Tuesday, September 3, 2019

माझा गॉगल

माझ्या लहानपणी गॉगल ही फक्त श्रीमंतांनी घालायची गोष्ट होती. त्यामुळे मी श्रीमंत होण्याच्या मागे लागलो. बाबा म्हणाले श्रीमंत होण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. म्हणून रात्र रात्र जागून अभ्यास करु लागलो. नंतर रेबॅनचा गॉगल घेण्याइतके पैसे कमवू लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला सतत घालावा लागणारा चष्मा लागलेला आहे. त्यामुळे, आणि एकंच नाक व दोनंच डोळे असल्यामुळे, नाकावर ठेवायचा डोळ्यांचा तो दागिना, माझ्या आयुष्यात न येण्याची शक्यता पक्की होत चालली होती.

पण आपण पसंत केलेल्या ध्यानाला सजवावं असं माझ्या 'नैनोमें सपना सपनोमें सजना' गाणं म्हणणारीने ठरवल्यामुळे माझ्या आयुष्यात रेबॅन आला.

तो घालून गोव्याच्या समुद्रात बागडत असताना, त्या रत्नाकराला माझ्याशी खेळावसं वाटलं. म्हणून त्याने पाठवलेल्या एका मोठ्या लाटेला मी धीरोदात्तपणे सामोरा गेलो असताना गडबड झाली. लाट ओसरली पण जाताना माझा गॉगल आणि धीरोदात्तपणा दोन्ही घेऊन गेली.

'साक्षात रत्नाकराला तू दिलेलं रत्न इतकं आवडलं की तो ते घेऊन गेला ' वगैरे कामचलाऊ वाक्य मी किनाऱ्यावरील गृहलक्ष्मीकडे बोललो, तेव्हा तिने जो कटाक्ष टाकला तो पाहून मला गोव्याच्या त्या समुद्रकिनारी आपोआप 'ताथैया ताथैया हो... दुम् तननन दुम् तननन' असं पार्श्वसंगीत ऐकू येऊ लागलं. तसंच, लक्ष्मी आणि हलाहल दोघेही सहोदर आहेत याबद्दल मला खात्री पटली.

नंतर कधी गॉगल माझ्या वाटेला गेलेला नाही आणि मीही फिट्टं फाट करून त्याच्या वाटेला गेलेलो नाही.

No comments:

Post a Comment