आहे त्यामुळे आपलं प्रयोजन श्रेष्ठ ठरत नाही. कारण अजून वीस एक वर्ष क्लास चालवल्यावर पुढे काय करायचं आहे ते मलातरी कुठे माहिती आहे? म्हणजे एका अर्थाने मी आणि तो रामदेव बाबाचा चतुष्पाद शिष्य सारखेच. फक्त आम्हा दोघांना चालायला / पळायला लावणाऱ्या प्रयोजनचा काळ कमीजास्त आहे. तो साक्षात्कार झाला आणि ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवल्यानंतर बघणाऱ्यांना जे वाटलं असेल तशी माझ्या मनाची अवस्था झाली.

त्याच अध्यात्मिक अवस्थेत मी कुत्र्याकडे अतीव प्रेमाने पाहिलं. त्यानेही लहानमोठ्या डोळ्यातून माझ्याकडे तसंच पाहिलं. मनात म्हटलं यालाही तीच अनुभूती झाली असेल की काय? त्यालाही माझ्याकडे बघून तसाच प्रश्न पडला असेल असं वाटून मला हसू आलं. मग Life of Pi मधल्या Pi च्या वडिलांनी प्राण्यांच्या डोळ्याबद्दल सांगितलेला सल्ला आठवला.

मग मला युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणाची गोष्ट आठवली. पण मी हिमालयात चालत नसून क्लाससाठी चालत असल्याने आणि मला चार भाऊ नसल्याने शिवाय माझ्याकडे भाकरतुकडा नसल्याने मी याबद्दल फार विचार करणं टाळलं. मी विचार करणं टाळल्यावर कुत्र्यानेही टाळलं असावं कारण त्याने चालण्याचा वेग कमी केला आणि मला एकट्याला पुढे जाऊ दिलं. वळून बघितलं तर त्याला दुसरं प्रयोजन सापडलं होतं. एका सुस्वरूप ललनेच्या बाजूने चालण्यात तो मग्न झाला होता. म्हटलं युधिष्ठिराच्यावेळी हिमालयात सुस्वरूप ललना नव्हती म्हणून त्या कुत्र्याला स्वर्गात प्रवेश मिळाला. नाहीतर कदाचित पुन्हा दुसऱ्या कुणाबरोबर शेपूट हलवत फिरत राहिला असता.

कुत्रा गेला आणि मी आज शिकवायचा टॉपिक, रिटायरमेंट अॉफ पार्टनरचा विचार करायला मोकळा झालो.

पुढची वीस वर्षे काय करायचं ते माहिती असल्याने मला धावण्यापासून / चालण्यापासून / शिकवण्यापासून बाजूला होता येणार नाही. नंतर कदाचित माझा त्यातला रस संपेल आणि मग ज्या सहजतेने त्या रामदेवबाबाशिष्याने माझ्याबरोबर आज चालणं सोडलं त्या सहजतेने मीही शिकवणं सोडीन. दुसऱ्या कुठल्यातरी प्रयोजनामागे लागेन. फक्त शिकवण्यातला माझा रस संपायच्या आत विद्यार्थ्यांचा माझ्यातला रस संपू नये हीच इच्छा.

एका कुत्र्याने माझ्यासारख्या absent minded professor ला इतकं सगळं इतक्या चटकन शिकवलं म्हणून मला दत्तगुरुंबरोबरच्या चार कुत्र्यांना चार वेद का म्हणत असावेत ते कळलं.

1 comment: