Tuesday, September 3, 2019

अजून काय हवं आयुष्यात

आवडत्या माणसांबरोबर संध्याकाळ छान जावी. मग वाढदिवसाला मिळालेलं पुस्तक वाचता वाचता रात्री लवकर झोपावं. त्यामुळे पहाटे साडेतीनलाच जाग यावी. मग फेसबुक चाळताना जिवलग मित्राने शेअर केलेल्या एकाच कृष्णभजनाच्या तीन सादरीकरणाच्या लिंक्स दिसाव्यात. घरातले सगळे झोपले आहेत म्हणून लवकर पाच वाजायची आपण वाट पहावी.

पाच वाजताच आधी ते भजन ऐकावं. मग मद्रास क्वार्टेट ने सादर केलेली त्याच भजनाची लिंक उघडावी. ते ऐकून मन तृप्त होत असताना खाली युट्यूबने सजेस्टेड व्हिडिओमधे पद्मश्री डॉ काद्री गोपालनाथ यांच्या एका प्रयोगाची लिंक दाखवावी. आपल्याला सॅक्सोफोनमधलं काही कळत नाही हे माहिती असूनही त्या फोटोत एक तबलावादक आणि एक मृदुंगवादक दिसतो म्हणून आपण ती लिंक ओपन करावी आणि भारतीय तालवाद्यांनी आपली पहाट, आपलं घर आणि आपलं मन भारुन टाकावं.

मृदुंगम् वादक श्री. बी. हरिकुमार आणि तबला वादक श्री. राजेंद्र नाकोडा या दोघांनी आपल्याला घडवून आणलेल्या दैवी स्पर्शामुळे डोळ्यातून घळाघळा पाणी वहावं. युट्यूबवरील कमेंट्स वाचताना एका कमेंटकर्त्याने 'That man playing mrudungam resembled a lion... His music roared' केलेली कमेंट वाचून. आपण काहीच केलेलं नसताना केवळ तालवाद्य आवडतात म्हणून आपण उगाचंच खूष व्हावं.

आणि मग इथे येऊन पोस्ट टाईप करताना; संध्याकाळ छान करणाऱ्यांना, वाढदिवसाला पुस्तक भेट देणाऱ्यांना, कृष्णभजन शेअर करणाऱ्या मित्राला, युट्यूबच्या अल्गोरिदम् ला की संगीतस्वर्ग उभा करणाऱ्या त्या गंधर्वांना, की ती सुंदर कमेंट करणाऱ्या श्रोत्याला; यापैकी कुणाला धन्यवाद द्यावेत तेच न कळावं. आणि बाकी काही नसून इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत म्हणजे आपण भाग्यवान आहोत यावर आपला विश्वास बसावा. अजून काय हवं आयुष्यात?


No comments:

Post a Comment